कॅटरिना कैफसारखी 40 व्या वर्षांनंतर गर्भधारणा शक्य आहे का? त्याचा बाळाला धोका होतो का?

फोटो स्रोत, Vicky Kaushal/Insta
- Author, सुमनदीप कौर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
बॉलीवूडची अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांना मुलगा झाला आहे. विक्की कौशलनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याची माहिती दिली आहे.
यापूर्वी त्यानं कॅटरिना गर्भवती असल्याची घोषणा करताना एक फोटो शेअर केला होता.
त्यानंतर या दोघांच्याही चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पाडला. कॅटरिना कैफ वयाच्या 42 व्या वर्षी आई होणार आहे, या गोष्टीवर देखील चर्चा होते आहे.
अर्थात वैयक्तिक किंवा व्यावसायिक पातळीवर यश मिळवल्यानंतर, चांगलं करियर घडवल्यानंतर आई होणारी कॅटरिना ही काही एकमेव किंवा पहिली महिला नाही.
2013 मध्ये अमेरिकेतील अभिनेत्री हॅली बेरीनं वयाच्या 47 व्या वर्षी बाळाला जन्म दिला होता.
मात्र चाळीशीनंतरच्या गरोदरपणात त्या महिलेला शारीरिक आणि मानसिक पातळीवर अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं.
वयाची 40 वर्षे उलटल्यानंतर आई होताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे, काय धोके असतात, हे आम्ही दिल्लीतील शालीमार बागेतील मॅक्स सुपर स्पेशिॲलिटीमधील स्त्री आणि प्रसूती विभागातील डॉक्टर एस एन बसू आणि अमृतसरमधील अमनदीप हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टर शिवानी गर्ग यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
डॉ. एस. एन. बसू आणि डॉ. शिवानी गर्ग यांचं म्हणणं आहे की या वयात आई होत असताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
उच्च रक्तदाब: चाळीशीनंतर उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. ही स्थिती आई आणि बाळ दोघांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळेत उच्च रक्तदाब आहे की नाही याची नियमितपणे तपासणी करणं महत्त्वाचं असतं.

फोटो स्रोत, Getty Images
जेस्टेशनल डायबिटीज मेलिटस: याचा अर्थ असतो की गरोदरपणात रक्तातील साखरेची पातळी वाढते. जर आईला मधुमेह असेल तर अशा परिस्थितीत अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात.
याचा बाळावर परिणाम होऊ शकतो. बाळाचं वजन खूप वाढू शकतं, बाळाच्या अवतीभोवती पाण्याचं प्रमाण वाढू शकतं. प्रसूतीनंतर बाळाला कावीळ होऊ शकते.
याशिवाय तज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की या वयात गर्भपाताची शक्यता जवळपास 30-40 टक्के वाढते.
गर्भातील भ्रूणावर होणारा परिणाम
बाळातील जन्मजात विकृती: याचा अर्थ बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. वयाच्या 40 व्या वर्षांनंतर गर्भधारणा झाल्यास बाळाची वाढ चांगल्या प्रकारे न होण्याचा धोका असतो.
बाळाच्या वाढीशी संबंधित समस्या: या वयातील गरोदरपणात, गर्भात बाळाची वाढ नीट होत नाही आणि प्रसूतीपर्यंत त्याचं वजनदेखील योग्यप्रकारे वाढत नाही.
प्लेसेंटाशी (या पिशवीत गर्भाची वाढ होते. त्याचं एक टोक गर्भनाळेला जोडलेलं असतं आणि दुसरं टोक बाळाच्या नाभीला) संबंधित समस्यादेखील येऊ शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
यात प्लासेंटाची योग्यप्रकारे वाढ होत न होणं, त्यात रक्ताचा योग्यप्रकारे पुरवठा न होणं यासारख्या समस्यांचा समावेश असतो.
गुणसूत्रांशी संबंधित समस्या: आईचं वय 40 पेक्षा अधिक असल्यावर बाळामध्ये मानसिक विकार निर्माण होण्याचा धोका जवळपास तिपटीनं वाढतो.
डॉ. बसू म्हणतात की चाळीशीनंतर डाऊन सिंड्रोम असलेलं बाळ होण्याचा धोका जवळपास 100 मध्ये 1 चा असतो.
धोका कमी केला जाऊ शकतो का?
तज्ज्ञ म्हणतात की वयासंबंधी धोका पूर्णपणे संपवता येत नाही. मात्र वेळोवेळी तपासणी केल्यानं आणि चांगली निरोगी जीवनशैली राखल्यानं तो कमी करण्यास मदत होते.
डॉ. एस एन बसू म्हणतात, "प्रसूतीआधी डॉक्टरांकडून नियमितपणे तपासणी केल्यामुळे हा धोका कमी होऊ शकतो. त्याचबरोबर रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळीदेखील नियंत्रणात ठेवली पाहिजे. वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे."
"तसंच डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घेतली पाहिजेत. विशेषकरून फॉलिक ॲसिडवर लक्ष दिलं पाहिजे. धू्म्रपान आणि मद्यपानावर नियंत्रण ठेवलं पाहिजे किंवा ते कमी केलं पाहिजे."

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. बसू यांच्या मते, "हळू ते मध्यम गतीनं चालणं, पोहणं आणि प्रसूतीपूर्व योगासनं केली जाऊ शकतात. मात्र खेळांपासून दूर राहिलं पाहिजे. कारण त्यात खूप जास्त शारीरिक हालचाली कराव्या लागतात."
डॉ. बसू म्हणतात की याव्यतिरिक्त तणाव टाळला पाहिजे. तसं करण्यासाठी पुरेशी झोप घेतली पाहिजे.
त्यांचं म्हणणं आहे की स्वत:च औषधं, व्हिटॅमिनच्या गोळ्या घेणंदेखील टाळलं पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंच महिलांनी औषधं घेतली पाहिजेत.
चाळीशीनंतर आई होणं धोक्याचं का असतं?
डॉ. बसू म्हणतात, वयाच्या 40 वर्षांनंतर महिलांमधील मुलं जन्माला घालण्याची क्षमता वेगानं कमी होऊ लागते.
सर्वसाधारणपणे 40 वर्षे वय असल्यावर मासिक पाळीच्या दरम्यान नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होण्याची शक्यता फक्त 5 टक्केच राहते. त्यानंतर ती आणखी कमी होत जाते.
डॉ. शिवानी यादेखील या गोष्टीशी सहमत आहेत. त्या म्हणतात, "ओव्हेरियन रिझर्व्ह, ज्याला सिरम एएमएच (अँटी-मुलरियन हार्मोन) टेस्टदेखील म्हणतात. त्यात असं दिसून आलं आहे की वयाच्या 40 वर्षांनंतर जेव्हा ही चाचणी केली जाते, तेव्हा ते सामान्य मर्यादेपेक्षा खूपच कमी असतं."
"त्यावेळेस शरीर मेनोपॉजच्या दिशेनं संक्रमण करत असतं. ही चाचणी महिलांमधील स्त्रीबीजांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी केली जाते."
डॉ. शिवानी असंही म्हणतात की हे सर्व तुमच्या जीवनशैलीवर अवलंबून असतं. 30 वर्षे वयातदेखील सिरम एएमएचची पातळी खूप कमी असू शकते आणि 40 व्या वर्षीदेखील ती जास्त असू शकते. ते प्रत्येक महिलेच्या बाबतीत वेगवेगळं असू शकतं.

यासंदर्भात मदत घेण्याच्या मुद्द्याबाबत डॉ. बसू सल्ला देतात की, "जर महिलांचं वय 40 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल आणि सहा महिने प्रयत्न करूनदेखील त्या गरोदर झाल्या नाहीत, तर एखाद्या फर्टिलिटी तज्ज्ञाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे."
डॉ. शिवानी सल्ला देतात की जर तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षी आई व्हायचं असेल, तर तुम्ही सर्व वैद्यकीय चाचण्या केल्या पाहिजेत.
त्यात कंप्लीट ब्लड काऊंट, केएफटी, एलएफटी, ब्लड शुगर, थायरॉईड, सीरम एएमएच, गर्भाशय आणि अंडाशयाच्या अल्ट्रासाऊंडचा समावेश आहे.
डॉ. शिवानी असंही म्हणतात की "पुरुषांनीदेखील त्यांच्या सर्व चाचण्या केल्या पाहिजेत. जर त्यांचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर त्यांनी वीर्याच्या गुणवत्तेची तपासणी केली पाहिजे."
याशिवाय, तज्ज्ञांचं म्हणणं आहे की विज्ञानानं केलेल्या प्रगतीमुळे अनेक गोष्टी शक्य होत आहेत. विविध तंत्रज्ञानाच्या मदतीनं संभाव्य समस्यांचीदेखील माहिती घेता येऊ शकते.
यात टेस्ट आणि स्क्रीनिंगचा समावेश आहे.
प्रसूतीआधी करायच्या आवश्यक चाचण्या
प्रसूतीआधी करायच्या आवश्यक चाचण्या
- क्रोमोसोमल समस्यांसाठी नॉन-इनव्हेसिव्ह प्रीनेटल टेस्टिंग (एनआयपीटी)
- पहिली तिमाही म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टर स्क्रीनिंग (रक्ताची चाचणी आणि न्युकल ट्रान्सलुसेन्सी स्कॅन)
- आवश्यकता असल्यास एम्नियोसेंटेसिस किंवा कोरियोनिक व्हिलस सॅम्पलिंग (सीव्हीएस)
संभाव्य समस्यांची लक्षणं आणि उपचार
डॉ. बसू म्हणतात की गरोदरपणाच्या काळात पुढे दिलेली लक्षणं दिसू शकतात.
- पोटात खूप तीव्र वेदना जाणवणं किंवा जोरात पेटके येणं
- जास्त ब्लीडिंग किंवा पाण्यासारखा द्रव निघणं
- तीव्र डोकेदुखी, अंधूक दिसणं किंवा अचानक सूज येणं (हे प्री-एक्लेम्पसियाचं लक्षण असू शकतं)
- बाळाच्या हालचाली कमी होणं किंवा अजिबात न जाणवणं (20 आठवड्यानंतर)
- सतत खूप ताप राहणं किंवा संसर्गाची लक्षणं दिसणं
त्यांचं म्हणणं आहे की जर अशी स्थिती निर्माण झाली, तर लगेच डॉक्टरांना संपर्क करावा.
आई होण्याचं काही 'नैसर्गिक' किंवा विशिष्ट वय असतं का?
वय हे प्रजनन क्षमतेवर परिणाम करणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. महिलांमध्ये 20 ते 35 वर्षे हे प्रजननाचं वय मानलं जातं. 35 व्या वर्षापासून प्रजनन क्षमतेमध्ये घसरण होऊ लागते.
डॉ. बसू म्हणतात की हे लक्षात घेतलं पाहिजे की पाश्चात्य देशांमधील महिलांच्या तुलनेत भारतीय महिलांना लवकर मेनोपॉज येतो.
भारतीय महिलांमध्ये मेनोपॉजचं वय 45 ते 49 वर्षांदरम्यान असतं. तर जगाच्या उर्वरित भागात ते 51 वर्षे असतं.
डॉ. बसू यांच्या मते, "नैसर्गिकरीत्या, वयाच्या 20 ते 30 वर्षांदरम्यान प्रजनन क्षमता सर्वाधिक असते. वयाच्या 35 व्या वर्षांनंतर गर्भधारणेशी संबंधित धोका सातत्यानं वाढत जातो. अर्थात वयाच्या 40 व्या वर्षानंतर हा धोका आणखी वेगानं वाढू लागतो."

फोटो स्रोत, Getty Images
त्याचबरोबर डॉ. बसू आणि डॉ. शिवानी गर्ग असंही म्हणतात की आई होण्यासाठी जागतिक पातळीवर लागू होणारं 'योग्य' असं वय नाही.
ते वैयक्तिक आरोग्य, तयारी, सपोर्ट सिस्टम आणि वैयक्तिक परिस्थितीवर अवलंबून असतं. अनेक महिला, योग्य देखभाल केल्यास, वयाच्या 40 व्या वर्षानंतरदेखील आई होऊ शकतात.
डॉ. बसू यांच्या मते,
- वयाच्या 20 व्या वर्षी महिलांमधील प्रजनन क्षमता शिखरावर असते.
- वयाच्या 30 व्या वर्षी गरोदरपणाची तयारी आणि प्रजननाचं आरोग्य यामधील ताळमेळ साधला जातो. मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे की वयाच्या 35 व्या वर्षानंतर प्रजनन क्षमतेत घसरण होण्यास सुरुवात होते.
- वयाच्या 40 व्या वर्षानंतर गरोदर होणं सामान्य बाब होत चालली आहे. ते शक्यही होतं आहे. मात्र त्यासाठी अनेकदा डॉक्टरांची देखरेख आणि काही बाबतीत प्रजनन सहाय्यक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते.
बाळाला जन्म देण्याच्या योग्य वेळेचा निर्णय हा पूर्णपणे वैयक्तिक स्वरूपाचा निर्णय आहे.
तो तुमची शारीरिक, मानसिक क्षमता आणि जीवनशैलीच्या आधारेच घेतला पाहिजे. तो कोणत्याही दबावाखाली घेता कामा नये, ही सर्वात महत्त्वाची बाब आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











