गे पेंग्विन जोडपं दुसऱ्या पेंग्विनच्या पिल्लाला ओलीस धरतं तेव्हा...

पेंग्विन, डेन्मार्क

फोटो स्रोत, Getty

फोटो कॅप्शन, डेन्मार्कमध्ये गे पेंग्विन जोडीने पिल्लाला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले.

डेन्मार्कमधल्या एका प्राणी संग्रहालयात एका पेंग्विन पिल्लाला ताब्यात घेण्यावरून पेंग्विनच्या दोन जोडप्यांमध्ये हमरातुमरी पाहायला मिळाली. यातील एक जोडपं गे आहे.

छोटं पिल्लू आपलं व्हावं यासाठी अपहरण नाट्य रंगलं. दोन्ही जोडप्यांमध्ये 'शाब्दिक' चकमकही अनुभवायला मिळाली. पण अखेर शेवट गोड झाला.

ही आहे, गोष्ट युरोपातल्या डेन्मार्क या रमणीय देशातल्या ओडेन्स प्राणी संग्रहालयातली. या संग्रहालयात गे पेंग्विन जोडप्याला एका पिल्लाला आपलंसं करण्याची ओढ लागली होती.

हे पुरुष पेंग्विन जोडपं एका पिलाच्या दिशेने आकर्षित झालं. आपल्या कक्षाच्या इथून फेरफटका मारत असताना या पिल्लाला पळवून नेण्याचा विचार त्यांच्या मनात आला असेल.

दुर्लक्षित पिल्लू आणि त्याचे विचलित असे बाबा पाहून या गे जोडप्याच्या मनातील पिलाला पळवून नेण्याचा विचार दृढ झाला असावा.

त्या पिल्लाची आई निवांतपणे आंघोळ करताना त्यांना दिसली. लहानग्या पिलाला पळवून नेण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असं त्यांना वाटलं.

या प्राणी संग्रहालयातील गार्ड सँडी हेडइगर्ड मुन्क यांनी हा सगळा प्रकार 'याचि देही याचि डोळा' अनुभवला.

डेन्मार्क, पेंग्विन

फोटो स्रोत, Getty

फोटो कॅप्शन, पेंग्विन

"संग्रहालयाची जनतेसाठीची वेळ संपायला आली होती. मी पेंग्विनच्या कक्षाच्या इकडे जात असताना काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं," डीआर या डेन्मार्कमधील प्रमुख वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितलं.

"त्या चिमुरड्या पिल्लाचे पालक त्याच्याबरोबर नव्हते आणि त्या पिल्लाला गे पेंग्विन जोडप्याने सरळ उचलून नेलं. हे सगळं नाट्य माझ्यासमोर घडलं. त्या पिल्लाच्या वडिलांना याचं काहीच वाटलं नाही," त्या म्हणाल्या.

आंघोळीचं कौतुक झाल्यानंतर त्या पिल्लाची आई पाण्यातून बाहेर पडली. त्यावेळी पिल्लू गायब झाल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने त्या पिल्लाचा शोध घेतला. बराच वेळ काहीच घडलं नाही असं वातावरण होतं. दुसऱ्या दिवशी पालकांनी पुन्हा पिल्लाचा शोध घ्यायला सुरुवात केली.

वादावादी

गे पेंग्विन जोडपं आणि त्या पिल्लाचे आईबाबा असलेलं पेंग्विन जोडपं यांच्यात जोरदार भांडण झालं.

त्यांनी कर्कश आवाज काढत विरोध व्यक्त केला. शेपट्या हलवून आदळआपट केली. एकमेकांना 'खुन्नस'ही दिली. गे पेंग्विन जोडपं पिल्लाला लपवण्याचा प्रयत्न करत होतं.

मानवी हस्तक्षेप

हा वाद थांबवण्यासाठी संग्रहालयातल्या कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला.

"संग्रहालयात अनुचित प्रकार घडू नये म्हणून मी ते पिल्लू त्याच्या खऱ्या पालकांकडे सोपवालं," असं सँडी यांनी सांगितलं.

त्यानंतर गे पेंग्विन दांपत्याला पालक होण्यासाठी एक अंडं देण्यात आलं आहे.

अंड्यातून यशस्वीरीत्या पिल्लू बाहेर येईल का, हे सांगण कठीण आहे. पण तसं झालं तर गे पेंग्विन दांपत्यासाठी ही सकारात्मक गोष्ट असेल. तूर्तास ओडेन्समधल्या या संग्रहालयात शांतता आहे.

या अनुभवातून संग्रहालयातील मंडळी काही शिकतील, अशी आशा आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)