शनीची कडी होणार गायब, ही खगोलीय घटना काय आहे?

फोटो स्रोत, NASA
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी
अंधाऱ्या रात्री टेलिस्कोपमधून चंद्रावरची विवरं, शनी ग्रहाची कडी तुम्ही पाहिली असतील. किंवा शनीभोवतीच्या या रिंगांचे फोटो नक्कीच पाहिले असतील.
ग्रहाभोवती असणाऱ्या या रिंग्समुळे शनी हा सौरमालेतला सगळ्यात वेगळा ग्रह ठरतो.
पण शनीची ही कडी म्हणजे Saturn Rings या 23 मार्च 2025 ला गायब होतील.
म्हणजे नेमकं काय होणार आहे? शनीची कडी म्हणजे या ग्रहाभोवती दिसणारी वर्तुळं कशाची बनली आहेत? आणि ती फक्त शनीभोवती का आहेत?
शनी हा आपल्या सूर्यमालेतला इतरांपेक्षा अगदी वेगळा दिसणारा ग्रह आहे. गुरू - म्हणजे Jupiter नंतरचा हा Solar System मधला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे आणि तो मुख्यतः बनलाय हायड्रोजन आणि हेलियमने. शनी ग्रहाचा व्यास आहे तब्बल 1,16,500 किमी.
शनीची कडी
या ग्रहाचं वेगळेपण म्हणजे त्या भोवती असणारी कडी. 1610 मध्ये खगोलज्ञ गॅलिलिओने पहिल्यांदा आपल्या दुर्बीणीतून ही कडी टिपली...पण तेव्हा ते नेमकं काय आहे, हे स्पष्ट झालं नाही.
गॅलिलिओने शनीभोवती पाहिलेल्या गोष्टी हे प्रत्यक्षात कडं - Ring असल्याचा शोध याच्या तब्बल 50 वर्षांनंतर क्रिस्टीयान हुगेन्स (Christiaan Huygens) यांनी लावला.

फोटो स्रोत, Getty Images
हे एक कडं नसून अनेक आहेत आणि त्यामध्ये अंतर आहे याचा शोध आणखी 20 वर्षांनी लागला. हा शोध ज्यांनी लावला त्या जिओवानी कॅसिनी (Giovanni Cassini) यांचच नाव A आणि B या दोन कड्यांमध्ये असणाऱ्या अंतराला देण्यात आलंय. या कॅसिनी यांचंच नाव असलेली एक मोहीम नासाने शनीचा अभ्यास करण्यासाठी पाठवली आहे.
आजवर शनीभोवतीच्या 7 कड्यांचा शोध लागला असून त्यांना A, B, C, D, E, F, G अशी नावं देण्यात आली आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
यातली G नावाची रिंग E आणि F रिंगच्या मध्ये आहे...आणि व्हॉएजर 1 यानाने शनीच्या शेजारून उडत जात असताना हिचा शोध लावला होता.
शनीची ही कडी 282,000 किमी अंतरावर पसरलेली आहेत. आणि अगदी एखाद्या धान्याच्या आकाराच्या बर्फकणांपासून ते मोठ्या खडकांसारख्या बर्फापासून ती बनलेली आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या रिंग्सची जाडी आहे फक्त 1 किमी. ही कडी 40 कोटी वर्षं जुनी असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
नासाच्या संशोधनानुसार काही कोटी वर्षांपूर्वी दोन बर्फाळ चंद्रांची धडक झाली आणि त्यातून निर्माण झालेल्या बर्फकण, दगडांपासून शनीची ही कडी तयार झाली.
शनीची कडी अदृश्यं का होणार?
गेले काही महिने खगोलशास्त्रज्ञ आणि खगोलप्रेमी शनी ग्रहावर नजर ठेवून आहेत. कारण 23 मार्चला शनीची ही रिंगणं दिसणं बंद होईल.
हे तात्पुरतं - काही महिन्यांसाठी असेल.
अशाप्रकारे शनीची कडी दिसणं ज्यावेळी बंद होतं तेव्हा या खगोलीय घटनेला म्हटलं जातं - Ring Plane Crossing. पृथ्वीवरून आपण कोणत्या कोनामध्ये शनीकडे बघतोय यावर ही खगोलीय घटना अवलंबून असते.

फोटो स्रोत, Getty Images
शनी हा ग्रह आपल्या सौरमालेमध्ये सूर्यापासून 1.43 अब्ज किलोमीटर्स अंतरावर आहे. आपली पृथ्वी सूर्याभोवती 365 दिवसांत एक प्रदक्षिणा पूर्ण करते. या काळाला आपण 1 वर्ष म्हणतो.
त्याच प्रमाणे सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीच्या दिवसांनुसार हिशोब केला तर शनीला 29.4 वर्षं लागतात.
पृथ्वीचा आस जसा 23.5 अंशांनी कललेला आहे, तसाच शनी देखील 26.7° अंशांमध्ये कललेला आहे. म्हणूनच शनीवरही ऋतू असतात आणि Solstice ही होतात...म्हणजे वर्षातला एखादा दिवस सगळ्यात मोठा किंवा सगळ्यात लहान असतो.
आता पृथ्वी आणि शनी हे दोन्ही ग्रह आपापल्या कक्षांमध्ये, आपापल्या वेगानुसार सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. म्हणूनच आपल्याला पृथ्वीवरून शनी ग्रह कसा दिसतोय ते दृश्य, म्हणजे तो व्ह्यू वर्षभर हळुहळू बदलत असतो.

फोटो स्रोत, Getty Images
सूर्याचा प्रकाश शनीच्या कड्यांवर पडत असतो. पृथ्वीवरून आपण कधी ही कडी वरून पाहतो, तर कधी खालून पाहतो.
पण Saturnian Equinox म्हणजे शनीवरच्या संपात काळामध्ये सूर्याचा प्रकाश हा थेट शनीच्या विषुववृत्तावर आणि त्याच्या रिंगणांवर पडत असतो. परिणामी पृथ्वीवरून आपल्याला शनी ग्रह तर दिसतो, पण त्याची कडी दिसत नाहीत... गायब झाल्यासारखी वाटतात.
पण मग ही Ring Plane Crossing घटना इतकी महत्त्वाची का आहे? कारण ती वारंवार घडत नाही. साधारणपणे 15 वर्षांतून एकदाच असं होतं असं नासाने म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images
एरव्ही प्रखरपणे चमकणारी ही कडी ज्यावेळी थोड्या काळासाठी दिसेनाशी होतात, तेव्हा शास्त्रज्ञांना शनीबद्दलचे इतर नवीन शोध लावण्याची संधी असते. म्हणजे 1965 ते 1980 या काळामध्ये जितका वेळ शनीची कडी अशी गायब झाली, त्या काळात शास्त्रज्ञांना शनीच्या 13 चंद्रांचा शोध लागला.
मार्च 2025 मध्ये गायब झालेली ही शनीची कडी नोव्हेंबर महिन्यापासून हळुहळू पुन्हा दिसायला लागतील.
यानंतर पुन्हा 2038 मध्ये पुढचं ring plane crossing होईल आणि शनीची रिंगणं पुन्हा गायब होतील. तर शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार सुमारे 30 कोटी वर्षांनी शनीची ही कडी कायमचीच गायब होतील.











