'डार्क स्काय पार्क' म्हणजे नेमकं काय? पेंच व्याघ्र प्रकल्पाचीच त्यासाठी निवड का झाली?

- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
महाराष्ट्रातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाला 'इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क' म्हणून मान्यता दिलेली आहे. रात्रभर आकाशातील ताऱ्यांचे खेळ बघत बसणं हा अनेकांचा छंद असतो.
अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत वर्दळीच्या ठिकाणांपासून जरा दूर गेलं तरीही अनेकांना तारे न्याहाळण्याचा ही हौस भागवता येत होती.
त्यातल्या त्यात जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर अशा ठिकाणी विजेच्या दिव्यांचा झगमगाट नसल्यामुळे निरभ्र आकाश अगदी सहज पाहता येत होतं.
पण हळूहळू प्रदूषणाचं प्रमाण वाढलं, कृत्रिम दिव्यांच्या उजेडाने रात्रीच्या वेळीसुद्धा दिवस असल्याचा भास होईल एवढा प्रकाश तयार झाला आणि रात्रीचं आकाश बघण्याची इच्छा असणाऱ्या खगोलप्रेमींचा हिरमोड होऊ लागला.
रात्रीच्या वेळी तारे पाहण्याचा आनंद मिळवण्यासाठी मानवी वस्तीपासून दूर जावं लागू नये आणि आकाश निरीक्षणासाठी राखीव जागा आणि उद्यानं तयार व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर 'इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन (IDSA)' ची स्थापना करण्यात आली.
याच संस्थेने पेंच व्याघ्र प्रकल्पाला भारतातील पहिलं डार्क स्काय पार्क होण्याचा मान दिलाय.
आता डार्क स्काय पार्क म्हणजे नेमकं काय? रात्रीच्या वातावरणाचं संवर्धन करणं का गरजेचं आहे? आणि प्रकाश प्रदूषण कमी होणं का गरजेचं आहे? याचाच हा सविस्तर आढावा.
डार्क स्काय पार्क म्हणजे काय?
पेंच व्याघ्र प्रकल्पाकडून मागच्या काही काळात रात्रीच्या आकाशाचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशनने ही मान्यता दिलेली आहे.
त्यामुळे आता व्याघ्र प्रकल्पातील काही भागांमध्ये कृत्रिम प्रकाशामुळे होणारं प्रदूषण नियंत्रित करून आकाश न्याहाळणाऱ्यांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातील.
IDSA च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार डार्क स्काय पार्क म्हणजे असं क्षेत्र जिथे फक्त नैसर्गिक प्रकाश असेल, कृत्रिम प्रकाशाचा अभाव असेल त्या ठिकाणची हवा प्रदुषणमुक्त असेल ज्यामुळे आकाश सहज न्याहाळता येईल.
महत्त्वाचं म्हणजे ही परिस्थिती कायम रहावी यासाठी या भागात प्रयत्न केले जातील. असा परिसर आकाश निरिक्षणासठी उत्तम म्हणून जाहीर केला जातो आणि त्याच भागाला डार्क स्काय पार्क असं म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
पेंच व्याघ्र प्रकल्पातील डार्क स्काय पार्क हा आशियातला पाचवा प्रकल्प असून याआधी आशिया खंडात जपान आणि दक्षिण कोरियामध्ये असे प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत.
पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रभू नाथ शुक्ला यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले की, "विश्वाची गुपिते उलगडू पाहणाऱ्या खगोलप्रेमींसाठी आता वाघांची ही भूमी नेहमीच प्रेरित करेल.
IDSA ने पेंच व्याघ्र प्रकल्पाला दिलेल्या मान्यतेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या व्याघ्र प्रकल्पाचं नाव जाणार आहे."
2022मध्ये याच संस्थेने लडाखच्या हानले वेधशाळेच्या परिसरात आकाश निरीक्षणासाठीचं राखीव क्षेत्र उभारण्याची परवानगी दिली होती.
त्यालाच डार्क स्काय रिजर्व्ह असंही म्हणतात. हानलेच्या वेधशाळेला भारतीय अंतराळ निरीक्षण वेधशाळा (Indian Astronomical Observatory) म्हणूनही ओळखलं जातं. ही जगातली सगळ्यांत उंच वेधशाळा आहे.
लडाखमधलं स्वच्छ आकाश आणि प्रदूषणमुक्त परिसरामुळे याच भागात डार्क स्काय रिजर्व्हला मान्यता देण्यात आलेली होती.
डार्क स्काय पार्क प्रमाणपत्रासाठी काय करावं लागतं?
डार्क स्काय पार्कची जागा खाजगी किंवा सरकारी असू शकते. कोणतीही व्यक्ती किंवा एखादा समुह हा राखीव क्षेत्रासाठी IDSA या संस्थेकडे अर्ज करु शकतो.
जागतिक वारसा स्थळासाठी ज्याप्रमाणे अर्ज केला जातो तशीच ही राखीव क्षेत्रासाठी प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची प्रक्रिया आहे.
पेंच येथील व्याघ्र प्रकल्पाच्या परिसराला डार्क स्काय पार्क म्हणून मान्यता मिळावी म्हणून अभिषेक पावसे या हौशी खगोलप्रेमी तरुणाने प्रयत्न केले आहेत. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुमारे 20,000 रुपयांचं शुल्क भरावं लागतं.
पेंच व्याघ्र प्रकल्पात काय बदल होणार?
डार्क स्काय पार्कची परवानगी मिळाल्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून पेंच व्याघ्र प्रकल्पात रात्रीच्या वेळी आकाशाचं निरीक्षण करण्यासाठी एक स्वतंत्र वेधशाळा उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
यासोबतच प्रकाशाचं प्रदूषण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातील.
डार्क स्काय प्रकल्पाबाबत स्थानिकांना माहिती दिली जाईल याबाबत प्रशिक्षणही पुरवलं जाणार आहे.
या व्याघ्र प्रकल्पातल्या सिलारी बफर झोन पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघोलीमध्ये आणखीन एक दुर्बीण बसवली जाईल.

फोटो स्रोत, AFP
"स्थानिक समुदायांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने पवनी बफर क्षेत्राच्या आजूबाजूच्या गावांमध्ये 100 हून अधिक पथदिवे आणि सामुदायिक दिवे जमिनीकडे तोंड करून लावण्यात आलेले आहेत. त्यांची दिशा बदलण्यात आली आहे.
यामुळे प्रकाश प्रदूषण कमी होतं आणि निशाचर परिसंस्थेला कमीत कमी व्यत्यय येतो. एकूणच काय तर पर्यटकांना रात्रीच्या वेळी येणारा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी हे प्रयत्न केले गेले आहेत," असं प्रभुनाथ शुक्ला म्हणाले.
इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन (IDSA) काय आहे?
1988 मध्ये 'इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन (IDSA)' ही संस्था सुरु झाली. रात्रीच्या वेळी तयार होणाऱ्या वातावरणाचं जतन करून त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याचं काम ही संस्था करते.
डार्क स्काय असोसिएशनच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सध्या 70 पेक्षा जास्त देशांमध्ये 193,000 समर्थकांच्या मदतीने ही चळवळ चालवली जाते.
प्रकाश प्रदूषण कमी करण्यासाठी आणि सुंदर, निरोगी आणि कार्यक्षम असलेल्या जबाबदार बाह्य प्रकाशाचा प्रचार करण्यासाठी या संस्थेचे कार्यकर्ते, समर्थक काम करत असतात.
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








