सूर्याच्या इतक्या जवळ जाऊनही नासाचं 'हे' अंतराळयान सुखरूप परत कसं आलं?

फोटो स्रोत, NASA
- Author, रेबेका मोरेल, ॲलिसन फ्रान्सिस आणि टिम डॉड
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अमेरिकेची अंतराळ संस्था असलेल्या नासाच्या एका अंतराळयानानं (स्पेसक्राफ्ट) सूर्याच्या अत्यंत जवळ जाऊनही सामान्यपणे काम करुन इतिहास रचला आहे.
याआधी अशाप्रकारे कोणतंही अंतराळयान सूर्याच्या इतक्या जवळ गेलेलं नव्हतं.
अनेक दिवस अत्यंत उष्ण वातावरणात उड्डाण केल्यानंतर त्याचा संपर्क तुटला होता, असा सिग्नल नासाच्या शास्त्रज्ञांना शुक्रवारी मिळाला.
हे यान सुरक्षित आहे आणि सूर्याच्या पृष्ठभागापासून 61 लाख किलोमीटर लांबून गेल्यानंतरही ते सामान्य पद्धतीनेच काम करत आहे, असं नासाचं म्हणणं आहे.
'पार्कर सोलर प्रोब' 2018 मध्ये सौर यंत्रणेच्या केंद्राच्या दिशेने पाठवण्यात आलं होतं.
ख्रिसमसच्या एक दिवश आधी हे 'प्रोब' यान सूर्याच्या बाह्य वातावरणामध्ये दाखल झालं होतं. मात्र, प्रचंड उष्ण तापमान आणि किरणोत्सर्गाशी दोन हात करुनही त्यानं आपलं अस्तित्त्व टिकवून ठेवलं.
अंतराळ यानाच्या या उड्डाणामुळे सूर्याच्या कार्यपद्धतीबाबतची आपली समज आणखी वाढणार आहे, असं नासाच्या संशोधकांचं म्हणणं आहे.
पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या जवळ पोहोचल्यानंतर नासाच्या संशोधकांच्या हृदयाची धडधड नक्कीच वाढलेली होती. ते सातत्याने या यानाकडून मिळणाऱ्या सिग्नल्सची वाट पाहत होते.
28 डिसेंबरच्या सकाळी पाच वाजता सिग्नल्स मिळू शकतात, अशी त्यांना आशा होती.
हे यान इतकी उष्णता कसं सहन करू शकतं?
पार्कर सोलर प्रोब 6.92 लाख किलोमीटर प्रति तास वेगाने आपला प्रवास करत असतानाही ते 980 डिग्री सेल्सियस इतकं तापमान झेलण्यात यशस्वी ठरलं, अशी माहिती नासाच्या वेबसाइटने दिली आहे.
नासाचं असं म्हणणं आहे की, "इतक्या जवळून सूर्याचा अभ्यास करून त्याचे तापमान पार्कर सोलर प्रोबद्वारे घेता येतं. त्यामुळे या प्रदेशातील एखादा पदार्थ लाखो अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत कसा गरम होतो हे समजण्यास मदत होईल."
यावरून सौर वाऱ्याची उत्पत्ती (सूर्यातून बाहेर पडणारा पदार्थाचा सतत प्रवाह) आणि ऊर्जेने भारलेले कण प्रकाशाच्या गतीपर्यंत पोहोचण्यामागची कारणे समजून घेता येऊ शकतील.


"अनेक शतकांपासून लोक सूर्याचा अभ्यास करत आहेत. मात्र, जोपर्यंत ते तिथपर्यंत पोहचणार नाहीत, तोपर्यंत तिथल्या वातावरणाची जाणीव होऊ शकणार नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही तिथून उड्डाण करणार नाही, तोपर्यंत तिथले वातावरण कसं आहे हे सांगू शकणार नाही," असं नासाच्या सायन्स विभागाचे प्रमुख डॉक्टर निकोला फॉक्स यांनी याआधी बीबीसीशी बोलताना म्हटलं होतं.
पार्कर सोलर प्रोब 2018 मध्ये लाँच करण्यात आलं होतं. त्याने आपल्या सौरमालेच्या केंद्राकडे आपला प्रवास सुरू ठेवला होता.
हे यान सूर्याजवळून 21 वेळेला गेलेलं आहे. प्रत्येक वेळेला ते आधीच्या तुलनेत सूर्याच्या अधिकच जवळ गेलेलं दिसून आलं आहे. मात्र, ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला हे यान सूर्याच्या प्रचंड जवळ पोहोचलेलं होतं. या यानाने सूर्याच्या जवळ जाण्याचे आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडले आहेत.
मात्र, सूर्याच्या सर्वांत जवळ जाण्याचा रेकॉर्ड करुनही अद्यापही हे यान सूर्यापासून 61 लाख किलोमीटर दूर होतं.
परंतु, हे अंतर सूर्य आणि प्रोब यानामधील अंतर देखील पुन्हा परिभाषित करते.

फोटो स्रोत, NASA
डॉ. फॉक्स यांचं असं म्हणणं आहे की, "आपण सूर्यापासून 9.30 कोटी मैल अंतरावर आहोत. जर समजा आपण सूर्य आणि पृथ्वीला एक मीटर अंतरावर ठेवलं. तर पार्क सोलर प्रोब हे यान सूर्यापासून फक्त 4 सेंटीमीटर अंतरावर असेल, असं हे प्रमाण आहे. थोडक्यात, हे यान सूर्याच्या इतकं जवळ आहे."
प्रोब यान हे 1400 डिग्री सेल्सियसचं तापमान सहन करण्यातदेखील यशस्वी ठरलं आहे. हे इतकं प्रचंड तापमान खरं तर त्याच्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनिक्सला जाळून खाक करु शकत होतं.
मात्र, या यानाच्या सर्व बाजूला 11.5 सेंटीमीटर जाड कार्बन कंपोझिट शील्ड लावण्यात आलं आहे, जे त्याचा प्रचंड उष्णतेपासून बचाव करत राहतं. मात्र, सूर्याच्या वातावरणात वेगानं प्रवेश करणं आणि नंतर तितक्याच वेगानं बाहेर येणं ही खरं तर प्रोब यानाची रणनीती आहे.
या यानाने इतर कोणत्याही मानवनिर्मित वस्तूपेक्षा जास्त वेगाने प्रवास केला, असं म्हणता येईल. त्याचा वेग ताशी चार लाख तीस हजार मैल होता. म्हणजे थोडक्यात, लंडन ते न्यूयॉर्क हे अंतर 30 सेकंदांपेक्षा कमी वेळेत उड्डाण करुन पार करण्याइतपत हा वेग आहे.
पार्कर यानाने सूर्याकडे जात असताना निर्माण झालेल्या अत्यंत मजबूत गुरुत्वाकर्षणामुळे हा वेग गाठला होता.
सूर्याला स्पर्श करण्याचे प्रयत्न का केले जात आहेत?
संशोधकांना अशी आशा आहे की, हे अंतराळ यान सूर्याच्या बाह्य वातावरणामधून म्हणजेच 'कोरोना'मधून गेलं असेल, तेव्हा त्याने तिथल्या वातावरणासंदर्भातील सर्व आकडेवारीवजा माहिती गोळा केलेली असेल. या आकडेवारीच्या मदतीने सूर्यासंदर्भातील अनेक रहस्यांचा उलगडा केला जाऊ शकतो.
वेल्समध्ये फिफ्थ स्टार लॅब्सचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जेनिफर मिलॉर्ड यांनी सांगितलं की, "कोरोना (सूर्याचे बाह्यावरण) वास्तवात फारच गरम आहे. हे इतकं गरम का आहे, याची आपल्याला थोडीही कल्पना नाहीये."
पुढे त्यांनी सांगितलं की, "सूर्याच्या पृष्ठभागावर 6 हजार डिग्रीच्या जवळपास तापमान असतं. मात्र, त्याचं बाह्य वातावरण असलेल्या कोरोनावर (ज्याला आपण सूर्य ग्रहणादरम्यान आपण पाहू शकतो) तापमान लाखो डिग्रीपर्यंत पोहोचतं. हे बाह्य वातावरण सूर्यापासून खूपच लांब आहे. तरीही इथलं वातावरण इतकं गरम कसं काय होत आहे?"
या मिशनद्वारे सोलर विंड अर्थात सूर्याच्या कोरोनापासून सातत्याने बाहेर पडणाऱ्या चार्ज्ड पार्टिकल्सच्या (उर्जेने भारलेले कण) प्रवाहाचाही अभ्यास केला जाईल.
जेव्हा हे चार्ज झालेले कण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या संपर्कात येतात तेव्हा आकाशात प्रचंड चमक निर्माण होते.
मात्र, अंतराळातील या कथित वातावरणामुळे अनेक मोठ्या समस्याही निर्माण होऊ शकतात. यामुळे, पॉवर ग्रीड, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्यूनिकेशन सिस्टीम पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकते.

फोटो स्रोत, NASA
"पृथ्वीवर आपलं दैनंदिन जीवन सुरळीत चालू राहण्यासाठी सूर्य, त्याबद्दलच्या घडामोडी, अंतराळातील हवामान आणि सोलर विंडबाबत माहिती घेणं फारच गरजेचं आहे," असं डॉ. मिलॉर्ड सांगतात.
जेव्हा हे पार्कर सोलर प्रोब यान पृथ्वीच्या संपर्कात आलेलं नव्हतं तेव्हा नासाच्या संशोधकांमध्ये फारच चिंता निर्माण झाली होती.
डॉ. फॉक्स यांना आशा होती की सिग्नल मिळताच त्यांची टीम त्यांना ग्रीन हार्ट सिम्बॉल पाठवेल. याचा अर्थ हे प्रोब यान योग्यरित्या काम करत असल्याचा तो संकेत असेल.
त्यांनी कबूल केलं की त्यांना या धाडसी प्रयत्नाबद्दल सुरुवातीला प्रचंड काळजी वाटत होती, परंतु त्यांचा या प्रोब यानावर विश्वासदेखील होता.
त्यांनी म्हटलं आहे की, "मला प्रोब यानाबद्दल आताही काळजीच वाटेल. मात्र, हे प्रचंड प्रतिकूल आणि अवघड वातावरणातही काम करु शकेल, अशा प्रकारेच आम्ही त्याला डिझाईन केलंय. हे छोटंसं अंतराळ यान आतून प्रचंड मजबूत आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











