एका गाढवाचा मृत्यू आणि 55 लोकांविरोधात एफआयआर, काय आहे प्रकरण?

गाढवाचा मृत्यू विजेचा धक्का लागल्याने झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गाढवाचा मृत्यू विजेचा धक्का लागल्याने झाला होता. (प्रातिनिधिक छायाचित्र)
    • Author, सीटू तिवारी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

बिहारच्या बक्सर जिल्ह्यात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. एका गाढवाच्या मृत्यूनंतर 55 लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात वीजेच्या खांबाचा स्पर्श झाल्यानं शॉक लागल्यामुळं एका गाढवाचा मृत्यू झाला. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांनी आणि स्थानिक लोकांनी स्थानिक केसठ पॉवर ग्रीड मध्ये गोंधळ घातल्याचं सांगण्यात आलं.

केसठ पॉवर ग्रीड चे कनिष्ठ अभियंता अवनीश कुमार यांच्या दाव्यानुसार, “या आंदोलनामुळे 2 तास 26 मिनिटं वीज पुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे विभागाला 1 लाख 46 हजार 429 रुपयांचं नुकसान झालं.”

“मी स्थानिक बासुदेवा ठाण्यात सरकारी कामकाजात अडथळा, आर्थिक नुकसान, आणि सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर दुर्व्यवहार करणे या कारणांनी एफआयआर दाखल केला आहे,” असं ते म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

ही घटना बक्सर जिल्ह्यातील केसठ ब्लॉकमधील रामपूर गावात घडली. गावातील ददन रजक नावाच्या एका व्यक्तीकडं चार गाढवं होती. ददन त्यांचा वापर वीट भट्टीत विटा आणि इतर सामानाच्या वाहतुकीसाठी करतात.

ददन रजक म्हणाले, “11 सप्टेंबरच्या संध्याकाळी मी माझ्या चार गाढवांना घेऊन घरी परत येत होतो. गावाच्या मध्यावर एक वीजेचा खांब आहे. पावसामुळं तिथे पाणी जमा झालं होतं.”

“खांबाजवळ गेल्यावर माझ्या गाढवांनी विजेच्या खांबाला स्पर्श केला. गावकऱ्यांच्या मदतीने मी तीन गाढवांची सुटका करण्यात यशस्वी ठरलो. पण माझं एक गाढव मेलं,” असंही ते म्हणाले.

रामपुर गावातील रहिवाशी ददन रजक यांच्या गाढवाचा मृत्यू झाला आहे.

फोटो स्रोत, Amjad

फोटो कॅप्शन, रामपुर गावातील रहिवाशी ददन रजक यांच्या गाढवाचा मृत्यू झाला आहे.

गाढव मेल्यानंतर गावकऱ्यांनी केसठ पॉवर ग्रीडच्या समोर जाऊन निदर्शनं केली. हे आंदोलन शांततेच केलं असा गावकऱ्यांचा दावा आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी त्यांनी तडजोडही केली.

मात्र वीज विभागाच्या दाव्यानुसार, “ग्रामपंचायतीच्या लोकांनी गावकऱ्यांबरोबर केसठ पॉवर ग्रीडमध्ये प्रचंड गोंधळ घातला. तसंच तिथं उपस्थित सुजीत कुमार आणि रवी कुमार या सरकारी अधिकाऱ्यांना एका खोलीत कोंडलं आणि वीज कापली.”

याप्रकरणी वीज विभागानं रामपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे पती विकासचंद्र पांडे, विशूनदेव पासवान, मंजू कुमारी, आलमगीर, आफताब अन्सारी, यांच्यासह आणखी 50 अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि इलेक्ट्रिसिटी ॲक्टच्या अनेक कलमांअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

‘वर्षभरात पाच जनावरांचा मृत्यू’

सरपंचांचे पती विकासचंद्र पांडेय यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते म्हणाले की, “एका वर्षात या खांबामुळे पाच प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. आम्ही वारंवार वीज विभागाला खांब दुरुस्त करायला सांगत आहोत. मात्र वीज विभाग निष्काळजीपणा करत आहे.”

“त्यादिवशी (11 सप्टेंबर) आमच्यापैकी कोणीही पॅनल रूम मध्ये गेलो नाही. मग वीज पुरवठा कसा खंडित होईल? खरं सांगायचं तर तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित केला जेणेकरून आम्हाला आंदोलन करता येणार नाही,” असं ते म्हणाले.

दरम्यान वीज विभागाकडं केलेली कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार ग्रामपंचायतीचे लोक किंवा गावकरी बीबीसीला दाखवू शकले नाहीत.

ददन यांच्याकडे आता तीन गाढवं उरली आहेत.

फोटो स्रोत, Amjad

फोटो कॅप्शन, ददन यांच्याकडे आता तीन गाढवं उरली आहेत.

ग्रामपंचायतीचे सचिव आलमगीर अन्सारी यांच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ते म्हणाले की, “गावातल्या मुख्य ट्रान्सफॉर्मरचा स्वीच दोन वर्षांपासून खराब आहे. मी दोन महिन्यापूर्वीच कनिष्ठ इंजिनियर साहेबांना सांगितलं की, इथं भुंअर यादव आणि हवालदार पासवान यांच्या म्हशीचा मृत्यू झाला आहे. त्यांनी रजिस्टरमध्ये नोंद केली आणि पुढे काही कारवाई केली नाही.”

तर वीज विभागाचे कनिष्ठ अभियंता अवनीश कुमार म्हणाले की, “गावकऱ्यांनी अशी कोणतीच तक्रार केलेली नाही. गाढव मेल्यानंतर त्यांनी तक्रार केली. त्यानंतर आम्ही विजेच्या खांबावर असलेली तार दुरुस्त करण्यासाठी एका माणसाला पाठवलं. मात्र हे लोक गोंधळ घालू लागले आणि त्यामुळे आठ ग्रामपंचायतीतील 50 गावं अंधारात बुडून गेली.”

या बातम्याही वाचा :

प्रकरणाची चौकशी सुरू

बक्सर जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात या प्रकरणाबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. “बिहारमध्ये अशा प्रकारचं प्रकरण याआधी झालं नाही,” असं अवनीश कुमार स्वतःच सांगतात.

याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. बासुदेव पोलीस ठाण्याच्या प्रमुख चुनमून कुमारी म्हणाल्या की, “या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे.”

रामपुर गाव

फोटो स्रोत, Amjad

ददन रजक यांनी हेही सांगितलं की, त्यांनी 80 हजार रुपयांचं कर्ज घेऊन हे गाढव विकत घेतलं होतं. रामपूर ग्रामपंचायतीतल्या वीट भट्टीत सहा महिने विटांचं उत्पादन होतं तेव्हा या चारही गाढवांसाठी त्यांना रोजचे आठशे रुपये मिळायचे.

ददन यांची दोन्ही मुलं मानसिक दृष्ट्या विकलांग आहेत. “मागच्या वर्षीच गाढव विकत घेतले होते. खांबाला चिटकल्यामुळं गाढवांना जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आमची काहीही कमाई होत नाही. यावर सरकार काही करणार आहे का?”

याप्रकरणी राज्याचा वीज विभाग 20000 ते 40 हजार पर्यंत नुकसान भरपाई देतो. ददन अजूनही या नुकसानभरपाईची वाट बघत आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)