माहम अनगा : अकबराच्या दरबारातली शक्तीशाली महिला; जिने स्पर्धकांचा काटा काढला, पण मुलानेच तिला धोका दिला

फोटो स्रोत, VICTORIA AND ALBERT MUSEUM
- Author, वखार मुस्तफा
- Role, पत्रकार आणि संशोधक, लाहोर
मुघल सम्राट हुमायूनचा दूधभाऊ असलेल्या नदीम खानची बेगम महाम अंगा मुघल साम्राज्यातील सर्वांत शक्तिशाली अशी स्त्री होती.
शेरशाह सूरीकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर हुमायून आणि त्याची बेगम हमीदाबानो राजकीय समर्थन मिळावं म्हणून पर्शियाला म्हणजेच इराणला गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत नदीम खानही होता. सोबत कुली खान आणि अधम खान ही त्याची दोन मुलं आणि पत्नी सुद्धा होते. मुघल साम्राज्याचा वारसदार अकबराची जबाबदारी सुद्धा नदीम खानच्या पत्नीवर होती.
महाम अंगाने अकबराला जरी तिच्या अंगावरचं दूध पाजलं नसलं तरी ती अकबराची काळजी घेणाऱ्या 10 प्रमुख स्त्रियांपैकी एक होती. यात जीजी अंगाचा देखील समावेश होता. तिच्या पतीने म्हणजेच शमसुद्दीन मोहम्मद खान उर्फ अटगा खान याने एकदा हुमायूनचा जीव वाचवला होता.
'अकबरनामा' मध्ये म्हटलंय की, "जीजी अंगा आणि महाम अंगा यांचा इतर स्त्रिया द्वेष करायच्या. त्यांनी लहानग्या शहजादयावर जादूटोणा केला असून तो इतर कोणाच्याही हातून दूध पित नसल्याची तक्रार इतर स्त्रियांनी हुमायूनकडे केली होती."
अबुल फजलने एका प्रसंगाचा उल्लेख करताना म्हटलंय की, "अकबर तेव्हा एक वर्ष तीन महिन्यांचा असेल. महाम अंगा तेव्हापासून अकबराच्या सेवेत गुंतली होती.
त्यावेळी मुघलांमध्ये एक प्रथा होती. लहान मुल पहिल्यांदा आपल्या पायावर चालू लागल्यावर त्याला घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तीने मारायचं असतं. त्यावेळी हुमायून तिथे हजर नव्हता. त्यामुळे महाम अंगाने मिर्झा अस्करी (हुमायूनचा भाऊ) ला अकबराला मारण्याची विनंती केली."
"ती मिर्झा अस्करीला म्हणाली की, हजरत जहाँबानी (हुमायून) हजर नाहीत, त्यांच्या जागी तुम्हीच वडीलधारे व्यक्ती आहात. मुलाचं वाईट नजरेपासून संरक्षण व्हावं म्हणून तुम्ही ही प्रथा पार पाडावी. यावर मिर्झाने डोक्यावरची पगडी काढली आणि अकबराच्या दिशेने फेकली, आणि लहानगा अकबर खाली पडला."
हुमायून जेव्हा आपलं राज्य परत मिळवण्यासाठी निघाला तेव्हा अकबर 13 वर्षांचा होता. हुमायूनचा लवाजमा दिल्लीत परतत असताना शाही स्त्रिया काबूलमध्येच राहिल्या. फक्त महाम अंगा दिल्लीला आली.
पुढच्याच वर्षी हुमायूनचा मृत्यू झाला. त्यावेळी तिथं महाम अंगादेखील उपस्थित होती. सेनापती असलेल्या बैराम खानने 14 वर्षीय अकबरला सम्राट म्हणून घोषित केलं. आणि स्वतःला साम्राज्याचा संरक्षक (पंतप्रधान) म्हणून नियुक्त केलं.

फोटो स्रोत, SOTHEBY'S
अकबर बैराम खानला 'खान बाबा' म्हणून हाक मारायचा. आणि नात्याने सुद्धा ते काका पुतणे होते. अकबराच्या सांगण्यावरून शाही स्त्रियांना काबूलहून आग्र्यात आणण्यात आलं, त्यावेळी या स्त्रियांच्या स्वागतासाठी महाम अंगाच वेशीवर गेली होती.
महाम अंगा आणि सम्राटाची जवळीक बैराम खानला खटकत होती. कारण नवख्या सम्राटावर तिने आपला प्रभाव आणि वर्चस्व वाढवायला सुरुवात केली होती.
पण बैराम खान काही पावलं उचलणार इतक्यात महाम अंगाने आपला डाव साधला. बैराम खानला मक्केच्या यात्रेला पाठवावं असं तिने अकबराला सुचवलं, आणि अकबर देखील यासाठी तयार झाला.
बैराम खानचा मृत्यू
अशा प्रकारे बैराम खानचा काटा काढण्यात आला. बैराम खान हतबल झाला होता. 1561 साली गुजरातमध्ये, मुबारक खान लोहानीच्या नेतृत्वाखाली अफगाणांची टोळी सक्रिय झाली होती. या टोळीच्या हातून बैराम खान मारला गेला.
1555 मध्ये मच्छीवाडाचं युद्ध लढलं गेलं होतं. या युद्धात मुघलांशी लढताना लोहानीचे वडील मारले गेले.
मोहम्मद हुसेन आझाद दरबार-ए-अकबरीमध्ये लिहितात, "खान-ए-खाना म्हणजेच बैराम खानाचे बरेच शत्रू होते. यात बरेचसे घरातले शत्रू सुद्धा होते. यात महाम अंगा, अधम खान, शहाब खान असे बरेचसे लोक होते जे आतल्या बाहेरच्या बातम्यांची माहिती ठेवायचे आणि वेळ आली की अकबराचे कान फुकायचे."
"अकबर त्याच्या नातेवाईकांचा खूप आदर करायचा. ज्या नातेवाईकाला संधी मिळायची तो नातेवाईक जाऊन बैराम खानाविषयी वाईट बोलायचा. जसं की, बैराम खान अकबराचा आदर करत नाही, तो त्यांना लहान मुलगा समजतो, मी अकबराला सम्राटाच्या गादीवर बसवलंय मी हवं त्याला गादीवर बसवू शकतो."
"या गोष्टी जेव्हा बैराम खानच्या कानावर गेल्या तेव्हा त्याने अकबराला एक पत्र लिहिलं. यात तो म्हणाला की, घरातील नोकर शुद्ध मनाने सेवा करतात, गुलामच्या (बैराम खान) मनात त्यांच्याविषयी कोणतेही वाईट विचार नाहीत."

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे लिहितात, "पण गोष्टी याही पुढे गेल्या होत्या. त्याच्या पत्राचा काहीच उपयोग झाला नाही. शहाबुद्दीन अहमद खानला आता पंतप्रधान बनवण्यात आलं होतं. तर महाम अंगाच्या आदेशावर सगळ्या गोष्टी फिरू लागल्या होत्या. आणि बैराम खान अकबराच्या रागाचे बळी ठरले असल्याची अफवा उडवण्यात आली."
"बैराम खानाच्या जवळचे मंत्री, दरबारी, सरदार आता दिल्लीच्या पायऱ्या झिजवू लागले. सगळेजण बैराम खानाला सोडून महाम अंगा आणि शहाबुद्दीन अहमद खान यांच्या ओसरीवर जमा होऊ लागले. हे दोघेही येणाऱ्या सेवाकाचं पद हुद्दा वाढवून द्यायचे."
बैराम खानाच्या समोर ठेवले पर्याय
अबुल फझलने 'अकबरनामा'मध्ये एक फर्मान लिहिलंय, "एकदा शाही सैन्य आणि बैरामखान यांच्यात लढाई झाली. परंतु सर्व इतिहासकार एकमताने लिहितात की, बैरामखानच्या मनात मत्सराची भावना नव्हती. जेव्हा शाही छावणी दिसली तेव्हा बैराम खान घोड्यावरून उतरला.
"त्याने आपल्या चिलखतातून तलवार काढून गळ्यात अडकवली, पटक्याने आपले हात बांधले, पगडी काढली आणि गळ्याभोवती गुंडाळली. बैराम खान आल्याचं कळताच अकबर सुद्धा जागेवरून उठला. बैराम खान धावत आला आणि पायावर डोकं ठेऊन रडू लागला."
"अकबर सुद्धा बैराम खानच्या अंगाखांद्यावर खेळून मोठा झाला होता. त्याच्याही डोळ्यातून आसवं आली. त्याने बैराम खानाला उठवून बसवलं आणि मिठी मारली. त्याचे हात सोडले, त्याच्या डोक्यावर पगडी ठेवली. यानंतर अकबर म्हणाला, खान बाबा आता तुमच्यासमोर फक्त तीन पर्याय आहेत. ते म्हणजे, तुम्हाला राज्य करायचं असेल तर चंदेरी आणि काल्पी हे जिल्हे घ्या आणि तिथे जाऊन राज्य करा.
दुसरा पर्याय म्हणजे, तुम्हाला माझ्यासोबत राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता. तुमच्या मानमरातबात काही कमी केली जाणार नाही.
आणि तिसरा पर्याय म्हणजे तुम्हाला जर हजची यात्रा करायची असेल तर तुमची सोय केली जाईल. तुम्ही म्हणाल तिथं तुमचं सामान गुमास्त्यांमार्फत पोहोच करण्यात येईल."
यावर बैराम खानाने हजला जाण्याची इच्छा दर्शविली. त्याने अकबराला विनंती करताना म्हटलं की, 'आता उतारवयात माझी कोणतीही इच्छा उरली नाहीये. आता अल्लाहच्या दारी जाऊन हुजूर (अकबर) यांच्या वयासाठी प्रार्थना करावी म्हणतो.'

फोटो स्रोत, Getty Images
अशा पद्धतीने हजचा पर्याय ठरला. बादशाहने बैराम खानाला राजवस्त्र आणि घोडे दिले. हाजी मोहम्मद खान सिस्तानी तीन हजारी अमीर (प्रादेशिक शासक) हे त्याचे जुने मित्र होते. वाटेत रक्षणासाठी बादशाहाने सैन्याची व्यवस्था केली.
"सलीम शाहची एक काश्मिरी पत्नी होती. सलीम शाहला तिच्यापासून एक मुलगी होती. ती बैराम खानच्या सैन्यासोबत हजला निघाली. तिचा बैराम खानच्या मुलावर, मिर्झा अब्दुर रहीम याच्यावर जीव होता. आणि त्याचंही तिच्यावर प्रेम होतं. शिवाय बैराम खानाला देखील त्या दोघांचं लग्न लावून द्यायचं होतं."
"यामुळे अफगाणी बैराम खानावर खार खाऊन होते. एके दिवशी संध्याकाळी ते प्रार्थनेसाठी नावेतून खाली उतरले. इतक्यात मुबारक खान लोहानी 30-40 अफगाण लोकांसह बैराम खानच्या पुढ्यात उभा राहिला. आम्ही भेटीसाठी आलोय असं त्यांनी सांगितलं. यावर बैराम खानाने ही त्यांना चांगल्या मनाने बोलावलं. मुबारक खान हात मिळवण्याच्या बहाण्याने पुढं आला आणि त्याने खानाच्या पाठीत खंजीर खुपसला, तर दुसऱ्याने डोक्यावर तलवारीचा वार केला."
लोकांनी मुबारक खानाला त्याने केलेल्या कृतीबद्दल विचारलं. यावर मुबारक खान म्हणाला की, मच्छिवाड्याच्या लढाईत माझे वडील मारले गेले, त्याचा बदला मी घेतला.
अंगा साम्राज्याची सुभेदार बनली
बैराम खानच्या हत्येचा अर्थ म्हणजे महाम अंगाचा आता मुघल दरबारात प्रभाव वाढला होता.
दरबारातल्या अनेकांनी महाम अंगाशी निष्ठा ठेवण्याचं वचन दिलं आणि त्या बदल्यात मोठमोठी बक्षिसे मिळवली. ती प्रतिभावान आणि सक्षम स्त्री होती.
शाही घराण्यावर आणि हरमवर तिचा प्रभाव होता, आता तर तिने अकबराच्या कारभारातही लक्ष घालायला सुरुवात केली.
महाम अंगा आता तरुण सम्राटाची राजकीय सल्लागार बनली होती. तिच्या या पदामुळे ती मुघल साम्राज्यातील दुसरी सर्वांत शक्तिशाली व्यक्ती बनली.
महिलांसाठी मशीद आणि मदरसे बांधले
1561 साली, महाम अंगाने खैरुल मंजिल नावाची एक इमारत बांधली. यात एक मशीद आणि मदरसा होता जो केवळ महिलांसाठी बांधण्यात आला होता.
ऐतिहासिक वास्तूंवर लिखाण करणारे वरुण घोष सांगतात की, हुमायूनच्या दीन पनाह (आताचा पुराना किल्ला) किल्ल्यासमोर आणि शेरशाह सुरीने बांधलेल्या लाल दरवाजाला लागून उभारलेल्या या इमारतीच्या माध्यमातून महाम अंगाचे संकल्प डोळ्यासमोर उभे राहतात. मुख्य दरवाजावर फारसी भाषेत काही वाक्य कोरण्यात आली आहेत:

फोटो स्रोत, Getty Images
"जलालुद्दीन मोहम्मद (अकबर) यांच्या काळात आदरणीय महाम बेग (अंगा) यांनी या वास्तूची निर्मिती केली आहे. आणि प्रामाणिक शहाबुद्दीन अहमद खान (अंगाचा जावई) यांनी या उदात्त कार्यात मदत केली."
घोष लिहितात, "वरच्या मजल्यावर असलेल्या मदरशांच्या खोल्या आणि अंगण पडद्यामागे असल्याचं दिसतं. यावरून हा मदरसा केवळ मुलींसाठी आणि मशीद केवळ स्त्रियांसाठीच असल्याचं स्पष्ट होतं.
अंगणाच्या मधोमध पाण्याने भरलेली टाकी होती, याचा वापर वजूसाठी केला जायचा. या इमारतीला मिनार नाहीये, भिंतीवर मध्य आशियाई शैलीतील नक्षीकाम आणि निळ्या टाइल्स लावल्या आहेत, तर काही ठिकाणी कॅलिग्राफीच्या खुणाही आहेत."
महाम अंगाचं पतन
महाम अंगाच्या पतानाची वेळ तिच्यावर स्वतःमुळे नाही तर तिच्या मुलामुळे ओढावली.
एकीकडे महाम अंगाला दरबारी लोकांचा पाठिंबा वाढतच होता, तर दुसरीकडे अधम खान तिच्या मेहनतीची फळं चाखत होता. त्याची पोहोच थेट सम्राट अकबरापर्यंत वाढली होती. त्यामुळे आता तो निवांत झाला होता.
महाम अंगामुळे अधम खानला मुघल सैन्याचं सेनापती बनविण्यात आलं. 1561 साली सारंगपूरच्या युद्धात मुघल सैन्याने माळवा जिंकला. पण या युद्धातून मिळवलेली लूट अधम खानने स्वतःजवळ ठेवली.
महाम अंगाच्या सांगण्यावरून अकबराने अधम खानला शिक्षा केली नाही. मात्र जिंकलेल्या प्रदेशावर पीर मोहम्मद खानची नियुक्ती केली.
1561 च्या नोव्हेंबर महिन्यात अकबराने त्याचे जवळचे सेनापती अटागा खान यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. ते जीजी अंगाचे पती होते. ही गोष्ट महाम अंगाला काही आवडली नाही.
अधम खान प्रकरण
16 मे 1562 मध्ये अधम खानने त्याच्या साथीदारांसह अटागा खान यांना मारण्याचा कट रचला आणि त्यांचा खून केला. त्यानंतर अधम खान शाही जनानखाण्याच्या दिशेने धावत सुटला, तिथं त्याला एका नेमत नावाच्या किन्नराने अडवलं.
याच दरम्यान लोक घाबरून मोठयाने किंचाळू लागले. या आवाजाने अकबर झोपेतून जागा झाला आणि त्याने पळणाऱ्या अधम खानला पकडलं.
अधम खान आपल्या गुन्ह्यासाठी कारणं देत होता, मात्र अकबराने त्याच्या तोंडावर एक ठोसा लगावला.
त्यानंतर अधम खानला पहिल्या मजल्यावरून खाली फेकण्याचे आदेश देण्यात आले. या मजल्याची उंची जवळपास 10 फूट इतकी होती. एवढ्या उंचावरून फेकल्यावर सुद्धा अधम खान जिवंत होता.
यावर अकबराने परत एकदा त्याला खाली फेकण्याचा हुकूम दिला. आणि यावेळी त्याला डोक्यावर फेकावं जेणेकरून तो जिवंत राहणार नाही असंही सांगितलं. अकबराने स्वतः जाऊन ही बातमी महाम अंगाला दिली. यावर महाम अंगा म्हणाली की, 'तू बरं केलंस.' मात्र अधम खानाच्या मृत्यूने महाम अंगा खचून गेली होती, थोड्या दिवसांत तिचाही मृत्यू झाला.
महाम अंगाचा दूसरा मुलगा कुली खान अशा गोष्टींमध्ये कधीच सामील नव्हता. त्यामुळे अकबराच्या राज्यात तो निवांत जगला.
अकबराने त्याची आया असलेल्या महाम अंगा आणि त्याचा दूधभाऊ अधम खान यांना दफन करण्यासाठी एक मकबरा बनवण्याचा आदेश दिला.
पण 1830 दरम्यान एका इंग्रज अधिकाऱ्याने हा मकबरा तोडून स्वतःसाठी एक निवासस्थान बांधलं. त्यानंतर हे निवासस्थान एक रेस्ट हाऊस, पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिसच्या रुपात वापरलं गेलं.

फोटो स्रोत, Getty Images
भारताचे व्हाइसरॉय आणि गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झनने मात्र या कबरींचा जीर्णोद्धार केला. त्याच्या प्रयत्नांमुळे अधम खानचे अवशेष सापडले, मात्र महाम अंगाच्या अस्थींचे अवशेष कधी सापडलेच नाहीत.
हा मकबरा दिल्लीच्या दक्षिणेकडील मेहरौली भागात कुतुबमिनारच्या उत्तरेस बनवण्यात आलाय.
'आसारुस-सनदीद' मध्ये सर सय्यद अहमद खान लिहितात, "या वस्तूच्या भिंतीत एक जिना आहे. या बुरुजाची भिंत अशा पद्धतीने बांधलीय की, इथून आतबाहेर जाता येईल."
"ही वास्तू म्हणजे एक भूलभुलैया आहे. लोकांना वाटतं की, ते ज्या मार्गाने आत जातात त्याच मार्गाने बाहेर येतील, पण तसं नसून एका कोपऱ्यात खालच्या बाजूला हा रस्ता आहे."
"त्यामुळे या जागेला भूलभुलैया हे नाव पडलंय."
मुघल राजवटीत बांधण्यात आलेला हा पहिला मकबरा (समाधी) आहे. ना यावर कोणती शाही कलाकुसर आहे ना यावर कोणत्याही प्रकारचं कोरीवकाम केलंय.
मुघल घराण्याचा तिसरा सम्राट असलेल्या जलालुद्दीन अकबर याच्या दरबारातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींचं दफन याठिकाणी करण्यात आलंय. हे भकास मकबरे शक्तिशाली व्यक्तिमत्त्वांच्या पतनाचं प्रतीक आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








