गुणरत्न सदावर्ते: होय, आम्ही गाढव पाळलंय कारण....

फोटो स्रोत, ANI
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
मंगळवारी (26 एप्रिलला) जामीन मिळाल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्तेंची मुंबईच्या आर्थररोड जेलमधून सुटका झाली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्लाप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंना अटक झाली. त्यानंतर, विविध प्रकरणात त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.
जेलमधून सुटल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, मी जेलमधून एसटी कर्मचाऱ्यांना तुम्ही कामावर जा असं सांगितल्याचा दावा त्यांनी केला.
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पोलिसांनी अनेक आरोप केलेत. त्यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईबाबत त्यांचं म्हणणं काय? याबाबत आम्ही गुणरत्न सदावर्तेंशी बातचीत केली.
तुमच्यावर शरद पवारांच्या घरावर हल्लाकरण्यासाठी चिथावण्याचा आरोप आहे?
मी योगशास्त्राचा शिक्षक आहे, विपश्यना करतो. आमचा संविधानावर विश्वास आहे. त्याच मार्गाने चालतो. त्यामुळे हिंसाचाराला आजिबात थारा नाही.
माझ्यावर झालेल्या आरोपांबाबत पोलीस चार्जशीट दाखल करतील तेव्हा 'दूध का दूध, पानी का पानी' होईल. मी यावर प्रकरण कोर्टात असल्याने काहीच बोलणार नाही.
तुम्हाला एकापाठोपाठ अनेक गुन्ह्यात अटक झाली. महाराष्ट्रात अनेक गुन्हे दाखल आहेत. याबाबत तुमची प्रतिक्रिया काय?
अटकेच्या कारवाईला आम्ही संघर्ष सुवर्णकाळ म्हणतो. आणीबाणीत अटलबिहारी वाजपेयी, जयप्रकाश नारायण, अडवाणी यांच्यावर कारवाई झाली. तशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे का? हा माझा प्रश्न आहे.
आणीबाणीत विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यावेळीदेखील न्यायालयाने आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतोय असं म्हटलं होतं. हायकोर्टाने मला जामीन देताना अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याचं म्हटलंय. आताचा काळ म्हणजे सदृष्य आणीबाणीची परिस्थिती आहे. राष्ट्रपती राजवटीची परिस्थिती येऊ नये म्हणून सरकारने जपलं पाहिजे.
आम्ही या प्रकरणाचा रिपोर्ट राष्ट्रपतींना देणार आहोत.

जय श्रीराम, म्हणणारा माणूस क्रांतीकारी असतो. राज्यात असंच सरू राहिल तर, हिंदुस्तानी लोक सरकारला माफ करणार नाही. अन्यायकारी सरकार म्हणून त्यांना ओळखलं जाईल.
लोकप्रतिनिधींवर हल्ले होतायत. मनसुखसारख्या व्यापाऱ्याचा खून झाला. भ्रष्टाचाराच्या आरोपात मंत्री जेलमध्ये. मला अटक करण्यात आली. त्यामुळे मी फक्त सांगेन की लोकशाहीत शेवटी फक्त राष्ट्रपती राजवट असते.
या राजकारणात तुम्ही भाजपचा मोहरा बनला आहात, असं म्हटलं जातंय
'जय श्रीराम' कोणत्या पक्षाचं नाही. माझ्यावर आरोप करणाऱ्यांना ते स्वत काय आहेत ते पहावं. मी राजकारणाला अस्पृश्य मानत नाही.
सरकारने स्वतःचं वर्तन सुधारलं पाहिजे. भाजपने राष्ट्रपती राजवटीची मागणी केलीये ते विरोधीपक्ष म्हणून. त्यांची मागणी योग्य असेल तर त्यांनी लाऊन धरावी.
माझी मागणी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याबाबत आहे. सरकार सुधारलं तर बरं, नाहीतर लोकशाहीत राष्ट्रपती अंतिम असतात.

फोटो स्रोत, FACEBOOK/GUNRATNA SADAVARTE
लोकांना न्याय मिळत नाही. भलत्याच गोष्टीत सरकारचा वेळ चाललाय. हायकोर्टही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याचं म्हणतंय. त्यामुळे आता सरकारने विचार करावा नाहीतर राष्ट्रपती राजवटीसाठी सामोरं जावं.
एसटी कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही लढलात. पण, पुढे काय झालं? एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतलेत?
मागील 70 वर्षात संप या नावाने झालेली गोष्ट संवैधानिक ठरलेली नाही. सहा महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन असंवैधानिक ठरलं नाही.
कोर्टाने आम्हाला सनदी अधिकाऱ्यांच्या अहवालाला आव्हान देण्याची मुभा दिलीय. पण, हे करण्याअगोदर सरकारने आम्हाला जेलमध्ये टाकलं. आता कष्टकऱ्यांशी चर्चा करू. चर्चेनंतर लोक ज्याप्रकारे पुढे जा म्हणतील. त्याप्रकारे पुढची पावलं टाकणार.

फोटो स्रोत, SHAHID SHEIKH
जेलमधून सुटल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, मी जेलमधून एसटी कर्मचाऱ्यांना तुम्ही कामावर जा असं सांगितल्याचं ते म्हणाले.
तुम्ही गाढव का पाळलंय?
गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या घरचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात त्यांची मुलगी झेन सदावर्ते घरात पाळलेल्या गाढवासोबत दिसत होती. गुणरत्न सदावर्ते यांनी गाढव का पाळलं? याबाबत बीबीसी मराठीने त्यांना प्रश्न विचारला.
ते म्हणाले, 'गाढवाच्या दुधाचे किती चांगले परिणाम आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? पोटातील आजार या दुधामुळे समूळ नष्ट होतात. मुलांना आजार झाल्यानंतर त्यांना गाढवाचं दूध मिळत नाही.' मी, माझी मुलगी झेनच्या लाडाखातर माळेगावच्या यात्रेतून घेतलं होतं. हे लोकोपयोगी आहे. मी प्राणीमित्र आहे. त्यामुळे आमच्या घरी अनेक जनावरं आहेत. सोशल मीडियावर लोक अर्धवट ज्ञानातून बोलत असतात.
तुम्हाला जेलमध्ये त्रास देण्यात आला. असा तुम्ही आरोप केला, त्याबद्दल सांगा
जेलमध्ये मी विपश्यना आणि योगासनांचे धडे दिले. 17 दिवस अन्नाचा कणही खाल्ला नाही. ज्यांना आरामाचं आयुष्य हवंय त्यांना त्रास होतो. गरजा कमी असल्याने जास्त त्रास झाला नाही. योगशिक्षक असल्याने 62 दिवसापर्यंत अन्नाचा कण न खाता राहू शकतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








