भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्यासाठीचा योग्य मार्ग कोणता? जाणून घ्या

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओनर एरेम
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हीस
भटके कुत्रे, त्यांची संख्या, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना हा मागील काही दशकांमध्ये जगभरात चर्चेचा आणि चिंतेचा विषय आहे.
यासंदर्भात कोणत्या योग्य उपाययोजना आहेत, कोणत्या देशांना त्यात यश आलं आहे आणि सध्या जगभरात नेमका काय ट्रेंड सुरू आहे याबद्दल माहिती देणारा हा लेख...
रेबीज या आजाराचा धोका जगभरात आहे. या आजारामुळे दरवर्षी जवळपास 60 हजार लोकांचा मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटना (WHO)नुसार यातील 99 टक्के प्रकरणं कुत्रा चावल्यामुळे किंवा कुत्र्यानं ओरखडल्यामुळे होतात.
कुत्रा चावल्यानंतर रेबीज टाळण्यासाठी जरी लस उपलब्ध असली तरी, एखाद्याला चेहऱ्यावर किंवा मज्जातंतूजवळ चावा घेतलेला असल्यास रेबीज प्रतिबंधक लस नेहमीच प्रभावी ठरत नाही.
जुलै महिन्यात अराक्कोनम शहरात चार वर्षांचा निर्मल घराबाहेर खेळत होता. तेव्हा त्याच्यावर भटक्या कुत्र्यानं हल्ला केला. त्या लहान मुलाच्या तोंडाचा कुत्र्यानं चावा घेतला तेव्हा त्याचे वडील नुकतेच घरात गेले होते.
"पाणी पिण्यासाठी मी नुकताच घरात गेलो होतो," असं निर्मल वडील बालाजी यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितलं.
"मी परत आलो तर निर्मलच्या तोंडावर जखमा झालेल्या होत्या. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता," असं ते पुढे म्हणाले.
निर्मलच्या घरच्यांनी त्याला लगेच हॉस्पिटल मध्ये नेलं. तिथं त्याला 15 दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं.
त्यानंतर निर्मलची तब्येत स्थिर झाली, त्याला बरं वाटू लागलं आणि त्यामुळे त्याला हॉस्पिटलमधील सोडण्यात आलं. मात्र घरी आल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये रेबीजची लक्षणं दिसू लागली.
निर्मलच्या घरच्यांनी त्याला लगेच हॉस्पिटल मध्ये नेलं. तिथे गेल्यावर तपासणी झाल्यावर लक्षात आलं की रेबीजच्या विषाणूचा त्याच्या मज्जासंस्थेत संसर्ग झाला होता. त्यानंतर दोनच दिवसात निर्मलचा मृत्यू झाला.
काहीवेळा घरातील वडीलधारे रागावतील या भीतीपोटी लहान मुलं त्यांना कुत्रा चावला आहे, ही गोष्ट घरी सांगतच नाहीत. मात्र यामुळे रेबीज प्रतिबंधक लस वेळेत घेतली जात नाही आणि जोपर्यंत लस घेतली जाते तोपर्यंत खूपच उशीर झालेला असतो.


मुंबईत 1994 ते 2015 या कालावधीत 13 लाख लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला होता. त्यातील 434 लोकांचा रेबीजमुळे मृत्यू झाला.
मात्र हल्ले होणं, चावा घेतला जाणं एवढेच भटक्या कुत्र्यांमुळे असलेले धोके नाहीत.
इंटरनॅशनल कम्पॅनियन अॅनिमल मॅनेजमेंट कोएलिशन (ICAM)या जागतिक स्तरावरील सेवाभावी संस्थेनुसार अनियंत्रित संख्या असलेल्या भटक्या कुत्र्यांमुळे इतरही काही महत्त्वाचे धोके आहेत.
यात रस्त्यावर अपघात होणं, पशुधनाला धोका असणं आणि रस्त्यावरून चालण्यास लोकांनी टाळणं किंवा त्याची चालण्याची भीती वाटणं या धोक्यांचा समावेश आहे.
तुर्कीमधील नवीन वादग्रस्त उपाय
तुर्कीमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या वाढत चालली आहे. तुर्कीतील पशुवैद्यकीय असोसिएशननुसार, तेथील भटक्या कुत्र्यांची संख्या 65 लाख इतकी आहे.
तुर्कीच्या सेफ स्ट्रीट्स असोसिएशननुसार, मागील दोन वर्षात तुर्कीमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू एकतर कुत्र्यानं चावा घेतल्यामुळे झाले आहेत किंवा भटक्या कुत्र्यांमुळे रस्त्यांवर झालेल्या अपघातामुळे झाले आहेत.
यावर्षी जुलै अखेर, तुर्की सरकारनं एक नवीन कायदा मंजूर केला. या कायद्यामुळे देशातील महानगरपालिकांना सर्व भटके कुत्रे पकडून त्यांना पुढील चार वर्षे त्यांच्यासाठी असलेल्या खास निवाऱ्यामध्ये किंवा आश्रयस्थानात न्यावे लागणार आहेत.
या कायद्याची अंमलबजावणी करण्यात अयशस्वी झालेल्या महापौरांना तुरुंगवास भोगण्याची वेळ येऊ शकते.
"भटके कुत्रे लहान मुलं, वयस्क, वृद्ध माणसं आणि इतर प्राण्यांवर हल्ला करतात. त्यांच्यामुळे रस्त्यांवर अपघात होतात," असं या नव्या विधेयकाचा मसुदा संसदेत पाठवल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान म्हणाले.
2004 पासून महानगरपालिकांना कायदेशीरदृष्ट्या भटक्या कुत्र्यांना पकडावं लागतं, त्यांना लस द्यावी लागते आणि त्यांची नसबंदी करून रस्त्यावर ज्या ठिकाणी त्यांना पकडण्यात आलं होतं पुन्हा त्याच ठिकाणी सोडावं लागतं.
या पद्धतीला सीएनव्हीआर पद्धत (CNVR method) असं म्हणतात. म्हणजेच कलेक्ट, न्यूटर, व्हॅक्सिनेट, रिटर्न. अनेक तज्ज्ञांच्या मते भटक्या कुत्र्यांच्या समस्येला आळा घालण्यासाठीचा हा सर्वोत्तम उपाय आहे.
मात्र तुक्रीचे राष्ट्राध्यक्ष इर्दोगान यांच म्हणणं आहे की या पद्धतीचा उपयोग झाला नाही.
कारण या पद्धतीचा योग्य परिणाम होण्यासाठी 70 टक्के भटके कुत्र्यांची नसबंदी करणं आवश्यक आहे, असं तुर्कीश व्हेटर्नरी मेडिकल सोसायटीच्या डॉ. गुले एर्तुर्क यांचं मत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
नव्या कायद्यानुसार भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण केलं जाणार आहे मात्र त्यानंतर त्यांना पुन्हा रस्त्यांवर सोडलं जाणार नाही तर खास त्यांच्यासाठीच्या निवाऱ्यांमध्ये ठेवलं जाणार आहे.
(जर या कुत्र्यांना कोणी पाळीव प्राणी म्हणून ताब्यात घेतलं नाही किंवा त्यांचा मृत्यू झाला नाही तर)
फेडरेशन ऑफ प्रोटेक्टिंग अॅनिमल्स ही संस्था यासंदर्भात इशारा देते की नवीन व्यवस्था खूपच महागडी ठरेल. त्याचबरोबर खुल्या, मोठ्या निवाऱ्यांमध्ये ताकदवान कुत्रे इतर दुबळ्या कुत्र्यांना त्यांचं अन्न खाण्यापासून रोखतील आणि त्यातून वेगानं रोग पसरू शकतात.
डॉ. एली हिबी आयसीएएम (ICAM)च्या संचालक आहेत. त्या म्हणतात की "त्याच प्रकारे अपयशी ठरण्याची ही एक संभाव्य अधिक महागडी पद्धत आहे." तसंच त्यांना वाटतं की यामुळे कुत्र्यांसाठीचे निवारे किंवा आश्रयस्थानं लगेचच भरले जातील.
तुर्की आणि इतर देशांमध्ये या नव्या कायद्याविरोधात निदर्शनं होत आहेत.
यासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यासाठी आम्ही तुर्की अधिकाऱ्यांना संपर्क केला. मात्र हा लेख प्रकाशित होईपर्यंत त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नव्हता.
भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता?
आयसीएएम (ICAM)चे डॉ. हिबी म्हणतात की भटक्या कुत्र्यांची आयुष्याच्या सुरूवातीच्या टप्प्यावर नसबंदी करणं हे त्यांची संख्या कमी करण्याच्या किंवा नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे.
याप्रकारे भटके कुत्रे प्रजनन करू शकत नाहीत. जर पाळीव कुत्रा हरवला किंवा त्यांला सोडण्यात आलं तरीदेखील तो प्रजनन करू शकणार नाही आणि त्यातून भटक्या कुत्र्यांची संख्या वाढणार नाही.
त्या म्हणतात की "भटक्या कुत्र्यांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पत्तीच्या प्रश्नावर उत्तर शोधल्याशिवाय त्यांना रस्त्यावरून उचलून नेण्यामुळे ही समस्या सुटणार नाही."
भटके कुत्रे प्रजनन करतच असतात. एक भटका कुत्रा वर्षभरात 20 पिल्लांपर्यंत जन्माला घालू शकतो. त्यामुळे त्यातील काही भटक्या कुत्र्यांना रस्त्यांवरून उचलून नेल्यामुळे (मारून किंवा अभयारण्यांमध्ये टाकून) दीर्घकाळात त्यांची संख्या कमी होणार नाही, असंही त्या पुढे सांगतात.
भटके कुत्र्यांना मारून टाकणं (काहीवेळा त्यांना सार्वजनिक ठिकाणी मारणं किंवा खास निवाऱ्यांमध्ये ठेवल्यावर त्यांचा मृत्यू होणं) ही गोष्ट अनेकांना क्रूर स्वरुपाची वाटते. किमान प्राणी हक्क कार्यकर्त्यांना तरी तसंच वाटतं.
त्याचबरोबर जे लोक कुत्र्यांना रस्त्यांवर गोळी घातली जात असताना किंवा विष देऊन मारलं जात असताना पाहतात त्यांच्यासाठी ते अस्वस्थ करणारं किंवा त्रासदायक असू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
डेबी विल्सन मानसोपचारतज्ज्ञ आणि मानसिक आरोग्य परिचारिका आहेत. त्यांनी "लहान मुलांच्या हक्कांचं समर्थन करणं म्हणजेच प्राण्यांच्या हक्कांचं देखील समर्थन करणं आहे" या शीर्षकाखाली इंग्लंडमधील हडर्सफील्ड विद्यापीठात पीएच.डी केली आहे.
प्राण्यांबरोबरची वर्तणूक आणि लहान मुलांचं संगोपन यासंदर्भात त्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे.
त्या म्हणतात, प्राण्यांच्या संदर्भातील कौर्य पाहिल्यानं मुलांमधील सहानुभुती, दयेची भावना कमी होते. त्याशिवाय ते जेव्हा मोठे होतात तेव्हा ते प्राण्यांशी आणि इतर लोकांशी क्रूरपणे वागण्याची शक्यता वाढते.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या लहान मुलांच्या मानवाधिकार करारात (United Nations Convention on the Rights of the Child)म्हटलं आहे की प्राण्यांविरोधात केल्या जाणाऱ्या हिंसाचारापासून लहान मुलांना दूर ठेवलं पाहिजे. लहान मुलांना या प्रकारच्या घटना दाखवता कामा नये.
भटक्या कुत्र्यांना नियंत्रणात ठेवण्यासंदर्भात जागतिक पातळीवरील यश
मग अखेर भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात कशी ठेवायची किंवा कमी कशी करायची?
बोस्निया-हेर्झेगोविना आणि थायलंड या दोन्ही देशांना सीएनव्हीआर (CNVR)म्हणजे कलेक्ट, न्यूटर, व्हॅक्सिनेट, रिटर्न या पद्धतीचा वापर करून अलीकडच्या काळात भटक्या कुत्र्यांची संख्या करण्यात यश आलं आहे.
डॉग्स ट्रस्ट वर्ल्डवाईड फाऊंडेशन बोस्निया नुसार, बोस्नियाची राजधानी असलेल्या सर्जेवो या शहरात भटक्या कुत्र्यांचं संकलन करणं, नसबंदी करणं, लसीकरण करणं आणि पुन्हा त्यांना रस्त्यावर सोडणं या पद्धतीद्वारे त्यांना भटक्या कुत्र्यांची संख्या 85 टक्के कमी करता आली आहे. 2012 ते 2023 या कालावधीत हे यश मिळालं आहे.
राजधानीसह साराजेवो कॅन्टोनमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या 70 टक्क्यांनी कमी झाली आहे.
भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाची कामगिरी महत्त्वाची आहे.
भटक्या कुत्र्यांची एकंदरीत संख्या घटण्यासाठी त्यांच्या नसंबदीचा दर 70 टक्क्यांहून अधिक असला पाहिजे. नसबंदीचे हे प्रमाण गाठण्यासाठी बोस्नियाला अधिक पशुवैद्यकांना प्रशिक्षण द्यावं लागलं.
डॉग्स ट्रस्ट्स या सेवाभावी संस्थेनं कुत्र्यांच्या मालकांमध्ये कुत्र्यांच्या नसबंदीच्या फायद्यांबाबत जागरुकता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार देखील करण्यात आला.
देशातील पशुवैद्यकीय चिकित्सालयं किंवा क्लिनिक्सची संख्या दुपटीपेक्षा अधिक करण्यात आली. त्यामुळे पाळीव आणि भटके अशा दोन्ही प्रकारच्या कुत्र्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देता आल्या.
साराजेवा शहरात हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आल्यानंतर 2015 मध्ये उर्वरित कॅंटोनमध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला.
मागील वर्षी थायलंडमध्ये सोई डॉग फाऊंडेशननं ऐतिहासिक कामगिरी केली. मागील 20 वर्षांमध्ये दहा लाख भटके कुत्रे किंवा प्राण्यांची नसबंदी करणारी आणि लसीकरण करणारी ती इतिहासातील पहिली संस्था ठरली आहे.
थायलंडची राजधानी असलेल्या एकट्या बॅंकॉक शहरातच पाच लाखांहून अधिक भटक्या कुत्र्यांना पकडण्यात आलं होतं.
या प्रदीर्घ प्रक्रियेची सुरूवात 2003 मध्ये फुकेत बेटावर अतिशय छोट्या स्वरुपात करण्यात आली होती.
"स्थानिक समुदायामध्ये विश्वास निर्माण करण्यापासून याची सुरूवात होते," असं डॉ. अॅलिक्जा आयझीडॉर्क्झिक म्हणतात. ते सोई डॉग फाऊंडेशनमध्ये इंटरनॅशनल डायरेक्टर ऑफ अॅनिमल वेलफेअर म्हणून कार्यरत आहेत.
फुकेत मध्ये त्यांना भटक्या कुत्र्यांची संख्या 80 हजारांहून 6 हजारांपर्यंत कमी करण्यात यश आलं. या यशानंतर त्यांनी ही पद्धत बॅंकॉकमध्ये अंमलात आणली. बँकॉक शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या खूपच जास्त होती.
मात्र ही वाट सहजसोपी नव्हती. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी आल्या होत्या.
जवळपास पाच वर्षांपूर्वी थायलंडच्या सरकारनं एक योजना सुरू केली होती. या योजनेनुसार प्रत्येक भटक्या कुत्र्याला त्यांच्यासाठी खास निवाऱ्यामध्ये हलवलं जाणार होतं. तुर्की सरकारच्या नव्या धोरणासारखीच ही योजना होती.
मात्र ही योजना व्यवहारी नसल्याचं लक्षात आलं होतं. कारण या खास आश्रयस्थानांमध्ये कुत्र्यांची प्रचंड गर्दी झाली होती.
थायलंड आणि बोस्निया या दोन्ही देशातील प्रकल्पांमुळे तिथल्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. त्याचबरोबर तिथल्या रेबीज आणि कुत्रा चावण्याच्या प्रकरणांमध्ये देखील घट झाली. याचा फायदा भटक्या कुत्र्यांना देखील झाला. कारण यामुळे भटक्या कुत्र्यांचे जीवनमान देखील उंचावलं, असं डॉ. हिबी सांगतात.
भटक्या कुत्र्यांच्या समस्येला तोंड देणारे देश
मोरोक्को या उत्तर आफ्रिकेतील देशातील अधिकाऱ्यांनी अलीकडेच मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्रे मारण्यास सुरूवात केली आहे.
अर्थात मोरोक्को सरकारनं यासाठी कोणतंही कारण दिलेलं नाही.
मात्र काहीजणांना असं वाटतं की मोरोक्कोमध्ये 2025 आफ्रिका कप ऑफ नेशन्सचं आयोजन केलं जाणार आहे. त्याचबरोबर मोरोक्को, फिफा 2030 वर्ल्ड कपच्या यजमानांपैकी एक देश आहे. या कारणांमुळेच सरकारनं हे पाऊल उचललं असावं.
अली इझडाइन हे ह्युमेन सोसायटी ऑफ मोरोक्कोचे संस्थापक आहेत. त्याचबरोबर ते अॅनिमल असोसिएशन्स ऑफ मोरोक्कोचे समन्वयक आहेत. ते म्हणतात की मोरोक्कोकडे टीएनव्हीआर (TNVR)(ट्रीट, न्यूटर, व्हॅक्सिनेट अॅंड रीलीज) कार्यक्रम नाही.

फोटो स्रोत, Getty Images
ह्युमन सोसायटी ऑफ मोरोक्कोच्या अंदाजानुसार देशात तीस लाख भटके कुत्रे आहेत आणि दरवर्षी 5 लाख भटके कुत्रे मारले जातात.
यातील बहुसंख्य कुत्रे सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालून किंवा विष देऊन मारले जातात.
मात्र भटक्या कुत्र्यांना मारून समस्या सुटत नसल्याचं चित्र आहे. इझडाइन म्हणतात की "उरलेले भटके कुत्रे मोठ्या प्रमाणात प्रजनन करतात. शिवाय त्यांचा जगण्याचा दर जास्त असतो. परिणामी ते मारले गेलेल्या कुत्र्यांची जागा घेतात."
इझडाइन यांच्या संस्थेचं म्हणणं आहे की त्यांना अलीकडेच माहिती मिळाली आहे की मोरोक्को सरकारनं आगामी काळात होऊ घातलेल्या दोन मोठ्या फुटबॉल स्पर्धांपूर्वी आणखी भटक्या कुत्र्यांना मारण्यासाठी तीस लाख प्राणघातक इंजेक्शन्सची ऑर्डर दिली आहे.
अर्थात सरकारी यंत्रणेकडून याची घोषणा करण्यात आलेली नाही किंवा ते स्वीकारण्यात देखील आलेलं नाही.
यासंदर्भात आम्ही, मोरोक्को सरकार, कॅसाब्लॅंका महानगरपालिका आणि मराकेश महानगरपालिकेला विचारलं, मात्र हा लेख प्रकाशित होईपर्यंत त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
डॉ. हिबी म्हणतात की सध्या जगभरात भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासंदर्भात सुधारणा होत असल्याचा ट्रेंड आहे. याचा संबंध नागरिकांकडून असलेल्या दबावाशी आहे. कारण लोकांकडून भटक्या कुत्र्यांच्या संख्येला आळा घालण्यासाठी अधिक मानवीय पद्धतींची मागणी केली जाते आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











