मुकेश अंबानींच्या गुजरातमधील प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात येणार 1000 मगरी

ccjdw

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रमिला कृष्णन
    • Role, बीबीसी तामीळ प्रतिनिधी

दक्षिण भारतातील मगरींच्या प्रजनन केंद्रातून जवळपास 1000 मगरी 1931 किलोमीटर अंतरावर वसलेल्या एका प्राणीसंग्रहालयात हलवण्यात येणार आहेत.

हे प्राणी संग्रहालय मुकेश अंबानींच्या मालकीचं आहे.

तामिळनाडूच्या मद्रास क्रोकोडाइल बँक ट्रस्टकडून या मगरी गुजरात राज्यातील ग्रीन्स प्राणीसंग्रहालय बचाव आणि पुनर्वसन केंद्राला पाठवाव्यात म्हणून भारताच्या प्राणीसंग्रहालय नियामकाने मागच्या वर्षी हिरवा कंदील दिला होता. आतापर्यंत या प्राणीसंग्रहालयात 300 मगरी पाठवण्यात आल्यात.

मद्रास क्रोकोडाइल बँक ट्रस्टच्या अधिकार्‍यांनी सांगितलं की, मगरींच्या संख्या जास्त असल्याने गर्दी तर होतेच आहे शिवाय त्यांच्यात आपापसात मारामारी होते, त्यामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलंय.

चेन्नईमध्ये असलेल्या या प्रजनन केंद्राचे क्युरेटर निखिल व्हिटेकर सांगतात, "या प्रजनन केंद्रात मगरींची संख्या जास्त असल्याने दरवर्षी शेकडो अंडी नष्ट करावी लागतात. या उर्वरित मगरींना निदान राहण्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध व्हावा या हेतूने त्यांचं स्थलांतर करण्यात आलंय."

मागच्या अनेक वर्षात या केंद्रातून भारतातील अनेक संरक्षित क्षेत्रांमध्ये आणि प्राणीसंग्रहालयात मगरी पाठवण्यात आल्यात. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर मगरींचं स्थलांतर करण्याची ही पहिलीच वेळ असावी.

गुजरातमधील जामनगर शहरात 425 एकरवर पसरलेलं हे प्राणीसंग्रहालय तीन वर्ष जुनं आहे. या प्राणीसंग्रहालयाने त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, "या मगरींना पुरेशी जागा, अन्न दिलं जाईल तसेच त्यांची योग्य काळजी घेतली जाईल."

मगरी, मुकेश अंबानी संग्रहालय

फोटो स्रोत, JERIN SAMUEL

फोटो कॅप्शन, मगरी

चेन्नईस्थित हे प्रजनन केंद्र 1976 साली स्थापन करण्यात आलं. मगरींच्या 'मगर्स, खाऱ्या पाण्यातील मगर, घरियाल' या मुख्य: तीन प्रजातींचं संरक्षण करण्याच्या उद्देशाने या केंद्राची स्थापना झाली होती.

या केंद्रात सुरुवातीच्या काळात इथं फक्त 40 मगरी होत्या. मगरींचं संरक्षण करण्याच्या आणि प्रजनन वाढवण्याच्या उद्देशाने या केंद्रात काम सुरू होतं. मगरींच्या संख्या वाढल्यावर त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार होतं.

पण 1994 मध्ये केंद्र सरकारने कायदा करून मगरींना नैसर्गिक अधिवासात सोडण्यावर बंदी आणली. प्रजनन केंद्राचे क्युरेटर निखिल व्हिटेकर सांगतात की, "सरकारच्या या निर्णयानंतर प्राणिसंग्रहालय तसेच वन्यजीव अभयारण्यांमध्ये या मगरींना हलवण्यात आलं."

आता तर वन्यजीव क्षेत्र कमी होत चालली आहेत. तर दुसरीकडे प्राणीसंग्रहालये ही थोडक्या प्रमाणात मगरी घेत आहेत. त्यामुळे अतिरिक्त मगरी पाठवायच्या कुठे असा प्रश्न पडलाय.

कारण त्यांच्यासाठी या प्रजनन केंद्रात पुरेशी जागा सुद्धा नसल्याचं अधिकारी सांगतात.

मगरी, मुकेश अंबानी संग्रहालय

फोटो स्रोत, JERIN SAMUEL

फोटो कॅप्शन, मगर केंद्र

प्रजनन केंद्रातील अधिकारी पुढे सांगतात की, "या मगरींना लाकडी पेट्यांमध्ये भरून तापमान नियंत्रित केलेल्या वाहनातून जामनगरला पोहोचवण्यात येईल"

निखिल व्हिटेकर सांगतात की, "ज्या मगरी जामनगरला पाठवण्यात येणार आहेत त्यांना आठवड्यातून फक्त एकदाच खायला द्यावं लागतं. त्यांचा प्रवास सुरु होण्याआधी त्यांना खायला दिलं जाईल."

पण प्रजनन केंद्राच्या मगरी स्थलांतरित करण्याच्या हेतूवरच आता शंका उपस्थित होऊ लागलीय.

प्रजनन केंद्रात जागा नाही म्हणून मगरी प्राणिसंग्रहालयात पाठवण्याच्या मुद्द्यावर वन्यजीवशास्त्रज्ञ पी. कन्नन म्हणतात की, मगरींना त्यांच्या नव्या घरातही बंदिस्त जागेत ठेवता येणार नाही, आणि ही समस्या कायम राहील."

मगरी, मुकेश अंबानी संग्रहालय

फोटो स्रोत, JERIN SAMUEL

फोटो कॅप्शन, सुसर

कन्नन सांगतात की, "नर मगरींच्या नसबंदीची कोणतीही सोय सध्या उपलब्ध नाही. सोबतच नर आणि मादी मगरींना जास्त काळ वेगळं ठेवता येणार नाही."

मग जामनगर मधील प्राणिसंग्रहालय या मगरींची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी काय करणार? याविषयी जाणून घेण्यासाठी बीबीसीने गुजरातमधील या प्राणीसंग्रहालयाशी संपर्क साधला, पण त्यांनी यावर कोणताच प्रतिसाद दिलेला नाही.

निलगिरी वन्यजीव आणि पर्यावरण संघटनेचे सचिव एस. जयचंद्रन सांगतात की, प्राण्यांचं अशपद्धतीने स्थलांतर करण्याऐवजी भारताने वन्यजीवांसाठीच्या संरक्षित क्षेत्रात वाढ केली पाहिजे.

ते पुढं म्हणतात की, "जर जंगलांमध्ये मगरींसाठी पुरेशी जागा असती, तर आज त्यांना प्राणीसंग्रहालयात हलवावं लागलं नसतं."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त