सिनेमामध्ये मुंग्या-झुरळांचंही होतं कास्टिंग; कुत्रा, हत्ती-घोड्यांना दिवसावर मिळतात पैसे

एंटरटेनमेंट चित्रपटातला एक सीन

फोटो स्रोत, Tips Industries

फोटो कॅप्शन, एंटरटेनमेंट चित्रपटातला एक सीन
    • Author, मधू पाल
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

तुम्ही असा एखादा चित्रपट पाहिलाय का ज्यात एखादा प्राणी अभिनय करता दिसलाय?

आणि तुम्हाला प्रश्न पडला की सिनेमात काम करायला हे प्राणी आणले कुठून जातात, त्यांची निवड कशी होते आणि कोणाच्या मदतीने प्राण्यांचे सीन शूट केले जातात?

जनावरांचं सिनेमातलं कास्टिंग खूप आव्हानात्मक असतं आणि रंजकही. ही त्याचीच गोष्ट.

झुरळं आणि मुंग्यांही सप्लाय होतात

अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या ‘बागबान’ चित्रपटातले ते दोन कुत्रे आठवतात जे आपल्या मालकाला त्याच्या मुलांपेक्षा जास्त जीव लावतात?

अक्षय कुमारच्या ‘जानवर’ चित्रपटापासून ते ‘एंटरटेनमेंट’ या चित्रपटात दिसणारे कुत्रे असोत किंवा सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटातले हत्ती, आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ मधलं गाढव किंवा राजकुमार रावच्या ‘ओह माय डार्लिंग’ चित्रपटातला इग्वाना... हे सगळे प्राणी 'गुरूकुल'चा भाग आहेत.

'गुरुकुल' ही संस्था जावेद खान आणि त्यांचे कुटुंबीय चालवतात. ते चित्रपटातल्या कामासाठी प्रशिक्षित प्राणी उपलब्ध करून देतात.

बीबीसीशी बोलताना जावेद म्हणतात, “हे काम आमचं कुटुंब गेल्या 45 वर्षांपासून करतंय. याची सुरुवात माझ्या वडिलांनी राज कपूर यांच्या आरके स्टुडिओ फिल्म्सपासून केली होती.”

त्यांच्या गुरुकुलमध्ये 20 प्रकारच्या जातींचे कुत्रे – जसं की जर्मन शेफर्ड, गोल्डन रिट्रिव्हर, पेम्ब्रोक वेल्श, कॉर्गी, बुलडॉग, डॅशहाऊंड, पग, जर्मन शॉर्टएरय पॉईंटर, बॉक्स, यॉर्कशायर टेरियर, ग्रेट डेन, लॅब्राडोर आहेत. तर मांजरींमध्ये इराणी मांजर, मॅन कून, बॉम्बे कॅट, हिमालयन कॅट, चित्तीदार कॅट अशा 8 प्रजाती आहेत.

त्यांच्याकडे इग्वाना, अॅमेझॉन पोपट, मकाऊ पोपट, काईक पोपट, अनेक लहान पक्षी, शुगर ग्लायडर्स, उंदीर आणि सशांसाराखे प्राणी आणि पक्षी आहेत.

हे सगळे प्राणी चित्रपट, सीरियल, वेबसीरिज किंवा जाहिरातींच्या गरजेनुसार मागवले जातात. जावेद यांच्याकडे झुरळं आणि मुंग्यांचीही मागणी केली जाते, तेव्हा त्याचीही व्यवस्था ते करतात. शूटिंग संपल्यावर जिथून हे झुरळं आणि मुंग्या किंवा मागणी केलेले कीटक आणले तिथे परत सोडले जातात.

कागदपत्रं आणि रजिस्ट्रेशन हवं

चित्रपटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांबद्दल जावेद म्हणतात की, “या प्राण्यांचं अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियामध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं. आमच्याकडे किती प्राणी आहेत हे आम्हाला सांगावं लागतं. त्यामुळे काही प्राण्यांचं रजिस्ट्रेशन माझ्या नावावर आहे तर काही प्राण्यांचं माझ्या भावाच्या नावावर.”

“आजही लोकांना माहीत नाही की प्राण्यांचं रजिस्ट्रशन करावं लागतं. आम्ही पण कधी कधी चित्रपटात गरज असेल तेवढे प्राणी देऊ शकत नाही. उदाहरणार्थ ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात सहा हत्तींची गरज होती, पण आमच्याकडे दोनच हत्तींचं रजिस्ट्रेशन झाल्यामुळे आम्ही दोनच देऊ शकलो.”

या प्राण्यांकडून चित्रपटात कसं काम करून घेतलं जातं याबद्दल बोलताना ते म्हणतात, “जेव्हा कोणताही निर्माता किंवा दिग्दर्शन आमच्याकडे त्यांच्या चित्रपटासाठी लागणाऱ्या प्राण्याची मागणी घेऊन येतो तेव्हा आम्ही तो सीन कसा आहे हे समजून घेतो. त्यानंतर त्या प्राण्याला त्या शूटसाठी प्रशिक्षित करतो.”

दिल धडकने दो चित्रपटातलं एक दृश्य

फोटो स्रोत, EXCEL Entertainment

फोटो कॅप्शन, दिल धडकने दो चित्रपटातलं एक दृश्य
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

“त्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात सीन शूट होत असेल तेव्हाही आम्ही तिथे उपस्थित असतो आणि तो सीन त्या प्राण्याकडून आम्हीच करवून घेतो कारण ते आम्ही सोडून दुसरं कोणाचं ऐकत नाहीत. शुटिंगच्या वेळी जास्त गर्दी असूनही चालत नाही कारण त्यामुळे प्राणी विचलित होऊ शकतात.”

“जर पडद्यावर कुत्रा अभिनेत्री/अभिनेत्याच्या हातात असेल किंवा मांडीवर असेल तर आम्ही शेजारी किंवा कॅमेऱ्याच्या मागे उभं राहून त्या कुत्र्याला कमांड देत असतो, म्हणजे तो कुत्रा कंफर्टेबल होईल. कधी कधी आमची कमांडही त्यांना समजत नाही. मग रिटेक करावा लागतो. काहीतरी युक्ती काढून प्राण्यांना समजवावं लागतं.”

“उदाहरणार्थ-कुत्र्याला उडी मारायची आहे तर मग त्याला काय आवडतं याचा आम्ही विचार करतो. त्याला खेळायला आवडतं का?, बॉल आवडतो का? खायला आवडतं का, मग आम्ही खाण्याच्या गोष्टी वर ठेवतो. मग ते खायला कुत्रा वर उडी मारतो तर शॉट होतो. आम्हाला असंच काम करावं लागतं. जेवढे दिवस शूट असेल तेवढे दिवस आम्ही त्यांच्यासोबत राहातो.”

पुढे म्हणतात, “त्याच्या जेवणापासून त्याच्या झोपण्यासाठी पूर्ण तयारी करावी लागते. प्राण्यांमुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी वेगळी जागा ठेवली जाते. शुटिंगची तारीख कळताच आम्हाला सरकारकडे परवानगीसाठी अर्ज करावा लागतो. किती दिवसांचं शूट आहे, प्राण्यांना किती तास काम करावं लागेल अशी माहिती त्यात भरावी लागते.”

“मोठे प्राणी जसं की हत्ती किंवा घोडे असतील तर मग जास्त लक्ष द्यावं लागतं. त्यांचे सगळे कागदपत्रं क्लियर आहेत की नाही हे बघावं लागतं. त्यांना एका शहरातून दुसऱ्या शहरात नेण्यासाठी वेगळा अर्ज करावा लागतो. त्यांच्या जेवणासाठी 1 महिन्याचा शिधा, त्यांच्या आरोग्याची पूर्ण माहिती घ्यावी लागते, अर्जात नमूद करावी लागते. या सगळ्या प्रक्रियेला 2 महिने जातात. त्यानंतरच शूटिंग सुरू होतं.”

थग्स ऑफ हिंदुस्थान

फोटो स्रोत, YashRaj Productions

शुटिंगचे किस्से

बॉलिवूडचे स्टार आणि प्राण्यांचे काही गमतीशीर किस्से सांगताना जावेद म्हणतात की, “अक्षय कुमारसोबत आम्ही ‘वक्त’ नावाचा चित्रपट केला होता. याचं शुटिंग मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये झालं होतं. या चित्रपटादरम्यान एक सीन होता ज्यात 15-16 जर्मन शेफर्ड कुत्रे त्यांच्या मागे पळतात. हा सीन खूपट जबरदस्त झाला होता. शुटिंगच्या दरम्यान अक्षय अनेकदा आमच्या कुत्र्यांबरोबर धावण्याची शर्यत लावायचे.”

“अक्षय कुमारच्या ‘एंटरटेनमेंट’ चित्रपटात आमच्या कुत्र्याने, ब्रुनोने रोल केला होता. त्याला सहसा आम्ही ऑडिशनला घेऊन जात नाही कारण त्याला खूप मागणी असते. अनेकदा भीती ही असते की त्याचं सिलेक्शन दुसऱ्या कुठल्या प्रोजेक्टसाठी झालं तर शुटिंगच्या तारखा एकत्र येतील.”

“या चित्रपटाचा काही भाग बँकॉकमध्ये शूट झाला. यात आमचा कुत्रा नव्हता. मुंबईत जो भाग शूट झाला त्यात आमचाच कुत्रा होता. तो खूपच शांत कुत्रा आहे. प्रत्येक सेटवर तो सगळ्यांचा लाडका बनतो. ब्रुनोने दीपिका पादुकोणसोबतही एका जाहिरातीत काम केलं आहे. आधी दीपिका त्याच्यासोबत काम करायला घाबरत होती पण नंतर त्यांच्यात चांगली दोस्ती झाली आणि ते शूटही चांगलं झालं.”

जावेद पुढे म्हणतात, “ठग्स ऑफ हिंदुस्थान’ या चित्रपटात आमिर खानला गाढवावर बसून रपेट करायची होती. शुटिंगच्या तारखांनुसार आम्ही एका महिन्यासाठी या गाढवाला घेऊन राजस्थानला गेलो. यशराज फिल्म्सने हे गाढव पसंत केलं होतं.”

“माझ्या वडिलांनी या गाढवाला प्रशिक्षित केलं होतं. त्याला इंग्लिश कमांड शिकवल्या होत्या. या गाढवाचं नाव नवाब होतं. सेटवर माझे वडील या गाढवाला इंग्लिशमध्ये कमांड द्यायचे आणि ते प्रतिक्रिया द्यायचं. हे पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आमिर खान या गाढवावर फार खूश होते. त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं की या गाढवाला सगळ्यांनी सेटवर नवाब म्हणूनच हाक मारायची.”

कुत्रा फिरवायला नेला आणि नशीब पालटलं

जावेद सांगतात की त्यांचे वडील अनाथ होते आणि अनाथ आश्रमात लहानाचे मोठे झाले. ते लहान-मोठी काम करायचे.

“आर के स्टुडिओजवळ ते आपल्या मालकाचा कुत्रा फिरवायला घेऊन जायचे. एक दिवस स्टुडिओत चाललेल्या शुटिंगसाठी कुत्र्याची आवश्यकता होती आणि माझ्या वडिलांना आत बोलावलं. त्यांना विचारलं की चित्रपटात काम करण्यासाठी हा कुत्रा काही दिवस इथे आणशील का? माझ्या वडिलांनी कुत्र्याच्या मालकाला विचारलं. तो हो म्हणाला. या कामाचे काही पैसेही मिळाले. तेव्हा वडिलांना वाटलं की हे चांगलं काम आहे, आणि यातून पैसे कमावले जाऊ शकतात.”

भेडिया चित्रपटाचं पोस्टर

फोटो स्रोत, Maddock Films,Jio Studios

फोटो कॅप्शन, भेडिया चित्रपटाचं पोस्टर

मग जावेद यांचे वडील सिनेमासाठी प्राण्यांना प्रशिक्षित करायला लागले. हळूहळू हे काम वाढत गेलं. तेव्हापासून आतापर्यंत जावेद यांच्या कुटुंबाने प्रशिक्षित केलेले प्राणी 1000 हून जास्त हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, कानडी इतकंच काय दोन हॉलिवूडच्या चित्रपटात झळकले आहेत.

दिवसाला 10 हजार

जावेद सांगतात की या कामाचे प्राण्यांना दिवसाला 7 हजार ते 10 हजार रूपये मिळतात. जसा प्राणी असेल त्यानुसार मानधन ठरतं. मोठ्या प्राण्यांचं जास्त मानधन, लहान प्राण्यांचं कमी.

“या प्राण्यांची देखभालही चांगल्या प्रकारे करावी लागते. त्यांच्यावर उपचार करण्यापासून त्यांना लहान-मोठ्या गोष्टी पुरवण्यापर्यंत सगळ्या गोष्टींकडे लक्ष पुरवावं लागतं. एक हत्ती 185 किलो खातो, त्याचा सगळा स्टॉक आम्हाला सोबत ठेवावा लागतो.”

जावेद हत्ती, घोडे, उंट असे मोठे प्राणी स्वतः ठेवत नाहीत. तर त्यांच्या मालकांशी चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान करार करतात. तेच या प्राण्यांना प्रशिक्षित करतात. त्यांना सांभाळून शुटिंगला घेऊन जातात आणि परत आणतात. तोवर सगळी जबाबदारी त्यांच्यावरच असते.

व्हीएफएक्स आणि खरे प्राणी

आता व्हीएफएक्सची चलती आहे, तर आता प्राण्यांची मागणी कमी झालीये का या प्रश्नाचं उत्तर देताना जावेद म्हणतात की, “हे खरंय की व्हीएफएक्सचा काळ आहे. पण चित्रपटांमध्ये बहुतांश खरेच प्राणी घेतात म्हणजे चित्रपटही वास्तवदर्शी वाटतील. पण जे प्राणी वापरण्यास भारतात मनाई आहे त्या प्राण्यांसाठी व्हीएफएक्स वापरले जातात.”

नुकत्याच आलेल्या वरुण धवनच्या 'भेडिया' चित्रपटात कुत्रे खरे होते पण लांडग्यासाठी व्हीएफएक्स वापरले कारण लांडगा चित्रपटात वापरायला भारतात बंदी आहे.”

“साप, खार, घुबड, पोपट, सरडा या सगळ्यांचे तुम्हाला व्हीएफएक्स दिसतील. पण अनेकदा दिग्दर्शकांना व्हीएफएक्स नको असतात. मग त्यावेळी दुसरा पर्याय शोधला जातो. उदाहरणार्थ पोपट दाखवायचा असेल तर अॅमेझॉन पोपट वापरला जातो.”

“खार दाखवायची असेल तर तिच्यासारखी दिसणारी शुगर ग्लायडर जातीची खार दाखवली जाते. सरड्याऐवजी तसाच दिसणारा इग्वाना दाखवला जातो. हे सगळे प्राणी भारतात सापडत नाहीत. त्यांना परदेशातून आणावं लागतं. यासाठी लागणाऱ्या सगळ्या कागदपत्रांची पुर्तता आम्ही करतो म्हणजे शुटिंग दरम्यान अडचण यायला नको.”

गुरुकुल या संस्थेचे प्राणी आजवर ‘बागबान’, ‘वक्त’, ‘भेडिया’, ‘एंटरटेनमेंट’, ‘ गोलमाल 3,’ ‘दम’, ‘कोई मिल गया’ अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकले आहेत. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिच्या ‘आर्चीज’ चित्रपटातही गुरुकुलचीच मांजर होती. आता शाहरुखचा आगामी चित्रपट ‘जवान’ मध्येही इथले प्राणी दिसतील.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)