'माझ्यासह पोटातल्या बाळाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे,' 8 महिन्यांच्या गरोदर महिलेचा लोकल ट्रेन प्रवासाचा संघर्ष

काजल राजपूत याच नोकरदार वर्गातील एक महिला. सीएसएमटी येथे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ त्या एका बँकेत नोकरी करतात.
फोटो कॅप्शन, काजल राजपूत याच नोकरदार वर्गातील एक महिला. सीएसएमटी येथे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ त्या एका बँकेत नोकरी करतात.

"घरातून बाहेर पडल्यावर लोकल ट्रेनने जाताना दररोज मनात भीती असते. गरोदरपणात तर आणखी अस्वस्थता असते. आपण बाळाला सुरक्षित ठेऊ शकू का? आपण घरातून तर निघालोय पण घरी सुरक्षित परत पोहोचू का? ही भीती सतत प्रवासादरम्यान असते."

ही प्रतिक्रिया आहे 8 महिन्यांच्या गरोदर असलेल्या काजल राजपूत यांची. काजल दररोज कल्याण ते सीएसएमटीपर्यंतचा सुमारे 51 किलोमीटरचा प्रवास मुंबई लोकल ट्रेनमधून करतात.

मुंबई लोकल ट्रेन अर्थात मुंबईची लाईफलाईन.

लोकल ट्रेन काही मिनिटांसाठी जरी बंद पडली किंवा उशिराने धावत असली तर मुंबई, ठाणे, कल्याण, बदलापूर या भागातील रेल्वे स्टेशन्स प्रवाशांनी तुडुंब भरलेली असतात.

दररोज सुमारे 75 लाख प्रवासी लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. विशेषत: कार्यालयीन वेळेतल्या गर्दीत म्हणजेच सकाळी सात वाजल्यापासून ते साधारण दहा वाजेपर्यंत तर संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री अगदी नऊ वाजेपर्यंत लोकल ट्रेन प्रवाशांनी भरगच्च असतात.

याच गर्दीतून गरोदर महिलाही प्रवास करतात. त्यापैकीच एक आहेत काजल राजपूत.

'प्रश्न बाळाला सुरक्षित ठेवण्याचा'

मुंबई लगतच्या ठाणे जिल्ह्यातून आणि त्याहून पुढेही अगदी कर्जत, कसारा इथपासून म्हणजे 70-80 किलोमीटर दूरवरून नोकरदार, कामगार मध्यमवर्गीय लोकल ट्रेनने दररोज सकाळी मुंबईत आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचतात.

काजल राजपूत याच नोकरदार वर्गातील आहेत. सीएसएमटी येथे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ एका बँकेत त्या नोकरी करतात. 27 वर्षांच्या काजल कुटुंबासह कल्याणला राहतात.

काजल आठ महिन्यांच्या गरोदर आहेत. या काळातही त्या लोकल ट्रेनमधूनच बँकेत पोहचत आहेत. कारण कल्याणपासून लोकल ट्रेन वगळता दुसरा परवडणारा आणि कमी वेळेत पोहचवणारा सार्वजनिक वाहतुकीचा दुसरा पर्याय उपलब्ध नाही.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

काजल दररोज साधारणपणे पावणे नऊ वाजता कल्याण रेल्वे स्टेशनला पोहचतात. अगदी गर्दीच्या वेळेत त्यात गरोदर असताना त्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. पण अनेकदा महिला कम्पार्टमेंटमधील गर्दीमुळे ट्रेनमध्ये चढताच येत नाही.

पर्याय म्हणून त्या कल्याणहून सुटणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये चढतात. या ट्रेनमध्ये चढायला तर मिळतं पण पुन्हा जागा मिळेलच याची काहीच शाश्वती नाही. हाच संघर्ष पुन्हा संध्याकाळी कामावरून सुटल्यानंतर सीएसएमटी स्थानकावरून परतीचा प्रवास करताना त्यांना करावा लागतो.

महिला प्रवाशांसाठी राखीव डबे असले तरी नोकरदार महिलांची गेल्या काही वर्षांत वाढलेली संख्या पाहता ही जागाही आता अपुरी पडत आहे.

काजल दररोज कल्याण ते सीएसएमटीपर्यंतचा सुमारे 51 किलोमीटरचा प्रवास मुंबई लोकल ट्रेनमधून करतात.
फोटो कॅप्शन, काजल दररोज कल्याण ते सीएसएमटीपर्यंतचा सुमारे 51 किलोमीटरचा प्रवास मुंबई लोकल ट्रेनमधून करतात.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

यात गरोदर महिलांसाठी लोकल ट्रेनमध्ये बसण्यासाठी कुठेही राखीव जागा नसल्याने गरोदरपणात महिलांचे खूप हाल होतात आणि धोका वाढतो असं काजल सांगतात.

बीबीसी मराठीशी बोलताना काजल राजपूत म्हणाल्या, "गेली आठ महिने मी असाच रोज प्रवास करत आहे. ह्या गर्दीत असा प्रवास करणं आठ महिन्यांच्या प्रेगनंसीमध्ये, हे अत्यंत कठीण आहे. ट्रेनला एवढी गर्दी आहे कारण हा पीक आवर आहे. पण ऑफीसची वेळही हीच आहे. पण मला या ट्रेनमध्ये चढता आलं नाही, ट्रेन सोडावी लागली आणि यामुळे ऑफीसला जायलाही लेट होतं."

गरोदर असलेलं दिसूनही अनेकदा उभं राहून प्रवास करावा लागतो, बसण्यासाठी जागा मिळत नाही असंही काजल हतबल होऊन सांगतात.

त्या सांगतात, "गरोदरपणातही अनेकदा उभं राहूनच प्रवास करावा लागतो. लेडिज कम्पार्टमेंट एवढ्या प्रवासी महिला असतात की, अनेकदा मोकळा श्वास घेणंही कठीण होऊन जातं. गरोदरपणात मळमळणे, अंगदुखी किंवा उलटी येणं ही गोष्ट आपल्या हातात नाही. या एक ते दीड तासाच्या प्रवासात या गोष्टींचा सामना करावा लागतो. गर्दीत सफोकेशन होतं. सुरुवातीचे तीन महिने उल्टी येणं हा त्रास मी सहन केलांय.

"जागा मिळत नाही त्यावेळी दीड तासही उभं राहून प्रवास केला आहे. पहिल्या तीन किंवा सहा महिन्यांत लोकांकडून जागा मिळेल ही अपेक्षाही करू शकत नाही. पोटाला धक्का लागणं गर्दीत स्वाभाविक आहे. मला धक्का लावू नका असंही सांगू शकत नाही. पायावर पाय ठेवणं, हा सगळा त्रास मी अनुभवला आहे."

गरोदर असूनही पोट दिसत असूनही अनेकदा उभं राहून प्रवास करावा लागतो पण बसण्यासाठी जागा मिळत नाही असंही काजल हतबल होऊन सांगतात.
फोटो कॅप्शन, गरोदर असूनही पोट दिसत असूनही अनेकदा उभं राहून प्रवास करावा लागतो पण बसण्यासाठी जागा मिळत नाही असंही काजल हतबल होऊन सांगतात.

अनेकांचं असंही मत असतं की, महिलांना प्रसूती रजा मिळते. मग त्यांनी अशा काळात सुटी घ्यावी. पण ती रजा सहाच महिन्यांची असते. यामुळं ही सुटी नवव्या महिन्यापासून घेण्याकडे महिलांचा कल असतो. म्हणजेच डिलेव्हरी जवळ आल्यानंतर आणि नवजात बाळाच्या संगोपनासाठी ही सुट्टी वापरली जाते.

यामुळं मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत जिथं महिला नोकरदार वर्ग मोठा आहे, अशा ठिकाणी तरी लोकल ट्रेनमधल्या प्रवासासाठी गरोदर महिलांचा स्वतंत्र विचार होणं गरजेचं आहे असं काजल आणि महिला प्रवाशांना वाटतं.

यासाठी किमान महिलांच्या डब्यात गरोदर महिलांसाठी एक तरी जागा राखीव असावी, अशी मागणी काजल राजपूत करतात.

"मुंबईचा प्रवास बहुतांश लोक लोकलनेच करतात. अशावेळी सेकंड क्लास किंवा फर्स्ट क्लासमध्ये एक किंवा दोन सीट प्रशासनाने गर्भवती महिलांसाठी राखीव ठेवल्या तर ते फायद्याचे ठरेल. कारण मी जाऊन हक्काने सांगू शकते, की माझी सीट आहे. मला त्रास होतोय मला बसायचं आहे.

"रिजर्वेशन नसतं तेव्हा लोकांना सांगू शकत नाही. एवढ्या गर्दीत आपण इतर महिला प्रवाशांचाही विचार केला पाहिजे. त्याही थकून आलेल्या असतात. पण गरोदर महिलांच्याबाबतीत प्रश्न बाळाच्या सुरक्षेचाही आहे,"

'महिला प्रवाशांसाठी कम्पार्टमेंट वाढवा'

मुंबईचं भौगोलिक स्थान पाहाता संपूर्ण मुंबईभर प्रवासासाठीचा लोकल ट्रेन हा सर्वांत वेगवान आणि परवडणारा पर्याय आहे.

काजल ज्या कल्याण भागात राहतात तिथून दररोज रस्ते मार्गे प्रवास करून सीएसएमटी पर्यंत पोहचणं हे खर्चिक आणि अत्यंत वेळखाऊ आहे. हीच परिस्थिती लाखो महिला प्रवाशांची आहे.

यामुळंच या भागातून लाखो लोक प्रत्येक मिनिटाला लोकल ट्रेनमधून प्रवास करत असतात. महिला कम्पार्टमेंटमध्ये परिस्थिती इतकी गंभीर बनत चालली आहे की, हल्ली अनेकदा जागा मिळण्यावरून किंवा लोकल ट्रेनमधून चढण्यास उतरण्यावरून सातत्याने भांडणं, बाचाबाची आणि मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत.

खरं तर महिला प्रवाशांच्याही प्रवासादरम्यान सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. महिला प्रवासी सुद्धा सर्रास दरवाजावर अगदी लटकून प्रवास करत असतात. म्हणजेच आपला जीव धोक्यात घालून प्रवास करतात.

काजल दररोज साधारण पावणे नऊ वाजता कल्याण रेल्वे स्टेशनला पोहचतात.
फोटो कॅप्शन, काजल दररोज साधारण पावणे नऊ वाजता कल्याण रेल्वे स्टेशनला पोहचतात.

परंतु सगळ्यांनाच एकाच वेळी साधारण कार्यालयात पोहचायचं असतं आणि म्हणून सकाळी आणि संध्याकाळच्यावेळेत लोकल ट्रेनची गर्दी अधिक जीवघेणी ठरत चाललेली आहे.

यासंदर्भात लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांशी आम्ही बोललो. यातील अनुराधा चव्हाण सांगतात, "माझी ऑफिसची वेळ सकाळी दहा ते सहा आहे. पण आधीच्या गाड्यांमध्ये इतकी गर्दी असते की मी त्यात चढू शकत नाही. त्यामुळं डोंबिवलीहून उलट प्रवास करून ट्रेन रिकामी झाल्यानंतर पुन्हा त्या ट्रेनने आम्हाला प्रवास करावा लागतो. महिला प्रवाशांसाठी आता डबे आणि जागा वाढवली पाहिजे."

"आम्ही पाहतो की, गरोदर महिलांचे तर खूप हाल होतात. यामुळे गरोदर महिलांसाठी विशेष राखीव जागा दिली तर अशा महिला चढण्याची घाई न करता सगळ्यांनंतर सुरक्षितरीत्या चढून आपली बसण्याची जागा हक्काने मागू शकतात," अनुराधा चव्हाण सांगतात.

तर वृषाली गावडे यांनी सांगितलं की, "मला घरातून एक तास लवकर निघावं लागतं. डाऊनला अर्धा तास लागतो. प्रायवेट जॉबला किती प्रॉब्लेम आहेत वेळेचे. सहज सांगतात की, जॉब नाही जमत तर करू नका. आज इतकी महागाई आहे. नोकरी केली नाही तर कसं भागवणार. मला कॅन्सर आहे. माझी अँजिओप्लास्टी झालेली आहे. तरीही प्रवास करावाच लागतो."

मध्य रेल्वेचं म्हणणं काय?

मुंबई लोकल ट्रेनचे दोन भाग आहेत. एक मध्य रेल्वे आणि दुसरा पश्चिम रेल्वे. यातून सुमारे दररोज 75 लाख प्रवासी प्रवास करतात.

यात महिला प्रवाशांसाठी जागेची क्षमता किती आहे ते पाहूया,

12 डब्ब्यांच्या एका ट्रेनची प्रवासी क्षमता साधारण 3 हजार 750 इतकी आहे. यात महिलांसाठी एकूण 4 कम्पार्टमेंट आहेत. यात जागेची क्षमता सुमारे 700 इतकी आहे. तसंच सकाळी 7 ते 11 या वेळेत पार्शियल कम्पार्टमेंट असून यात जागेची क्षमता 26 अधिकच्या जागा आहेत. अशा 12 कोचच्या लोकल ट्रेनच्या 1788 फेऱ्या सुरू आहेत.

तर 15 कोच लोकल ट्रेनमध्ये महिलांचे 4 कम्पार्टमेंट आहेत ज्यात बसण्याची क्षमता सुमारे 800 इतकी आहे. परंतु या लोकल ट्रेनच्या केवळ 22 फेऱ्या आहेत.

'लेडिज स्पेशल' म्हणून दोन ट्रेन महिलांसाठी राखीव आहेत. या ट्रेनच्या दिवसाला चार फेऱ्या आहेत.

पीक अवरच्या गर्दीत त्या गरोदरपणातही ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. पण अनेकदा त्यांना महिला कम्पार्टमेंटमधील गर्दीमुळे ट्रेनमध्ये चढताच येत नाही.
फोटो कॅप्शन, पीक अवरच्या गर्दीत त्या गरोदरपणातही ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. पण अनेकदा त्यांना महिला कम्पार्टमेंटमधील गर्दीमुळे ट्रेनमध्ये चढताच येत नाही.

लोकल ट्रेनमध्ये एक डबा हा दिव्यांगांसाठी राखीव आहे. यासंदर्भात आम्ही मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांच्याशी संपर्क साधला.

स्वप्नील नीला सांगतात, "गरोदर महिलांना ट्रेनमध्ये दिव्यांगांसाठी राखीव डब्यातून प्रवास करण्यासाठी परवानगी दिली आहे. सध्या त्यांच्यासाठी जागा कुठेही राखीव नाही. आतापर्यंत तरी असा प्रस्ताव कधी आमच्याकडे आलेला नाही. असा प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करू."

मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्क, जगातलं एक जुनं, स्वस्त, अत्यंत व्यग्र आणि कदाचित सर्वांत जीवघेणं रेल्वे नेटवर्क आहे.

2023 या एकट्या वर्षात या रेल्वे नेटवर्कमध्ये अपघातात 2590 जणांचा मृत्यू झाल्याचं स्वतः रेल्वे पोलिसांचा अहवाल सांगतो. म्हणजेच दररोज सरासरी 7 प्रवाशांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलं होतं.

मुंबईच्या या लोकलमधून प्रवास करताना जेवढे मृत्यू होतायत, जवळपास तेवढेच प्रवासी जखमीसुद्धा होत आहेत. 2023 या वर्षभरात 2 हजार 441 प्रवासी जखमी झाले आहेत. मे 2022 आणि मे 2024 मध्येही जखमींची संख्या साधारण तेवढीच आहे.

1925 मध्ये सुरू झालेली ही लोकल ट्रेनमध्ये गेल्या काही काळात अनेक महत्त्वाचे बदल झाले. तसंच अनेक सुधारणा देखील झाल्या. पण आजही प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे हे वास्तव आहे.

त्यातही महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय असताना त्यांच्यासाठी आणि गरोदर महिलांच्या दृष्टीने स्वतंत्र विचार व्हायला हवं असं महिला प्रवाशांची आग्रही मागणी आहे.

'महिलांच्याच डब्ब्यात जागा आरक्षित ठेवण्याची सुचना करावी'

शिवसेनेच्या (शिंदे गट) महिला आमदार मनिषा कायंदे यांनी बीबीसी मराठीच्या रिपोर्टची दखल घेत गरोदर महिलांना लोकल ट्रेनमध्ये राखीव जागा उपलब्ध करून देण्यात मागणी केली आहे.

'एक्स'वर केलेल्या एका पोस्टमध्ये मनिषा कायंदे म्हणाल्या, "उपनगरीय लोकल रेल्वेने दररोज कामावर जाणाऱ्या महिलांची वाढणारी संख्या पाहता कामावर जाणाऱ्या गरोदर महिला व लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या स्तनदा माता यांना लोकल रेल्वेने प्रवास करताना प्रवेश करण्यापासून ते उतरेपर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो."

शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदार महिला मनिषा कायंदे

फोटो स्रोत, x/Dr.Manisha Kayande

फोटो कॅप्शन, शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदार महिला मनिषा कायंदे यांनीही गरोदर महिलांना लोकल ट्रेनमध्ये राखीव जागा उपलब्ध करून देण्यात मागणी केली आहे.

"जवळपास 10 वर्षांपूर्वी उपनगरीय रेल्वेच्या प्रवासी सल्लागार समितीवर महिलांची प्रतिनिधी म्हणून काम करताना रेल्वे प्रशासनाने माझ्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत गर्भवती महिलांना दिव्यांगांकरिता आरक्षित डब्ब्यातून प्रवास करण्याची मुभा दिली होती."

"मात्र अनेक वेळा दिव्यांगाकरिता राखीव डब्ब्यांमधून अनेक गंभीर आजारांचे रुग्ण देखील प्रवास करत असतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी असलेल्या गर्भवती महिलांना संसर्ग होण्याची शक्यता बळावते."

"त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गर्भवती व लहान बाळासह प्रवास करणाऱ्या स्थनदा महिलांकरिता महिलांच्याच डब्ब्यात काही जागा (किमान 10 ते 16 जागा) आरक्षित ठेवून तश्या सुचना त्या आसनांजवळ ठळकपणे लावणे आवश्यक आहे," असंही कायंदे यांनी नमूद केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)