आपली 'गे' ओळख उघडपणे स्वीकारणाऱ्या इमामाची गोळ्या झाडून हत्या; मुहसिन हेन्ड्रिक्स कोण आहेत?

फोटो स्रोत, AFP
- Author, लेबो डिशेको
- Role, ग्लोबल रिलीजन करस्पॉन्डन्ट, बीबीसी वर्ल्ड सर्व्हीस
कदाचित मुहसिन हेन्ड्रिक्स यांच्या हे नियतीतच होतं की त्यांनी मशिदीचं प्रमुखपद स्वीकारावं.
हे तेच मुहसिन हेन्ड्रिक्स आहेत, ज्यांना शनिवारी दक्षिण आफ्रिकेमध्ये गोळ्या घालून ठार करण्यात आलंय.
स्वत: मुहसिन हेन्ड्रिक्स यांचे आजोबा इमाम होते. जेव्हा मुहसिन लहान होते तेव्हापासूनच मोठं होऊन इस्लामचा अभ्यास करण्याची इच्छा त्यांच्या मनात प्रबळ झाली होती.
मात्र, आपण भविष्यात आपल्या देशातील तसेच आफ्रिका खंडातील LGBTQ+ मुस्लिमांचा आवाज होऊ, हे मात्र त्यांना तेव्हा कधीही वाटलं नसावं.
ते तसे मृदूभाषी होते. मात्र, मी जेव्हा 2019 मध्ये त्यांच्याशी बोललो होतो तेव्हा त्यांच्या आवाजात मला एक विलक्षण करारीपणा जाणवला होता.
आपल्या लैंगिकतेसह आपण जे काही आहोत त्याच्याशी आपण प्रामाणिक असावे यावर त्यांचा विश्वास होता. कारण, लोकांना नाकारण्याऐवजी ते जसे आहेत, तसं त्यांना स्वीकारणं हाच खरं तर इस्लाम धर्म आहे, असं त्यांचं ठाम मत होतं.
त्यांची लैंगिक ओळख हीदेखील त्यांच्याच एकूण अस्तित्वाचा भाग होती, तर मग अल्लाह त्यांना का नाकारेल? असाही विचार त्यांनी माझ्यासमोर बोलून दाखवला होता.
त्यांची पीपल्स मशीद केवळ समलिंगी लोकांसाठी नाही, ही बाब मुहसिन हेन्ड्रिक्स माझ्याशी फोनवर बोलत असताना आग्रहाने सांगत होते.
त्याऐवजी, आपली मशीद सर्वांचं स्वागत करणारी आहे, असा त्यांचा विचार होता. अगदी या मशिदीमध्ये देहविक्रेय करणाऱ्या महिलांसारख्या वंचित घटकांचंही स्वागत आहे, असा त्यांचा विचार होता.


त्यांच्या मशिदीत महिला आणि पुरुष दोघेही प्रार्थना करायचे. अगदी काहीवेळा महिलाही शुक्रवारच्या प्रार्थनेचं नेतृत्व करायच्या.
इस्लामिक धर्मग्रंथ सर्वांना एकत्र राहण्यासाठीचा अवकाश उपलब्ध करुन देतो, असा त्यांचा दृढविश्वास होता.
जेव्हा आम्ही संवाद साधत होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की, काही स्थानिकांकडून विरोध सुरू झाल्यानतंर ते आपल्या मशिदीसाठी नवी जागा शोधत होते. ही मशीद सुरुवातीला त्यांच्या घरातच उभारण्यात आली होती.

फोटो स्रोत, AFP
त्यांनीच उल्लेख केल्याप्रमाणे, त्यांचा जन्म पुराणमतवादी मुस्लीम कुटुंबामध्ये झाला होता. मात्र, आपण इतर मुलांपेक्षा काहीसे वेगळे आहोत, याची जाणीव अगदी लहान वयातच मुहसिन हेन्ड्रिक्स यांना झालेली होती.
'त्यांच्यासारख्या' लोकांनी नरकात जावं, असं आपल्या आजोबांनी आपल्या उपदेशात म्हणताना त्यांनी ऐकलेलं होतं. 'द रॅडिकल' या 2022 साली प्रकाशित झालेल्या डॉक्युमेंटरीमध्ये त्यांनी या प्रसंगाचं वर्णन केलंय.
मात्र, सरतेशेवटी जे त्यांच्याकडून अपेक्षित होतं, तो मार्गही त्यांनी आजमावून पाहिला होता आणि तो म्हणजे परंपरेप्रमाणे एखाद्या महिलेशी लग्न करण्याचा. मात्र, त्यांचं हे लग्न सहा वर्षेच टिकलं. घटस्फोट होण्यापूर्वी या सहा वर्षांच्या वैवाहिक जीवनात त्यांना तीन मुले झाली.
आपली समलिंगी असल्याची लैंगिक ओळख खुलेपणाने स्वीकारल्यानंतर 1996 मध्ये त्यांनी इतर समलिंगी मुस्लिमांसाठी 'इनर सर्कल' नावाच्या एका छुप्या सपोर्ट ग्रुपची स्थापना केली.
त्यांच्या एका मित्राने धर्मग्रंथातील वचनावर आधारलेल्या प्रवचनामध्ये समलैंगिकतेचा निषेध करणारा उपदेश ऐकला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःचं समावेशक असं पूजास्थळ उभारण्याचा निर्णय घेतला.

फोटो स्रोत, Getty Images
वयाच्या 21 व्या वर्षी, मुहसिन हेन्ड्रिक्स इस्लामचा अभ्यास करण्यासाठी पाकिस्तानला गेले होते.
पाकिस्तानला जाऊन इस्लामचा अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यामागे एक प्रमुख आणि मोठं कारण अर्थातच होतं ते त्यांची लैंगिकता. जी गोष्ट आपल्या हातातच नाहीये, त्यासाठी अल्लाह आपल्याला का नाकारेल, हे त्यांना समजून घ्यायचं होतं.
नंतरच्या काळात त्यांनी आपली समलिंगी असण्याची ओळखही स्वीकारली आणि त्याची आपल्या धार्मिक विश्वासाशी सांगडही घातली. मात्र, त्यांच्या या नव्या दृष्टिकोनाशी सर्वजण सहमत नव्हते.
2022 मध्ये, साऊथ आफ्रिका मुस्लीम ज्यूडिशियल कौन्सिलने (MJC) असं म्हटलं की, जे मुस्लीम समलिंगी नातेसंबंधात आहेत, "त्यांनी स्वत:ला इस्लाम धर्माच्या कक्षेतून बाहेर झोकून दिलं आहे."
यावर एका लेखामधून प्रत्युत्तर देत मुहसिन हेन्ड्रिक्स यांनी असा युक्तिवाद केला होता की, शरियाचा (इस्लामी कायदा) उद्देश हा "मानवी जीवन, मानवी हक्क, मानवी प्रतिष्ठा आणि समाजाला आकारास आणणाऱ्या प्रत्येक घटकाचं संरक्षण करणं हा होता."

फोटो स्रोत, Getty Images
मुहसिन हेन्ड्रिक्स यांच्या हत्येवर प्रतिक्रिया देताना मुस्लीम ज्यूडिशियल कौन्सिलने असं म्हटलं आहे की, "आम्ही सातत्याने मुहसिन यांची भूमिका ही इस्लामिक शिकवणुकीला सुसंगत नसल्याचं अधोरेखित करत आलो आहोत. मात्र, त्यांची हत्या होण्याचा तसेच LGBTQ समुदायाला हिंसक पद्धतीने लक्ष्य करण्याचा आम्ही निःसंदिग्धपणे निषेध करतो."
पुढे कौन्सिलने असं म्हटलं आहे की, "एका लोकशाही आणि बहुलवादी समाजाचा घटक म्हणून मुस्लीम ज्युडिशियल कौन्सिल समाजातील वेगवेगळ्या विचारसरणींमध्येही शांततापूर्ण सहअस्तित्व आणि परस्पर आदरभाव असणं गरजेचं आहे, या मतावर ठाम आहे."
मुहसिन हेन्ड्रिक्स यांनी करुणा-केंद्रित इस्लामचा संदेश दिला असून आफ्रिका खंडातील समलिंगी मुस्लीमांसाठी ते नेहमीच एक अग्रेसर शिलेदार म्हणून ओळखले जातील.
ते कुणावर प्रेम करतात वा ते कोण आहेत, या सगळ्याच्या पल्याड जाऊन देव त्यांच्यावर नक्कीच प्रेम करतो, असा त्यांचा दृष्टीकोन होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











