ग्रहणकाळात काही प्राणी होतात अस्वस्थ तर काही होतात अचानक सक्रिय, काय आहे रहस्य?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, फ्रॅंकी अॅडकिन्स
- Role, बीबीसी फीचर्स
सूर्यग्रहणामुळं माणूस तर आश्चर्यचकित होतोच, मात्र काही काळापुरती जेव्हा सूर्यप्रकाश जाऊन अंधार पडतो तेव्हा पृथ्वीवरील सजीवसृष्टीतील सजीवांना कसं वाटतं?
काही विशिष्ट वेळी, जेव्हा आपल्या सूर्यमालेत खास परिस्थिती निर्माण होते, म्हणजेच काही काळापुरता सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो, त्यामुळे सूर्य झाकला जातो आणि पृथ्वीवर अंधार पडतो. यालाच सूर्यग्रहण म्हणतात.
आठ एप्रिलच्या सूर्यग्रहणाबाबत जगभरात कुतुहल आहे. कारण उत्तर अमेरिका खंडाच्या काही भागामध्ये पूर्ण सूर्यग्रहण दिसेल आणि चार मिनिट नऊ सेकंदासाठी पूर्णपणे अंधार निर्माण होईल.
अर्थात सूर्यग्रहण फक्त काही क्षणांसाठीचं असतं मात्र मानवावर याचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. सूर्यग्रहणामुळे मानव आश्चर्यचकित होतो, त्याच्यातील कुतूहल वाढतं आणि त्याच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात.
पृथ्वीवर सजीवांचं आयुष्य, त्यांची दिनचर्या सूर्यावर अवलंबून आहे. सूर्योदय आणि सूर्यास्तावर प्राण्यांचं जगणं पूर्णपणे अवलंबून असतं. चारा शोधणे, शिकार करणे, झोपणे, उठणे यांसारख्या दैनंदिन कामासाठी प्राणी 24 तासांच्या जैविक घड्याळावर अवलंबून असतात. याला 'सर्काडियन रिदम' सुद्धा म्हणतात.
कित्येक दशकांतून पृथ्वीवरील एखाद्या भागात होणारं सूर्यग्रहण या जैविक घड्याळात काही क्षणांसाठी अडथळा निर्माण करतं. मात्र प्राण्यांच्या दिनचर्येवर सूर्यग्रहणाचा नेमका काय परिणाम होतो याबद्दल सध्या खूपच मर्यादित स्वरुपात माहिती उपलब्ध आहे.
याचं एक कारण हेदेखील आहे की सर्व प्राणी या खगोलशास्त्रातील घटनेवर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाहीत.
स्वीडनमधील लुंड विद्यापीठात बिहेवियरल इकॉलॉजिस्ट असणाऱ्या सेसिलिया निल्सन म्हणतात, ''सूर्यप्रकाश ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. वृक्ष, वनस्पती आणि सजीवांवर त्याचा मोठा परिणाम होत असतो. आपण सूर्यप्रकाश रोखू शकत नाही, मात्र निसर्गाचेच असे नियम आहेत, निसर्गातच अशा घटना होतात की प्रकाशाचं रुपांतर अंधारात होतं. त्यानंतर पुन्हा एका निश्चित वेळेनंतर अंधार दूर होत प्रकाश पूर्ववत होतो.''
माहिती गोळा करण्याचा प्रयत्न
न्यू इंग्लंड मधील किटक वैज्ञानिक असणाऱ्या व्लियम व्हिलर यांनी शंभर वर्षांपूर्वी यासंदर्भात संशोधन करण्याचा प्रयत्न केला होता. सूर्यग्रहणाच्या वेळेस सूर्य दृष्टीआड गेल्यावर अंधार निर्माण झाल्यानंतर पशू काय करतात हे जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली आणि लोकांना आवाहन केलं की 1932च्या सूर्यग्रहणाच्या वेळेस त्यांनी हे पाहण्याचा प्रयत्न करावा की सूर्यग्रहणाच्या त्या मोजक्या क्षणांमध्ये अंधार पडल्यावर पशूंच्या वागण्यात नेमका काय बदल होतो.
त्यांना पशूंच्या वागण्याशी निगडित 500 गोष्टींची माहिती मिळाली. यामध्ये पक्षी, कीटक, रोपं, वनस्पती, स्तनधारी सजीवांपासून वटवाघूळ आणि मधमाशांबद्दलची माहिती होती. सूर्यग्रहणामुळं अंधार होताच वटवाघूळ हुंकार देऊ लागले होते. तर मधमाशा त्यांच्या पोळ्यात परतू लागल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
ऑगस्ट 2017 मध्ये जेव्हा पुन्हा सूर्यग्रहण झालं आणि जवळपास 2 मिनिटं 42 सेकंदांसाठी सूर्य झाकला गेला होता. तेव्हा वैज्ञानिकांनी हाच प्रयोग पुन्हा एकदा केला.
यासंदर्भात समोर आलेली माहिती आणखीच धक्कादायक होती. अंधार पडताच जिराफ सैरभैर होऊन इकडं तिकडं पळू लागले, अमेरिकेत दक्षिण कॅरोलिनातील एका प्राणीसंग्रहालयात काही कासवांनी प्रणयक्रीडा सुरू केली. ओरेगॉन, इडाहो आणि मिसुरीमध्ये बम्बलबी नावाच्या मधमाशांनी घोंघावणं थांबवलं.
आता सोमवारी आठ एप्रिलला सूर्यग्रहण होतं आहे. यामुळं पुन्हा एकदा वैज्ञानिक सूर्यग्रहणामुळं होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी उत्सुक आहेत. मेक्सिकोपासून मेन पर्यत वैज्ञानिक या खगोलशास्त्रीय घटनेच्या प्रत्येक क्षणाचा अभ्यास करण्यासाठी तयारी करत आहेत.
वैज्ञानिकांनी लोकांनी आवाहन केलं आहे की सूर्यग्रहणाच्या काळात पशूंच्या वागण्यात दिसून येणाऱ्या बदलांवर नक्की लक्ष द्यावं.
संपूर्ण दिवसभर प्राणी संग्रहालयात होती अस्वस्थता
अॅडम हार्टस्टोन-रोझ, दक्षिण कॅरोलिना तील रिव्हर बॅंक्स प्राणीसंग्रहालयात आणि गार्डनमध्ये वैज्ञानिक म्हणून काम करत असतात.
ते सांगतात, 2017 च्या सूर्यग्रहणाआधी त्यांना असं वाटलं होतं की प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही.
त्यांनी याला पाऊस आणि वादळासारखीच एक घटना मानत याकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र अनेक संशोधक आणि मोठ्या संख्येने नागरिक प्राणी संग्रहालयात गोळा झाले होते. तिथे असणाऱ्या प्राण्यांच्या 17 प्रजातींना पाहण्यासाठी जमले होते. सूर्यग्रहण सुरू होण्याआधीपासून आणि झाल्यानंतर ते प्राण्यांचं निरीक्षण करत होते.

फोटो स्रोत, Getty Images
अॅडम हार्टस्टोन-रोझ सांगतात, ''हा दिवस इतर दिवसांपेक्षा वेगळा होता. कारण त्या दिवशी प्राणी संग्रहालयात खूपच हालचाल दिसून येत होती. इथं हजारो लोक जमले होते आणि प्रत्येकजण उत्साहात होता.''
हार्टस्टोन-रोझ यांचं म्हणणं आहे की ज्या प्राण्यांचं निरीक्षण करण्यात आलं त्यातील तीन चतुर्थांशपेक्षा अधिक प्रतिक्रिया आयुष्य बदलून टाकणारी आणि खूपच अद्भुत अशी होती.
सूर्यग्रहण काळातील प्राण्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या वागण्याला चार प्रकारात विभागण्यात आलं. एक प्रकार म्हणजे ज्यात प्राणी नेहमी प्रमाणंच वागत होते. दुसरा प्रकार ज्यात संध्याकाळ झाल्यानंतर प्राणी ज्या प्रकारे वागण्यास सुरूवात करतात त्या प्रकारचं वागणं, तिसरा प्रकार ज्यात प्राणी अस्वस्थ झाले होते आणि चौथा प्रकार ज्यात प्राणी विचित्र पद्धतीनं वागत होते.
हार्टस्टोन-रोझ सांगतात, ''सूर्यग्रहणासारख्या दुर्मिळ घटनेच्या संपूर्ण वेळेत ग्रिझली अस्वल पूर्णपणे निराश झाले होते.''
ते पुढं सांगतात, ''संपूर्ण ग्रहणकाळात ही अस्वलं आराम करत होती. त्यातील एकाने आपलं डोकं खाली केलं. त्याच्या वर्तनातून असं दिसत होतं की त्याला ग्रहणाची परवा नाही.''

दुसरीकडे निशाचर पक्षी खूपच भ्रमिष्टासारखे वागत होते. हार्टस्टोन-रोझ म्हणतात, 'जसा सरडा भवतालाशी जुळवून घेण्यासाठी रंग बदलतो, तसं टॉनी फ्रॉगमाऊथ नावाचे पक्षी दिवसा सडलेल्या झाडाच्या खोडासारखं दिसण्याचा प्रयत्न करत होते. रंगरूप बदलण्यात हे पक्षी निपुण असतात. ते रात्रीच्या वेळेस अन्न शोधतात आणि त्यांचा रंग बदलतात.'
हार्टस्टोन-रोझ म्हणतात, ''त्यांनी नेमकं तेच केलं. सूर्यग्रहणानंतर जेव्हा प्रकाश पूर्ववत झाला तेव्हा पुन्हा एकदा झाडांच्या फांद्यावर परतले.''
सूर्यग्रहणाच्या काळात काही प्राणी चिंतातूर आणि अस्वस्थ झालेले दिसून आले. हार्टस्टोन-रोझ म्हणतात, ''एरवी जिराफ खूपच शांत स्वभावाचं प्राणी असतात.'' मात्र एखाद्या शिकारी प्राण्याला किंवा गाडीला पाहिल्याचा त्यांना धक्का बसला असावा, अशा पद्धतीने जिराफ सूर्यग्रहणाच्या काळात पळू लागले.
हा टेनेसी मधील नॅशविले प्राणीसंग्रहालयातील जिराफांचा फोटो आहे. यामध्ये ते भीतीने जोरात पळताना दिसत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र सर्वांत विचित्र वागणं गॅलापागोसमधील मोठ्या कासवांचं होतं. हार्टस्टोन-रोझ सांगतात, ''सर्वसाधारणपणे कासव हे सुस्त प्राणी असतात. ते इतरांसमोर फारसे येत नाहीत'', मात्र सूर्यग्रहणाच्या काळात या कासवांच्या वागण्यात मोठा बदल दिसून आला.
ही कासवं नेहमीपेक्षा अधिक सक्रिय झाली आणि जेव्हा सूर्यग्रहण शिखरावर पोचलं तेव्हा चक्क त्यांनी प्रणयक्रिडा सुरू केली.
अर्थात सूर्यग्रहणाचा वेगवेगळ्या प्राण्यावर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी प्राणीसंग्रहालयात एक वेगळंच वातावरण होतं. मात्र या पद्धतीने प्राणीसंग्रहालयात निरीक्षण करण्याच्या काही मर्यादा किंवा दोषदेखील आहेत.
हार्टस्टोन-रोझ सांगतात की' ''सूर्यग्रहण ही एक रोमांचकारी घटना असते आणि त्यामुळे लोक जोरजोरात ओरडत होते.''
ते सांगतात की त्यामुळंच प्राण्यांची प्रतिक्रिया लोकांच्या गोंगाटामुळं होती की सूर्यग्रहणामुळं होती हे समजणं खूपच कठीण आहे.
जंगलातील प्राण्यांचं वर्तन
अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून ते पश्चिम किनारपट्टी पर्यंत पसरलेल्या 143 हवामान केंद्रांमधील माहिती एकत्र करून त्याचाही अभ्यास करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हा अभ्यास करणाऱ्या टीमचं नेतृत्व करणाऱ्या निल्सन सांगतात, ''आमच्याकडं एक असं नेटवर्क आहे जे सतत आकाशावर लक्ष ठेवून असतं. सूर्यग्रहणासारख्या दुर्मिळ घटनांचा अभ्यास मोठ्या स्वरुपात करण्याची ही एक मोठी संधी असू शकते.''
पक्षी किंवा किटकांसारखे उडणारे सजीव सूर्यप्रकाशाच्या अभावी निर्माण झालेल्या अंधाराला सुर्यास्त समजून आकाशात उडण्यास सुरुवात करतील का? यावर वैज्ञानिक विचार करत होते.
मात्र सूर्यग्रहणातील अंधारात पक्षांना आकाशात उडताना पाहणं कठीण असतं, अशावेळी ही हवामान केंद्रे महत्त्वाची ठरू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
निल्सन सांगतात, ''वेगवेगळ्या पक्ष्यांवर लक्ष ठेवण्याऐवजी, आपण आकाशात उडणाऱ्या सर्वच सजीवांबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकतो.''
एक सर्वसामान्य रडार कसं काम करतं ते समजून घेऊया. हे रडार एक सिग्नल पाठवतं आणि मग सोनार तंत्रानुसार तो सिग्नल पुन्हा येण्याची वाट पाहतं. परत येणाऱ्या सिग्नलला रिफ्लेक्टिव्हिटी असं म्हणतात.
निल्सन सांगतात की हा परत येणारा सिग्नल किंवा रिफ्लेक्टिव्हिटी प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी असते. म्हणजेच एखाद्या पक्षामुळं असणारी रिफ्लेक्टिव्हिटी ही एखाद्या ढगाच्या रिफ्लेक्टिव्हिटीपेक्षा पूर्णपणे वेगळी असते.
सूर्यास्ताच्या वेळेस सर्वसाधारणपणं आकाशात अनेक घडामोडी घडत असतात. कारण पक्षी आपापल्या घरट्यात परतत असतात. मात्र दिवसाउजेडी अचानक अंधार होण्याची दुर्मिळ घटना घटल्यानंतर पक्षांच्या वागण्यात काही बदल होऊ शकतो का?
निल्सन पुढं सांगतात, ''आम्ही असं पाहिलं की प्रत्यक्षात आकाशात पक्षांची संख्या कमी झाली होती.'' सूर्यग्रहणाची सुरूवात झाल्यानंतर बहुतांश पक्षी आकाशातून जमिनीवर आले होते. त्यानंतर त्यांनी इकडेतिकडे उडणं बंद केलं होतं.
त्या म्हणतात, वादळ येण्याआधी पक्षी ज्या पद्धतीने स्वत:साठी आश्रयस्थान शोधू लागतात, पक्षांचं वागणं अगदी त्याच प्रकारचं होतं.
ग्रहणाचे इतर परिणाम
अमेरिकेतील नेब्रास्कामध्ये प्लेट नदीचं खोरं स्थलांतरित पक्षांसाठी थांबण्याचं ठिकाण आणि घरटी बनवण्याचं ठिकाण म्हणून महत्त्वाचं आहे. 2017 च्या सूर्यग्रहणात पक्षांचं वागणं समजून घेणं तसं थोडं सोपं होतं.
वैज्ञानिकांच्या एका टीमने तिथे पक्षांचं निरीक्षण करण्यासाठी त्यांच्या नेहमीच्या मार्गाच्या आसपास अनेक टाईम लॅप्स कॅमेरे आणि पक्षांचा आवाज रेकॉर्ड करण्यासाठी रेकॉर्डर लावले होते.
कियर्नी येथील नेब्रास्का विद्यापीठात संशोधक असणाऱ्या एम्मा ब्रिनली बकले यांचं म्हणणं आहे की सूर्यग्रहणाच्या काळात वेगवेगळ्या पक्षांच्या वागण्यातील बदल किंवा प्रतिक्रिया वेगवेगळ्या स्वरुपाची होती.
त्या म्हणतात की सूर्यग्रहणामुळं जेव्हा अंधार पडू लागला तेव्हा वेस्टर्न मीडोलार्क पक्षी वेगाने झाडांकडे जाऊ लागला आणि काही ठिकाणी त्यांनी चिवचिवाट देखील बंद केला. तर अमेरिकन गोल्डफिंच आणि सॉंग स्पॅरो पक्षांनी ग्रहण काळात जोरजोरात आवाज काढले, चिवचिवाट केला.
माणसांप्रमाणंच प्राणीदेखील ग्रहणकाळात वेगवेगळ्या पद्धतीने वागतात. काही अभ्यासात असं दिसून आलं आहे की ग्रहणकाळात मासे लपण्याच्या जागेचा शोध घेऊ लागले आणि कोळ्यांनी त्यांची जाळी नष्ट करून टाकली.

फोटो स्रोत, Getty Images
एका प्रयोगात, फुलांमध्ये छोटे मायक्रोफोन लावण्यात आले होते. या अभ्यासात असं दिसून आलं की सूर्यग्रहणात अंधार पडताच 'बम्बलबी'ने घोंगावणं बंद केलं होतं.
ब्रिनली बकले यांचं म्हणणं आहे की अंधार पडल्यामुळंच सर्व बदल झाले असं म्हणता येणार नाही. कारण सूर्यग्रहणामुळं इतर किंवा दुय्यम स्वरुपाचे परिणामदेखील होतात.
सूर्यग्रहणाच्या काळात नेब्रास्कामध्ये, तापमान जवळपास 6.7 अंश सेल्सिअसने खाली आल्याचं नोंदवण्यात आलं. इथं आर्द्रतेत 12 टक्क्यांपर्यतची वाढ झाली होती. फारच कमी कालावधीत हा मोठा बदल झाला होता.
त्या म्हणतात की या बदलांमागे काय कारण आहे, हे अगदी निश्चित स्वरूपात सांगता येणं कठीण आहे.
8 एप्रिलच्या सूर्यग्रहणाला लक्षात घेऊन अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना मध्ये रिव्हर बॅंक प्राणीसंग्रहालयाने एका मोठ्या वैज्ञानिक अभ्यासाची योजना आखली आहे.
सूर्यग्रहण सफारी योजनेंतर्गत प्राण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांचं निरीक्षण करण्यासाठी आणि प्राण्यांच्या वर्तनातील बदल समजून घेण्यासाठी हजारो लोकांना प्रोत्साहन दिलं जातं आहे.
अर्थात प्राणीसंग्रहालयापासून दूर, शेतातील प्राणी आणि पाळीव प्राण्यांचा अभ्यास करून त्यांच्या वागण्याचं निरीक्षण करण्याचादेखील यात समावेश करण्यात येणार आहे.

ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या एका वलयाकार ग्रहणातून प्राथमिक स्वरुपाची माहिती याआधीच एकत्रित करण्यात आली आहे. संपूर्ण सूर्यग्रहणापेक्षा वलयाकार ग्रहण वेगळं असतं. चंद्र फक्त आंशिक स्वरुपात सुर्यासमोर आल्यामुळं वलयाकार ग्रहण होतं. यालाच काही लोक 'रिंग ऑफ फायर' देखील म्हणतात.
संपूर्ण अमेरिकेत पसरलेल्या जवळपास एक हजार डेटा कलेक्टर्ससोबत नासा देखील एक एक्लिप्स साऊंडस्केप योजना राबवतं आहे.
या योजनेंतर्गत ऑडिओ मॉथ्स नावाच्या छोट्या डेटा रेकॉर्डरचा वापर हे डेटा कलेक्टर्स करणार असून ते वन्यजीवांच्या आवाजाचे रेकॉर्डिंग करणार आहेत.
हेनरी ट्रे विंटर हे अॅडव्हांस्ट्ड रिसर्च इन स्टीम एक्सेसिबिलिटी लॅबच्या सोलर फिजिक्स वैज्ञानिक सांगतात, 'प्राण्यांवर ध्वनीचा दीर्घकाळापर्यंत प्रभाव राहतो का ही बाब आम्हाला विशेष रुपानं जाणून घ्यायची आहे.'
विंटर सांगतात की विशिष्ट परिस्थितीत प्राणी ज्या प्रकारची प्रतिक्रिया देतात, त्यातून मानवाच्या हालचालींमुळं होणाऱ्या परिणामाबद्दल अधिक माहिती मिळू शकते.
ते सांगतात, ''तुम्ही एखाद्या भागात बांधकाम किंवा इतर कामांसाठी रात्रभर प्रकाशव्यवस्था केली असल्यास होणाऱ्या मोठ्या आवाजाचा प्रभाव ऐकू शकतात.''
2044 च्या आधी अमेरिकेत दिसणारे हे शेवटचं संपूर्ण सूर्यग्रहण आहे. याच कारणामुळे अनेकजण प्राण्यांवर होणाऱ्या परिणामांवर खास लक्ष ठेवून आहेत.
हार्टस्टोन-रोझ म्हणतात, ''कोणत्या प्रकारचं ग्रहण हा एक अत्यंत शक्तिशाली आणि अद्भूत स्वरूपाचा अनुभव आहे. हे सर्व आपल्याला एकमेकांसोबत आणि निसर्गासोबत अनुभवाला मिळतं. याच काळात आपण अनेक आणि व्यापक स्वरुपाच्या प्रश्नांची उत्तरं देखील शोधू शकतो.''











