'सुमारे सव्वाशे विद्यार्थिनींची गणवेश उतरवून तपासणी', शहापूरच्या शाळेत नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात एका नामांकित शाळेत विद्यार्थिनींचे शाळेत गणवेश उतरवून तपासणी केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याबाबत पालकांनी गटशिक्षणाधिकारी आणि पोलिसांकडे धाव घेतली.
शाळेत स्वच्छतागृहामध्ये रक्त सांडल्याचं आढळून आल्यानंतर सुमारे सव्वाशे विद्यार्थिनींची गणवेश काढून तपासणी केल्याचा प्रकार घडला आहे.
विद्यार्थिनींनी घरी येऊन हा प्रकार सांगितल्यानंतर संतापलेल्या पालकांनी शाळा आणि पोलीस ठाण्यात धाव घेतली.
त्यानंतर पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. तसंच मुख्याध्यापिकेसह एका महिला कर्मचाऱ्यास अटक केली.
या घटने संदर्भात शाळा प्रशासन आणि मुख्याध्यापक यांच्याबाबत त्यांची अधिकृत भूमिका काय ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी काहीही संपर्क होऊ शकलेला नाही.
या शाळेत नर्सरी ते दहावीपर्यंतच्या वर्गात सुमारे 600 विद्यार्थी शिक्षण घेतात.
नक्की प्रकरण काय?
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात ही इंग्रजी माध्यमातली शाळा आहे. या शाळेत 8 जुलैला हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जुलैला सकाळी 10 ते 12 च्या सुमारास मुख्यध्यापिकेनं शाळेतील साधारण सव्वाशे मुलींना शाळेच्या हॉलमध्ये एकत्रित बोलावलं.
त्यानंतर शाळेतील बाथरूमच्या भिंतीवर आणि बाथरुमच्या लादीवर असलेले रक्ताचे डाग असलेले फोटो प्राजेक्टरवर दाखवून मासिक पाळी आली आहे किंवा नाही? कोणी रक्त सांडलं याबाबत विचारणा करण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर ज्या मुलींना मासिक पाळी आली आहे. त्या मुलींच्या हाताचे ठसे घेण्यास काही शिक्षकांना सांगितलं.
तसंच ज्या मुलींना मासिक पाळी आली नाही त्यांना बाथरूममध्ये नेऊन त्यांचे कपडे काढून तपासणी करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना सांगितल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
या सर्व प्रकारामुळे विद्यार्थिनी भेदरल्या. काही मुलींनी हा प्रकार आपल्या घरी येऊन पालकांना सांगितला. काही विद्यार्थिनी तर या प्रकारानंतर बोलण्याच्या मनस्थितीतही नव्हत्या. तर काहींनी दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्यास नकार दिला, असं काही पालकांनी सांगितलं. काही विद्यार्थिनींच्या पालकांनी एकमेकांशी संपर्क साधला आणि माहिती घेतली.
शाळा सध्या बंद; शाळा प्रशासन नॉट रिचेबल
या घटने संदर्भात शाळा प्रशासन आणि मुख्याध्यापक यांच्याबाबत त्यांची अधिकृत भूमिका काय ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी काहीही संपर्क होऊ शकलेला नाही.
शाळेतील दूरध्वनी क्रमांकावर बीबीसीने संपर्क साधला असता, मुख्याध्यापक आणि इतरांवर कारवाई झाली असल्याचं सांगण्यात आलं. इतर काही माहिती देण्यात आली नाही.
शाळा सध्या बंद आहे, असंही दूरध्वनीवरून सांगण्यात आलं. इतर काही माहिती आणि भूमिका कळविण्यात आली, तर यात अपडेट करण्यात येईल.

फोटो स्रोत, Getty Images
कठोर कारवाईची मागणी
या घटनेबाबत या शाळेतील पीडित विद्यार्थिनींच्या पालकांशी आम्ही संवाद साधला. नाव न लिहिण्याच्या अटीवर त्यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "आमच्या मुलींना अक्षरशः खेचून खेचून हा प्रकार करण्यात आला. त्या खूप घाबरलेल्या आहेत. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे."
या घटनेबाबत इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या पालकांनी माहिती देताना म्हटलं, "हा असा वाईट प्रकार कोणत्याही विद्यार्थ्यांसोबत घडू नये. सध्या आमच्या सर्व मुली घाबरलेल्या आहेत. कोणत्याही मुलींना अशा प्रकारच्या घटनेचा त्रास होऊ नये. शाळेतच असा प्रकार घडत असेल, तर मुली सुरक्षित असतील का? शाळेत मुली असुरक्षित आहेत, असं आम्हाला वाटू लागलं आहे. त्यामुळे प्रशासनानं याची योग्य दखल घेत कारवाई करावी."
या घटनेसंदर्भात काही पालकांनी तत्काळ गटशिक्षण अधिकारी रामचंद्र विशे यांना भेटून या घटनेची माहिती दिली. तसंच मुख्याध्यापक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी केली.

फोटो स्रोत, Getty Images
गटशिक्षण अधिकारी विशे यांनी संस्थाचालकांशी आणि शाळेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
त्याच दरम्यान काही पालकांनी बुधवारी (9 जुलै) मुख्याध्यापिकांना जाब विचारण्यासाठी शाळेत धाव घेतली. काही पालकांनी आपला मोर्चा पोलीस ठाण्याकडे वळवला. शाळेवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी ठिय्या आंदोलन केलं.
30 ते 40 विद्यार्थिनींचे पालक शाळेत पोहोचल्यानंतर शाळेत एकच गोंधळ निर्माण झाला. पालक थेट मुख्याध्यापक आणि शिक्षकांना याप्रकरणी जाब विचारत होते. यावेळी शाळेमध्ये शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये काही काळ संघर्ष निर्माण झाला.
त्यावेळच्या व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये पालक मुख्याध्यापकांना जाब विचारताना दिसत आहेत. त्यावेळी मी असे कोणत्याही प्रकारचे आदेश दिले नव्हते, असा कोणताही प्रकार घडला नाही, असं मुख्याध्यापक बोलताना दिसत आहेत, असं पालकांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
या संदर्भात आठवीमध्ये शिकणाऱ्या एका पीडित मुलीच्या आईशी बीबीसी मराठीने संवाद साधला, तेव्हा त्यांनी सांगितलं, "हा प्रकार घडल्यानंतर आम्ही जाब विचारण्यासाठी शाळेत पोहोचलो. मात्र, शाळा प्रशासन आणि मुख्याध्यापिका हा घडलेला प्रकार घडलाच नाही, असं सांगत होते. मग इतक्या विद्यार्थिनी खोटं बोलत आहेत का? हा सवाल आम्ही त्यांना केला. त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं. त्यामुळे आम्ही पोलिसांकडे आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली."
पालकांचा संताप पाहून मुख्याध्यापिकांनी पोलिसांना पाचारण केले. घटने संदर्भात माहिती मिळताच तात्काळ पोलीस कर्मचारी आणि अधिकारी दाखल झाले. त्यामुळे शाळेला पोलीस छावणीचे स्वरूप आलं. पोलिसांनी पालकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत शहापूर पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील शाळेत धाव घेतली. या दरम्यानही पालकांनी मुख्याध्यापक आणि शिक्षक, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
मुलींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम
घडलेल्या घटनेमुळे विद्यार्थिनींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचं काही पालकांनी सांगितलं. तसंच अनेक मुली शाळेत जाण्यास घाबरत असल्याचीही पालकांची तक्रार आहे.
या पार्श्वभूमीवर शहापूर पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांनी यावेळी झाल्या प्रकाराबाबत वरिष्ठांकडे अहवाल पाठवणार असल्याचं आश्वासन पालकांना दिलं.
या सर्व गोंधळानंतर संस्थाचालकांशी बोलणं झालं असून मुख्याध्यापिकांना बडतर्फ करण्याबाबत पत्र पाठवीत असल्याचं पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांनी पालकांना सांगितलं. तसंच आरोप असलेल्या सर्व लोकांना ताब्यात घेऊन नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दोघांना अटक, अधिक तपास सुरू
याप्रकरणी पीडित विद्यार्थीनीच्या पालकांच्या तक्रारीवरून मुख्यध्यापिकेसह 5 शिक्षिका आणि शाळा प्रशासन व्यस्थापन समितीत असलेल्या दोन महिला आणि शिपाई अशा एकूण 8 जणांवर शहापूर पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोप असलेल्या सर्व लोकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती शहापूर पोलिसांनी दिली.
तसेच बीबीसी मराठीशी बोलताना उपअधीक्षक मिलिंद शिंदे म्हणाले, "याप्रकरणी आम्ही दोघांना अटक केलेली आहे. यामध्ये मुख्याध्यापिका आणि सफाई कर्मचारी महिला यांचा समावेश आहे. आज या दोन्ही आरोपींना कोर्टामध्ये हजर केले जाईल. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











