सिनेमांमधील AIच्या वापराविरोधात हॉलिवूड संपावर

फोटो स्रोत, 20TH CENTURY STUDIOS
- Author, बर्न्ड डेबुसमन ज्यू. आणि समंथा ग्रॅनव्हिल
- Role, बीबीसी न्यूज
- Reporting from, अनुक्रमे वॉशिंग्टन आणि लॉस एंजिलिसहून
हॉलिवूड मधील कलाकारांनी संपाची घोषणा केली आहे. हॉलिवूडमधील हे गेल्या 60 वर्षांतील हे पहिलं मोठं शटडाउन आहे.
कमी मोबदला आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) उद्भवलेल्या धोक्यामुळे 11 आठवड्यांपूर्वी अनेक लेखकांनी संप पुकारला होता.
आता हजारो चित्रपट आणि टेलिव्हिजन कलाकारांनी या लेखकांना पाठिंबा देऊन काम बंद केलं आहे.
अर्थात स्क्रिन अॅक्टर्स गिल्ड या कलाकारांचं प्रतिनिधित्व करते. लेखकांना आणि कलाकारांना वाजवी वेतन मिळावं या मागणीसाठी संप पुकारला आहे.
यात हॉलिवूड मधील जवळपास 160,000 लोक काम थांबवणार आहेत.
परिणामी अमेरिकन चित्रपट आणि टीव्ही निर्मात्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
तसंच हा संप सुरू राहिल्यास काही प्रमुख चित्रपट देखील पुढे ढकलले जाऊ शकतात.
2 मे पासून रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका संपावर आहे. या संस्थेचे सुमारे अकरा हजार सदस्य आहेत. वेतनवाढ आणि कामाची चांगली परिस्थिती या मागणीसाठी त्यांनी संप पुकारलाय.
मोठे कलाकार संपात सहभागी
सिलियन मर्फी, मॅट डॅमन आणि एमिली ब्लंट यांसारख्या कलाकारांनी संपात सहभागी असल्याच्या घोषणा करत इंस्टाग्रामवर पोस्ट केल्या आहेत.
स्क्रिन अॅक्टर्स गिल्डने हा संप गुरुवारी मध्यरात्री लॉस एंजेलिस मध्ये सुरू केला. कॅलिफोर्नियातील नेटफ्लिक्सच्या मुख्यालयाबाहेर तसंच पॅरामाउंट, वॉर्नर ब्रदर्स आणि डिस्ने यांच्या कार्यालयांसमोर शुक्रवारी सकाळी कलाकार जमले होते.

फोटो स्रोत, Reuters
युनियनच्या संपात कलाकारांव्यतिरिक्त, गायक, नर्तक, स्टंट कलाकार किंवा मोशन पिक्चर्समध्ये काम करणारे लोक देखील समाविष्ट आहेत.
युनियनचं म्हणणं आहे की, कलाकारांऐवजी ज्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि कॉम्प्युटर जनरेटेड चेहरे आणि आवाजांचा वापर होतो तो तात्काळ थांबवावा.
यावर अलायन्स ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स स्टुडिओचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या संस्थेने युनियनच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.
त्यांनी एका निवेदनात म्हटलंय की, युनियनच्या निर्णयामुळे उद्योगावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या हजारो लोकांवर संकट ओढवेल.

फोटो स्रोत, Getty Images
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबद्दलच्या चिंतेबद्दल एएमपीटीपीने म्हटलंय की, डिजिटल प्रतिकृतींच्या वापरामध्ये ते कलाकारांच्या भूमिकेचं संरक्षण करतील.
1960 पासून लेखक आणि कलाकार एकाच वेळी संपावर गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. 1960 साली अभिनेते (अमेरिकेचे माजी राष्ट्रपती) रोनाल्ड रेगन यांच्या नेतृत्वाखील संप झाला होता.
कलाकारांनी शेवटचा संप 1980 मध्ये केला होता.
या संपामुळे नेटफ्लिक्स, अॅमेझॉन डॉट कॉम आयएनसीच्या प्राइम व्हीडिओ सारख्या स्ट्रीमिंग सर्व्हिसेस प्लॅटफॉर्मवरील हॉलिवूड निर्मिती थांबवली जाईल.
यूएस करमणूक उद्योगातील 90 टक्के पेक्षा जास्त ग्राहक टीव्ही आणि डिजिटल सबस्क्रिप्शनवर पैसे खर्च करतात. म्हणजेच कलाकारांच्या संपाचा स्ट्रिमिंग सर्व्हिसेसवर जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गुरुवारी युनियनने संप पुकारल्यानंतर, डिस्नेचे सीईओ बॉब इझर म्हणाले की, कलाकार आणि लेखकांच्या मागण्या अवास्तव आणि उद्योगासाठी हानिकारक आहेत.
कोरोना काळात या उद्योगाला नुकसान सोसावं लागलं होतं आणि आता त्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहोत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








