अंटार्क्टिकामध्ये मरून पडली पेंग्विनची हजारो पिल्लं

अंटार्क्टिकामध्ये तापमानवाढीमुळे बर्फ वितळत चाललं आहे. त्यामुळे पेंग्विनना अन्नाच्या शोधात दूरदूर जावं लागलं आणि वेळेवर अन्न न मिळाल्यामुळे त्यांच्या पिल्लांचा मृत्यू ओढवला.
अंटार्क्टिकाच्या किनाऱ्यावर सगळीकडे अॅडेली पेंग्विन नावाची प्रजाती आढळते. पूर्व अंटार्क्टिकामधल्या विणीसाठीच्या वसाहतीत त्यांची हजारो पिल्लं मरून पडली.
गेल्या पाच वर्षांत पेंग्विन्सची पिल्लं मरून पडल्याची ही दुसरी घटना. याआधी 2015 मध्येही अन्नाअभावी पेंग्विनची अनेक पिल्लं मरून पडली होती.

फोटो स्रोत, Reuters
पेंग्विनच्या खाद्यात क्रील हे कोळंबीसारखे जलजीव, स्वीड्स आणि छोट्या माशांचा समावेश असतो. अंटार्क्टिकामध्ये सध्या क्रीलची कृत्रिम पैदास होत असल्यामुळे पेंग्विनना नैसर्गिक अधिवासात हे खाद्य मिळत नाही.
त्यामुळे या भागात क्रीलच्या कृत्रिम पैदाशीवर नियंत्रण आणलं तरच पेंग्विनना इथे त्यांचं खाद्य मिळेल, असं संशोधकांचं म्हणणं आहे. वर्ल्डवाईड फंड फॉर नेचर या संस्थेच्या संशोधकांच्या पथकाने अंटार्क्टिकामध्ये पेंग्विनच्या सर्वेक्षणाचा प्रकल्प हाती घेतला आहे.

फोटो स्रोत, BBC/SHUTTERSTOCK
2010 पासून फ्रेंच संशोधक या प्रकल्पात काम करत आहेत. त्यांच्या अभ्यासानुसार, तापमानवाढीमुळे पेंग्विनचा अंटार्क्टिकामधला अधिवास घटत चालला आहे.
कुणासाठी... पिल्लांसाठी
अॅडेली पेंग्विन्स अंटार्क्टिकामध्ये समुद्राने वेढलेल्या बर्फाच्या खडकांवर राहतात. पण विणीसाठी त्यांना बर्फाचं आवरण नसलेले उघडे खडक लागतात.
ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा त्यांचा विणीचा हंगाम असतो. या काळात अंटार्क्टिकामध्ये वसंत ऋतू असतो. समुद्रातलं बर्फ गोठण्याच्या आधी पेंग्विनना त्यांचा विणीचा हंगाम पार पाडावा लागतो.

फोटो स्रोत, WWF/PA
पेंग्विन उघड्या खडकांवर दगडाचं घरटं बनवून अंडी घालतात. हे घरटं बनवण्याची जबाबदारी पेंग्विनच्या नरावर असते.
घरट्याची जबाबदारी नरावर ?
जो नर पिल्लांसाठी सुरक्षित घरटं बनवतो त्याची मादी निवड करते.
पेंग्विनची मादी एका हंगामात दोन अंडी घालते. ही अंडी उबवण्याचं काम नर आणि मादी आळीपाळीने करतात. जोरदार हिमवर्षावात या अंड्यांची राखण करताना नर आणि मादीची कसोटी लागते.

फोटो स्रोत, Reuters
पेंग्विन्सच्या जोडीपैकी एकजण अंड्याजवळ थांबतो आणि दुसऱ्याला अन्नाच्या शोधात जावं लागतं. याच काळात अन्न न मिळाल्यामुळे पेंग्विनच्या पिल्लांचा मृत्यू ओढवला.
पेंग्विनच्या संवर्धनाची गरज
अंटार्क्टिकामध्ये अॅडेली पेंग्विनच्या संख्येत 65 टक्क्यांची घट झाली आहे. आता उरलेल्या पेंग्विनना वाचवण्यासाठी त्यांचे अधिवास संरक्षित करणं गरजेचं आहे.
त्यासोबतच त्यांच्या विणीच्या जागी त्यांच्यासाठी पुरेसं खाद्य असेल याची खबरदारी आपण घ्यायला हवी, असं वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड या संस्थेचे रॉड डॉवनी यांनी म्हटलं आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








