नर्गिस दत्त यांनी राज कपूर यांच्या स्टुडिओसाठी जेव्हा आपलं सोन्याचं कडंही विकलं होतं...

नर्गिस

फोटो स्रोत, JH THAKKER VIMAL THAKKER

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

1948 साली नर्गिस आणि राज कपूर पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांचं वय होतं 20 आणि तोपर्यंत त्यांनी 20 चित्रपटांमध्ये कामही केलं होतं. राज कपूर तेव्हा 22 वर्षांचे होते. तोपर्यंत त्यांना दिग्दर्शनाची संधी मिळाली नव्हती. पण या दोघांच्या भेटीची कहाणी एकदम रंजक आहे.

तेव्हा राज कपूर आपल्या पहिल्या सिनेमासाठी स्टुडिओ शोधत होते. नर्गिसची आई जद्दनबाई फेमस स्टुडिओमध्ये 'रोमिओ अँड ज्युलिएट'चं शूटिंग करत असल्याचं राजना समजलं. तिथं कोणत्या प्रकारच्या सोयी आहेत, हे राजना जाणून घ्यायचं होतं.

राज कपूर थेट त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा नर्गिस यांनीच दरवाजा उघडला. दार उघडण्यासाठी त्या स्वयंपाकघरातून धावत आल्या होत्या. स्वयंपाकघरात त्या भजी तळत होत्या.

या धांदलीमध्ये त्यांचा हात केसांना लागला आणि हाताचं बेसन केसांनाही लागलं. बस्स! नर्गिसच्या याच रूपावर राज कपूर भाळले.

'आग'चं शूटिंग

त्यानंतर त्यांनी हाच प्रसंग अगदी हुबेहूब ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्यासाठी 'बॉबी' सिनेमात वापरला. पण या भेटीवर नर्गिस कशा व्यक्त झाल्या, हे फारच कमी लोकांना माहिती आहे.

नर्गिस

फोटो स्रोत, ULTRA DISTRIBUTRS PVT LTD

या घटनेबाबत नर्गिस यांनी आपली सगळ्यात जवळची मैत्रिण नीलमला सांगितल्याचं TS जॉर्ज यांनी 'द लाइफ अँड टाइम्स ऑफ नर्गिस' पुस्तकात लिहून ठेवलं आहे. नीलमला सांगताना नर्गिस म्हणाल्या होत्या, "एक जाडजूड, निळ्या डोळ्यांचा मुलगा आमच्या घरी आला होता. 'आग'चं शूटिंग सुरू होतं, तेव्हापासून हा मुलगा माझ्यावर लाईन मारत होता," असंही त्यांनी नीलमला सांगितलं होतं.

जेव्हा नर्गिस राज कपूरचा पहिला सिनेमा म्हणजे 'आग'मध्ये काम करण्यासाठी तयार झाल्या, तेव्हा पोस्टरवर तिचं नाव कामिनी कौशल आणि निगार सुल्ताना यांच्या नावांच्या वर लिहिलं जावं, असा आग्रह नर्गिसच्या आईने धरला होता.

पृथ्वीराज कपूर यांच्या आग्रहावरून जद्दनबाई आपल्या मुलीच्या कामासाठी फक्त दहा हजार रुपयांची फी घेण्यास तयार झाल्या.

परंतु त्यानंतर आपल्या बहिणीला 40 हजार रुपये मानधन द्यावं, अशी मागणी नर्गिस यांचा भाऊ अख्तर हुसैन यांनी केली आणि तसं झालंही.

कपूर घराणे एकाच फ्रेममध्ये

फोटो स्रोत, RISHI KAPOOR

फोटो कॅप्शन, कपूर घराणे एकाच फ्रेममध्ये

'आग'चं शूटिंग खंडाळ्यात झालं होतं. नर्गिसची संशयखोर आई जद्दनबाई त्यांच्याबरोबर खंडाळ्याला गेली होती. जेव्हा राज कपूर यांनी 'बरसात' चित्रपटाचं शूटिंग काश्मीरमध्ये करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा जद्दनबाई यांनी त्याला थेट नकार दिला. मग शेवटी महाबळेश्वरमध्येच काश्मीर तयार करण्यात आलं आणि शूटिंग झालं.

या नात्याबद्दल कपूर घराण्यातही तणाव होता. पृथ्वीराज कपूर यांनी आपल्या मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. 'आवारा' चित्रपटाच्या वेळेस जद्दनबाईंचं निधन झालं.

त्यामुळे नंतर त्यांना रोखणारं कुणीच राहिलं नाही.

'RK फिल्म्स'ची जान

बरसात चित्रपट तयार करताना नर्गिस राज कपूरच्या पूर्ण प्रेमात पडल्या. 'फर्स्ट फॅमिली ऑफ इंडियन सिनेमा- द कपूर्स' या पुस्तकात मधू जैन लिहितात, "नर्गिसनं आपलं हृदय, आत्मा इतकंच काय तर पैसासुद्धा राज कपूरच्या सिनेमात गुंतवायला सुरुवात केली."

नर्गिस राज कपूर

फोटो स्रोत, ULTRA DISTRIBUTORS PVT LTD

"जेव्हा आरके स्टुडिओला पैसे कमी पडू लागले तेव्हा तिनं आपलं सोन्याचं कडंही विकलं. RK स्टुडिओला पैसे मिळवून देण्यासाठी तिनं बाहेरच्या निर्मात्यांकडे 'अदालत', 'घर संसार' आणि 'लाजवंती' असे सिनेमे केले.

नर्गिसबद्दल राज कपूर यांनी नंतर असंवेदनशील उद्गार काढले होते, जे खूप गाजले होते. ते म्हणाले होते, "माझी पत्नी माझ्या मुलांची आई आहे, मात्र माझ्या चित्रपटांची आई तर नर्गिसच आहे."

नर्गिस RK फिल्म्सची जान होत्या. त्यांचं शूटिंग नसलं तरी त्या सेटवर उपस्थित राहायच्या.

'राज कपूर स्पीक्स'

एकदा राज कपूर नाशिकजवळ एका धबधब्याजवळ 'आह' चित्रपटाचं शूटिंग करत होते. तेव्हा शूटिंग पाहाण्यासाठी त्यांनी आपला चुलत भाऊ कर्नल राज खन्नाला बोलावलं होतं.

राज कपूर यांची मुलगी रितू नंदा यांनी 'राज कपूर स्पीक्स' या पुस्तकात लिहिलं आहे: "कर्नल राज खन्ना यांनी मला सांगितलं की, त्या दिवसांमध्ये शूटिंगनंतर आम्ही शिकारीला जायचो. नर्गिस जीपमध्ये मागे बसलेली असायची, ती आम्हाला सँडविचेस आणि ड्रिंक्स द्यायची. रात्री तीन-चारच्या सुमारास परतल्यावर नर्गिस मैदानात तंबूभोवती फेरी मारायची. अजूनही जनरेटर का सुरू आहे, असे ती लोकांना विचारायची. कोणतीही गोष्ट वाया गेलेली तिला आवडत नसे."

राज कपूरच्या आयुष्याची ही एकप्रकारे चेष्टाच होती की त्यांचं लग्न झाल्यानंतर चार महिन्यांनी त्यांची नर्गिसशी पहिली भेट झाली होती. दोघांचे धर्मही वेगवेगळे होते.

देव आणि राज

खरंतर नर्गिस यांचे वडील डॉ. मोहन बाबू हिंदू होते, मात्र त्यांचं पालन मुसलमानांसारखं झालं.

नर्गिस राज कपूरपेक्षा जास्त शिकलेल्या होत्या. त्या क्वीन्स मेरी कॉन्व्हेंटमधून BA झाल्या होत्या. राज कपूरने आपलं शालेय शिक्षणही पूर्ण केलं नव्हतं. ते नेहमी कॉमिक्सच वाचत राहिले.

देव आनंद आणि राज कपूर

फोटो स्रोत, MOHAN CHURIWALA

फोटो कॅप्शन, देव आनंद आणि राज कपूर

राज कपूर सर्व सिने कार्यक्रमामध्ये नर्गिसला घेऊन जायचे. देवानंद यांनी आपली आत्मकथा 'रोमॅन्सिंग विथ लाईफ'मध्ये लिहिलं आहे, "आम्ही रशियात सहा महिने एकत्र राहिलो तेव्हा मी राज कपूर यांना पूर्णपणे ओळखलं. आम्ही पार्ट्यांना एकत्र जायचो. नर्गिस आणि राज एकाच खोलीत राहायचे.

"आम्ही गेलो की रशियन पियानोवर 'आवारा हूँ'ची धून वाजवली जायची. कधीकधी राज कपूर इतकी दारू प्यायचे की ते बिछान्यातून खाली उतरायचं नावही घेत नव्हते. आम्ही खाली वाट पाहात बसायचो, मग नर्गिस त्यांना खाली घेऊन येण्याचा प्रयत्न करायची."

राज कपूर यांच्याशी विवाह?

काही काळानंतर नर्गिस यांच्या मनात आशा पल्ल्वित झाल्या, की आपण सौ. राज कपूर व्हावं, एक पत्नी आणि एक आई व्हावं. ही इच्छा स्वाभाविक आणि साहजिक होती.

नर्गिस राज कपूर

फोटो स्रोत, ULTRA DISTRIBUTORS PVT LTD

फोटो कॅप्शन, नर्गिस राज कपूर

मधु जैन लिहितात, "राज कपूर यांच्याशी विवाह व्हावा, असं नर्गिसला वाटत होतं. पण राज कपूर यांच्याशी कायदेशीर विवाह होऊ शकतो का, यावर मुंबईचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांचा सल्ला घेतला."

नर्गिस यांनी आपली मैत्रीण नीलमला सांगितलं होतं, एक दिवस तुझ्याशी लग्न करेन, असं राज कपूर नेहमी सांगायचे. मात्र राज कपूर आपल्या पत्नीला कधीही सोडणार नाहीत, हे लक्षात आल्यावर मात्र त्यांनी यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

नर्गिस राज कपूर यांच्या जीवनातून अगदी शांतपणे बाहेर पडल्या.

मदर इंडिया

RK बॅनरच्या बाहेरचा एखादा सिनेमा करण्यापूर्वी नर्गिस राज कपूर यांचा सल्ला नक्की घ्यायच्या. मात्र त्यांनी जेव्हा 'मदर इंडिया' सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या प्रेमातला शेवटचा टप्पा सुरू असल्याचा अंदाज सर्वांना आला होता.

मदर इंडियामधील एक दृश्य. नर्गिस, सुनील दत्त आणि राजेंद्र कपूर

फोटो स्रोत, MOTHER INDIA MOVIE

फोटो कॅप्शन, मदर इंडियामधील एक दृश्य. नर्गिस, सुनील दत्त आणि राजेंद्र कपूर

1986 साली सुरेश कोहली यांना दिलेल्या मुलाखतीत राज कपूर म्हणाले होते, "माझी आणखी एकदा फसवणूक झाल्याचं मला कळलं जेव्हा नर्गिसने एका म्हातारीची भूमिका करण्यास नकार दिला. ती पटकथा मी राजिंदर सिंह बेदींकडून विकत घेतली होती.

"आपली प्रतिमा खराब होईल, असं सांगून तिनं ही भूमिका करायला नकार दिला होता, पण दुसऱ्याच दिवशी तिनं 'मदर इंडिया'मध्ये म्हाताऱ्या बाईची भूमिका करण्याचा निर्णय घेतला होता."

नर्गिस आणि सुनील दत्त यांचा विवाह

1958 साली नर्गिस यांनी सुनील दत्त यांच्याशी लग्न केलं. 'मदर इंडिया' प्रदर्शित होईपर्यंत या विवाहाची बातमी गुप्त ठेवण्यात आली होती, कारण या सिनेमात सुनील दत्त यांनी नर्गिस यांच्या मुलाची भूमिका केली होती. जर लोकांना ते कळलं असतं तर कदाचित हा सिनेमा तितका चालला नसता.

नर्गिस आपल्याला सोडून जाणार आहेत याची राज कपूर यांना आजिबात कल्पना नव्हती. मधु जैन लिहितात, की नर्गिस आणि सुनील दत्त याचां विवाह झाल्याचं जेव्हा त्यांना कळलं, तेव्हा ते आपल्या मित्रांसमोर स्फुंदत-स्फुंदत रडू लागले.

नर्गिस यांचे चरित्रकार टीजेएस जॉर्ज लिहितात, "यानंतर राज कपूर यांनी भरपूर दारू प्यायला सुरुवात केली. कुणाचाही खांदा मिळाला की डोकं ठेवून ते लहान मुलांसारखं रडायला सुरुवात करायचे."

'संगम' फिल्म

स्टर्लिंग पब्लिशर्सचे प्रमुख सुरेश कोहली एकदा त्यांची मुलाखत घ्यायला गेले, तेव्हा त्यांनी सहज बोलताना राज कपूर यांना सांगितलं की देवयानी चौबळ त्यांचं चरित्र लिहिण्यास उत्सुक आहेत.

राज कपूर यांनी विचारलं, "त्यांना माझ्या आयुष्याबद्दल काय माहिती आहे?"

संगम सिनेमा

फोटो स्रोत, SANGAM MOVIE

फोटो कॅप्शन, संगम सिनेमा

सुरेश कोहली सांगतात की त्यानंतर ड्रॉवरमधून फ्रेम केलेलं एक पत्र काढून राज कपूर म्हणाले, "जग म्हणतं मी नर्गिसला साथ दिली नाही, पण खरंतर तिनं मला फसवलं आहे."

"एकदा आम्ही पार्टीला जात होतो. तेव्हा तिच्या हातात एक कागद होता. मी तिला ते काय आहे विचारलं. त्यावर 'काही नाही, काही नाही' असं ती म्हणाली आणि कागद फाडून टाकला. जेव्हा आम्ही कारजवळ पोहोचलो तेव्हा मी रुमाल विसरलो, असं सांगितलं. तोपर्यंत मोलकरणीने फाडलेल्या कागदांचे तुकडे गोळा करून कचऱ्याच्या टोपलीत टाकले होते. मी ते तुकडे कपाटात ठेवून दिले.

दुसऱ्या दिवशी मी ते तुकडे एकमेकांना जोडले. तेव्हा एका निर्मात्याने तिला लग्नासाठी मागणी घातली होती. तिनं याबद्दल मला काहीच सांगितलं नव्हतं. मी ते पत्र फ्रेम करून माझ्याजवळ ठेवलं. हा प्रसंग मी 'संगम'मध्ये वापरला आहे."

शेवटचा चित्रपट 'जागते रहो'

सुरेश कोहली यांच्यानुसार लग्नाची ही मागणी निर्माते आणि दिग्दर्शक शाहिद लतीफ यांच्याकडून आली होती. तेव्हा ते लेखिका इस्मत चुगताई यांचे पती होते.

राज कपूर आणि नर्गिस यांचा शेवटचा सिनेमा 'जागते रहो' होता. आयुष्यभर प्रमुख भूमिका करणाऱ्या नर्गिस यांनी या सिनेमात छोटीशी भूमिका केली.

बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा अगदीच आपटला. राज कपूर आणि नर्गिस यांच्यातली केमिस्ट्री या सिनेमात दिसून आली नाही.

जागते रहो

फोटो स्रोत, JAGTE RAHO MOVIE

फोटो कॅप्शन, जागते रहो

नर्गिस दत्त यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये राज कपूर सामान्य लोकांबरोबर सर्वांत शेवटी चालत होते. त्यांनी काळा चष्मा लावलेला होता.

प्रत्येकजण त्यांना नर्गिस यांच्या पार्थिवाजवळ जाण्यास सांगत होता, पण ते गेले नाहीत. ते हळूच पुटपुटले, "एकेक करून माझे सगळे मित्र मला सोडून जात आहेत."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)