मुघल-ए-आझमसाठी अॅडव्हान्स म्हणून पृथ्वीराज कपूर यांनी घेतला होता 1 रुपया...

फोटो स्रोत, Prithvi Theatre
- Author, प्रदीप कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
बॉलीवूडचा 'मुघल-ए-आझम'चा किताब कोणाला द्यायचा असेल तर तो पृथ्वीराज कपूर यांनाच द्यायला हवा. त्यांनी पडद्यावर ज्या पद्धतीने अकबर साकारला, त्याला तोड नाही.
पृथ्वीराज कपूर यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लायलपूर येथील समुंद्री तालुक्यात 3 नोव्हेंबर 1906 रोजी झाला होता.
ते तीन वर्षांचे असताना त्यांच्या डोक्यावरून आईचं छत्र हरपलं. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी शाळेतल्या नाटकात भाग घेतला.
पुढे पेशावरच्या एडवर्ड कॉलेजमधून बॅचलरची डिग्री मिळवली. पण एवढ्या वर्षात नाटकाची आवड काही कमी झाली नव्हती. नाटकाच्या वेडापायी ते लाहोरला आले, पण कुठल्याच नाटक कंपनीत काम मिळालं नाही. त्यांचा स्वभाव हजरजबाबी होता आणि विशेष म्हणजे ते शिकलेले होते.
लाहोरमध्ये काम मिळत नाही म्हटल्यावर सप्टेंबर 1929 मध्ये त्यांनी मुंबई गाठलं. तिथं त्यांना इम्पीरियल फिल्म कंपनीत काम तर मिळालं पण हे काम बिनपगारी होतं. पण ते थांबले नाहीत. कारण त्यांना बॉलिवूडचा शहेनशाह जे बनायचं होतं.
1931 मध्ये भारतातील पहिला बोलपट 'आलमआरा' रिलीज झाला. यात पृथ्वीराज कपूर यांनी वेगवेगळ्या वयोगटातील आठ प्रकारच्या भूमिका साकारून सिनेसृष्टीत कलेचा एक उत्तम नमुना सादर केला होता.
पडद्यावर अकबर साकारला...
'आलमआरा' नंतर दहा वर्षांनी म्हणजेच 1941 मध्ये सोहराब मोदींचा 'सिकंदर' चित्रपट आला होता. या चित्रपटात पृथ्वीराज कपूर यांनी सिकंदराची भूमिका वठवली होती.
त्यानंतर 1960 मध्ये मुघल-ए-आझम आला. या चित्रपटात त्यांनी अकबराची भूमिका करून ती भूमिकाच अजरामर केली. त्यांच्या या अभिनयाचे दाखले आजही दिले जातात.
चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या आधी पृथ्वीराज कपूर यांचं नाव घेतलं जातं. त्यामुळे दिलीप कुमार आणि मधुबाला नाराज झाले होते हे तितकंच खरं आहे.
त्यांच्या या नाराजीचा उल्लेख आढळतो 'थिएटर के सरताज पृथ्वीराज' या पुस्तकात. योगराज टंडन लिखित हे पुस्तक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने प्रकाशित केलंय.

फोटो स्रोत, Prithvi Theatre
'मुघल-ए-आझम' चित्रपट तयार व्हायला बराच वेळ लागत होता. यापाठीमागे बरीच कारणं होती. आजही याच्या चर्चा होतात. पण यातलं एक मुख्य कारण होतं की, चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये पृथ्वीराज कपूर यांचं नाव पहिल्या नंबरवर झळकणार होतं.
पृथ्वीराज के. आसिफ यांना म्हटले होते की, "उगाच किरकोळ गोष्टींवरून चित्रपट पुढं ढकलण्यात काही अर्थ नाहीये. या दोघांची नावं अगदी मोठ्या अक्षरात पहिल्यांदा टाकून द्या, मला काही फरक पडत नाही."
यावर असिफ म्हणाले की, "दिवाणजी, मी मुघल-ए-आझम बनवतोय, सलीम-अनारकली नाही. या दोघांनाही या गोष्टी समजतं नाहीयेत. या चित्रपटात एकच हिरो आहे आणि तो म्हणजे अकबर द ग्रेट."
1 रुपयाचा ब्लँक चेक मागितला...
पृथ्वीराज कपूर या चित्रपटाचा भाग कसे झाले यामागेही एक रंजक किस्सा आहे. आसिफ यांनी त्यांना एका बंद लिफाफ्यात कोरा चेक दिला होता.
योगराज टंडन त्यांच्या पुस्तकात लिहितात, "आसिफ यांची चेष्टा करताना पृथ्वीराज कपूर म्हटले होते की, एवढं काही लिहिलंयस तर तेवढं चेकवर पण रक्कम लिहिली असतीस."
यावर आसिफ म्हणाले की, त्यावर किती रक्कम टाकू हे आधी सांगा.
पृथ्वीराज कपूर यांचे सहाय्यक म्हणून योगराज टंडन तिथं उपस्थित होते.
पृथ्वीराज म्हणाले, "तुला माहीत नाहीये का?"
यावर के. आसिफ म्हणाले, "मला जर माहीत असतं तर मी लिहिलं नसतं का?"
मग पृथ्वीराज कपूर म्हणाले, "अच्छा...मग एक काम कर, तुला हवी तेवढी रक्कम त्यावर लिही. माझी काही हरकत नाहीये."
यावर के. असिफ म्हणाले "दिवाणजी, असं बोलू नका. सर्वांनी आपली आपली रक्कम सांगितलीय. दिलीप कुमार, मधुबाला, दुर्गा खोटे, मग तुम्ही पण सांगा."
"नाही, माझी किंमत तू ठरव."
"दिवाणजी, हे धाडस मी करू शकत नाही."
"मला तर अजून स्वतःची किंमत लावता आलेली नाही."
"बरं...राजने तुम्हाला 'आवरा'मध्ये किती मानधन दिलं होतं हे तरी तुम्ही सांगू शकता."
"पन्नास हजार"
"बरं. मग मी पंच्चाहत्तर हजार लिहितो."
"जसं तुला योग्य वाटेल."

फोटो स्रोत, Prithvi Theatre
पण प्रकरण इथंच संपलं नाही. रक्कम तर ठरली होती पण कॉन्ट्रॅक्टच्या आधी अॅडव्हान्स द्यायचा, असं के. आसिफ यांचं म्हणणं पडलं.
के. आसिफ यांनी पृथ्वीराज कपूर यांना चेकवर अॅडव्हान्सची रक्कम लिहायला सांगितली, तेव्हा पृथ्वीराज यांनी एक रुपया लिहिला.
त्यांच्या या कृतीमुळे के. आसिफ भावूक झाले. त्यावर पृथ्वीराज यांनी त्यांना म्हटले, "आसिफ, मी माणसांसोबत काम करतो, व्यापारी आणि मारवाड्यांसोबत नाही."
अशा पृथ्वीराज कपूर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूरसारखे हिरे दिले. रणधीर कपूर, ऋषी कपूर, करिश्मा कपूर, करीना कपूर आणि रणबीर कपूर यांनी कपूर खानदानाचा वारसा पुढं चालवला.
कपूर कुटुंबीय बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित कुटुंब मानलं जातं.
पृथ्वीराज कपूर यांच्या पुढच्या पिढीतल्या राज कपूर यांनी हिंदी सिनेसृष्टीत एवढं मोठं नाव कमावलं की, पृथ्वीराज कपूर यांच्या मुलाच्या नावाने त्यांना ओळखलं जाऊ लागलं.

फोटो स्रोत, Prithvi Theatre
पण राज कपूर यांना त्यांच्या संबंध आयुष्यात असं कधीच वाटलं नाही की ते त्यांच्या वडिलांपेक्षा चांगले आहेत. ते त्यांच्या वडिलांचा इतका आदर करायचे की, त्यांनी त्यांच्या वडिलांसमोर कधीच दारू आणि सिगरेटला हात लावला नाही.
राज कपूर यांच्या आयुष्यात त्यांच्या वडिलांचं किती महत्व होतं याविषयीचा एक किस्सा चित्रपट पत्रकार जयप्रकाश चौकसे यांनी लिहून ठेवलाय.
ते लिहितात, "राज कपूर बऱ्याचदा मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या वडिलांच्या घराबाहेर यायचे आणि वडिलांना हाक मारून उठवायचे. त्यांचे वडील जेव्हा बाल्कनीत यायचे तेव्हा राज कपूर म्हणायचे की, तुम्ही खाली येऊ नका, मीच तुमच्या बरोबरीला यायचा प्रयत्न करतो. इतकं बोलून त्यांची नशा उतरायची."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








