भरदिवसा तब्बल 4 मिनिटं होणार अंधार, नासा प्रयोगांसाठी सज्ज

खग्रास सूर्यग्रहण

फोटो स्रोत, Getty Images

पृथ्वी हा सूर्यमालेतला एकमेव ग्रह आहे जिथून खग्रास सूर्यग्रहण पाहता येतं.

दर 18 महिन्यांनी पृथ्वीवरच्या कोणत्यातरी भागात सूर्यग्रहण दिसत असतं. 8 एप्रिलला होणाऱ्या सूर्यग्रहणाबद्दल जगभरात उत्सुकता आहे कारण उत्तर अमेरिकेच्या ज्या भागात खग्रास ग्रहण स्थिती दिसेल तिथे तब्बल 4 मिनिटं 9 सेकंदांसाठी भरदिवसा - अंधार होईल.

यापूर्वीच्या खग्रास ग्रहणांपेक्षा हा काळ खूप मोठा आहे, म्हणूनच या ग्रहण काळात भरपूर प्रयोग केले जाणार आहेत.

चंद्र हा सूर्यापेक्षा पृथ्वीच्या 400 पट जवळ आहे पण त्याचवेळी हा चंद्र सूर्यापेक्षा आकारमानाने 400 पट लहान आहे. म्हणूनच ज्यावेळी सूर्य - चंद्र आणि पृथ्वी हे एका रेषेत येतात - मधोमध असणारा चंद्र - सूर्याला झाकू शकतो आणि आपल्याला पृथ्वीवर ग्रहण दिसतं.

सूर्यग्रहण स्थिती

फोटो स्रोत, Getty Images

वैज्ञानिकांसाठी हाच ग्रहण काळ अनेक संशोधनांसाठीच्या प्रयोगांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

याही वेळी 8 एप्रिलला उत्तर अमेरिका खंडात ग्रहण लागायला सुरुवात होईल तेव्हा लाखो लोकांना ते पाहता - अनुभवता येईल.

कारण यावेळी ग्रहण ज्या पट्ट्यात दिसणार आहे तो पट्टा प्रचंड लोकवस्तीचा आहे. मेक्सिकोचा काही भाग - अमेरिका आणि कॅनडात मिळून तब्बल 3.1 कोटी लोक हे ग्रहण पाहतील असा अंदाज आहे.

ग्रहण काळात कोणते प्रयोग करण्यात येणार आहेत?

या ग्रहणाचा वन्य प्राण्यांवर कसा परिणाम होतो याचा अभ्यास नॉर्थ कॅरोलिनातली NC स्टेट युनिव्हर्सिटी करणार आहे. ग्रहण पट्ट्यातल्या टेक्सास राज्यातल्या प्राणी संग्रहालयांमध्ये 20 प्राण्यांचा अभ्यास करण्यात येईल.

नासाच्या Eclipse Soundscape Project नेही प्राण्यांच्या वागणुकीचा अभ्यास करण्यासाठी आखणी केलीय. खग्रास ग्रहणपट्ट्यामधल्या भागांमधल्या प्राण्यांचे आवाज टिपण्यासाठी माईक असलेली लहान उपकरणं पेरली जातील आणि ग्रहणामुळे पूर्ण अंधार झाल्यानंतरच्या प्राण्यांच्या प्रतिक्रिया नोंदवण्यात येतील.

ग्रहणाच्या पट्ट्यापासून दूर अमेरिकेतल्या व्हर्जिनियातल्या नासाच्या वॅलप्स तळावरून 3 साऊंडिंग रॉकेट्स लाँच करण्यात येतील. Embry Riddle Aeronautical University चे आरोह बडजात्या या प्रयोगाचे प्रमुख आहेत. पृथ्वीच्या वातावरणामध्ये ग्रहणकाळात कोणते बदल घडतात याच्या नोंदी ही रॉकेट्स करतील. तीनही रॉकेट्स पृथ्वीपासून 420 किलोमीटर उंच जातील आणि नंतर पृथ्वीवर कोसळतील.

यातलं पहिलं रॉकेट ग्रहणाच्या पूर्ण स्थितीच्या 45 मिनिटं आधी लाँच होईल, दुसरं खग्रास काळात आणि तिसरं 45 मिनिटांनी लाँच केलं जाईल.

ग्रहणादरम्यान दिसणारा सूर्याचा कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ग्रहणादरम्यान दिसणारा सूर्याचा कोरोना

पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर वातावरणातील 80 किमीपासून सुरू होणाऱ्या थराला म्हणतात आयनांबर - Ionosphere. या थरात Ion आणि इलेक्ट्रॉन असतात.

हा एकप्रकारे अवकाश (Space) आणि वातावरण (Atmosphere) यांच्यातला पृथ्वीचा संरक्षक थर असतो. हा रेडिओ लहरी परावर्तित करणारा थर असतो. ग्रहणामुळे या थरात कोणते बदल घडून येतात याविषयीचा महत्त्वाचा अभ्यास साऊंडिंग रॉकेट्सच्या मदतीने केला जाईल. एरवी - ग्रहण नसतानाही जर या आयनांबरात काही बदल झाले तर त्याचा परिणाम सॅटलाईट कम्युनिकेशन्सवर होत असतो. त्यामुळेच ग्रहणामुळे होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्याची ही महत्त्वाची संधी आहे. कारण कोणत्या गोष्टींचा आपल्या संपर्क यंत्रणांवर परिणाम होऊ शकतो, हे यातून कळू शकतं.

ग्रहण

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

नासाच्या मदतीने आणखीन एक इंटरेस्टिंग प्रयोग होणार आहे - Eclipse Megamovie

ग्रहण पाहणाऱ्यांनी त्याचे फोटो काढावेत असं आवाहन या प्रयोगासाठी करण्यात आलंय. हजारो लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणांवरून काढलेले हे फोटोज मग जोडले जातील, AI च्या मदतीने त्यांचं विश्लेषण केलं जाईल.

खग्रास ग्रहणामध्ये सूर्याचा CORONA म्हणजे सूर्याभोवती वायूंमुळे निर्माण झालेल्या वातावरणाचे वेगवेगळे फोटोज यामुळे मिळणार आहेत.

सूर्याच्या पृष्ठभागावरच्या प्रखर प्रकाशामुळे हा कोरोना म्हणजे हे आवरण एरवी दिसत नाही, त्यासाठी विशेष उपकरणं लागतात.

पण ग्रहणकाळात सूर्याभोवती हा कोरोना दिसतो. याच ग्रहणकाळात एरवी न दिसणारे, सूर्याच्या अगदी जवळ असणारे तारेही दिसू शकतात. त्यामुळे त्यांचा अभ्यास करणं हेही एक महत्त्वाचं उद्दिष्टं असतं.

नासाची High Altitude Research Planes या ग्रहणाचे 50,000 फुटांवरून फोटो काढतील. मेक्सिकोपासून सुरुवात करून ही विमानं ग्रहणजसं पुढे सरकेल तशी प्रवास करतील. शिवाय या विमानांमध्ये इतरही काही उपकरणं असतील.

ग्रहणादरम्यान पृथ्वीचं वातावरण आणि हवामान यांच्यातले बदल टिपण्यासाठी एक्लिप्स बलून प्रोजेक्ट राबवला जाईल.

यात जवळपास 600 फुगे वातावरणात सोडले जातील. पृथ्वीच्या पृष्णभागापासून वर 35 किलोमीटर पर्यंत जाणाऱ्या या फुग्यांना जोडलेली उपकरणं वेगवेगळ्या नोंदी करतील.

नासाचा पार्कर सोलर प्रोब

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नासाचा पार्कर सोलर प्रोब

नासाचा Parker Solar Probe, युरोपियन स्पेस एजन्सी आणि नासाचा सोलर ऑर्बिटर, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधले अंतराळवीर हे देखील अर्थातच या ग्रहणाचा अभ्यास करतील.

ग्रहणांमुळे यापूर्वी लागलेले महत्त्वाचे शोध

सूर्यग्रहण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आर्थर एडिंग्टन यांनी 1919 मध्ये टिपलेला फोटो.

यावेळच्या ग्रहणात इतक्या वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास होणार आहे. पण यापूर्वी ग्रहण काळात करण्यात आलेल्या अभ्यासांमुळेच इतिहासात काही महत्त्वाचे शोध लागलेले आहेत.

अल्बर्ट आईस्टाईन यांची Theory of general relativity - सापेक्षतावादाचा सिद्धांत हा 19 मे 1919 च्या खग्रास सूर्यग्रहणादरम्यान आर्थर एडिंग्टन यांनी टिपलेल्या एका फोटोमध्ये सिद्ध झाला.

1868मध्ये सूर्य ग्रहणादरम्यान नोंदी करताना हेलियम (He) चा शोध लागला होता.

चंद्र ग्रहणादरम्यान पृथ्वीच्या पडलेल्या वक्र सावलीमुळेच पृथ्वी सपाट नाही तर गोल आहे हे सिद्ध करायला अॅरिस्टॉटलला मदत झाली होती.