एसटी संप: 'हातामध्ये बांगड्या भरून मी एसटी चालवली कारण...'

- Author, मुश्ताक खान
- Role, बीबीसी मराठीसाठी, दापोलीहून
"नाईलाज म्हणून आम्ही चालवून घेत होते. आता तर आमचे बांधव टोकाचं पाऊल उचलू लागले आहेत. एकीकडे बायको भांडते दुसरीकडे सरकार भांडतंय आम्ही कर्मचाऱ्यांनी नक्की करायचं काय," असा सवाल एसटी चालक अशोक वणवे यांनी केला.
हातात बांगड्या घालून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देणारे अशोक वणवे आपल्या भावना मांडत होते.
मूळचे बीडचे मात्र आता कोकणातील दापोली आगारात कार्यरत वणवे यांनी प्रतिनिधिक पद्धतीने संपाला पाठिंबा दिला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
सध्या राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करणं आणि पगारवाढ या प्रमुख मुद्द्यांसह हे कर्मचारी आंदोलन करत आहेत.
"आमचे एस.टी.कर्मचारी मरतायत आम्ही दिवाळी कशी साजरी करणार? असं म्हणत आम्हाला शासकीय सेवेत सामावून घ्या अशी मागणी ते राज्य सरकारकडे करत आहेत. सरकारनं या गोष्टीची दखल घ्यावी," असं वणवे यांचं म्हणणं आहे.
ते सांगतात, "लोक मरत आहेत आणि तुम्ही कामावर जाताय असं म्हणत बयको भांडत होती. कामावर जायचंच असेल तर बांगड्या घालून जा असं बायको म्हणाली. दुसरीकडे कामावर नाही गेलो तर साहेब पत्र देतात. आता बायको भांडू नये आणि साहेब पत्र देऊ नये यासाठी हाता बांगड्या घालून कामावर आलो."
07 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3 वा. दापोली ठाणे शिवशाही गाडी त्यांनी बांगड्या घालूनच चालवली. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला त्यांचा हा प्रातिनिधिक पाठिंबा होता.

अशोक वणवे मूळचे बीड जिल्ह्याचे. शेतकरी कुटुंबाचे. रोजगारासाठी ते 400 कि.मी लांब दापोलीत आले. दापोलीत घर भाड्यानं घेवून आपल्या संसाराला सुरूवात केली.
आपली परिस्थिती सुधारेल असं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वाटत होतं. पण तसं काही घडलं नाही. त्यांच्या हातावर 13 हजार रूपये पडतात. एवढ्यात त्यांचं भागत नाही तरी सुद्धा ते चालवून घेत होते.
"आमचे बांधव आत्महत्या करतायत तरी सरकारला जाग येत नाही. याच्या पलीकडे मलाही काही बोलता येत नाही आणि मी बोलू शकत नाही", असं अशोक वणवे सांगत होते.
लवकरात लवकर सरकारनं ठोस पावलं उचलून सरकारनं कामगारांची आत्महत्या थांबवावी अशी विनंती त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
काय आहे संपाचा मुद्दा?
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिवाळी ऐन तोंडावर असताना एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. यानंतर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करत संप मागे घेण्याचं आवाहन केलं.
पण राज्य सरकारच्या या घोषणेला काही तास उलटत असतानाच शेवगाव आगारात एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. त्यानंतर 4 नोव्हेंबरला एसटी कर्मचाऱ्यांची एक संघटना पुन्हा संपावर गेली आणि काही आगारांमधलं कामकाज ठप्प झालं. एसटी कर्मचाऱ्यांनी संप करू नये, असं हायकोर्टाने म्हटलं होतं.

गेल्या काही वर्षांपासून एसटी तोट्यात आहे आणि कोव्हिड काळात लॉकडाऊन दरम्यान वाहतूक पूर्ण बंद असल्याने मार्च 2020 ते मार्च 201 या काळात एसटीचं 6300 कोटींचं उत्पन्न बुडलं.
या काळात कर्मचाऱ्यांचे पगारही थकले होते. या पार्श्वभूमीवर सध्या एसटी कर्मचारी आंदोलन करतायत.
या आंदोलनामध्ये एसटी चालक अशोक वनवे सहभागी नाहीत. कारण, सहभागी झाले तर कारवाईचं पत्र येईल असं त्यांचं म्हणणं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








