पवित्र प्रभाकर : धोतर नेसलेला भारतीय स्पायडरमॅन ज्याने जगाला वेड लावलंय

स्पायडरमॅन

फोटो स्रोत, SONY PICTURES

    • Author, झोया मतीन आणि मेरील सेबॅस्टियन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

सुपरहिरोंच्या जगात आता एक भारतीय स्पायडर मॅन आलाय. तो कधी कधी धोतर नेसतो, त्याच्या बाहीला सोन्याची बटणं असतात, काळेभोर केस मानेवर रूळत असतात आणि येता जाता इतर जगातल्या पाहुण्यांना तो भारतीय संस्कृतीविषयी शिकवत असतो.

सोनी पिक्चर्सच्या स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडरव्हर्स हा एनिमेटेड चित्रपट सध्या भारतात हिट ठरला आहे. याची कमाई गेल्या वीकेंडला 28 लाख डॉलर्स एवढी होती.

भारताच्या इतिहासात कोणत्याही एनिमेटेड चित्रपटाने रिलीज झाल्याच्या पहिल्या दोन दिवसात केलेली ही सर्वाधिक कमाई आहे.

अर्थात यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कारण भारतात स्पायडर-मॅन हे पात्र खूपच लोकप्रिय आहे. मुख्य म्हणजे हिंदी चित्रपटांचा वरचष्मा असणाऱ्या देशात हे पाश्चात्य पात्र लोकप्रिय आहे.

2007 पासून भारतात स्पायडर-मॅनचे चित्रपट लोकप्रिय ठरत आहेत. या चित्रपटांनी भरपूर कमाई केलेली आहे. त्यामुळे त्याच्या अनेक भारतीय आवृत्याही आल्या. यातली सर्वात प्रसिद्ध आवृत्ती म्हणजे ‘स्पायडर मॅन, स्पायडर मॅन तुने चुराया मेरे दिल का चैन’ हे गाणं. आजही हे गाणं लोकप्रिय आहे.

पण नवा आलेला स्पायडरमॅन चित्रपट अजून खास आहे, कारण यात या सुपरहिरोची भारतीय आवृत्ती दाखवली आहे.

पवित्र प्रभाकर. तो राहातो मुंबाटनमध्ये. हे नाव म्हणजे मुंबई आणि न्युयॉर्कचा भाग मॅनहॅटन यांचं कॉम्बिनेशन आहे.

स्पायडरमॅनचं मुळ नाव पीटर पार्कर, म्हणून त्याच्या भारतीय आवृत्तीचं नाव त्याच्याशी साधर्म्य साधणारं – पवित्र प्रभाकर असं ठेवलं आहे.

पवित्र त्या पाच स्पायडरमॅनपैकी आहे जे वेगवेगळ्या विश्वात (मल्टिव्हर्स) राहातात पण त्यांच्यातल्या शक्तीमुळे एकमेकांच्या संपर्कात राहू शकतात. हे सगळे स्पायडरमॅन एकत्र येऊन सिनेमाचा हिरो माईल्स मोरॅलसची साथ देतात एका सुपरव्हिलनला हरवण्यासाठी.

करण सोनी यांनी पवित्र प्रभाकरच्या पात्राला आवाज दिला आहे

फोटो स्रोत, SONY PICTURES

फोटो कॅप्शन, करण सोनी यांनी पवित्र प्रभाकरच्या पात्राला आवाज दिला आहे
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पवित्रचा स्पायडर मॅन जगभरातल्या चाहत्यांना आवडला आहे,खासकरून भारतीयांना त्याने वेड लावलं आहे.

पवित्रचं मुंबाटन चाहत्यांना 1970 च्या दशकात लोकप्रिय असणाऱ्या इंद्रजाल कॉमिक्सची आठवण करून देतं. या कॉमिक्समध्ये फॅटम आणि मँड्रेक्सची कहाणी दाखवली होती. हे कॉमिक भारतात अनेक भाषांमध्ये प्रसिद्ध व्हायचं.

या चित्रपटाने पहिल्यांदा वेगवेगळ्या वंशांच्या स्पायडरमॅन्सला एकत्र आणलं म्हणून त्यांचं कौतुक होतंय.

“सुरुवातीला मार्व्हलने पहिला कृष्णवर्णीय स्पायडरमॅन दिला. आता पवित्र आलेला आहे. ही कथा एक खूप महत्त्वाचा संदेश देते. कोणीही स्पायडर मॅन बनू शकतं,” स्पायडरमॅनचा चाहता असलेला मृत्युंजय पाल म्हणतो.

पवित्रचं स्पायडरमॅनच्या जगात येणं अनेकांसाठी नवं असलं तरी त्यांचा जन्म मात्र जवळपास एका दशकापूर्वी झालेला आहे. पण तेव्हा याच्याबद्दल फार कमी लोकांना माहीत होतं. कॉमिक्स वाचणाऱ्या एका ठराविक वर्गापर्यंतच पवित्र मर्यादित होता.

हे पात्र पहिल्यांना स्पायडरमॅन : इंडिया#1 या 2004 च्या कॉमिकमध्ये पहिल्यांदा दिसलं होतं. याचे चार भाग आले होते आणि जगभरात याच्या 10 लाख कॉपी विकल्या गेल्या होत्या.

पवित्रचा स्पायडरमॅनही इतर स्पायडरमॅनसारखा आपल्या भागातल्या लोकांना मदत करणारा किशोरवयीन मुलगा आहे.

कोणत्याही किशोयवयीन मुलासारखं त्यालाही अभ्यास, शाळा आणि त्याची सुपरहिरोगिरी यात सुवर्णमध्य साधावा लागतो. दिवसा त्याला शाळेतली मुलं त्रास देतात.

पण रात्री तो सुपरहिरो बनतो. गुन्हेगारांना अद्दल घडवतो आणि उंच उंच इमारतींना लटकतो. त्याचा वेग अतिप्रचंड आहे. आपली ओळख लपवण्यासाठी तो मास्क लावतो.

स्पायडरमॅन

फोटो स्रोत, GraPhic India

पण पवित्रच्या कहाणीला भारतीय तडका आहे. तो चहा पितो, धोतर नेसतो आणि त्याला त्याच्या शक्ती एका रेडिओएक्टिव्ह स्पायडरमॅनकडून न मिळता एका योगी गुरुंकडून मिळाल्या आहेत.

शाळेतली मीरा जैन (मेरी जेन या नावाचं भारतीयकरण) त्याला आवडते. तो खरं एका लहानशा गावातला आहे पण त्याला स्कॉलरशिप मिळाली आहे आणि तो मोठ्या शहरात शिकायला आला आहे.

तो भारतीय निर्मात्यांनी तयार केलेला ‘भारतीय स्पायडरमॅन’ आहे. शरद देवराजन, जीवन कांग आणि सुरेश सितारामन यांना 2003 मध्ये ही कल्पना सुचली होती.

“पवित्र एक खेड्यातला मुलगा आहे ज्याला मोठ्या शहरात परकं वाटतं, तिथल्या उच्चभ्रू वातावरणाशी तो जुळवून घेऊ शकत नाही. हे दाखवताना आम्हाला भारताच्या सामाजिक स्थितीची खरी परिस्थिती दाखवायची होती. 2004 साली आम्ही जे पाहिलं त्याच्याशी हे मिळतं जुळतं होतं,” शरद देवराजन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

स्पायडरमॅनच्या या नव्या चित्रपटात वेगवेगळ्या वंशाचे आणि लिंगाचे सुपरहिरो आहेत. यातला मुख्य हिरो मिगेल मोरॅलस पोर्टोरिकन आणि आफ्रिकन वंशाचा आहे. मिगेल ओहाराचा स्पायडरमॅन मेक्सिकन आहे. जेसिका ड्र्यू ही मार्व्हलची पहिली गरोदर सुपरहिरो आहे. हॉबी ब्राऊन हा स्पायडरमॅन आफ्रिकन वंशाचा आहे.

पण 2004 साली स्पायडरमॅनची भारती आवृत्ती आणणं किंवा तसा विचार करणं सोपं नव्हतं. देवराजन म्हणतात की भारतीय प्रेक्षकांनी स्पायडरमॅन पाहिला तर होता पण त्याचे कॉमिक्स कधी वाचले नव्हते.

स्टॅन ली यांच्यासोूबत शरद देवराजन

फोटो स्रोत, GRAPHIC INDIA

फोटो कॅप्शन, स्टॅन ली यांच्यासोूबत शरद देवराजन

पण भारतात कॉमिक बुक्सची मोठी मागणी होती हे खरं. किराणा दुकानात, पेपरच्या स्टॉलवर आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर अमर चित्र कथा, चंपक, ट्विंकल असे कॉमिक्स दिसायचे.

“इतिहास आणि पुराणकथा यात लोकांना प्रचंड रस आहे. त्यामुळे भारतातले बहुतांश कॉमिक्स याच दोन प्रकारात मोडतात,” इंडिया कॉमिक-कॉनचे संस्थापक जतीन वर्मा म्हणतात.

सुपरहिरोबदद्ल आता लोकांना आकर्षण वाटायला लागलं आहे. आत्तापर्यंत हिरो म्हटलं की बॉलिवूड सिनेमातले हिरोच लोकांना आठवायचे.

“एका आंतरराष्ट्रीय सुपरहिरोला भारतीय रूप द्यायचा आमचा हेतू होता. एक असा मुलगा जो गेटवे ऑफ इंडियावर झोके घेतो, मुंबईच्या रस्त्यांवर लक्ष ठेवतो आणि त्याच्या मावशीबरोबर दिवाळी साजरी करतो,” देवराजन म्हणतात.

गेली वीस वर्षं पवित्र हे आणि यापेक्षा अधिक काय काय करतोय.

कॉमिक्समध्ये असलेलं पवित्रचं पांढरं धोतर चित्रपटात निळं होतं. त्यावर तो फंकी जॅकेट घालतो ज्यावर नक्षीकाम केलेलं आहे.

देवराजन यांच्या मते त्याचं पात्र ‘भारतीय संस्कृती आणि कुटुंबमुल्यं दर्शवतं’.

यातलं माईल्स नावाचं पात्र आपल्याला मिळालेल्या ताकदीमुळे अस्वस्थ आहे पण पवित्रचं तसं नाही. तो आशावादी आहे. तो मुंबाटनच्या गजबजलेल्या इमारतींवरून आरामात झोके घेतो.

त्याचा आत्मविश्वास जागोजागी दिसतो. मुंबाटन फिरताना तो एका ठिकाणी म्हणतो, “इथेच ब्रिटिशांनी आमची संपत्ती चोरली.”

माईल्स एका ठिकाणी चहाला ‘चाय टी’ म्हणतो त्यावरून पवित्र त्याची खेचतो आणि म्हणतो, “तू इतर वेळी काय कॉफी-कॉफी किंवा क्रिम-क्रिम मागतो का?”

व्हरायटी मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत या चित्रपटाच्या तीन दिग्दर्शकांपैकी एक केम्प पावर म्हणतात की, “आम्ही चित्रपट बनणं सुरू झाल्यानंतर पवित्रची कथा बदलली आणि पुन्हा की नव्याने त्याचं पात्र कसं असेल हे ठरवलं. कारण काही भारतीय वंशाच्या एनिमेटर्सला वाटत होतं की पवित्र अजून ऑथेंटिक हवा.”

स्पायडर मॅन

फोटो स्रोत, GRAPHIC INDIA

वर्मा म्हणतात की, “या चित्रपटाचा मुख्य प्रेक्षक भारताबाहेरचा असला तरी यातले सांस्कृतिक संदर्भ उगाच आळशीपणाने वाट्टेल ते टाकलेले किंवा भारतीयांना एकाच साच्यात बसवणारे वाटत नाहीत. आणि हा भारतीय स्पायडरमॅन कदाचित स्पायडरमॅनच्या सगळ्या चित्रपटांपैकी सर्वात उत्तम ठरेल अशा चित्रपटाचा भाग असल्याने अजून छान वाटतं.”

देवराजन म्हणतात की चित्रपटात कॉस्च्युम बदलले असले तरी पात्र, त्याचा स्वभाव आणि त्याचा भारतीयपणा बदलला नाहीये.

पवित्रच्या पात्राची अजून वाढ होईल अशी त्यांना आशा आहे.

ते म्हणतात, “कॉमिक्सपासून स्क्रीनपर्यंत प्रवास करायला पवित्रला 20 वर्षं लागली. आता अशा आहे की लवकरच पवित्रवर लाईव्ह एक्शन चित्रपट येईल. त्याला 20 वर्षं लागणार नाहीत. भारतीयांना त्यांच्या स्वतःच्या स्पायडरमॅनची गरज आहे.”

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)