गोरिलांचं स्वतःची जखम बरं करण्याचं ज्ञान माणसांसाठी उपयोगी ठरेल का?

स्वत:वर उपचार करणाऱ्या गोरिला आलाय भविष्यातील औषध संशोधनाचा अंदाज

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, हेलन ब्रिग्स
    • Role, पर्यावरण पत्रकार, बीबीसी न्यूज

निसर्ग हे ज्ञानाचं भांडार आहे आणि रोज नवीन संशोधन निघाले तरी आपल्याला अनेक गोष्टी माहीतच नाहीत. याची जाणीव प्रत्येक संशोधनागणिक वाढतच जात असल्याचे दिसते. अनेक औषधी वनस्पतींबद्दल आपल्याला माहिती नाहीये पण त्या वनस्पतींची वैशिष्ट्ये समजून घेण्यास गोरिला आपली मदत करू शकतात असं वैज्ञानिकांना वाटतं.

आफ्रिकेतील गबॉनच्या जंगलात गोरिला हे स्वतःवरच उपचार करुन घेतात. ते ज्या वनस्पतींचा वापर करतात त्यांच्यावर संशोधन केले असता अनेक नव्या गोष्टी सापडल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.

औषधाच्या संशोधनासाठी भविष्यात या गोरिलांची मदत होऊ शकते असा विश्वास वैज्ञानिकांना वाटत आहे.

गबॉनमधील काही संशोधकांनी गोरिलांनी खाल्लेल्या काही पानांचा अभ्यास केला. माणसांवर उपचार करणाऱ्यांनीही त्या पानांचा उपयोग केला होता. त्यातल्या चार पानांमध्ये औषधी गुण होते.

या पानांवर प्रयोगशाळेत संशोधन करण्यात आल्यावर असं आढळलं की यात अँटिऑक्सिडंट आणि अँटिमायक्रोबियल्स (जीवाणूंविरुद्ध लढण्याची क्षमता) खूपच जास्त होती.

एका पानात तर सुपरबग्सशी (जीवाणूंचा एक प्रकार जो प्रतिजैविकांनाही प्रतिरोधक झाला आहे) लढण्याचीही क्षमता होती.

वानर ही प्रजातीसुद्धा औषधी गुण असलेली पानं निवडून स्वत:वर औषधोपचार करते.

जखमी झालेल्या ओरँगउटाननेही एका झाडाचा लेप वापरून जखम बरी केल्याची बातमी आली होती.

गबॉनच्या मुकलाबा डोडू राष्ट्रीय उद्यानात वेस्टर्न लोलँड गोरिलांनी काही झाडं खाल्ल्याची नोंद वैज्ञानिकांनी एका संशोधनात केली आहे.

स्थानिक पातळीवर उपचार करणाऱ्या लोकांच्या मुलाखतींनुसार ही चार झाडं उपयोगी ठरू शकतात. ताम्रवृक्ष, जायंट यलो मलबेरी, आफ्रिकन सागवान आणि अंजीर ही ती झाडं आहे.

या झाडांच्या साली पारंपरिक औषधांमध्ये पोटाचे विकार ते वंध्यत्वापर्यंत सर्व रोगांमध्ये उपचार करण्यासाठी वापरल्या जातात. त्यामध्ये फिनोल्स ते फ्लेव्होनॉइड्स सारखे औषधी गुणधर्म असलेली रसायनं असतात.

स्वत:वर उपचार करणाऱ्या गोरिलांमुळे आलाय भविष्यातील औषध संशोधनाचा अंदाज

फोटो स्रोत, Getty Images

इ. कोलायच्या किमान एका मल्टी ड्रग रेजिस्टंट स्ट्रेनविरोधात प्रतिजैविक क्रिया घडवून आणण्याची क्षमता या चारही पानांमध्ये दिसून आली.

ज्या स्ट्रेन्सची चाचणी केली त्यापैकी ताम्रवृक्षात जीवाणूंशी लढण्याची वैशिष्ट्ये मोठ्या प्रमाणात दिसून आली.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

यावर बोलताना डरहॅम विद्यापीठातील मानववंशशास्त्रज्ञ डॉ. जोआना सेचेल म्हणाल्या, “कोणत्या झाडांची पानं खाणं हे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे, याबाबत गोरिल्ला उत्क्रांत होत गेले आहेत. यावरुन आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, की मध्य आफ्रिकेतील वर्षावनांच्या जैवविविधतेबाबत आपण किती अनभिज्ञ आहोत."

सेचेल यांनी गबॉनमधील जंगलातही संशोधन केले आहे.

गबॉनमध्ये अशी अनेक जंगलं आहे ज्याचा कोणी फारसा अभ्यास केलेला नाही. हत्ती, चिंपाझी आणि गोरिल्ला यांचा अधिवास या ठिकाणी आहे. तसंच तिथे अशी अनेक झाडं आहे ज्याची वैज्ञानिकांनाही कल्पना नाही.

शिकारी आणि रोगराई यामुळे वेस्टर्न लोलँड गोरिल्ला नष्ट झाले आहेत.

International Union for Conservation of Nature (IUCN) च्या रेड लिस्टमध्ये लुप्तप्राय प्राणी म्हणून त्यांची नोद झाली आहे.

हे संशोधन Plos One या मासिकात प्रकाशित झालं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)