सुनीता विल्यम्स जिथे गेल्या आहेत, ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक बंद पडल्यावर काय होईल?

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सुनीता विल्यम्स आणि सहकारी

फोटो स्रोत, NASA/Getty Images

फोटो कॅप्शन, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सुनीता विल्यम्स आणि सहकारी
    • Author, द इन्क्वायरी पॉडकास्ट
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

कल्पना चावला ते सुनिता विल्यम्स यांच्यासारखे अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तरंगतानाचे व्हिडियो तुम्ही पाहिले असतील.

अंतराळात 400 किलोमीटरवरून पृथ्वीभोवती भ्रमण करत असलेलं हे अंतराळ स्थानक जागतिक एकात्मतेचं, सहकार्याचं सर्वात महत्त्वाचं प्रतीक आहे.

या अंतराळ स्थानकानं नव्या वैद्यकीय उपचारपद्धती शोधण्यासून ते हवामान बदलावर नजर ठेवण्यापर्यंत अनेक प्रकारच्या वैज्ञानिक संशोधनात मदत केली.

पण, आता त्याचा कार्यकाळ आता संपत आला आहे. काही वर्षांनी ते निकामी होईल, तेव्हा पृथ्वीवर पॅसिफिक महासागरात पाडलं जाईल.

गेल्या तीस वर्षांपासून पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असलेल्या या अंतराळ स्थानकाचा सांगाडा आता जुना झाला आहे. त्यामुळे सहा वर्षांत ते बंद केलं जाईल.

साहजिकच अंतराळ स्थानकाचा शेवट होईल, तेव्हा तो एका युगाचा अंत ठरेल.

पण मग त्यानंतर काय होईल? भारतासह अनेक देश आपापली अंतराळ स्थानकं उभारण्याच्या तयारीत आहेत, त्याचा काय परिणाम होईल?

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची निर्मिती

जेनिफर लेवासर अमेरिकेच्या वॉशिंग्टन डिसीमध्ये राहतात आणि त्या तिथे स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटच्या नॅशनल एयर अँड स्पेस म्युझियमच्या क्युरेटर आहेत.

त्या सांगतात की “स्पेस स्टेशन एवढं चमकदार आहे. सूर्याचा अँगल सोयीचा असेल तर ते दिसतंही. ते एका ठराविक वेगानं फिरत राहतं.”

ताशी 17,500 मैल वेगानं हे अंतराळ स्थानक पृथ्वीभोवती फिरत आहे आणि आपल्या ग्रहाची एक एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी त्याला 93 मिनिटं लागतात.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक

फोटो स्रोत, NASA

फोटो कॅप्शन, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक

1998 साली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अवकाशात पाठवण्यात आलं होतं.

त्या काळी म्हणजे शीतयुद्ध संपल्यानंतरच्या दिवसांत ते जागतिक सहकार्य आणि शांतीचं प्रतीक बनलं आणि हा प्रकल्प म्हणजे एक मोठं राजनैतिक यश मानलं गेलं होतं.

पण या अंतराळ स्थानकाची कल्पना कुठून सुचली? तर त्यासाठी अंतराळ मोहिमांच्या इतिहासात डोकावून पाहावं लागले.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

1942 साली जर्मन इंजिनीअर्सनी अंतराळात जाऊ शकेल असं व्ही-2 रॉकेट बनवलं. तेव्हापासूनच माणसाला अंतराळात नेण्याचे, तिथे राहता येईल असं स्थानक उभारण्याचे प्रयत्नही सुरू झाल्याचं जेनिफर लेवासर सांगतात.

मग दुसरं महायुद्ध संपलं आणि शीत युद्धाचा काळ सुरू झाला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्याची शक्यताच नव्हती.

खरंतर तेव्हा सोव्हिएत रशिया आणि अमेरिका या देशांत माणसाला चंद्रावर पाठवून आपलं तांत्रिक वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शर्यत रंगली होती. त्यात अमेरिकेला 1959 साली यश आलं.

मग 1970च्या दशकात दोन्ही देशांनी आपापली अंतराळ स्थानकं पृथ्वीभोवती कक्षेत प्रस्थापित केली.

पण, 1979 साली अमेरिकेचं स्कायलॅब अंतराळ स्थानक बंद झाल्यावर अमेरिकेच्या महत्त्वाकांक्षा आणखी वाढल्या.

BBC

त्या पार्श्वभूमीवर 1984 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अमेरिकन अंतराळ संस्था नासाला एक नवा प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश दिले.

राष्ट्राध्यक्ष रेगन यांनी सांगितलं की, ‘नासानं अन्य देशांच्या साथीनं दहा वर्षांत अंतराळ स्थानक तयार करावं जिथे राहून माणसं संशोधन करू शकतील.’ जगात शांती आणि समृद्धी आणण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचंही ते म्हणाले.

सन 1989 उजाडेपर्यंत सोव्हिएत रशियाचं विघटन झालं. शीतयुद्ध संपलं आणि मग रशियाही अंतराळ स्थानक उभारण्याच्या या प्रकल्पात अमेरिकेच्या साथीनं सहभागी झाला.

जेनिफर लेवासर यांच्या मते, “त्यावेळी अमेरिकेनं रशियाला या प्रकल्पात सहभागी केलं नसतं, तर कदाचित रशियाचा अंतराळ कार्यक्रमच बंद पडला असता. 1994 साली दोन्ही देशांतली तांत्रिक देवाण-घेवाण सुरू झाली आणि त्यातूनच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची यशस्वी निर्मिती झाली.”

या प्रकल्पात अमेरिका आणि रशियासह युरोप, कॅनडा आणि जपानचं योगदान आहे. सहयोगाचा असा प्रयोग याआधी झाला नव्हता.

सोलर पॅनेल्स असलेलं रशियन मोड्यूल झार्या (वरती) आणि अमेरिकन मोड्यूल युनिटी (खाली) एकमेकांना जोडल्यानंतर, स्पेस शटल 'एंडेव्हर' या यानातून अंतराळवीरांनी टिपलेला फोटो.

फोटो स्रोत, Getty Images/NASA

फोटो कॅप्शन, सोलर पॅनेल्स असलेलं रशियन मोड्यूल झार्या (वरती) आणि अमेरिकन मोड्यूल युनिटी (खाली) एकमेकांना जोडल्यानंतर पृथ्वीवर परतताना, स्पेस शटल 'एंडेव्हर' या यानातून अंतराळवीरांनी टिपलेला फोटो.

नव्वदच्या दशकाच्या मध्यावर या प्रकल्पाची रूपरेशा आखण्यात आली. अमेरिका आणि रशियाची ऑरबिटल सिस्टिम आणि जपान, युरोपचे मोड्यूल्स असं हे स्थानक आकार घेऊ लागलं.

स्पेस स्टेशनच्या आकाराविषयी जेनिफर लेवासर सांगतात, “याचा मूळ सांगाडा एका नौकेसारखा आहे, त्यात दुसरे मोड्यूल्स जोडण्याची सोय आहे. या मोड्यूल्समध्ये माणसं राहू शकतात.

“इथे विजेसाठी सोलर पॅनेल्स आहेत. पण हे स्थानक अंतराळात पोहोचवणं फारच खार्चिक होतं. तसंच जमिनीवरून त्याचं नियंत्रण करण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज होती.”

20 नोव्हेंबर 1998 रोजी रशियानं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचं पहिलं मोड्यूल कझाकस्तानातून अंतराळात प्रक्षेपित केलं. हे मोड्यूल ‘झार्या’ या नावानं ओळखलं जातं. झार्याचा अर्थ होतो ‘सूर्योदय’.

त्याच वर्षी चार डिसेंबरला अमेरिकेनंही त्यांचं मोड्यूल, ‘युनिटी’ लाँच केलं आणि त्यानंतरच्या काळात बाकीची मोड्यूल्स एक एक करून जोडण्यात आली.

नासा अंतराळवीर गॅरेट राईजमन अंतराळ स्थानकाची उभारणी आणि देखरेखीचं काम करताना, 17 मे 2010 रोजीचा फोटो

फोटो स्रोत, Getty Images/NASA

फोटो कॅप्शन, नासा अंतराळवीर गॅरेट राईजमन अंतराळ स्थानकाची उभारणी आणि देखरेखीचं काम करताना, 17 मे 2010 रोजीचा फोटो

ही उभारणी पूर्ण करण्याची प्रक्रिया 2011 पर्यंत सुरू होती. तोवर या अंतराळ स्थानकाचा आकार एका फुटबॉल मैदानाएवढा वाढला.

या एवढ्या मोठ्या अंतराळ स्थानकात जगातल्या अनेक देशांच्या वैज्ञानिक आणि संशोधकांचं काम चालतं. मग त्यांच्यात समन्वय कसा साधला जातो?

अंतराळातला समन्वय

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात या प्रकल्पातले मुख्य देश म्हणजे अमेरिका, रशिया, कॅनडा, जपान आणि युरोपियन देशांचे किमान सात वैज्ञानिक सतत तैनात असतात.

साधारणपणे ते एका वेळी सहा महिने इथे राहतात. पण काही वेळा हा कालावधी लांबूही शकतो.

युरोपियन स्पेस एजन्सीचे माजी सल्लागार मार्क मैककॉकग्रीन त्याविषयी अधिक माहिती देतात. ते जर्मनीच्या हायडेलबर्गमधील मॅक्स प्लँक इंस्टिट्यूटमध्ये खगोलशास्त्रज्ञ आहेत.

“ISS वर जाणारे बहुतांशजण जीवशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि सागरी विज्ञान तज्ज्ञ असतात. गेल्या वीस वर्षांत नासा, यूरोपियन स्पेस एजंसी, जपान आणि रशियाची अंतराळ संस्था तसंच अन्य काही अंतराळ संस्थांतून त्यांची निवड केली जाते. पण आता खाजगी पर्यटकही अंतराळ स्थानकात जाऊ शकणार आहेत.”

 BBC

हे अंतराळवीर आधी रशियाचं सोयूझ कॅप्सूल किंवा अमेरिकेच्या स्पेस शटल मधून अंतराळ स्थानकात ये-जा करायचे.

पण 2003 साली ‘कोलंबिया’ यानाला झालेल्या अपघातात भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांच्यासह सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला. त्यानंतर अमेरिकेनं स्पेस शटल बंद करायचा निर्णय घेतला.

2011 साली स्पेस शटल मोहिमा बंद झाल्यापासून इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीचं क्रू ड्रैगन या यानांतून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ये-जा करतात.

या प्रवासासाठी बारा तास ते काही दिवस लागू शकतात.

पृथ्वीवरून अंतराळ यानाचं उड्डाण कधी होतंय आणि त्या यानाचं अंतराळ स्थानकात डॉकिंग कधी होतेय म्हणजे ते कधी जोडलं जातंय यावर हा कालावधी अवलंबून असतो.

पण अंतराळवीरांना हा सगळा काळ आपल्या सीटवर बसून राहावं लागतं, जे कठीण जाऊ शकतं. तसंच अंतराळ स्थानकाच्या बंदिस्त जागेत सहा महिने राहणंही सोपं नाही.

अंतराळ स्थानकातली आव्हानं

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात इतर सहकाऱ्यांसोबत मिळून राहणं, शांततापूर्ण पद्धतीनं काम करणंही महत्त्वाचं असतं.

हे सगळं वाटतं तितकं सोपं नसतं.

अंतराळ स्थानकातली पिझ्झा पार्टी

फोटो स्रोत, NASA

फोटो कॅप्शन, अंतराळ स्थानकातली पिझ्झा पार्टी

मार्क मॅककॉकग्रीन तिथल्या आव्हानांविषयी सांगतात, “अंतराळ संस्था एखाद्या अंतराळवीराची निवड करतात तेव्हा ती व्यक्ती स्वभावानं शांत आहे ना आणि मोठ्या घटनांनी विचलीत होत नाही ना, हे पाहतात.

“दुसरं म्हणजे ISSवर आंघोळीची सोय नाही. फक्त ओल्या कपड्यानं शरीर पुसून घ्यावं लागतं. सहा महिने किंवा कधी कधी वर्षभर आंघोळीशिवाय राहणं कठीण जातं. त्यासाठीच एकदुसऱ्याच्या साथीनं मिळून मिसळून काम करण्याची क्षमता असणं गरजेचं आहे.

“ISS तसं पृथ्वीच्या जवळ आहे. त्यामुळे ताजं अन्नही अंतराळवीरांपर्यंत पोहोचवलं जातं. म्हणजे त्यांना केवळ पॅकेज्‍ड फूडवर अवलंबून राहावं लागत नाही.”

पण अंतराळवीरांना जेवतानाही काळजी घ्यावी लागते. म्हणजे बिस्किट किंवा ज्याचे तुकडे हवेत तरंगतील अशा गोष्टी खाता येत नाहीत.

झोपण्यासाठी अंतराळवीर जी स्लीपिंग बॅग वापरतात, तीही भिंतीला बांधली जाते, म्हणजे ते झोपेत तरंगून कुठे धडकणार नाहीत.

असं दीर्घकाळ अंतराळात राहण्याचा अंतराळवीरांच्या तब्येतीवरही वाईट परिणाम होतो.

BBC

मार्क मॅकॉकग्रीन सांगतात की, अंतराळात राहिल्यानं स्नायूंचं नुकसान होतं, हाडांची घनता कमी होते तसंच रक्त आणि इतर द्रव्यांचं अभिसरण प्रभावित झाल्यानं शरिरातला दाब वाढतो.

अंतराळात माणसाच्या दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. यातल्या अनेक समस्या पृथ्वीवर पोहोचल्यावर मिटतात. पण त्यासाठीही सहा महिने लागू शकतात.

अंतराळातल्या रेडिएशनचा म्हणजे किरणोत्साराचा अंतराळवीरांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होतो का, याविषयी अजून संशोधन सुरू आहे.

त्यातून मिळालेल्या माहितीचा फायदा भविष्यात चंद्रावर दीर्घकाळ वास्तव्य करताना किंवा माणसाला मंगळावर पाठवण्याच्या मोहिमेत होईल.

पण हे सगळे प्रयोग अंतराळात सुरू असतानाच इथे पृथ्वीवर या प्रकल्पात सहभागी देशांमध्ये राजकीय संघर्ष पेटला आहे. त्याचा भविष्यातल्या अंतराळ संशोधनावर कसा परिणाम होईल?

अंतराळातली कूटनीती

1998 साली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची सुरुवात झाली, तेव्हा एक आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला होता.

त्यानुसार या प्रकल्पात सहभागी सर्व देशांनी आपण या स्थानकाची देखरेख, डागडुजी आणि तिथे अंतराळवीरांच्या प्रवासात मदत यासाठी एकमेकांना सहकार्य करायचं ठरवलं होतं.

अंतराळ स्थानकातून टिपलेला हरिकेन 'मिल्टन'चा फोटो, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी ISS नं जमा केलेली माहिती मदत करते आहे.

फोटो स्रोत, NASA

फोटो कॅप्शन, अंतराळ स्थानकातून टिपलेला हरिकेन 'मिल्टन'चा फोटो, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी ISS नं जमा केलेली माहिती मदत करते आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्या करारानुसार आंतरारष्ट्रीय अंतराळ स्थानकातली मोड्यूल्स आणि इतर तंत्रसामुग्री ज्यांनी तिथे नेली आहे, त्या देशांचा त्या त्या सामग्रीवर पूर्ण अधिकार आहे, असं माय्या क्रॉस सांगतात.त्या अमेरिकेच्या नॉर्थईस्टर्न विद्यापीठात राज्यशास्त्राच्या प्रध्यापक आहेत.

“आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातल्या अमेरिकन मोड्यूलवर अमेरिकेचा कायदा लागू होतो, तर रशियन मोड्यूल रशियन कायद्यानुसार चालतं. याच आधारावर तिथल्या समस्या सोडवल्या जातात.”

पण फेब्रुवारी 2022 मध्ये रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यावर परिस्थिती बदलली.

अमेरिका आणि युरोपियन देशांचे रशियासोबतचे संबंध बिघडले आणि एक पेच निर्माण झाला.

माय्या क्रॉस सांगतात, “हल्ल्यानंतर लगेचच रॉसकॉसमॉस या रशियन अंतराळ संस्थेनं अंतराळ स्थआनकातून बाहेर पडण्याची आणि तिथल्या अमेरिकन अंतराळवीरांना तसंच सोडून देण्याची धमकी दिली होती. आमचं मोड्यूल अंतराळ स्थानकापासून वेगळं करू, असंही ते म्हणाले होते. त्यावेळी आयएसएसच्या भवितव्याविषयी चिंता निर्माण झाली.”

अर्थात रशियानं तसं काही केलं नाही. रशियन संशोधक आणि अंतराळवीरांनी सहकार्य केलं आणि अंतराळ स्थानकातले व्यवहार पूर्वीसारखे सुरू राहिले.

BBC

माय्या माहिती देतात की, हे असं घडलं, कारण पृथ्वीवरून अशी मदत थांबवण्याचा आदेश दिला गेला, तरी परिस्थितीनुसार एकमेकांना मदत करण्याचा अधिकार आणि नियंत्रण या अंतराळवीरांच्या हाती होतं.

म्हणजे राजकीय आणि वैज्ञानिक कूटनीती दोन वेगळ्या पातळ्यांवर काम करत राहिली.

पण या प्रकल्पासंबंधी रशियाचं काँट्रॅक्ट 2028 साली संपणार आहे. म्हणजे आंतरारष्ट्रीय अंतराळ स्थानक नष्ट होण्याआधीच हा करार संपणार आहे.

मग त्यानंतर काय, असा प्रश्न निर्माण होतो. त्यातच अमेरिका आणि रशियासोबत आता चीन आणि भारतासारखे देशही अंतराळात आपली जागा तयार करण्याच्या शर्यतीत आहेत.

“अंतराळात अमेरिकेच्या आणि चीनच्या नेतृत्त्वाखाली संशोधकांचे दोन गट पडणं कुणालाही नको आहे. कारण त्यातून संघर्ष वाढेल आणि दशकांपासून ज्या परस्पर सहकार्याच्या आधारावर अंतराळ संशोधन होतंय, त्याच्या मूळ भावनेलाच धक्का बसेल. हवामान बदलासारख्या मोठ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी असं आंतरराष्ट्रीय सहकार्य अतिशय गरजेचं आहे,” असं माय्या क्रॉस सांगतात.

रशिया आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक प्रकल्पातून बाहेर पडल्यास पर्याय म्हणून अमेरिका खासगी कंपन्यांकडे वळलाय.

अंतराळवीर स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगन यानात मोहिमेचा सराव करताना

फोटो स्रोत, NASA/SpaceX

फोटो कॅप्शन, अंतराळवीर स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगन यानात मोहिमेचा सराव करताना

नासानं आता इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स या कंपनीसोबत हातमिळवणी केली आहे.

स्पेस एक्स गेल्या दहा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतराळवीरांची ने-आण करत आहे. पण त्यांना पर्यटकांनाही अंतराळात न्यायचं आहे.

अंतराळाचं खासगीकरण

वेंडी व्हिटमन कॉब अमेरिकेच्या अलाबामातील स्कूल ऑफ अडव्हांस्ड एयर अँड स्पेस स्टडीजमध्ये सुरक्षाविषयक प्राध्यापक आहेत.

त्या सांगतात की, या अंतराळ स्थानकाचा सांगाडा तीस वर्षांपासून रेडिएशन आणि इतर आव्हानांना तोंड देत असल्यानं कमजोर होतोय.

मग हे स्थानक बंद करून पृथ्वीवर कसं आणायचं? यातही एक मेख आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक चालवणाऱ्या प्रपल्शन इंजिनचा भाग रशियाचा आहे, त्यामुळे रशियाच्या मदतीशिवाय हे स्थानक पृथ्वीच्या वातावरणात आणता येणार नाही.

वेंडी व्हिटमन कॉब सांगतात, “ISSला अंतराळातून हटवण्यासाठी आपलं इंजिन वापरायला रशियानं नकार दिला, तर अमेरिकेला दुसरा पर्याय शोधावा लागेल.

“त्यासाठीच नासानं एक प्रपल्शन मॉड्यूल तयार करण्यासंदर्भात स्पेस एक्स कंपनीसोबत बातचीत सुरू केली आहे. हे मोड्यूल आयएसएसला पृथ्वीच्या वातावरणात आणू शकेल.

पहिले अंतराळ पर्यटक डेनिस टिटो, मागे रशियन अंतराळवीर. 30 एप्रिल 2001 रोजीचा फोटो.

फोटो स्रोत, NASA/ROSCOSMOS/Getty Images

फोटो कॅप्शन, पहिले अंतराळ पर्यटक डेनिस टिटो, मागे रशियन अंतराळवीर. 30 एप्रिल 2001 रोजीचा फोटो.

सरकारी अंतराळ संस्थांमध्ये खासगी भागीदारीची ही केवळ सुरुवातच आहे असंही, वेंडी नमूद करतात.

“ISS ला ‘डी-कमिशन’ म्हणजे बंद केलं की सरकार नवं अंतराळ स्थानक तयार करण्यासाठी खासगी कंपन्यांसोबत काम करू शकतं.

“अंतराळवीरांना स्पेस स्टेशनवर नेण्या आणण्यासाठी स्पेस एक्स कंपनीच्या शटल मॉड्यूलचा वापर आधीच सुरू झाला आहे. पुढे जाऊन खासगी कंपन्यांच्या मदतीनं अंतराळ प्रकल्पांचं व्यावसायीकरण होऊ शकतं.”

डिसेंबर 2021 मध्ये नासानं तीन अमेरिकन टीम्सना पर्यायी अंतराळ स्थानकाचं डिझाईन तयार करण्याचा ठेका दिला होता.

त्यातला ‘ऑरिबिटल रीफ’ नावाचा एक आराखडा ‘ब्लू ओरिजिन’ नावाची कंपनी करते आहे ज्यात अमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस भागीदार आहेत. या अंतराळ स्थानकावर अंतराळवीरांसबोतच पर्यटकांनाही नेता येईल.

विमान निर्मिती करणारी कंपनी ‘एयरबस’ नासाच्या मदतीनं ‘स्टारलॅब’ नामक अंतराळ स्थानकाचा आराखडा तयार करत आहे.

नॉर्थऑप ग्रमन या अमेरिकन कंपनीच्या नेतृत्त्वातल्या तिसरी टीमनं आपला स्वतंत्र प्रकल्प रद्द करून स्टारलॅबमध्ये सहभाग घेतला आहे.

बंगळुरूतील प्रदर्शनात मांडलेलं इस्रोच्या प्रस्तावित 'भारतीय अंतरीक्ष स्टेशन' (BAS) चं मॉडेलस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इस्रोच्या प्रस्तावित 'भारतीय अंतरीक्ष स्टेशन' (BAS) चं मॉडेल

पण नवं अंतराळ स्थानक तयार करणाऱ्या या एवढ्याच टीम्स नाहीत. चीनच्या खासगी अंतराळ कंपन्याही या दिशेनं पावलं टाकत आहेत.

तर भारताची अंतराळ संस्था इस्रोनं अलीकडेच जाहीर केलेल्या ‘भारतीय अंतरीक्ष स्टेशन’ प्रकल्पात खासगी कंपन्यांना सहभागी करून घेण्याची तयारी दाखवली आहे.

या सगळ्यांचा उद्देश केवळ नवं अंतराळ स्थानक तयार करण्यापुरता मर्यादित नाही. तर अंतराळात मानवी वस्ती उभारण्यासाठीची ही पावलं ठरू शकतात.

“या सगळ्यांचं मुख्य लक्ष्य आहे माणसाचं रक्षण. इलॉन मस्क आणि जेफ बोझेस यांना सायन्स फिक्शनमधून प्रेरणा मिळाली आहे.

“पृथ्वीवर कुठली मोठी आपत्ती ओढवली, तर माणसाला अंतराळात राहता यावं, असं मस्क यांच्या स्पेस एक्सला वाटतं, तर जेफ बेझोसना अंतराळात मोठे कारखाने, इंडस्ट्रीयल पार्क उभारायच्या आहेत, म्हणजे पृथ्वीवरचं प्रदूषण कमी होईल.

“फक्त फायद्यासाठी नाही तर मानवाच्या भवितव्याविषयी एका आदर्शवादी विचारानं प्रेरीत होऊन या कंपन्या प्रयत्न करतायत.”

चीनचं तियांगाँग स्पेस स्टेशन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चीनचं तियांगाँग स्पेस स्टेशन

या महत्त्वाकांक्षी विचारात आणि योजनांमध्येच आपल्या प्रश्नाचं उत्तरही दडलं आहे.

नव्या अंतराळ स्थानकांची निर्मिती आणि अंतराळ यात्रा स्वस्त झाल्यानं नव्या शक्यता निर्माण होऊ शकतात.

अंतराळ स्थानकांचा वापर वैज्ञानिक संशोधनासाठी होईल ज्यानं पृथ्वीवरच्या हवामान बदलासारख्या समस्यांचा सामना करता येऊ शकेल.

सोबतच अंतराळ पर्यटन आणि भविष्यात अंतराळातल्या मानवी वस्त्या उभारण्याची तयारीही करता येईल.

पण एक गोष्ट निश्चित आहे. भविष्यात नव्यानं करार झाला नाही, तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासोबतच विज्ञानातल्या आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या एका युगाचाही अंत होईल.

संकलन - जान्हवी मुळे, बीबीसी प्रतिनिधी

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)