सिंगल स्क्रीन चित्रपटगृह: लुप्त होत चाललेला सांस्कृतिक वारसा..

सिंगल स्क्रीन

फोटो स्रोत, HEMANT CHATURVEDI

    • Author, शर्लिन मोलान
    • Role, बीबीसी न्यूज

कधीकाळी भारतातील सर्व घटकांतील लोकांचे मनोरंजनाचं मुख्य साधन म्हणून सिंगल स्क्रीन सिनेमा हॉलकडे पाहिलं जायचं. जसा काळ पुढे सरकत गेला तसा केबल टीव्ही आला, इंटरनेट, मल्टिप्लेक्स आले पण सिंगल स्क्रीन सिनेमा हॉल सुरूच होते.

पण पूर्वी शेकड्यांच्या संख्येत असणाऱ्या या सिंगल स्क्रीन सिनेमा हॉलची संख्या आता रोडावली आहे. सिनेमॅटोग्राफर हेमंत चतुर्वेदी यांनी इतिहासजमा होणाऱ्या या परंपरेचा मागोवा घेतलाय.

पूर्वी भारतात सिंगल-स्क्रीन सिनेमा हॉलची रचना भव्यदिव्य असायची. भारतीय वास्तुशिल्प शैलीत बांधण्यात आलेले हे हॉल प्रेक्षकांना मोठ्या संख्येने सामावून घेत.

सिनेमॅटोग्राफर हेमंत चतुर्वेदी यांनी 2019 साली एक मोहीम हाती घेतली. यात त्यांनी 15 राज्यांमध्ये फिरून जवळपास 950 सिनेमा हॉलचे फोटो काढले.

ते सांगतात, "मागील 25 वर्षांत सिंगल-स्क्रीन सिनेमा हॉलची संख्या 24,000 वरून 9,000 वर घसरली आहे. अनेक ठिकाणी प्रेक्षकवर्गाचा प्रतिसाद मिळत नसल्याने सिंगल स्क्रीन सिनेमा हॉलला टाळं ठोकण्यात आलं, तर काही ठिकाणी मॉल्स आणि इमारतींसाठी हे सिनेमा हॉल पाडण्यात आले."

चतुर्वेदी सांगतात, "या थिएटर्समुळे लोकांमध्ये सिनेमा पाहण्याची संस्कृती रुजली. भारतातील लहान लाहन शहरातही लोक चित्रपटांचा आनंद घेऊ लागले."

अशा इतिहासजमा होणाऱ्या संस्कृतीचं फोटोंच्या माध्यमातून जतन व्हावं ही कल्पना चतुर्वेदी यांना सुचली तेव्हा ते त्यांच्या मूळ गावी म्हणजेच उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे शहरात फिरायला गेले होते.

अलाहाबाद शहरातील निरंजन टॉकीज

फोटो स्रोत, HEMANT CHATURVEDI

फोटो कॅप्शन, अलाहाबाद शहरातील निरंजन टॉकीज

लहान असताना ते तिथूनच जवळ असणाऱ्या लक्ष्मी टॉकीजमध्ये चित्रपट बघायला जायचे. यावेळेसही त्यांनी लक्ष्मी टॉकीजला भेट दिली, पण आता ते बंद पडलं होतं. लक्ष्मी देवतेचे नाव या थिएटरला नाव देण्यात आलं होतं, त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना देखील करण्यात आली होती. पण यावेळी ती मूर्ती धुळीने माखली होती, तिचा एक हात गहाळ झाला होता.

चतुर्वेदी सांगतात की, "हे दृश्य बघून मला जाणवलं की, शहरीकरणामुळे आपण आपलीच संस्कृती संपवतोय. आणि त्याच दिवशी मी अशा मरणासन्न अवस्थेत असणाऱ्या सिंगल-स्क्रीन सिनेमा हॉलचं दस्तऐवजीकरण करण्याचा निर्णय घेतला."

1940 च्या सुमारास उत्तरप्रदेशमध्ये निरंजन टॉकीज बांधण्यात आली होती. पण मालमत्तेच्या वादात 1989 च्या सुमारास ही टॉकीज बंद पडली.

ऐन भरभराटीच्या काळात ही इमारत प्रशस्त इंटीरियर, आर्ट डेको डिझाइन आणि सनबर्स्ट मोझेक फ्लोअर्सने सुसज्ज होती. भले ही आज या इमारतीला टाळं लागलं असेल मात्र तिची भव्यता आजही कायम आहे.

चतुर्वेदी सांगतात, "अलाहाबाद (प्रयागराज) शहरातील हा पहिला एसी सिनेमा हॉल असल्याचं म्हटलं जातं."

"तिथल्या स्थानिकांनी मला सांगितलं की, त्यांचे वाड-वडील चित्रपट संपायच्या थोडं आधी दारासमोर उभे राहायचे. जेणेकरून चित्रपट संपला की दरवाजा उघडल्यावर थंड हवेचा झोत त्यांच्या चेहऱ्यावर येईल."

1932 मध्ये बिकानेरमध्ये स्थापन केलेली गंगा टॉकीज.

फोटो स्रोत, HEMANT CHATURVEDI

फोटो कॅप्शन, 1932 मध्ये बिकानेरमध्ये स्थापन केलेली गंगा टॉकीज.

राजस्थानमधील गंगा टॉकीज तत्कालीन राज्यकर्त्यांनी बांधल्याचं सांगितलं जातं.

गेल्या 20 वर्षांपासून थिएटर बंद आहे. परंतु धुळीने माखलेल्या कोपऱ्यात आणि पडक्या भिंतींवर 1961 साली आलेल्या शम्मी कपूरच्या 'जंगली' या हिट चित्रपटाचं पोस्टर, 1967 साली आलेला नर्गिसच्या शेवटचा चित्रपट 'रात और दिन'चं पोस्टर अशा अनेक संस्मरणीय गोष्टी सापडल्या.

भारताचं पश्चिमेकडील राज्य असलेल्या महाराष्ट्रात विजयानंद टॉकीज आहे, 1914 साली या सिनेमा हॉलचं बांधकाम पूर्ण झालं.

या सिनेमा हॉलविषयीची एक रंजक कथा सांगितली जाते. ती अशी की, राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला सिनेमा बनवणारे दादासाहेब फाळके या थिएटरजवळ असणाऱ्या दोन झाडांमध्ये सफेद कापड बांधून कृष्णधवल चित्रपट दाखवायचे.

नाशिक शहरातील विजयानंद टॉकीज.

फोटो स्रोत, HEMANT CHATURVEDI

फोटो कॅप्शन, नाशिक शहरातील विजयानंद टॉकीज.

चतुर्वेदी सांगतात, "या हलत्या प्रतिमा पाहून लोक घाबरले. त्यांना ही काळी जादू आहे असंच वाटलं. त्यानंतर त्यांनी दादासाहेबांचा प्रोजेक्टर तोडला चित्रपटाच्या रिळ पेटवून दिल्या."

"हे नवं तंत्रज्ञान आहे कोणत्याही प्रकारचा जादूटोणा नाही हे पटवून देण्यासाठी स्थानिक पोलिसांना मोहीम राबवावी लागली."

1800 च्या दशकात मुंबईतील 'प्ले हाऊस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका परिसरात रॉयल टॉकीज बांधण्यात आली. या परिसराला प्ले हाऊस म्हटलं जायचं कारण इथे नाटकांचे आणि संगीताचे अनेक थिएटर्स होते. पुढे जेव्हा भारतात सिनेमे तयार होऊ लागले तेव्हा त्यांना सिनेमा हॉल्सचं स्वरूप प्राप्त झालं.

चतुर्वेदी सांगतात की, "आजही या थिएटर्समध्ये ग्रीन रूम्स, पडाद्यामागील स्टेज अस्तित्वात आहेत. रॉयल टॉकीजमध्ये मला 1950 आणि 1962 मधील दोन जुने लेटरहेड्स सापडले. या परिसराला प्ले हाऊस अशी ओळख असल्याचा हा अधिकृत पुरावा होता."

स्वातंत्र्यपूर्व काळात गुजरातमध्ये वाधवान नावाचं एक संस्थान होतं. या संस्थानातील सिनेमा हॉल आज जीर्ण अवस्थेत उभा आहे. या वास्तूविषयी एक रंजक कथा सांगितली जाते.

वाधवान मधील तिकीट खिडकी.

फोटो स्रोत, HEMANT CHATURVEDI

फोटो कॅप्शन, वाधवान मधील तिकीट खिडकी.

असं सांगितलं जातं की, वाधवानचा राजा 1896 च्या दरम्यान मुंबई दौऱ्यावर होता. त्यावेळी त्याने ल्युमिएर ब्रदर्सने शोधलेला एक प्रोजेक्टर 10,000 रुपये देऊन ऑर्डर केला.

हा दहा वर्षांनी आला. ओपन एअर थिएटरमध्ये हा प्रोजेक्टर बसविण्यात आला. चतुर्वेदी यांच्या मते, मूक चित्रपट प्रदर्शित करणारा हा भारतातील पहिला सिनेमा हॉल होता. आज फक्त या थिएटरची तिकीट खिडकीच अस्तित्वात आहे.

1935 साली असंच एक भव्यदिव्य थिएटर महाराष्ट्रातील सोलापूर शहरात बांधण्यात आलं होतं. या थिएटरचं नामकरण भागवत चित्र मंदिर असं करण्यात आलं.

महाराष्ट्रात 1935 मध्ये स्थापन केलेलं भागवत चित्र मंदिर.

फोटो स्रोत, HEMANT CHATURVEDI

फोटो कॅप्शन, महाराष्ट्रात 1935 मध्ये स्थापन केलेलं भागवत चित्र मंदिर.

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षी या चित्रमंदिरात पहिला सार्वजनिक कार्यक्रम केल्याचं या थिएटरचे मालक सांगतात.

त्यांनी याच थिएटरच्या कंपाऊंडमध्ये आणखी तीन थिएटर बांधले. चतुर्वेदी सांगतात की, "भारतातील मल्टिप्लेक्स जनक आपणच आहोत असं भागवत चित्र मंदिराच्या मालकांना वाटतं."

डब्ल्यू. एम. नामजोशी यांनी छाया मंदिर, कला मंदिर आणि उमा मंदिर या तीन थिएटर्सची निर्मिती केली. त्यांनी भारतात जवळपास तीन डझन सिंगल-स्क्रीन थिएटर्स बांधले.

चतुर्वेदी सांगतात की, "या थिएटरच्या मालकाने मला सांगितलं की, एक वेळ अशी होती जेव्हा हे थिएटर्स पूर्ण क्षमतेने सुरू असायचे. कधीकधी तर इतकी गर्दी व्हायची की तिकीट घेण्यासाठी जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी मालकाचे वडील छतावरून फटाके खाली टाकायचे."

निशात टॉकीज.

फोटो स्रोत, HEMANT CHATURVEDI

फोटो कॅप्शन, निशात टॉकीज.

मध्यंतरी मुंबईतील निशात थिएटरचं नूतनीकरण सुरू होतं त्यामुळे ते बराच काळ बंद होतं. पण अलीकडेच आलेल्या शाहरुख खान स्टारर 'पठाण' चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी हे थिएटर खुलं करण्यात आलं.

पठाण रिलीज झाला तेव्हा थिएटर मध्ये इतकी गर्दी जमली होती की मालकांना शेजारच्या थिएटरमधून 'हाऊसफुल' चा बोर्ड मागवावा लागला. कारण त्यांनी त्यांच्या हाऊसफुल बोर्डचा अनेक वर्षांपासून वापरच केला नव्हता. आणि आता तो कुठल्या अडगळीत पडला असेल हे देखील त्यांना आठवत नव्हतं.

"चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी मला भारतातील सिंगल-स्क्रीन थिएटर्सचं पुनरुज्जीवन झालंय अशा आशयाचे मेसेज केले. माझा या सगळ्यांना एकच सवाल आहे, पठाणनंतर काय? सिंगल स्क्रीन थिएटर पुन्हा एकदा काळाच्या पडद्याआड जातील का? काहीच सांगता येत नाही."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)