माकड कुत्रे संघर्ष : माकडं नेमकी जगतात कशी? त्यांची जीवनपद्धती काय आहे?

माकड

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील लवूळ गावात माकडांनी 250 कुत्र्यांचा जीव घेतला असा एक दावा करण्यात आला. या दाव्याची बातमी झाली आणि या बातमीने आश्चर्यमिश्रित धक्का बसला. हे कृत्य सुडभावनेने केलं असाही एक प्रवाद पहायला मिळाला. या दाव्याची शहनिशा करण्यासाठी बीबीसी मराठीने एक सविस्तर वृत्तांत केला. तो तुम्ही इथे वाचू शकता.

कुत्र्यांचा जीव घेण्याइतपत माकडांमध्ये सूडभावना निर्माण झाली त्यावरून माकडं खरंच माणसाळली की काय असा प्रश्न उपस्थित झाला. पण माकडं खरंच असं करू शकतात का? माकडांची मनोवृत्ती काय असते? अशा अनेक प्रश्नांचा धांडोळा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

भारतातल्या अनेक शहरात माकडं बहुसंख्येने आढळतात. माकड दिसलं की आपल्याकडची कोणती वस्तू विशेषत: खाण्याची वस्तू हिरावून घेणार नाही याची काळजी घेतली जाते.

उत्तर प्रदेशातील वृंदावन शहरात अशीच बहुसंख्येने माकडं आढळतात. ते तर चक्क चष्मा हिरावून नेतात. एक फ्रुटीचं पाकिट दिलं की ते चष्मा परत करतात. आता या दाव्यात अतिशयोक्ती वाटू शकते. पण प्रस्तुत लेखकाने हा अनुभव घेतला आहे.

तुम्ही तिथे चष्मा लावून दिसले की मनुष्यप्राणी आणि माकड तुमच्याकडे वक्रदृष्टीने पाहतात. मग कोणीतरी सजग नागरिक 'चष्मा उतार लो बंदर ले जाएंगे' असा इशारा देतात.

वृंदावन शहरात माकड फ्रुटी पिताना दिसलं की चष्मा हिरावल्याचं बक्षीस मिळाल्याची नोंद आपसूकच मेंदूत होते.

माकड

फोटो स्रोत, Getty Images

राजधानी दिल्लीत सुद्धा बहुसंख्येने माकडं आढळतात. संसद, नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक या महत्त्वाच्या ठिकाणी त्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात पहायला मिळतो. माकडांना पिटाळून लावण्यासाठी तिथे खास माणसं ठेवलेली असतात. यावर मध्ये एक चित्रपटही आला होता.

माकडांना पिटाळता पिटाळता माणसाचाच माकड कसा होतो असा त्या चित्रपटाचा आशय होता. संसदेत सुद्धा हा मुद्दा गाजला आणि माकड दिसल्यावर काय करायचं याच्या मार्गदर्शक सूचनाच सरकारने जारी केल्या होत्या.

लवूळ गावात जो प्रकार घडला त्यात सूड भावना नव्हती. कुत्र्यांच्या पिलाच्या शरीरावरच्या उवा खाण्याच्या उद्देशाने पिलं पळवून आणत आणि मग सोडून देत असं या घटनेचं विश्लेषण करताना प्राणी तज्ज्ञांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

या सगळ्यात कुत्र्यांची पिलाची उपासमार होऊन ते मेले असंही एक निरीक्षण नोंदवण्यात आलं. मात्र सूडभावना या एकाच मुद्दयाभोवती हे प्रकरण गाजलं. मात्र माकडांच्या दृष्टीने फारसा विचार झाला नाही आणि दावे आणि प्रतिदाव्यांची माकडचेष्टा चालू राहिली.

माकड आणि वानर यांच्यातला फरक

भारतात माकडांच्या 11 प्रजाती आढळतात. त्यातला लाल तोंडाचा माकड बहुसंख्येने आढळतो. त्याचं शास्त्रीय नाव मॅकाका रेडिएटा आहे. त्याला टोपी माकड असंही म्हणतात.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक, सांगली या भागात ही माकडं मोठ्या संख्येने आढळतात.

लवूळ गावातही वानरांमुळेच सदरहू प्रकार घडला. लाल माकड उकिडवे बसले असता त्यांची उंची 60 सेमी असते आणि शेपटी शरीराच्या लांबीपेक्षा मोठी असते. नराचं वजन 6-9 किलो तर मादीचं वजन 5-8 किलो असतं. त्यांच्यावर डोक्यावर काळसर रंगाचे केस असतात आणि या केसाची रचना टोपी ठेवल्यासारखी असते म्हणून त्यांना टोपी माकड असं म्हणतात.

माकड

फोटो स्रोत, Getty Images

लाल तोंडाची माकडं जंगलात राहतात. झाडांची फळं आणि मुळं हे त्यांचं मुख्य खाद्य असतं. शहरात आले तर आपल्या घरात जे मिळेल ते खातात. विशेषत: वाळवणं, फळं, हे त्यांना विशेष प्रिय असतात.

ही माकडं कळपात राहतात. एका कळपात 30-40 माकडं असतात. त्यात 7-8 नर, 10-15 माद्या आणि बाकी लहान पिलं असतात. ही माकडं वनात लाजाळू असतात आणि शहरात आल्यावर आक्रमक होतात. वाळत घातलेले कपडे पळवणं, पिंकांची नासधूस करणं यामुळे ते त्रासदायक ठरू शकतात. वाघ आणि बिबट्या त्यांचे शत्रू असतात.

वानरांची मुख्य वस्ती हिमालय ते कन्याकुमारी व श्रीलंका आहे. वानरांच्या एकूण 14 पोटजाती आढळतात. हिमालयात अगदी 4000 मी उंचीवरही ते राहतात. तीर्थस्थळांवर पाण्याच्या टाक्या असतील तर तेथे वानरांचे कळप आढळतात.

माणसांच्या हातातल्या वस्तू हिसकावण्यात यांचाही हातखंडा आहे. एका कळपात तीस ते चाळीस वानर असतात. त्यातला नर हा सगळ्यांवर हुकुमत गाजवत असतो. तो स्वत:चे अंग साफ करत नाही. पण स्वत:चे अंग इतरांकडून साफ करून घेतो. त्यामुळे या प्रजातीतही पुरुषसत्ताक पद्धत अस्तित्वात आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.

वानर मादी गरोदर झाल्यावर 170 दिवसात पिलांना जन्म देते. एक महिना ते पिलू आईला चिटकून असतं आणि त्यानंतर ते विलग होतं. या पिलाची वाढ सात वर्षांपर्यंत होतं. चित्ता वाघ हे त्यांचे शत्रू असतात. ते दिसताच एकमेकांना चित्कारून इशारा देतात. वानराचे तोंड, हात, पाय संपूर्ण काळे असतात.

माकडं कशी जगतात?

विनया जंगले या मुंबईत वन्यजीव अभ्यासक आहेत. त्यांच्या मते माकडांचा बुद्ध्यांक (IQ) आणि भावनांक (EQ) दोन्ही चांगला असतो. ज्या परिस्थितीत ते आहेत त्याच्याशी ते पटकन जुळवून घेतात.

ते जितकं प्रेम करतात तितकाच टोकाचा तिरस्कारही करतात. जंगल हा त्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. मात्र जंगलं कमी झाल्याने त्यांचा ओढा शहराकडे वाढला आहे.

माकड

फोटो स्रोत, Getty Images

"शहरात येणं माकडांसाठी सुरक्षित असतं. कारण तिथे खायला मिळतं. माणसांच्या हातून काही पदार्थ हिसकावले तर त्याला विरोध होत नाही. त्यामुळे एखाद्या जंगलात माकडांची संख्या जास्त असेल आणि त्या जंगलात त्यांना खायला मिळालं नाही तर त्या जंगलालगतच्या शहरात माकडांची संख्या खचितच जास्त असते," जंगले सांगतात.

माकड आणि माणसांच्या संवेदना बऱ्याचशा सारख्या असतात असं जंगले यांना वाटतं. त्यामुळे लवूळ गावात सूडभावनेने पिल्लांना मारल्याची शक्यता नाकारता येत नाही असं त्यांना वाटतं.

शब्दावाचून कळते सारे

माकड आणि वानर मूक असले तरी त्यांची संवेदनशीलता कमालीची असते. प्राणीमित्र असलेले धनराज शिंदे एक किस्सा सांगतात.

"मध्य प्रदेशात एकदा एका माकडिणीचं पिल्लू गेलं. तेव्हा ती त्याला घेऊन पशुवैद्यकीय इस्पितळात पोहोचली. ती तिथे गेल्यावर पिल्लाला घेण्याचा प्रयत्न करताच ती अस्वस्थ झाली आणि झाडावर जाऊन बसली. पिल्लू मेलं होतंच. मग कसंतरी ते डॉक्टरांच्या हाती लागलं आणि त्यांनी उपचाराचं नाटक केलं. तेही माकडिणीने पाहिलं. नंतर अनेक दिवस ती त्या गावात फिरत होती."

माकडांनाही माणसांसारखेच आजार होतात. Bereavement: Reactions, Consequences, and Care या पुस्तकात माकडांच्या भावभावनांबद्दल विस्ताराने मांडणी केली आहे. माकडाची किंवा वानराची आई गेली तर माकड सैरभैर होतात.

माकड

फोटो स्रोत, Getty Images

मात्र दु:खाचे कढ येणं, कोसळून जाणं, उन्मळून पडणं अशी लक्षणं आढळून येतात. आपल्या जवळचा व्यक्ती गेला तर माकडं सैरभैर होतात. किंचाळणं, ओरडणं हेही लक्षणं दिसून पडतात. त्यामुळे दु:खं ही प्राण्यांनाही चुकत नाही पण ते व्यक्त करण्याची माकडांची पद्धत ही बरीचसी माणसांसारखीच असते.

मग माकडं सूड घेतात का? या प्रश्नाचं उत्तरं शोधण्यासाठी अनेक वन्यजीव अभ्यासकांशी आम्ही संपर्क केला. तेव्हा असा सूड वगैरे घेणं शक्य नाही असा बहुतांश लोकांचा होरा होता.

कोणताही सजीव जगण्यासाठी जो संघर्ष करत असतो तो माकडांनाही चुकलेला नसतोच. योग्यप्रकारे जगता यावं यासाठी संरचना करणं, शिकाऱ्यांपासून बचाव करणं, पिलांचं रक्षण करणं हे सगळ्या करण्याइतपत माकडं किंवा वानरं चांगलीच बुद्धिमान असतात. एखाद्यावर प्रेम जडलं तर त्याला धरून ठेवतात. हल्ली हा गुण मनुष्यप्राण्यातही अभावानेच आढळतो.

मनुष्य प्राणी संघर्ष पुन्हा ऐरणीवर

लवूळ गावातील घटना हा प्राण्यांमधला कथित संघर्ष होता. तरी या निमित्ताने शहरात बहुसंख्येनं माकडं दिसणं, त्यांची चेष्टा करणं, दगडं मारणं हेही प्रकार दिसून येतात.

लवूळ गावात किती कुत्री मारली गेली, ती कशी मारली गेली याबद्दल स्पष्टता नाही.

माकड आणि वानरं जंगलात राहतात. तिथे राहण्याची त्यांची एक जीवनपद्धती असते. तिथे खायला शोधणं, आपल्या कळपाचं रक्षण करणं, मुला बाळांचा सांभाळ करणं असे हजारो व्याप त्यांना असतात. मात्र शहरात आल्यावर माकडं(ही) गब्बर होतात त्यांना लगोलग खायला मिळतं.

मात्र असं खायला घालणं हा गुन्हा आहे असं वन्यजीव अभ्यासक धर्मराज पाटील सांगतात. माणसांनी खायला घालणं आणि मग तिथेच त्यांनी आपली वेगळी व्यवस्था स्थापन करणं हे वाढत जाणार आहे आणि ते धोकादायक आहे असंही निरीक्षण धर्मराज पाटील नोंदवतात.

माकड

फोटो स्रोत, Getty Images

मग जंगलांच्या संख्येवर अतिक्रमण न करणं आणि जंगलं वाढवणं हाच उपाय आपल्याला दिसतो. असे उपाय करण्याला सरकारकडून मर्यादा असतात मात्र प्राणीसंवर्धनासाठी सरकार अनेक उपाययोजना करत असतात, असं भारतीय वन सेवेतल्या अधिकारी पियुषा जगताप यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

प्रसिद्ध कथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचं सत्तांतर नावाचं एक पुस्तक आहे. त्यात ते म्हणतात, "काळाप्रमाणेच संघर्षही सतत वाढत असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच तर भरती असते, पूर असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंडं भरसमाट वाढतात, गर्दी होते, तेव्हा तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो.

"ज्यांना बोलता येतं ते हा राग, उद्दामणा, संघर्ष शब्दातून दाखवतात. ज्यांना बोलता येत नाही त्यांचे राग, लोभ, प्रेम हावभावातून, स्पर्शातूनच सांगितले जातात."

वानरं शहरात आली की त्यांच्या वागण्यातले वेगवेगळे पैलू माणसाला कळतात. त्यातूनच मग समज गैरसमज होतात. अफवा इकडून तिकडून उड्या मारायला लागतात. माणसाचा वानर होतो आणि माडगुळकर म्हणतात, तसं हा संघर्ष सर्वत्र भरून राहतो.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)