लोणार सरोवर : चंद्राशी संबंध ते गुलाबी पाणी, आतापर्यंत उलगडली 'ही' रहस्यं

लोणार

फोटो स्रोत, Google Earth

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

लोणार सरोवर हे जगभरातल्या विविध ज्ञानशाखांमधल्या शास्त्रज्ञांना, अभ्यासकांना आणि सोबतच पर्यटकांना कायम भुरळ घालत आलं आहे. मानवाचा वावर इथे सुरू होण्याअगोदर इथे घडलेल्या पृथ्वीच्या आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या घटनेच्या पोटात अजून काय काय दडलं आहे याचं कुतूहल सर्वांच्याच मनात असतं.

लोणारवर या इथल्या विवराबद्दल आणि या परिसरातल्या भूगर्भशास्त्रीय वैशिष्ट्यांवर, इथे कालपरत्वे तयार होत गेलेल्या जीवसृष्टीवर आणि मानवी वावर सुरू झाल्यावर झालेल्या अनेक सांस्कृतिक बदलांवर गेली कित्येक वर्षं अभ्यास होत राहिला आहे. अजूनही होतो आहे.

त्यातून या विवराविषयी नवीन गोष्टी दर कालांतराने प्रकाशात येत असतात.

उदाहरणार्थ, अलीकडेच गेल्या दशकात लोणार विवराच्या आणि सरोवराच्या वयाबद्दल नवं संशोधन झालं आणि तोपर्यंत साधारण 50 हजार वर्षं वय मानलं जाणारं हे विवर जवळपास साडेपाच लाखापूर्वी झालेल्या अशनीपातातून तयार झालं असावं असं समोर आलं.

या विवराविषयी नवीन गोष्टी दर कालांतराने प्रकाशात येत असतात.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC

फोटो कॅप्शन, या विवराविषयी नवीन गोष्टी दर कालांतराने प्रकाशात येत असतात.

गेल्या काही वर्षांमध्ये मानव मंगळाच्या अभ्यास अधिक जोरानं करतो आहे. आता लोणारच्या बसाल्ट खडकातल्या दगडांचा मंगळ आणि चंद्रावरच्या दगडांशी असलेल्या साधर्म्यामुळे त्या ग्रह-उपग्रहांंच्या वातावरण आणि भूपृष्ठाचा पूर्वाभ्यास करण्याचा प्रयत्न होतो आहे.

जागतिक पातळीवरचे अनेक संशोधक या कारणासाठीही लोणारकडे आशेनं पाहत आहेत.

अशा पुराणपूर्व काळापासून पृथ्वीच्या कवचात बसलेल्या हे लोणार सरोवर एका अतिप्रचंड कालखंडाचा साक्षीदार आहे. इथं घडलेल्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक बदलांचं ते एक साक्षीदार आहे. तो एक वारसा आहे.

त्यामुळेच लोणार सरोवरला 'युनेस्को'च्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळावं, हे रास्त आहे. पण एवढा उशीर का झाला?

लोणारच्या जन्माची कथा

लोणारचं सरोवर एका उल्केतल्या पृथ्वीपर्यंत पोहोचलेल्या अशनीमुळे झाला. अंतराळातून हा अशनी पृथ्वीवर महाराष्ट्रात लोणारला येऊन पडला. त्याक्षणी प्रचंड ऊर्जा निर्माण झाली. ही ऊर्जा एवढी होती की हा 'इम्पॅक्ट' झाल्यावर तो घन अवस्थेतून नंतर त्याची वाफ झाली.

पण या जोरदार धक्क्यातूनच तयार झालं दख्खनच्या पठाराच्या बसाल्ट खडकाच्या छातीवरचं, तब्बल 1.8 किलोमीटर व्यासाचं हे महाकाय विवर. हे विवर आजही तिथं आहे आणि त्यात कालांतरानं सरोवर तयार होऊन एक वैशिष्ट्यपूर्ण जीवसृष्टी त्याभोवती तयार झाली.

लोणारचं सरोवर एका उल्केतल्या पृथ्वीपर्यंत पोहोचलेल्या अशनीमुळे झाला. (प्रतिकात्मक छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लोणारचं सरोवर एका उल्केतल्या पृथ्वीपर्यंत पोहोचलेल्या अशनीमुळे झाला. (प्रतिकात्मक छायाचित्र)

"जवळपास सहा-साडेसहा कोटी वर्षांपूर्वी इथे बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणारला ज्वालामुखीतून आलेला लाव्हा वाहिला होता. त्यानंतर मोठा काळ काहीच घडलं नाही. मग इथं उल्केतला एक अशनी इथं पृथ्वीवर येऊन दख्खन पठारावर आदळला आणि हे विवर तयार झालं. हे घडलं अंदाजे 5 लाख 70 हजार वर्षांपूर्वी."

"हा अशनी मोठा धक्का देत पृथ्वीच्या कवचात शिरला. याला initial impact stage असं म्हणतात. तेव्हा एक प्रचंड स्फोट झाला आणि या विवराभोवतीचं कडं तयार झालं. एका फुलाच्या सगळ्या पाकळ्या खुलाव्या, तसं हे दृष्यं होतं," डॉ शॉन राईट 'बीबीसी मराठी'शी बोलतांना सांगतात.

डॉ. शॉन राईट 2004 सालापासून लोणार आणि त्यासारख्या जगभरातल्या विवरांवर संशोधन करत आहेत. मूलत: भूगर्भशास्त्रज्ञ असलेले शॉन अमेरिकेतल्या 'प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिट्यूट' मध्ये वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून काम करतात.

लोणारसहित जगभरातल्या अशनीपातांमुळे तयार झालेल्या विवरांचा अभ्यास, हा त्यांच्या मुख्य विषय. 2004 पासून आठ वेळेस ते लोणारला येऊन गेले आहेत आणि अनेक महिने थांबून इथं त्यांनी संशोधन केलं आहे.

अशनी पृथ्वीवर येऊन धडकल्यावर मोठा स्फोट झाला. (प्रतिकात्मक छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अशनी पृथ्वीवर येऊन धडकल्यावर मोठा स्फोट झाला. (प्रतिकात्मक छायाचित्र)
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हे विवर कसं निर्माण झालं, यासोबतच, जेव्हा तुम्ही त्याच्याकाठाभोवतीच्या उंच कड्यावर उभं राहता, तेव्हा कुतुहलानं पहिला प्रश्न हा मनात येतो की हे विवर कधी तयार झालं असेल? या विवराच्या वयाचे आकडेही सतत बदलत राहिले आहेत.

कधीकाळी हे विवर ज्वालामुखीतून तयार झालं असं समजलं जायचं. कारण सहाजिक होतं की दख्खन पठार हे एका ज्वालामुखीच्या उद्रेकातून साधारण सहा कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालं असावं असं म्हटलं जातं. त्याच पठारावरचं हे विवर.

पण नंतर 1970 नंतर ते उल्केतल्या अशनीद्वारे साधारण 35 ते 50 हजार वर्षांपूर्वी निर्माण झाल्याचं स्पष्ट झालं. ब्रिटिशकाळापासूनच जगभरातले अभ्यासक त्याकडे आकृष्ट झाले होते.

अमेरिकेच्या स्मिस्थसोनियन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी इथे बरंच काम केलं. भारतात 'जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया'नंही काम केलं आहे. बसाल्ट खडकातलं जगभरातलं हे एकमेव अशनीपातातून तयार झालेलं विवर असं मानलं जाऊ लागलं. त्यामुळे त्याचं महत्त्व आहे.

अशनीपातामुळे तयार झालेली जगभरात अशी साधारण 200 विवरं आहेत. मेक्सिको किंवा अमेरिकेतलं ऍरिझोना ही त्यातली काही प्रसिद्ध उदाहरणं.

गेल्या दशकात मात्र कार्बन डेटिंगशिवाय अन्य पद्धतींनी लोणारच्या विवराचं वय शोधण्याचे प्रयत्न झाले. त्यातली एक प्रद्धत म्हणजे अरगॉन-अरगॉन रेडिओमेट्रिक आयसोटोपिक डेटिंग.

ऑस्ट्रेलियातल्या एका संशोधन संस्थेनं ही पद्धत वापरुन 2010 साली प्रकाशित केलेल्या एका पेपरमध्ये हा अशनी साधारण 5 लाख 70 हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर येऊन धडकला, हे सिद्ध झाल्याचं म्हटलं.

ग्राफिक्स

फोटो स्रोत, BBC Marathi

फोटो कॅप्शन, डॉ. शॉन राईट

लोणारमधली जीवसृष्टी आणि 'तो' गुलाबी रंग

आज तुम्ही लोणारला गेलात तर तिथं एक दाट जंगल भोवती तुम्हाला सरोवराभोवती दिसेल. लोणार हे गाव अगदी या विवराला लागूनच आहे. पण विवरावरुन आत डोकावून पाहिल एक उतारानं गोलाकार जंगल दिसतं.

या पाण्यातल्या काही विशिष्ट शैवालांमुळे आणि या भोवतीच्या झाडांमुळेही उंचावरुन पाणी हिरवं दिसेल.

या हजारो वर्षांत लोणारच्या विवराभोवती अनेक गोष्टी घडल्या. इथं एक सरोवर तयार झालं आणि त्याभोवती एक वैशिष्ट्यपूर्ण सजीव सृष्टी उत्क्रांत होत राहिली.

पण अर्थात ती इतरत्र कोणत्याही पाण्याच्या स्त्रोताच्या आधारानं असते अशी नाही. कारण इथलं पाणी अतिक्षारयुक्त आहे. त्याची pH value समुद्रापेक्षाही अधिक आहे. त्यात नेहमीचे जलचर राहू शकत नाहीत. इथल्या पाण्यात शैवालांची, सूक्ष्मजीवांची एक वैशिष्टपूर्ण सृष्टी निर्माण झाली आहे.

इथं एक सरोवर तयार झालं आणि त्याभोवती एक वैशिष्ट्यपूर्ण सजीव सृष्टी उत्क्रांत होत राहिली.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC

फोटो कॅप्शन, इथं एक सरोवर तयार झालं आणि त्याभोवती एक वैशिष्ट्यपूर्ण सजीव सृष्टी उत्क्रांत होत राहिली.

त्यामुळे काही च्रकावणाऱ्या घटनाही इथे घडल्या आहेत. तुम्हाला आठवत असेल, 2020 सालच्या जून महिन्यात लोणार सरोवराचे फोटो, व्हिडिओ एकदम व्हायरल झाले. जगभरात त्याच्या बातम्या झाल्या आणि लोणार एकदम चर्चेत आलं.

त्याचं कारण होतं या सरोवराचं पाणी एकदम गुलाबी झालं. निळं-हिरवं दिसणारं पाणी एकदम गुलाबी कसं झालं? त्याचं कारण काय? मायक्रोबायोलॉजिस्टनाही काही काळ चक्रावून टाकलं होतं या प्रश्नानं.

तेव्हा कोव्हिड काळातल्या लॉकडाऊन सुरू होता. त्या स्थितीतल्या भीतीनं काही अफवाही उठू लागल्या. त्यामुळे नेमकं शास्त्रीय कारण शोधणं आवश्यक होतं.

मग या पाण्याचा पुण्यातल्या आघारकर संशोधन संस्थेत सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासकांनी अभ्यास केला. त्याचं उत्तर सापडलं. लोणारचं पाणी गुलाबी होण्याचं कारण त्याच्या क्षारयुक्त पाण्यात तयार झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्थेत होतं.

2020 सालच्या जून महिन्यात या सरोवराचं पाणी एकदम गुलाबी झालं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2020 सालच्या जून महिन्यात या सरोवराचं पाणी एकदम गुलाबी झालं.

"त्या अशनीमुळे, तिथल्या दगडांमुळे तिथे खूप मोठ्या प्रमाणात क्षार आहेत. त्यामुळे तिथल्या पाण्याची क्षारता खूप मोठ्या प्रमाणात वाढली. म्हणूनच त्याला इंग्रजीत आपण अल्कलाईन सोडा लेक असं म्हणतो."

"या सोडा लेकचं वैशिष्ट्य हे की पूर्वी पाण्याचे बाहेरचे प्रवाह इथे पूर्वी नव्हते. आता इथे वेगवेगळे प्रवाह येतात, झरे येतात आणि त्याचं पाणी या तलावात मिसळतं. त्यामुळे लोणार सरोवराच्या पाण्याची क्षारता एका पातळीपर्यंत मर्यादित राहते," डॉ प्रशांत ढाकेफाळकर सांगतात.

डॉ. ढाकेफाळकर हे 'आघारकर संशोधन संस्थे'चे संचालक आहेत. त्यांनी आणि त्यांच्या टीमनेच या पाण्याचा अभ्यास करुन नेमकं कारण शोधलं.

ढाकेफाळकर

फोटो स्रोत, BBC Marathi

"या जीवाणूंंचं एक वैशिष्ट असतं ते म्हणजे ते गुलाबी रंगाचं एक पिगमेंट (द्रव) तयार करतात. या पिगमेंटमुळे त्या पाण्याला गुलाबी रंग आला. हे जास्त वेळेस होत नाही कारण इतक्या मोठ्या प्रमाणार दुष्काळ पडला नाही आहे. पाऊस येतो, पाणी पडतं आणि क्षारता मर्यादेत राहते. 2020 मध्ये मात्र ती क्षारता वाढली. त्यात या बॅक्टेरियांची वाढ झाली. एक शैवालही तिथं वाढलं. या सगळ्यात पाणी गुलाबी रंगाचं झालं," हा अंतिम निष्कर्ष ढाकेफाळकर आणि त्यांच्या टीमनं मांडला.

वास्तविक लोणार सरोवराचं पाणी जवळपास महिनाभर गुलाबी राहून पुन्हा नेहमीच्या निळ्या-हिरव्या रंगाचं झालं. पण हे ऐकल्यावर दोन प्रश्न लगेचच पडतात. ते म्हणजे असं कधी पूर्वी झालं होतं का आणि पुढेही कधी लोणारचं पाणी गुलाबी होऊ शकतं का?

लोणार सरोवराचं पाणी जवळपास महिनाभर गुलाबी राहून पुन्हा नेहमीच्या निळ्या-हिरव्या रंगाचं झालं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लोणार सरोवराचं पाणी जवळपास महिनाभर गुलाबी राहून पुन्हा नेहमीच्या निळ्या-हिरव्या रंगाचं झालं.

"ते पूर्वीही झालं होतं. त्याच्या नोंदीही आहेत. फरक एवढाचं आहे की आता ते माध्यमांमुळे सगळीकडे समजलं. ते पुढे केव्हाही होऊ शकतं. जेव्हा तापमान, क्षारता यांच्या नेमक्या प्रमाणानुसार त्या सूक्ष्मजीवांची निर्मिती होईल आणि नेमकी परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा ही घटना पुन्हा होऊ शकते," डॉ ढाकेफाळकर सांगतात.

अर्थात या क्षारयुक्त पाण्याशिवाय गोड्या पाण्याचे अन्य प्रवाहही इथे येतात. त्या आधाराने बाजूचं जंगलही वाढतं. बिबटे, रानडुकरं असे काही वन्यजीव प्राणीही या जंगलात आहेत.

लोणारचं सांस्कृतिक विश्व

पण लोणारचं महत्त्व केवळ वैज्ञानिक नाही. निश्चितपणे ती एक असाधारण नैसर्गिक घटना आहे आणि त्यात अनेक प्रश्नांची उत्तरं दडली आहेत. पण लोणारचं सरोवर हे एका मोठ्या कालपट्टिकेचे साक्षीदार आहे. त्यानं मानवी संस्कृतीचीही अनेक स्थित्यंतरं पाहिली आहेत.

त्यामुळे लोणार हे ऐतिहासिकदृष्ट्याही तितकंच महत्त्वाचं आहे.

एक मानवी संस्कृतीही लोणार सरोवराभोवती हजारो वर्षांमध्ये तयार होत गेली. हे ऐतिहासिक, सांस्कृतिक टप्पेही या विवराभोवती उभ्या वास्तूंमध्ये, अवशेषांमध्ये दिसतात. तुम्ही लोणार सरोवरापर्यंत जाण्याअगोदर जेव्हा गावातून फिरता, तेव्हाच या इतिहासाच्या पाऊलखुणा तुम्हाला दिसायला लागतात.

अनेक पुराणकालिन मंदिरं उभी आहेत. काही चांगल्या अवस्थेत, काही भग्नावशेष आहेत. पण त्या पाऊलखुणांमधून इथे काय घडलं असावं याचा स्पष्ट अंदाज येतो.

लोणारमधलं दैत्यसुदन मंदिर 

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लोणारमधलं दैत्यसुदन मंदिर

लोणारशी अनेक पुराणातल्या अख्यायिका जोडल्या गेल्या आहेत. 'लवणासुरा'ची कथा लोणारशी जोडली आहे. 'लवण' म्हणजे मीठ. त्यामुळे या क्षारयुक्त पाण्याच्या सरोवराशी तिचा संबंध आणि त्यासंबंधीत मंदिरं, त्यांच्यावरचे उल्लेख इथं पहायला मिळतात. गावातलं 'दैत्यसुदन' मंदिर त्यासाठी पाहण्यासारखं.

त्याशिवाय गोमुख मंदिर, कमळजा मातेचं मंदिर हीसुद्धा सरोवराकाठानं आजही उभी आहेत. अशी अनेक मंदिरं आहेत.

"जुन्यात जुनं काय असेल लोणारमध्ये तर एक नृसिंहाची मूर्ती आहे जी वाकाटककालीन आहे. त्या काळातली मंदिरं आज आपल्याला तिथं दिसत नाहीत. आज जी मंदिरं तिथं आहेत ती सगळी, ज्याला आम्ही पूर्वमध्ययुग म्हणतो, म्हणजे 12व्या, 13 व्या शतकात झालेली निर्मिती आहे."

"ती अगदी अठराव्या शतकापर्यंत निर्मिती झालेली दिसते. त्याच्यामध्ये तुम्हाला शुष्क सांधी प्रकारची मंदिरं दिसतात. काही ठिकाणी विटांची शिखरं असलेल्या मंदिरांचे अवशेषही दिसतात," पुरातत्व अभ्यासक सायली पलांडे-दातार सांगतात.

महाराष्ट्रातल्या अनेक संप्रदायांशी संबंधित वास्तू इथे आहेत.

ग्राफिक्स

फोटो स्रोत, BBC Marathi

लोणार मध्ययुगात प्रसिद्ध होतं मीठासाठी. इथलं मीठ आणि त्यावर आधारित उत्पादनं बाहेर सर्वत्र पाठवली जायची. त्याचे उल्लेख ऐतिहासिक साधनांमध्ये सापडतात.

"आपण जेव्हा मध्ययुगात येतो तेव्हा अकबराच्या 'आईन-ए-अकबरी'मध्येही काही महत्वाच्या नोंदी मिळतात. त्यात साबण आणि काच करण्यासाठी जो कच्चा माल असतो, तो या लोणार सरोवराच्या मिठातून मिळतो अशी नोंद आहे."

"औषधी गुणासाठी ते मीठ वापरलं जायचं. तिथं खूप मोठा साबणाचा कारखाना होता. जहांगिरानं तिथून साबण मागवल्याच्या नोंदी आहेत. शहाजहान खुद्द हे लोणार सरोवर प्रकरण काय आहे ते बघून गेल्याच्या नोंदी आहेत," सायली सांगतात.

'शहाजहान हे लोणार सरोवर प्रकरण काय आहे ते बघून गेल्याच्या नोंदी आहेत'

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'शहाजहान हे लोणार सरोवर प्रकरण काय आहे ते बघून गेल्याच्या नोंदी आहेत'

"लोणार सरोवर आणि त्याच्या आजूबाजूला तीर्थक्षेत्रनिर्मिती झाली आहे आणि तिथे विविध काळात व्यापारही चाललेला आहे कारण ते मीठ महत्त्वाचं आहे. निसर्गासोबतच मानवी भौतिक वारसा, मानवी प्रथा परंपरा आणि व्यापार उदीम या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे एकवटलेल्या दिसतात," सायली शेवटी सांगतात.

लोणारचा मंगळ आणि चंद्राशी संबंध काय?

लोणारचा अशनीपात हा पृथ्वीच्या आयुष्यातली एक महत्त्वाची घटना आहे. त्यात पृथ्वीवरच्या आजवरच्या भौतिक आयुष्याची आणि तिच्याबाहेरच्या अवकाशातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत.

त्यामुळे जगभरातले, विशेषत: खगोलविज्ञानाचे, अभ्यासक लोणारचा अभ्यास करत असतात. त्यांच्या मते लोणार आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत करुन शकतं जे प्रश्न पृथ्वीबाहेरच्या विश्वाविषयी आहेत.

डॉ.शॉन राईट 2004 सालापासून लोणार आणि त्यासारख्या जगभरातल्या विवरांवर संशोधन करत आहेत. हा त्यांच्याही अभ्यासाचा भाग आहे. त्यांच्या मते, मंगळ आणि चंद्र यांच्यावर सतत मोहिमा करणाऱ्या मानवाला, त्यांच्या अभ्यासासाठी लोणार मदत करू शकतं.

मंगळ ग्रहावरही अशनीपातामुळे तयार झालेले 'शॉक्ड बसाल्ट' खडक आहेत.(प्रतिकात्मक छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मंगळ ग्रहावरही अशनीपातामुळे तयार झालेले 'शॉक्ड बसाल्ट' खडक आहेत.(प्रतिकात्मक छायाचित्र)

त्याचं कारण ज्या प्रकरचे 'शॉक्ड बसाल्ट' अशनीपाताचा धक्का बसल्यावर इथे लोणारमध्ये तयार झाले आहेत, तसचे मंगळ आणि चंद्राच्या पृष्ठभागावरही आहेत असं दिसून आलं आहे.

शॉन यांच्या मते, जेव्हा माणूस चंद्र आणि मंगळाचा पृष्ठभाग, वातावरण जाणून घेण्यासाठी जेव्हा सतत मोहिमा करतो आहे, तेव्हा लोणारच्या या तशा प्रकारच्या अशनीपातातून तयार झालेले 'शॉक्ड बसाल्ट' आपल्या काही उपयुक्त माहिती देऊ शकतात.

ग्राफिक्स

फोटो स्रोत, BBC Marathi

"मंगळावरचे दगड हे शॉक्ड बसाल्ट आहेत. आपल्याकडे ते मंगळावरचे दगड आहेत ज्यांना 'मार्शियन मेटिओराईट' म्हटलं जातं. ते दगड हे लोणारमध्ये सापडणा-या शॉक बसाल्टसारखेच आहेच. अपोलो मोहिमेतल्या अंतराळवीरांनी चंद्रावरचे अशनी आणले आहेत. ते सुद्धा बसाल्ट आहेत," डॉ. शॉन स्पष्ट करुन सांगतात.

"मी काही मंगळावर सजीव सृष्टीच्या शोधात वगैरे नाही आहे, पण आपल्याला मंगळ अथवा चंद्रावरच्या वातावरणाचा अधिक निश्चित अभ्यास करणं गरजेचं आहे. जो चंद्रावर पुन्हा माणूस पाठवून किंवा मंगळावर रोव्हर पाठवून करता येईल. पण त्यासाठी तसाच तयार झालेला शॉक्ड बसाल्ट आपल्याकडे हवा आणि तो लोणारमध्ये आहे," शॉन लोणारचं चंद्र आणि मंगळ मोहिमांमधलं महत्व सांगतात.

त्यासाठीच 'नासा' असेल अथवा 'इसरो' सारख्या अंतराळ मोहिमा करण्या-या संस्था, त्यांनीही लोणारच्या अभ्यासाला कायम महत्व दिलं आहे.

लोणारचं संवर्धन ते 'युनेस्को जागतिक वारसा यादी'तला दावा

लोणार सरोवराच्या संवर्धनाचे प्रयत्न अनेक वर्षं सुरू आहेत. त्याकडे मोठा काळ दुर्लक्ष झाले. आता लोणार सरोवराभोवतीच्या परिस्थितीत मोठी सुधारणा झाली आहे.

पण काही वर्षांपूर्वी मानवी हस्तक्षेप, दूषित सांडपाणी, सरोवरबाजूची शेती या सगळ्यामुळे लोणारच्या संवर्धनावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.शेवटी न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करावा लागला.

"2003 ते 2010 पर्यंत उन्हाळा,पावसाळा, हिवाळा वर्षभरात सगळ्या काळात आम्ही लोणारला जाऊन नोंदी घेतल्या. पाण्याची पातळी कशी कमी-जास्त होते आहे, मंदिरांची अवस्था काय आहे. 2010 येईपर्यंत हे दिसत होतं की प्रत्येक वर्षं स्थिती खराब होत चालली आहे. 2009-10 च्या आसपास काही जणांनी नागपूर खंडपीठातही याविषयी धाव घेतली," मयुरेश प्रभुणे सांगतात.

प्रभुणे यांच्या 'खगोलविश्व' या संस्थेनं लोणारच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले.

लोणार सरोवराच्या संवर्धनाचे प्रयत्न अनेक वर्षं सुरु आहेत.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC

फोटो कॅप्शन, लोणार सरोवराच्या संवर्धनाचे प्रयत्न अनेक वर्षं सुरु आहेत.

"लोणारचा विषय न्यायालयानं गांभीर्यानं घेतला. राज्य सरकारकडे कितीही अर्ज केले तरीही फार लक्ष देण्यात येत नव्हतं. न्यायालयानं त्यावर एक समिती नेमली. आम्ही हेच सुचवलं होतं की लोणार सरोवरात जाणारं सांडपाणी ताबडतोब बंद व्हायला पाहिजे. खाली जी शेती आहे तीही बंद व्हायला पाहिजे. कारण या दोनही गोष्टींचा परिणाम तिथल्या इकोसिस्टिमवर होतो आहे. आता बरीचशी सुधारणा झाली आहे," प्रभुणे पुढे सांगतात.

लोणार सरोवर परिसर आता संरक्षित अभयारण्य आहे. 2020 साली त्याला 'रामसर स्थळा'चा दर्जा देण्यात आला आहे. पण आता महाराष्ट्र सरकार या सरोवराला 'युनेस्को' जागतिक वारसा घोषित करावं या प्रयत्नात आहे. त्याकडेच आता सगळ्यांचं लक्ष आहे.

किरण पाटील ग्राफिक्स

फोटो स्रोत, BBC Marathi

अर्थात 'युनेस्को जागतिक वारसा यादी'त समाविष्ट होणं ही एक मोठी प्रक्रिया आहे. भारताकडून अधिकृत प्रस्ताव जाण्याअगोदर मोठा पल्ला बाकी आहे.

लोणारची ओळख जगाला काही नवीन नाही. लोणारचं विवर एका चिरकालीन साक्षीदारासारखा लाखो वर्षांचा वारसा घेऊन उभं आहे. त्यामुळे हा प्रश्न पडतोच की ही मान्यता मिळण्यासाठी एवढी वाट का पहावी लागावी?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)