प्राण्यांमधल्या माद्या आपल्याला महिला नेतृत्वाबद्दल काय शिकवतात

प्राणी, मानसशास्त्र
फोटो कॅप्शन, महिलांच्या नेतृत्वगुणाबद्दल प्राणी आपल्याला काय सांगतात
    • Author, लेस्ली इव्हान्स ऑगडेन
    • Role, बीबीसी कॅपिटल

तरस, व्हेल्स आणि हत्ती यांच्यातलं साम्य तुम्हाला माहिती आहे का? या प्राण्यांच्या गटांचं नेतृत्व त्यांच्यातल्या एका मादांकडे असतं. आणि केवळ याच प्राण्यांमध्ये नाही तर. एका नवीन संशोधनानुसार 5,000 पेक्षा जास्त सस्तन प्राण्यांच्या ज्ञात प्रजातींपैकी काही मोजक्याच प्रजातींमध्ये मादा नेतृत्व करतात.

पुरुषी वर्चस्वाच्या या विश्वात स्त्रियांना ते असमानतेचं ग्लास सीलिंग तोडून कसं वर येता येईल, यावर बरीच चर्चा सर्वत्र होताना दिसते. मग याचं उत्तर कदाचित प्राण्यांच्या विश्वाचा कानोसा घेतला तर सापडेल का?

प्रथमदर्शनी बघता हे काहीसं वादग्रस्त विधान वाटेल. पण प्राण्यांच्या विश्वाचा हा अभ्यास करणाऱ्यांच्या मते या प्रश्नाचं उत्तर होकारार्थीच येतं.

प्राण्यांच्या वर्तनाविषयी मिल्स कॉलेजच्या प्राध्यापक जेनिफर स्मिथ यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सप्टेंबरमध्ये एक शोधनिबंध प्रसिद्ध केला. त्यांच्या निरीक्षणांनुसार तरस (Hyena), काळा-पांढरा देवमासा (Killer whale), सिंह, ठिपकेदार तरस, बोनोबो माकडं, लिमर माकडं आणि हत्ती या प्राण्यांच्या प्रजातींमध्ये मादा त्यांच्या गटांचं नेतृत्व करतात.

ही निरीक्षणं अचूक येण्यासाठी या अभ्यासकांनी अशा प्राणीसमूहांची निवड केली, ज्यांच्यात सामाजिक वर्तनाची चिन्हं स्पष्ट होती, जशी की कळपाचं नेतृत्व, त्या त्या कळपातल्या हालचाली, शिकार करणं आणि संघर्षं संपवण्याची वृत्ती असणं.

व्हीडिओ कॅप्शन, व्हीडिओ : कळपातील हत्ती मेला नि इतर हत्ती शोकमग्न झाले

या निकषांवर त्यांनी जवळपास 76 प्राण्यांच्या प्रजाती निवडल्या आणि त्यांचं निरीक्षण केलं. त्या समूहांमध्येही या अभ्यासकांना मादीच नेतृत्व करत असल्याचं स्पष्टपणं आढळलं आणि या मादी नेतृत्वाचे काही ठळक गुणविशेष निश्चितपणे सांगता येतील, असं दिसलं.

स्मिथ म्हणतात की, "या मानवेतर समाजाकडून आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतील, असं मला वाटतं."

प्राणी, मानसशास्त्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ओर्कासमध्ये माद्या कळपाचं नेतृत्व करतात

पण या निरीक्षणाबद्दल संशोधकांनी एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली आहे की या नेतृत्वगुणांची वर्चस्ववादाशी गफलत होता कामा नये. "नेतृत्वाची गरज तेव्हा भासते जेव्हा एखाद्या अडीअडचणीच्या वेळी गटाला एकत्र आणत, त्यात सुसूत्रता आणून त्यांचा समन्वय साधावा लागतो," असं या शोधनिबंधाचे सहलेखक आणि VU युनिर्व्हसिटी अँम्स्टरडॅममधले उत्क्रांतिवाद मानसशास्त्राचे प्राध्यापक मार्क व्हॅन व्ह्युगट सांगतात.

या अडीअडचणी काहीही असू शकतात. उदाहरणार्थ, अन्नाचा शोध घेणं किंवा हिंस्त्र पशूंशी संघर्ष टाळणं वगैरे. दुसरीकडे वर्चस्ववाद म्हटलं तर एकप्रकारे दोन व्यक्तींमधली स्पर्धाच असते.

या संशोधकांच्या व्याख्येनुसार यशस्वी नेते ते असतात ज्याच्याकडे लोक आपोआप ओढले जातात, ते नव्हे ज्यांना लोकांना आपल्या गटात सामील करण्यासाठी खात्री पटवून द्यावी लागते.

तंटा नको, प्रेम हवं

तब्बल 90 टक्के मानवी जातींचा DNA हा आपले त्यातल्या त्यात नजीकचे म्हणू शकू, असे पूर्वज चिंपांझी आणि बोनोबो माकडांशी मिळताजुळता आहे. पण चिंपांझींमध्ये बहुतेकदा नरच टोळीचं नेतृत्व करताना दिसतो. बोनोबो माकडांचं नेतृत्व मादी करताना दिसते.

क्योटो युनिर्व्हसिटीमधील टाकेशी फ्युरिची या कांगो देशातील बोनोबो माकडांच्या अभ्यासक समजावतात की, मादा टोळीचा प्रवास कसा असावा ते ठरवतात. त्या जेवणाची तरतूद करत असल्यानं पहिल्यांदा त्याच जेवतात.

प्राणी, मानसशास्त्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बोनोबो माकडं

बोनोबो माकडांच्या टोळीत फारसा संघर्ष होत नाही, त्यापेक्षा चिंपांझींच्या टोळीत थोडी मारामारी जास्ती होते. बोनोबो मादी बॉसगिरी करते. नर माकडापेक्षा दिसायला थोडी लहान असते नि शांतता प्रस्थापित करण्यासाठी हस्तक्षेपही करते.

अनेकदा मादी नरांना धक्काबुक्कीही करते. फ्युरिची सांगतात की, "दोन मादा नरांशी मारामारी करायला लागल्या तर शेवटी शंभर टक्के वेळा मादच विजयी ठरतात."

पण असं दिसून आलं आहे की, बोनोबो माकडांचा लढण्यापेक्षा किंवा मारामारीपेक्षा जरा प्रेमानं, समजुतीनं घेण्याकडे अधिक कल असतो. या प्रजातीत जवळीक महत्त्वाची असते आणि कधी कधी तर बोनोबो मादा ताण कमी होण्यासाठी वारंवार नर आणि मादांशी सेक्स करतात. म्हणजे टोळीत शांतता नांदवण्याचं मुख्य काम मादा करतात.

दुसरीकडे हत्ती आणि ओर्का व्हेल माशांच्या कुटुंबांमध्ये वयस्कर मादा संसाराचा गाडा हाकतात. ओर्का माशांमध्ये आज्या हुशार असतात, त्या त्यांच्या विस्तारलेल्या मोठ्या कुटुंबाला पोसतात आणि त्यांचे खाद्य असलेला सॅल्मन मासा कुठे आहे, याचा आसमासही घेतात.

व्हीडिओ कॅप्शन, भेटा आनंद शिंदेंना, जे हत्तींशी गप्प मारतात!

हत्तींच्या कळपांच्या नेतृत्वागुणांबद्दल केनियातील हत्तींसाठी स्थापन केलेल्या अँबोसेली ट्रस्टमधले शास्त्रज्ञ व्हिकी फिशलॉक सांगतात की, "उपलब्ध असलेल्या साधनांचा उपयोग करून घेण्याइतपत हत्तींची स्मृती चांगली असते. ऐन दुष्काळातही पाण्याच्या शोधार्थही ज्ञानाचा साठा असणारी त्यांची कुटुंबप्रमुख सगळ्यांसोबत बाहेर पडते."

पण हत्ती आणि माणसांमधले एक मोठा फरक अधोरेखित व्हायलाच हवा. तो म्हणजे मानवी समाजात पितृसत्ताक पद्धतीमुळं संपत्ती आणि मानमरातबाचा वारसा पुरुषांकडून पुरुषांकडंच जातो. तर हत्तींमध्ये (आणि ओर्कांमध्ये) मातृसत्ताक पद्धत अवलंबली जाते.

सिंथिया मॉस या 1970पासून अँबोसेली ट्रस्ट फॉर एलिफंट या संस्थेच्या संचालक आणि संस्थापक आहेत. त्या सांगतात की, "हत्तीणींचा जन्मच मुळी नेतृत्व करण्यासाठी झालेला असतो. त्यांच्यापुढे ना कुठला पर्याय असतो, ना त्यांना नेते होण्यासाठी नर हत्तींशी संघर्ष करावा लागतो. नर हत्ती वेगळेच राहातात आणि कुटुंबप्रमुख म्हणून हत्तींच्या कळपात ते भूमिकाही बजावत नाहीत."

तरस बहुतांशी वेळा एकमेकांच्या सहकार्यानं शिकार करतात. शिकारीत नर मुख्य भूमिका बजावतात तर दुसरीकडं मादी भक्ष्यावर ओरडतात. मादी नरांहून मोठ्या आणि बलवान असतात. कळपाचं दिशादर्शन करतात.

भक्ष्यावर ताव मारताना पिलांचा सांभाळ करणारा मादी, मग पिलं आणि त्यानंतर नर, असा प्राधान्यक्रम ठरला असतो. तरस मादीचं नेतृत्व टोळीयुद्धाच्या वेळी पणाला लागतं, विशेषतः जेव्हा असे युद्ध जागेवरून होतात.

स्मिथ सांगतात की तरस मादी एकमेकांच्या पार्श्वभागाला नाकाने हुंगत हाताने खुरचटण्याचा प्रयत्न करतात. हे खरंतर त्यांच्या भाषेत गळाभेटीसारखं असतं.

कालांतराने विश्वासार्ह संबंध झाल्यानंतरही या मादी आणखी एक करार करतात. केव्हाही आक्रमण होऊ शकतं, याची जाणीव असलेल्या तरस एकमेकांशी आघाडी कायम करून कायम हल्ल्यासाठी सुसज्ज राहतात.

प्राणी, मानसशास्त्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तरसांमध्येही मादाच कळपाचं नेतृत्व करते.

आपण आपल्या सहकाऱ्यांना जरी या प्राण्यांप्रमाणे अभिवादन करू शकत नाही तरी आपल्यातही या सस्तन प्राण्यांसारखीच महत्त्वाच्या प्रसंगी युती करण्याची प्रवृत्ती असते. जसं सोशल मीडियावर आपला मित्रपरिवार असतो आणि काही तज्ज्ञमंडळीही त्यांच्या वयोमान, अनुभवांवर आधारित पोक्त सल्ले देतात.

मग या प्राण्यांच्या जगतातून आपण महिलांच्या नेतृत्वाबद्दल काय शिकू शकतो?

प्राण्यांच्या समूहात मादी आणि त्यांनी प्रस्थापित केलेल्या सहकारितेच्या बंधनांना वाढतं महत्त्व आहे. आणि असं लक्षात येतं की जेव्हा महिला दोन गटांमध्ये गाठ बांधतात, तेव्हा महिला नेतृत्व अधिक सक्षम होतं.

स्मिथ सांगतात की, "मानवी समाजातलं उदाहरण म्हणून सध्याची #MeToo ही चळवळ घेता येईल. त्यात कुणीही सहभागी होऊ शकतं आणि अत्याचाराचं प्रमाण महत्त्वाचं नाही. या वास्तविक परिस्थितीत स्त्रियांनी एकत्र येऊन, संघटित व्हायला हवं. तर त्या नेतृत्वाचा समाजावर काहीएक प्रभाव पडून त्यातून काही चांगलं घडू शकेल. हेच आपण बोनोबो माकडं, तरस आणि एकत्र येणाऱ्या या गटांमध्ये पाहिलं."

पण या केसाळ प्राण्यांच्या जगाची थेट वर्किंग वुमनच्या जगाशी तुलना खरंच योग्य आहे का?

म्हटलं तर ही कल्पना वादग्रस्त ठरणारी आहे, हे स्मिथ आणि त्यांचे सहकारी स्वीकारतात. ती अडचणीची ठरू शकते, कारण युनिर्व्हसिटी ऑफ ब्रिस्टोलमधील ख्रिस्टोस लोआनोयू म्हणतात की, "या संकल्पनेतली क्लिष्टता आणि सामाजिक स्तरांवरचे फरक हे तितकेच महत्त्वाचे आणि दखल घेण्याजोगे आहेत. त्यामुळे एकदम या निष्कर्षाप्रत मारलेली उडी बघता मुळात अशी तुलना करणं अत्यंत कठीण आहे, असं वाटतं." लोआनोयू हे कलेक्टिव्ह बिहेव्हिअर अँण्ड लिडरशिप या विषयाचे अभ्यासक आहेत.

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : सावधान, हत्ती- इलो रे इलो

स्मिथ यांची टीम युक्तिवाद करते की स्त्रियांचं नेतृत्व या मुद्दयाकडं अगदी चुकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. नेतृत्वगुणावर लक्ष केंद्रित करतानाच मोठ्या स्तरावरच्या, गुंतागुंतीच्या अशा उद्योगजगत, शासनयंत्रणा किंवा लष्कर आदी ठिकाणच्या श्रेणीरचना लक्षात घेतल्या गेल्या. पण अन्य काही ठिकाणीही महिलांचं नेतृत्व असतं - कुटुंब किंवा काही लहान गटांमध्येही त्या पुढाकार घेतात, तथापि नेतृत्व आणि पुढाकार हा यातला फरक सूक्ष्मदृष्टीनं पाहता येतो.

अगदी सस्तन प्राण्यांच्या गटात पुरुषांचं नेतृत्व, स्त्रियांचं नेतृत्व हे तसं दुर्लक्षितच राहिलं आहे. युनिर्व्हसिटी ऑफ टोरँटोमधील प्राथमिक वागणुकीच्या अभ्यासक ज्युली टाईक्रोब यांनी व्हर्व्हेट माकडांचा (काळ्या तोंडाची माकडं) अभ्यास केला आहे. या जातीच्या माकडांमध्ये मादीनं केलेलं नेतृत्व, हे मधल्या फळीचं किंवा एकूणच टोळीचं नेतृत्व करणं, ही क्वचित आढळणारी गोष्ट आहे. यात मधल्या फळीचं व्यवस्थापन या मुद्द्याचा विचार करताना आधीच्या अभ्यासात चुकून असं निश्चित केलं गेलं की, निर्णय घेण्याचं काम मुख्यत्वे नरांनी (पुरुषांनी) केलं, असं ज्युली स्पष्ट करतात.

अर्थातच आपल्या जीवशास्त्रात केल्या गेलेल्या अभ्यासाच्या परिपाकानुसार एक बाजू अशीही आहे की स्त्रियांचं नेतृत्व झाकोळलं का गेलं. तर त्याचं उत्तर आपल्या संस्कृतीत आहे. संस्कृतीत बदल करण्यात लोक माहीर असतात आणि त्यामुळं आपल्या भोवतालचं पर्यावरण बदलतं. त्यामुळं स्मिथची टीम वादविवाद करते की आपण आपलं भविष्य घडवू शकतो आणि तेही स्त्रियांना नेतृत्वाची संधी दिली तर.

या अभ्यासातल्या काही कल्पना या प्रत्यक्ष पुराव्यांपेक्षा अधिक चांगल्या आहेत. पण लेखकांच्या मते अधिक कठोर निकषांवर आधारलेला, परिणामकारक असा अभ्यास भविष्यात होणं गरजेचं आहे. तथापी या आठ प्रजातींचं नेतृत्व माद्या (स्त्रिया) करत आहेत आणि एक प्रकारे भविष्यातल्या आशेवर झुलवणाऱ्या अभ्यासाचा हा श्रीगणेशा तर झालेला नाही ना...

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)