शेकडो मगरींच्या घोळक्यात गावकरी 'या' तलावात आंघोळ करतात, कपडे धुतात..

फोटो स्रोत, Anirudh Vasava
गुजरातमधील मलताज गावात लोक मगरीच्या सान्निध्यात राहतात. अंगावर काटा आला ना? पण असं गाव अस्तित्वात आहे. जानकी लेनिन यांनी या गावात जाऊन याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
"सकाळी 10 च्या सुमारास मगरी बाहेर येतात," तिथली एक स्त्री मला कपडे वाळत घालता घालता सांगत होती.
मी तिच्या घरात म्हणजे मलताज या गावाच्या वऱ्हांड्यात होते. तिच्या घराच्या समोर असलेल्या एका तळ्याचं मी निरीक्षण करत होते.
सामान्यपणे जसं तळं असतं तसंच ते तळं होतं. तिथे असलेल्या शेवाळाच्यामध्ये या मगरी होत्या. मगरींची ही प्रजाती इतर प्रजातींपेक्षा धोकादायक मानली जाते. मी ज्या स्त्रीशी बोलत होते तिच्या आधीच्या पिढ्याही मगरीबरोबर राहत असल्याचं तिने मला सांगितलं.
बहुतांश जागी मगर दिसली की लोकांची पाचावर धारण बसते. मात्र साबरमती आणि माही नदीने वेढलेल्या चरोतर भाग या परिस्थितीला अपवाद आहे.
चरोतर जिल्ह्यातील 30 गावांमध्ये एकूण 200 मगरी राहतात. असं एका निसर्ग संवर्धन संस्थेचं म्हणणं आहे. निसर्ग संवर्धनासाठी ही संस्था काम करते.
इथल्या प्रत्येक तळ्यात मगरी असल्याचा धोक्याचा इशारा देणाऱ्या पाट्या आहेत. मात्र ही तळी गावकऱ्यांच्या दिनचर्येचा भाग आहेत. त्यामुळे गावकरी या सूचनेकडे फारसं लक्ष देत नाहीत आणि तिथे पोहायला जातात, अंघोळ करतात, कपडे धुतात, अगदी गुरंढोरंही याच पाण्यात धुतात.

फोटो स्रोत, Niyati Patel
मगरीही याच पाण्यात डुंबतात, मासे पकडतात आणि आपल्या पिलांना मोठं करतात. त्या किनाऱ्यावर जातात, उन खातात. ज्या परिसरात गुरंढोरं चरायला येतात, लहान मुलं खेळतात तिथेच या मगरीही जातात.
माणसं आणि मगरी एकमेकांना काहीही त्रास न देता आनंदाने राहतात.
सोन्याची खाण
चरोतर याचा अर्थ सोन्याची खाण असा होतो. इथल्या शेतकऱ्यांना शेतीतून बरंच उत्पन्न मिळालं. म्हणून या भागाला चरोतर असं म्हणतात. इथं चारीबाजूंना तंबाखूचे मळे पसरलेले दिसतात. तिथे रानटी प्राण्यांचा लवलेषही दिसत नाही. मग या मगरी कुठून आल्या, असा प्रश्न पडतो.
काही जणांच्या मते या भागात मगरी आधीपासूनच होत्या. तर काही जणांचं असं मत आहे की 18व्या शतकापासून भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत गायकवाड घराण्याचं या भागावर राज्य होतं.
त्यांनीच मगरी शिकार करण्याच्या उद्देशाने या तळ्यांमध्ये सोडल्या. मात्र हे म्हणणं सिद्ध करणारा ऐतिहासिक पुरावे नाहीत. पण या मगरी नजीकच्या काळात इथं आलेल्या नाहीत, हे मात्र नक्की.
इथल्या मगरींची वागणूक मात्र अजब आहे.
2018 मध्ये जगभरात मगरींच्या हल्ल्यात 18 लोकांचा जीव गेला आहे.
मगरींनी केलेल्या हल्ल्याची माहिती ठेवणाऱ्या CrocBITE या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार चरोतर भागापासून 40 किमी अंतरावर असलेल्या विश्वामित्री नदीतील मगरींनी 2011 ते 2012 या काळात आठ लोकांना जखमी केलं आणि दोन लोकांचा जीव घेतला, असं सरपटणाऱ्या प्राण्यांचे तज्ज्ञ राजू व्यास सांगतात.

फोटो स्रोत, Bhumkcha Rajdeep
नर्मदा नदीवरील सरदार सरोवरातून 300 ते 500 मगरींना हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने तज्ज्ञांमध्ये अस्वस्थता आहे. ज्या ठिकाणी मगरींना हलवण्यात येत आहेत, तिथं त्या व्यवस्थितपणे राहू शकणार नाहीत, अशी भीती तज्ज्ञांना आहे. त्यांच्या मार्गावर येणाऱ्या लोकांशी त्यांचा सामना होईल आणि मानव आणि मगरी यांच्यातील संघर्ष तणावपूर्ण होईल, असं त्यांना वाटतं.
मात्र चरोतर भागात Voluntary Nature Conservancy या संस्थेच्या आकडेवारीनुसार गेल्या 30 वर्षांत फक्त 26 हल्ले झालेत. त्यातील आठ प्रसंगात माणसांना किरकोळ जखमा झाल्यात. 2009 साली झालेल्या एका हल्ल्यात नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.
लोकांनाच हव्यात मगरी
मलताज भागात वन विभागाने एक संरक्षण जाळी उभारली आहे जेणे करून लोक पाण्याचा वापर करतील आणि मगरींपासूनही सुरक्षित राहतील. सरपटणारे प्राणी तसे धोकादायक नसतात असं तिथले स्थानिक लोक सांगतात.
इथं मगरी मनुष्यप्राण्यांबरोबर त्यांना कोणतीही इजा न करता सहज राहतात, असं इथले लोक सांगतात.
तिथले स्थानिक या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या पाठीशी असतात.

फोटो स्रोत, Janki Lenin
पेटली नावाच्या एका खेड्यात तळ्याच्या काठी एक कुटुंब राहतं. त्यांची बकरी मगरींनी खाल्ली. मात्र त्याबद्दल कोणतंही दु:ख व्यक्त न करता ते म्हणाले, "कदाचित ती त्या मगरीसाठीच बनलेली असेल. म्हणूनच तिने खाल्ली असेल."
नदीच्या किनारी अनेक झोपड्यांच्या जवळ उन्हापासून बचाव करण्यासाठी मगरी येतात. मगरींच्या घरट्यांमुळे रस्ता खचण्याचा धोकाही आहे. या गावातली जमीन अशीच खचली. सुदैवाने त्याच कोणी जखमी झालं नाही.
अशा गैरसोयी असल्या तरी इथल्या लोकांना मगरींवर गर्व आहे.
देवा या खेड्यात सगळ्यांत जास्त सरपटणारे प्राणी असले तरी मलताज गावाला मगरींचं गाव म्हणवून घेणं फारच आवडतं.
देवीचं वाहन
तिथल्या लोकांनी मृत मगरीवर अंत्यसंस्कारही केलेत. तसंच खोडियार देवीच्या बाजूला तिचा पुतळाही बांधला. या मृत मगरीचा पुतळा या देवीच्या बाजूला अगदी हौशेने उभी आहे. ही प्रतिमा गावातील अनेक घरांमध्ये बघायला मिळते. या मगरीला देवीचं वाहन मानलं जातं.

फोटो स्रोत, Rom Whitaker
इथल्या लोकांना सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल फारच आस्था आहे. गावचे सरपंच दुर्गेशभाई पटेल तर मगरींना आणखी जागा मिळावी म्हणून गावातील आणखी एक तळं खोदण्याच्या तयारीत आहे.
सूर्य जसा वर आला तसं उन खायला मगरी तळ्याच्या मध्यभागी आल्या. मला तेव्हा बारा मगरी दिसल्या. मात्र ही संख्या आणखी जास्त आहे. मी तिथे एका ठिकाणी मेथी पकोड्यांचा आस्वाद घेत होते. खाली एक कोरडा कालवा होता. तिथे एक मगर सूर्याची किरणं अंगावर घेत होती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








