ताडोबात सापडले 2 वाघांचे मृतदेह, झुंजीमुळे झाला मृत्यू?

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा वनपरिक्षेत्रात दोन वाघांचे मृतदेह आढळून आले होते. मृत्यू झालेल्या वाघांमध्ये सहा ते सात वर्षं वय असलेला टी-142, तर टी- 92 या दीड ते दोन वर्षांच्या मादी बछड्याचा समावेश आहे.

कोळसा वनपरीक्षेत्रात झरी हे उपवन क्षेत्र येतं. यातील झरी कक्ष क्रमांक 338 पाणघाट कुटी परिसरातील खातोडा तलाव क्षेत्रात गस्तीदरम्यान वनरक्षकाला दोन वाघांचे मृतदेह आढळून आले होते.

एका मादी बछड्याचा पुष्ठभाग खाल्लेला आढळून आला तर पूर्णपणे शाबूत असलेला दुसरा वाघ टी-142 याच्याही शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत.

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 20 ते 21 जानेवारी दरम्यान रात्री दोन वाघांमध्ये भीषण झुंज झाली. याच झुंजीत दोन वाघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात आला आहे.

वन उपसंचालक (कोर) नंदकिशोर काळे यांनी दिलेल्या “माहितीनुसार दोन वाघांच्या भीषण झुंजीत एक 6 ते 7 वर्षाचा नर वाघ तर टी-92 या वाघिणीचा मादी बछड्याचा मृत्यू झाला. मात्र त्याच परिसरात आम्हाला T-192 हा वाघ आढळून आला आहे.

“परिसरात ट्रॅप कॅमेरात तो कैद झाला. त्यामुळं याच वाघाने दोन वाघांना ठार केलंय का याचा शोध आम्ही घेत आहोत. तर ट्रॅप कॅमेऱ्यात आढळून आलेल्या T-192 यानेच मादी बछड्याला ठार करून त्याचा पुष्ठभाग खाल्लाय का याचाही शोध आम्ही घेत आहोत. त्या भागात दोन दिवसांपासून वाघांची झुंज सुरू होती,” काळे म्हणाले.

ताडोबाचे वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी रविकांत खोब्रागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार “दोन वाघांची भीषण झुंज झाली. त्यात अती रक्तस्राव झाल्याने वाघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन ते अडीच वर्षाचा वाघाच्या बछड्याचा मागील भाग खाल्लेला होता. या मादी बछड्याच्या शरीरावरही जखमा आढळून आल्या आहेत”.

“त्याचेही सँपल आम्ही घेतले आहेत. T-142 या वाघासोबत या मादी बछड्याचा काय सबंध होते, त्यासाठी DNA नमुने प्रयोशाळेत पाठवण्यात आले आहे. त्यानंतर दोघांमधले सबंध कळेल. पण मादी बछड्याचा मागील भाग कुणी खाल्ला हे अद्याप स्पष्ट नाही. त्या बछड्याचा मृत्यू अधिवासाच्या लढाईसाठी झाला, की दुसऱ्या वाघाने त्याला ठार करुन त्याचे मास खाल्ले, की इतर प्राण्यांनी त्याचे मास खाल्ले हे अहवालानंतर पुढे येईल” खोब्रागडे यांनी माहिती दिली.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

ताडोबात वाघांची संख्या वाढल्याने अधिवासाच्या स्वामित्वासाठी दोन वाघांच्या झुंजीचे प्रमाण वाढले आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात वाघांच्या मृत्यूंची संख्या वाढत आहे.

“वाघांचे मृत्यूची कारणमीमांसा होणे आवश्यक आहे. वाघांच्या सवयी, त्यांची दैनंदिनी, जीवनशैली व अधिवासामध्ये येणारी स्थित्यंतरे व कालानुरूप वागण्यात होणारे बदलांचे निरीक्षण केले पाहिजे,” असं मत वन्यजीव प्रेमी यादव तरटे पाटील यांचं आहे.

ते म्हणतात “यातून अनेक बाबींचा उलगडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामावून घेण्याची क्षमता (Carrying Capacity) संपलेल्या किंवा वहनक्षमता कमी झालेल्या भागातील किंवा मोठ्या प्रमाणात पर्यटन होणाऱ्या भागातील वांघांचा विशेष अभ्यास होने आवश्यक आहे.”

“अधिवास स्वामीत्वावरुन वाघांच्या होणाऱ्या मृत्यूबाबत किंवा नैसर्गिक मृत्यू यांना सुद्धा शास्त्रीय बाजूने पाहणे आवश्यक आहे. ताडोबा व टिपेश्वर सारख्या जंगलातील वाघांचे अलीकडच्या काळातील वर्तणूक बदलत असल्याचे चित्र आहे. जेणेकरून याचा व्याघ्र संवर्धनासाठी उपयोग घेता येईल,” तरटे म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)