औरंगजेबाला धूळ चारणारा 'आसामचा शिवाजी,' जाणून घ्या अहोम साम्राज्याची गोष्ट

लचित बारफुकान

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

शिवाजी महाराजांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं छाटून टाकली हा इतिहास सर्वश्रुत आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या "महाराष्ट्राचा इतिहास-मराठा कालखंड (भाग 1) मधील डॉ. वि. गो. खोबरेकर लिखित शिवकाल (1630 ते 1707 इ.) या पुस्तकात शाहिस्तेखानाची बोटं छाटण्याचं सविस्तर वर्णन दिलं आहे.

5 एप्रिल 1663 रोजी शिवाजी राजांनी दोनशे अनुभवी आणि कसलेल्या लढवय्यांना बरोबर घेऊन खानाच्या जनानखानाच्या इमारतीच्या भिंतीला भोक पाडलं आणि आपल्यापैकी दोघा-तिघांना आत पाठवलं. जनानखान्यातील दासींनी शाहिस्तेखानास कळवलं की भिंतीस भोक पाडून काही माणसं आत घुसली आहेत.

हे ऐकताच शाहिस्तेखान आपलं शय्यागृह सोडून वाड्याच्या ओसरीवर आला. अंधारी रात्र होती कोण माणसं आली आहेत ते समजत नव्हतं. वाड्याच्या दुसऱ्या दिवाणखान्यात अनेक दिवे जळत होते. शाहिस्तेखानाचा मुलगा अबुलफतेखान तिथंच झोपला होता. तो शाहिस्तेखान आहे असं समजून मावळे त्या माणसावर तुटून पडले. त्याचे शिर कापून घेऊन आपल्या बरोबर घेऊन गेले.

शिवाजी महाराज

अंधारातून शिवाजी महाराजांची माणसे चालत असल्यामुळे त्यांची चाहूल शाहिस्तेखानाच्या लोकांना लागली. मग एकच गडबड उडाली सर्वजण जागे झाले, पळापळ सुरू झाली. स्वतः शाहिस्तेखानाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महाराजांनी मध्येच त्याला गाठून त्याच्यावर तलवारीचा वार केला. त्याची परिणीती खानाची एका हाताची बोटे तुटण्यात झाली. तो जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने पळू लागला.

शाहिस्तेखानाची नाचक्की झाल्यामुळे चिडलेल्या औरंगजेबाने आपल्या मामाला बंगाल सुभ्यावर सुभेदार म्हणून पाठवलं. हा झाला आपल्या स्टोरीचा पहिला भाग.

आता शिवाजी महाराजांना स्वराज्य उभारणीसाठी धनाची आवश्यकता होती. त्याचबरोबर शाहिस्तेखानला पळवून लावल्यानंतर महाराजांना मुघल दरबारातही आपला धाक निर्माण करायचा होता.

सूरत हे बंदर मुघलांचं प्रमुख बंदर होतं. याच बंदरातून मुघलांचा व्यापार पर्शियन आखातापर्यंत चालायचा. इथे अनेक गडगंज व्यापारी होते तसंच मक्का-मदिनेसाठी जाणारी जहाजंही याच बंदरातून जायची.

त्यामुळे सूरत लुटली तर मुघलांना जरब बसेल आणि विपुल संपत्ती पदरात पडेल, असा विचार शिवाजी महाराजांनी केला होता, असं 'Shivaji, His Life and Times' या ग्रंथात इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांनी नमूद केलं आहे. त्यामुळे 5 जानेवारी 1664 शिवाजी राज्यांनी सुरत लुटलं.

ही सुरतेची पहिली लूट होती.

शिवाजी महाराज

यामुळे महाराजांनी पहिल्यांदा सूरत लुटल्यानंतर त्यांचा बिमोड करायला औरंगजेबने मिर्झाराजे जयसिंह यांना पाठवलं. पुरंदरचा तह झाला. त्यातली एक अट होती की महाराजांनी औरंगजेबाला भेटायला आग्र्यात यायचं.

तिथे त्यांना कैदेत ठेवलं गेलं. कैदेतच शिवाजी महाराजांना ठार करायचं असा औरंजेबाचा इरादा होता, त्यासाठी त्यांना वेगळ्या ठिकणी पाठवण्याचंही त्याने ठरवलं. पण मिर्झाराजे जयसिंगांनी शिवाजी महाराजांना वचन दिलं होतं की त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही.

त्यामुळेच मिर्झाराजे जयसिंगाचा मुलगा रामसिंग याने औरंजेबासमोर म्हटलं की जर शिवाजी राजांना हात लावायचा असेल तर आधी मला मारावं लागेल. मी वडिलांचा शब्द पाळणार.

काही काळाने महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सहीसलामत सुटून परत आले आणि यात रामसिंहाने त्यांना मदत केली असा औरंगजेबाचा समज झाला.

हा दुसरा भाग.

आता गोष्ट सुरू होते त्या आसामी राजाची.

मराठ्यांकडून मात खाल्यानंतर शाहिस्तेखानाला आधीच बंगालात पाठवलं होतं, मिर्झा राजे जससिंगाच्या तावडीतून महाराज सुटल्यानंतर खवळलेल्या औरंजेबाने त्यांच्या मुलाला रामसिंहाला शिक्षा म्हणून आसामच्या मोहीमेवर पाठवलं.

तिथे अहोम राजांचं राज्य होतं आणि यातले एक प्रमुख सरदार (ज्याला आसामी भाषेत बारफुकान असंही म्हणतात) होते लचित बोरफुकान.

आसाम लचित बारफुकान

फोटो स्रोत, Shahid Shaikh

हा भाग मुघलांच्या साम्राज्यात येत नव्हता, आणि दख्खन सुटला तर निदान आसाम जिंकावा अशा विचाराने औरंजेबाने आसामवर हल्ला करायला सांगितलं. जवळच मामा शाहिस्तेखानही होता.

अहोम राज्याचं बळ मुघलांच्या तुलनेत फारच कमी होतं. पण मुघल आणि अहोम सरदार लचित यांची सेना यांचं जे युद्ध झालं ते इतिहासात 'सरायघाटचं युद्ध' म्हणून ओळखलं जातं. हे युद्ध म्हणजे आसामवर ताबा मिळवण्याचा मुघलांचा अखेरचा प्रयत्न होता.

त्यानंतर काही काळासाठी मुघलांच्या ताब्यात गुवाहाटी गेलं खरं, पण संपूर्ण अहोम साम्राज्याला ते आपल्या छत्राखाली कधीच आणू शकले नाहीत.

सरायघाटची लढाई गनिमी कावा, ताकदीपेक्षा युक्तीच्या बळावर लढाया कशा जिंकतात येतात यांच उत्तम उदाहरण समजली जाते.

काय आहे अहोमांचा इतिहास?

मुघल अहोम साम्राज्यावर चाल करू आले इथंपर्यंत तर आपण पाहिलंच.

1615 पासून मुघल अहोम साम्राज्याला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतच होते. याकाळात दोन्ही साम्राज्यांमध्ये बऱ्याच लढाया झाल्या. शेवटी 1639 साली मुघल आणि अहोम यांच्यात तह झाला आणि अहोम साम्राज्याची सीमा ठरली.

यानंतर बरीच वर्षं गुवाहाटी अहोमांच्या हातातून जाऊन मुघलांच्या ताब्यात राहिलं. त्याकाळी या भागाला कामरूप असं म्हणायचे. तर कामरूपवर मुघलांचं राज्य होतं आणि तिथल्या ब्रम्हपुत्रानदीच्या पार अहोमांचं छोटंस राज्य होतं.

पण 1658 मध्ये शाहजहानच्या मृत्युनंतर मुघल साम्राज्यात जी दुफळी माजली तिचा फायदा घेऊन अहोमांनी आपल्या हातातून गेलेला काही प्रदेश पुन्हा काबीज केला. गुवाहाटी पुन्हा त्यांच्याकडे आलं.

शाहजहानच्या मृत्युनंतर मुघल साम्राज्यात जी दुफळी माजली तिचा फायदा घेऊन अहोमांनी आपल्या हातातून गेलेला काही प्रदेश पुन्हा काबीज केला

फोटो स्रोत, WALKER AND CO

फोटो कॅप्शन, शाहजहानच्या मृत्युनंतर मुघल साम्राज्यात जी दुफळी माजली तिचा फायदा घेऊन अहोमांनी आपल्या हातातून गेलेला काही प्रदेश पुन्हा काबीज केला

औरंगजेबाकडे दिल्लीची सत्ता आल्यानंतर त्याने बंगालचा नव्याने नेमलेला सुभेदार मीर जुमलाला आसाम पुन्हा मुघलांच्या अधिपत्याखाली आणायला सांगितलं.

1661 साली मीर जुमला अहोम साम्राज्यावर चाल करून आला आणि त्याने अहोमांना हरवलं. पण अहोम सैन्य गनिमी कावा, लपून छपून हल्ला करतच राहिले, दुसरीकडे आसामामधून दिल्ली किंवा बंगालात संदेशवहन करणं अहोमांनी अशक्य करून टाकलं होतं.

मीर जुमला जिंकला तर होता, पण खऱ्या अर्थाने मुघल साम्राज्य आसामात प्रस्थापित झालं नव्हतं. मग अहोम राजा जयध्वज सिंह आणि मीर जुमला यांच्यात 1663 साली तह झाला. मुघलांनी अहोमांची राजधानी गढगावमधून माघार घेतली पण या तहाच्या अटी इतक्या जाचक होत्या की त्या पाळणं अहोमांना अशक्य होतं. दुसरीकडे अपमानाचा सल होताच.

याबद्ल इतिहासकार जदुनाथ सरकार आपल्या 'आसाम मुघल रिलेशन्स' या संशोधन प्रबंधात लिहितात की, "मुघल अहोमांनी अधिकच कठोरपणे वागत होते. याच एक उदाहरण द्यायचं झालं तर अहोमांनी तहाअतंर्गत पाठवलेला हत्ती जेव्हाही प्रवास करताना मरायाचा, तेव्हा अहोमांना दंड म्हणून 2000 रूपये मुघलांकडे भरावे लागायचे."

जदुनाथ सरकार पुढे लिहितात की यामुळे अहोमांची मुघलांकडे थकबाकी वाढत चालली होती. गुवाहाटीचा मुघल सुभेदार फिरोज खान खंडणीसाठी अहोमांना त्रास द्यायचा. एकदा त्याने वेळेत सारा आला नाही म्हणून अहोमांना खरमरीत पत्र पाठवलं होतं.

मुघलांच्या पहिल्या आक्रमणानंतर अहोमांनी तयारी सुरू केली. जयध्वज राजानंतर गादीवर आलेल्या चक्रध्वज राजाने मीर जुमलाच्या आक्रमणानंतर परागंदा झालेल्या लोकांना राज्यात परत आणलं, त्यांचं पुनर्वसन केलं, नव्याने किल्ले बांधायला घेतले, सैन्याची ताकद वाढवली.

या सैन्याची कमान होती लचित बोरफुकान या सेनापातीच्या हाती. या ताज्या दमाच्या सैन्याने गुवाहाटी ताब्यात घेण्यासाठी 1667 साली पुन्हा हल्ला केला. तुंबळ युद्ध झालं पण अहोमांनी मुघलांना पळवून लावलं, आणि त्यांच्या सगळ्या सैन्य सामग्री ताब्यात घेतल्या. याच्या आधी एकच वर्षं शिवाजी महाराजांची आग्र्याहून थरारक पद्धतीने सुटका झाली होती.

औरंगजेबाचे विरोधक आपली ताकद परत मिळवत होते.

मुघलांची गुवाहाटीवर स्वारी

शिवाजी महाराज निसटल्यामुळे रामसिंहावर (मिर्झा राजे जयसिंहाचा मुलगा) औरंगजेब चिडलेला होताच, त्याने रामसिंहाची पदावनती केली. मिर्झाराजे जयसिंगाकडून दख्खनची सुभेदारी काढून घेतली. रामसिंहाची राजा ही पदवीही काढून घेतली.

पण आपल्या मानसन्मान परत मिळावा म्हणून रामसिंहाने पुन्हा मुघल सैन्यात सहभागी व्हायचं ठरवलं आणि औरंगजेबाने त्यांना आसाम काबीज करायची जबाबदारी दिली.

औरंगजेब

फोटो स्रोत, PENGUIN INDIA

आसामी बखरींमध्ये, ज्याला बुरांजी असं म्हणतात, या घटनेचा उल्लेख आहे. एका बुरांजीत लिहिलंय की, "रामसिंहाला आसामच्या मोहिमेवर पाठवण्यामागे औरंगजेबाचा हेतू वेगळाच होता. त्याच्या मनात होतं की आसामात गेलेला कोणताही सुभेदार आणि सेनापती जिवंत परत आलेला नाही. कोणाचा नैसर्गिक मृत्यू झालाय तर कोणी युद्धात मारलं गेलंय. आसामचं पाणी विष आहे, तिथली हवा वाईट आहे आणि तिथल्या डोंगर-टेकड्यांवर बेसुमार झाडी आहे."

डॉ. महेश्वर नओग यांनी 2017 साली लिहिलेल्या 'लचित बारफुकान, द व्हिक्टर ऑफ आसाम' या पुस्तकात रामसिंहाच्या सैन्याचं वर्णन आहे.

ते लिहितात, "1667 च्या उत्तरार्धात रामसिंह आसामवर चाल करून आला. रामसिंहाला शिक्षा म्हणून जास्तीच सैन्य दिलं नव्हतं."

तर शिशिधर दत्ता आणि ब्योमकेश त्रिपाठी आपल्या मार्शल ट्रॅडिशन्स ऑफ नॉर्थ इस्ट इंडिया या पुस्तकात दोन्ही सैन्याची तुलना करतात.

"रामसिंहाकडे 8000 चं स्वतःचं पायदळ, 15,000 मुघल सैन्य, टर्कीहून आलेले 5000 तलवारबाज, कूच बिहारच्या मांडलिक राजाने दिलेलं 15,000 पायदळ आणि 50 जहाजांची तुकडी होती. तर लचित बारफुकानच्या सैन्यात 1 लाख माणसं होती, यातली 32 हजार माणसं 3000 हजार लहान-मोठ्या नौकांवर कार्यरत होती."

औरंगजेबाने रामसिंहाला सांगितलं होतं की जाता जाता माझ्या मामाला (शाहिस्तेखानाला) भेट.

शाहिस्तेखान तेव्हा बंगालचा सुभेदार होता. रामसिंह दिल्लीहून निघाला, पाटण्यामार्गे बंगालमध्ये येऊन शाहिस्तेखानाला भेटला. या भेटीचं वर्णन डॉ महेश्वर नओग यांनी 2017 साली लिहिलेल्या 'लचित बारफुकान, द व्हिक्टर ऑफ आसाम' या पुस्तकात आहे.

त्यात दिलंय, "शाहिस्तेखानाने मित्राचा मुलगा म्हणून रामसिंहाचं जंगी स्वागत केलं. त्याला 25 हजाराची खंजीर तलवार भेट दिली. रामसिंहाला सल्ला देताना तो म्हणाला की तिथलं पाणी विषारी आहे त्यामुळे फक्त ब्रम्हपुत्रेचंच पाणी पी. पुढे रामसिंहाला हे आश्वासनही दिलं की अन्न, शस्त्रं, दारूगोळा किंवा पैसे कशाचीही कमतरता भासली तर बिनदिक्कत मला सांग, मी स्वतःहून तुला हे सगळं पुरवेन."

पण जसंजसं सैन्य आसामच्या दिशेन पुढे सरकायला लागला, औरंगजेबाने आणखी सैन्य पाठवलं. डॉ महेश्वर नओग एका बखरीचा उल्लेख देऊन म्हणतात की आसामामध्ये शिरताना रामसिंहकडे 3 लाखाचं सैन्य होतं, 1000 जंगली कुत्रे होते, जे शत्रूचा फडशा पाडत. मुघल सैन्याकडे तोफा होत्या, दारूगोळा होता.

काही पुस्तकांमध्ये उल्लेख आहे की या सैन्याबद्दल कळल्यानंतर लचित बारफुकानच्या डोळ्यात पाणी आलं होतं की आता मी माझ्या देशाला आणि राजाला कसं वाचवू.

व्यूहरचना आणि गनिमी कावा

लचित बारफुकान यांना कळून चुकलं होतं की सरळ युद्ध झालं तर आपला टिकाव मुघल सैन्यसमोर लागणार नाही. त्यामुळे त्यांनी मुघल सैन्याच्या ज्या गोष्टी कमकुवत होत्या, त्याचा फायदा घ्यायचा ठरवलं.

ब्रह्मपुत्रा नदीत असलेला लचित बारफुकान यांचा पुतळा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ब्रह्मपुत्रा नदीवर असलेला लचित बारफुकान यांचा पुतळा

एकतर अहोम सैन्याने ठरवलं की मुघलांना सगळ भिडायचं नाही. त्यांच्याशी लढायचं पण युद्धभूमी कोणती ते आपण ठरवायचं. खूप विचाराअंती ती जागा गुवाहाटी असेल असं ठरलं. कारण हे शहर जंगलाने आच्छादलेल्या टेकड्यांवर वसलं होतं, मोकळी मैदानं नव्हती आणि एका बाजून कमीत कमी 1 किलोमीटर रूंद अशी ब्रम्हपुत्रा होती.

अहोम राज्यात पुढे सरकायचं असेल तर ब्रम्हपुत्रा पार करण्यावाचून पर्याय नव्हता. मुघलांच्या हालचालींवर यामुळे बंधन येणार होती.

गुवाहाटीत मुघल सैन्याल प्रवेश करता येऊ नये म्हणून अनेक छुपी ठाणी बनवली गेली जिथून अहोम सैन्य मुघलांवर हल्ला करू शकेल. त्यांना पाण्यामार्गेच यावं लागेल अशी व्यवस्था केली.

या एका गोष्टीसाठी लचित बारफुकान यांचं नाव जगातल्या बुद्धीमान सैनापतींमध्ये घेतलं जातं कारण त्यांनी जमिनीवरचं युद्ध पाण्यावर नेलं.

पाण्यावर लढण्यात अहोम सैन्य सक्षम होतं पण मुघल सैन्य कमकुवत. काही महिने दोन्ही सैन्यांमध्ये लढाया होत राहिल्या, पण रामसिंहाच्या हाती काही लागलं नाही.

शेवटी ऑगस्ट 1669 मध्ये औरंगजेबाने शाहिस्तेखानाला या लढाईसाठी सैन्य आणि रसद पुरवायला सांगितली. याकाळात अहोम सैन्याने अनेकदा मुघल सैन्यावर गनिमी काव्याने हल्ले केले. एव्हाना 1670 उजाडलं होतं.

रामसिंह या युद्धाला कंटाळला होता. त्याने एकदा असंही म्हटलं की अहोम राजाने माझ्याशी तलवारबाजीत जिंकून दाखवावं मी आसाम सोडून निघून जाईन. पण अहोम राजा चक्रध्वजाने हा प्रस्ताव फेटाळला की, 'एक राजा, छत्रपती नसलेल्या एका सामान्य नोकराशी काय द्वंदयुद्ध लढेल.'

अर्थात या काळात अहोम सैन्याचेही बरेच सैनिक मारले गेले. एका लढाईत तर रामसिंहाच्या घोडदळाने अहोम सैन्याच्या 10 हजार सैनिकांची कत्तल केली.

पण अहोम मागे सरकत नव्हते आणि मुघलांना जिंकता येत नव्हतं. शेवटी तहाची बोलीणी सुरू झाली. मुघलांनी म्हटलं की 1639 साली जो तह झाला त्यात ज्या अटी ठरल्या, तसं वागा. तेवढा प्रदेश तुमचा आणि मुघलांना दरवर्षी 3 लाख रूपये सारा द्या.

अहोमांनी हा प्रस्ताव उडवून लावला.

शेवटची लढाई

अहोम राजा चक्रध्वज मरण पावल्यानंतर त्या जागी गादीवर बसलेल्या उदयादित्याने या तहाचा विचार करायचा ठरवला. दीर्घकाळ चाललेल्या युद्धाने प्रजा त्रासली होती.

पण त्याला राजाच्या सरदारांनी विरोध केला. आपण तह केला तरी दिल्लीचा सम्राट ते पाळणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि आता तह केला तर आजवरचे सगळे प्रयत्न वाया जातील असंही म्हटलं गेलं.

लचिक बारफुकान आजरी पडले होते आणि अहोमांच्या सैन्याला शाहिस्तेखानाने पाठवलेली जहाजं आणि नाविक तगडी टक्कर देत होते. अहोम सैन्यात भय पसरलं होतं.

जमिनीवरची लढाईही अहोमांच्या हातातून निसटत चालली होती. इतक्या प्रदीर्घ काळ चाललेल्या लढाईत मुघलांकडून सतत ताज्या दमाचे सैनिक येत होते पण अहोमांचं सैन्य थकलं होतं.

शेवटी आजारी असतानाही लचित बारफुकान यांनी पुन्हा युद्धभूमीत उडी घेतली आणि सैन्यात प्राण फुंकले.

ब्रह्मपुत्रा नदीत इतखुली, कामाख्या आणि अस्वक्रांता या तीन भागांच्या मधोमध मुघल सैन्याच्या जहाजांची कोंडी केली. गनिमी काव्याचे हल्ले चालूच होते. नदीची माहिती मुघलांपेक्षा अहोमांना जास्त होती.

मुघलांच्या जहाजांवर मागून पुढून दोन्ही बाजूंनी हल्ले होत होते. मुघल सैन्याचा सरखेल मुनव्वर खान या लढाईत मारला गेला.

मार्च 1671 मध्ये ही निर्णयक लढाई झाली. या लढाईत अहोमांनी मुघलांना मानस नदीपर्यंत पळवून लावलं. दारांग भागातल्या (जमिनीवरच्या) सैनिकांनीही माघार घ्यायला सुरुवात केली.

रामसिंह स्वतः गुवाहाटीसोडून कामरूपमध्ये गेले. पुढे पाच वर्षं त्यांनी गुवाहाटी आणि अहोमांवर हल्ला करण्याची दुसरी चांगली संधी शोधली पण ती त्याला मिळाली नाही. शेवटी 1676 मध्ये रामसिंह दिल्लीला परतले.

सरायघाटची लढाई जिंकल्यानंतर पुढच्याच वर्षी 1672 मध्ये लचित बारफुकान यांचं आजारीपणाने निधन झालं.

यानंतरही मुघल आणि अहोमांमध्ये 1679 मध्ये लढाई झाली आणि गुवाहाटी मुघलांच्या ताब्यात गेलं. पण 1682 मध्ये गंगाधर राजाच्या राज्यात अहोमांनी ते पुन्हा जिंकलं आणि त्यानंतर कामरूपमधूनही मुघलांना माघार घ्यावी लागली.

सरायघाटची लढाई हा अहोमांचा आसाम ताब्यात घेण्याचा मुघलांचा शेवटचा प्रयत्न होता जे अयशस्वी ठरला.

आज लचित बारफुकानांना आसाममध्ये प्रचंड मान आहे. त्यांच्या नावाने सर्वोत्तम NDA कॅडेटला पुरस्कार दिला जातो. इतरही सैन्य पुरस्कार दिले जातात, तसंच 24 नोव्हेंबरला 'लचित दिवसही' साजरा केला जातो.

औरंगजेबाला मात देणाऱ्या या शूर सेनापतीला 'आसामचे शिवाजी' म्हणून ओळखलं जातं.

संदर्भ

1. डॉ. वि. गो. खोबरेकर लिखित शिवकाल

2. 'Shivaji, His Life and Times' - गजानन मेंहदळे

3. 'आसाम मुघल रिलेशन्स' - जदुनाथ सरकार

4. 'लचित बारफुकान, द व्हिक्टर ऑफ आसाम' - डॉ महेश्वर नओग

5. मार्शल ट्रॅडिशन्स ऑफ नॉर्थ इस्ट - शिशिधर दत्ता आणि ब्योमकेश त्रिपाठी

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)