औरंगजेबाने जेव्हा मुलाला हिंदी शिकवण्यासाठी स्वतः बनवली होती डिक्शनरी

फोटो स्रोत, INDIA PICTURES
- Author, फैसल मोहम्मद अली
- Role, बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली
औरंगजेबाची प्रतिमा म्हणजे हिंदूंचा द्वेष करणारा कट्टर इस्लामी शासक अशी उभी केली जाते. पण औरंगजेबाचं व्यक्तिमत्त्व असं होतं की, त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी आपण ऐकल्या तर आपला आपल्या कानांवर विश्वास बसणार नाही.
तसं बघायला गेलं तर औरंगजेबाचा भाऊ दारा शिकोह हा अतिशय उदारवादी होता. त्यानं वेदांचं, उपनिषदांचं फारसीमध्ये भाषांतर केलं होतं. त्यामुळे त्याला व्यासंगी आणि जाणकार म्हणूनही ओळखलं जातं. पण सत्तेच्या लढाईत मात्र तो हरला. औरंगजेबाने 1659 मध्ये अतिशय क्रूरपणे त्याची हत्या केली होती.
पण असं असूनही औरंगजेब व्यासंगी होता असं म्हटलं तर? आपल्या मुलाच्या शिक्षणात अडचणी येऊ नयेत, त्याला हिंदी भाषा शिकता यावी म्हणून औरंगजेबाने हिंदी-फारसी डिक्शनरी तयार करून घेतली होती.
या गोष्टीचा उल्लेख इतिहासकार ओम प्रकाश प्रसाद यांच्या 'औरंगजेब- एक नई दृष्टी' या पुस्तकात आढळतो. 'तोहफतुल-हिंद' नावाची ही हिंदी-फारसी डिक्शनरी आहे. ज्या फारसी व्यक्तीला हिंदी येत नाही त्याला या डिक्शनरीच्या माध्यमातून हिंदी शिकता येईल अशी रचना करण्यात आलीय.
औरंगजेबाचा तिसरा मुलगा आझम शाह याला स्थानिक हिंदी भाषा शिकण्यासाठी ही डिक्शनरी तयार करण्यात आली होती. याच्या अनेक प्रति आजही ग्रंथालयात उपलब्ध आहेत. यातली अशीच एक डिक्शनरी पाटणातील खुदाबख्श खान ओरिएंटल लायब्ररीमध्ये आहे.
सामान्य लोकांसाठी या डिक्शनरीच्या प्रति छापण्यात आल्यात.
डिक्शनरीची वैशिष्ट्यं
औरंगजेबाच्या आदेशावरून मिर्झा खान बिन फखरुद्दीन मुहम्मद यांनी 1674 मध्ये ही डिक्शनरी तयार केली.
खुदा बख्श खान लायब्ररीच्या डायरेक्टर शाइस्ता बेदार सांगतात, "हिंदी आणि ब्रजभाषेतील शब्द असलेल्या या डिक्शनरीत प्रत्येक शब्दाचा उच्चार आणि नंतर त्या शब्दाचा अर्थ फारसी भाषेत देण्यात आलाय."

'चंपा' हा शब्द उदाहरण म्हणून बघायचा झाल्यास या डिक्शनरीमध्ये कोणत्या शब्दावर जोर द्यायला हवा, त्याचा फारसी भाषेतील अर्थ इत्यादी गोष्टीही देण्यात आल्या आहेत. चंपाचा अर्थ सांगताना म्हटलंय की, जर्द सोनेरी रंगाचं फूल ज्यात किंचित शुभ्र रंग असतो. हिंदुस्थानातले कवी त्यांच्या प्रेयसीला या फुलाची उपमा देतात. या फुलाच्या कळीची तुलना प्रेयसीबरोबर केली जाते.
त्याचपद्धतीने 'चिंता' या शब्दाचा अर्थ देण्यात आलाय. याचा अर्थ काळजी करणं असा आहे. त्याचप्रमाणे रथाचं वर्णन 'चारचाकी गाडी' असं करण्यात आलंय.
मुघलांच्या काळात दरबारातील भाषा फारसी असायची. फारसी भाषेतील अनेक शब्द आता हिंदी किंवा इतर भाषांमध्ये वापरले जातात.
राजपुत्राच्या शिक्षणासाठी तयार करण्यात आलेली ही हिंदी डिक्शनरी एकप्रकारे इन्सायक्लोपीडिया (विश्वकोश) आहे. यात भारतीय वैद्यकशास्त्र, संगीत, ज्योतिष आणि इतर विषयांशी संबंधित माहिती उपलब्ध आहे.
शाइस्ता बेदार यांच्या मते 'अशा पद्धतीची डिक्शनरी काढून धार्मिक आणि सामाजिक सलोखा वाढवणे हा उद्देश होता.'
त्या सांगतात, "खुदाबख्श खान लायब्ररी आता एक अनोखा प्रयोग करत आहे. हिंदीमध्ये वापरल्या जाणार्या उर्दू-फारसी शब्दांची एक संस्कृत-हिंदी शब्दांची यादी तयार करण्याचं काम सुरू आहे. यामुळे भाषेच्या विकासात दिलेलं योगदान समजून घेता येईल."
मुघल बादशहांच्या हिंदी कविता
दिल्लीच्या जवाहरलाल विद्यापीठातील प्राध्यापक, हिंदी लेखक, समीक्षक मॅनेजर पांडे त्यांच्या 'मुगल बादशाहों की हिंदी कविता' या पुस्तकात औरंगजेबाचा मुलगा आझम शाहने रचलेल्या काही कवितांचा उल्लेख केला आहे.
यात तो कवितेच्या माध्यमातून दारिद्र्य संपवण्यासाठी हिंदू देवता गौरी आणि शिव यांची आराधना करतोय.
गौरी ईश्वरी शिवा भवानी आनन्द देजैI
रुद्राणी सर्वाणी सर्व मंगला मृडानी मैनका दारिद्र भंजैI
भस्म भूषण अंग चर्चित गंग शिखर बहुर रूप शिवजीI
गांडवर में डमरू बाजत, फूँकत फणेश भारीI
मात्र तज्ज्ञांच्या मते, भाषेवर प्रभुत्व मिळवलेल्या व्यक्तीकडूनचं अशा प्रकारची निर्मिती होऊ शकते.

फोटो स्रोत, PENGUIN INDIA
मॅनेजर पांडे यांच्या पुस्तकात अकबरापासून ते बहादूरशहाने रचलेल्या हिंदी कवितांपर्यंतच संकलन करण्यात आलंय.
या पुस्तकाची निर्मिती करण्यासाठी पांडे यांनी प्रामुख्याने दोन ग्रंथांचा आधार घेतलाय. यात कृष्णदेव व्यास देव रचित 'रसागर' 'संगीत रागकलद्रुम' आणि चंद्रबाली पांडेंच्या 'मुगल बादशाहों की हिंदी' या ग्रंथांचा समावेश आहे.
युरोपियन वैद्य आणि प्रवासी फ्रांस्वा बर्निअर औरंगजेबाबद्दलच्या एका घटनेचा उल्लेख करताना लिहितो की, औरंगजेब सत्तेवर आल्यावर त्याने एका धर्मगुरूला सांगितलं होतं की, 'एका शासकाला धार्मिक भाषेपेक्षा स्थानिक भाषा येणं गरजेचं असतं.'
बरेच इतिहासकार औरंगजेबाबद्दल लिहितात की, 'तो अरबी आणि फारसी भाषांचा जाणकार होता. पण त्यांच्या कुटुंबात हिंदी भाषेचा वापर व्हायचा. हिंदीतल्या बऱ्याचशा म्हणी औरंगजेबाला मुखोद्गत होत्या आणि आपल्या बोलण्यात तो त्याचा वापरही करायचा.'
औरंगजेबाला कवितेची आवड, भाषेचं ज्ञान होतं. त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. ज्याच्या चर्चा आज होतात आणि भविष्यातही होत राहतील.
प्रसिद्ध इतिहासकार ऑड्रे ट्रुशके त्यांच्या 'औरंगजेब्स मॅन अँड द मिथ'या पुस्तकात लिहितात, "औरंगजेबाचं व्यक्तिमत्त्व अत्यंत गुंतागुंतीचं होतं. म्हणजे त्याला एखाद्या साच्यात बसवणं अवघड आहे."
वारसाची हत्या
औरंगजेबचा मुलगा आझम शाहचं पूर्ण नाव अबुल फैज कुतुबुद्दीन मोहम्मद आझम असं होतं.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतर आझम शाह गादीवर बसला. पण तीन महिन्यांतच त्याच्या सावत्र भावाने शाह आलमने त्याच्या विरोधात युद्ध पुकारलं आणि या दोघांमध्ये झालेल्या लढाईत आझम शाहला ठार झाला.
औरंगजेबाने तो हयात असतानाच आझम शाहला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं होतं. औरंजेबाच्या मृत्यूनंतर 14 मार्च 1707 रोजी तो सिंहासनावर बसला आणि आग्र्यातील जाजाऊच्या युद्धात 12 जून 1707 रोजी त्याचा पराभव झाला.
औरंगजेबाची कबर ही औरंगाबादमधील खुलताबाद येथे आहे. त्याच जवळ आझम शाहची कबर देखील आहे. आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








