कुराण जाळणारे सलवान मोमिका कोण होते? स्वीडनमध्ये त्यांची हत्या का करण्यात आली?

कुराण जाळणारे सलवान मोमिक कोण होते? स्वीडनमध्ये त्यांची हत्या का करण्यात आली?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सलवान मोमिका

दोन वर्षांपूर्वी स्वीडनमध्ये कुराण जाळणाऱ्या सलवान मोमिका यांची, बुधवारी (29 जानेवारी 2025) संध्याकाळी हत्या करण्यात आली.

38 वर्षांचे मोमिका स्टॉकहोमच्या जवळील सोदरताल्जेमधील एका घरात जखमी अवस्थेत सापडले.

स्टॉकहोम सेंट्रल मशिदीच्या बाहेर 2023 मध्ये मोमिक यांनी कुराणाची प्रत जाळली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी आंदोलनंही करण्यात आली होती.

मोमिका यांच्या हत्येच्या आरोपाखाली पाच लोकांना अटक केली असल्याचं स्टॉकहोम पोलिसांनी सांगितलं आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, टीकटॉकवर लाइव्ह व्हीडिओ करत असताना मोमिका यांच्यावर गोळी झाडली गेली.

स्टॉकहोमच्या एका न्यायालयात त्यांच्यावर कुराण जाळल्याच्या घटनेवर सुनावणी सुरू असतानाच मोमिका यांची हत्या करण्यात आली आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

स्वीडनच्या वेळेनुसार बुधवारी रात्री 11 वाजता पोलिसांना या भागात गोळीबार झाला असल्याची माहिती मिळाली.

सुरुवातीला मोमिका यांचं नाव पोलिसांनी जाहीर केलं नाही. गोळी लागल्याने एका माणसाला रुग्णालयात नेत असल्याचं त्यांनी सांगितलं. गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला.

गोळी लागली तेव्हा मोमिका त्यांच्या घराच्या बाल्कनीत उभे राहून सोशल मीडियावर लाइव्ह स्ट्रिमिंग करत होते.

गुरुवारी त्यांच्यावरील खटल्याची अंतिम सुनावणी होणार होती. मात्र, आरोपीचा मृत्यू झाल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलली असल्याचं न्यायालयाने सांगितलं.

स्वीडनच्या सुरक्षा विभागानं या प्रकरणाचा तपास सुरू केला असल्याची माहिती पंतप्रधान उल्फ क्रिसटेरसन यांनी दिली असल्याचं स्टॉकहोमच्या एसवीटी या वृत्तसंस्थेच्या बातमीत सांगितलं आहे.

या खुनाशी स्वीडनबाहेरच्या लोकांचा संबंध असल्याची शंका त्यांना आहे. मात्र खून कोणी केला ते आतापर्यंत स्पष्ट समजलेलं नाही.

मोमिका यांनी का जाळलं होतं कुराण?

2023 ला स्टॉकहोमच्या सेंट्रल मशिदीसमोर सलवान मोमिका यांनी स्वीडनचे दोन झेंडे फडकवले आणि देशाचं राष्ट्रगीत गायलं. त्यानंतर त्यांनी कुराणाची प्रत जाळली.

मोमिका आपण नास्तिक आणि लेखक असल्याचं सांगत 28 जून 2023 ला त्यांनी कुराणाची प्रत जाळली होती. तो बकरी ईदचा दिवस होता.

मोमिका यांनी ज्या विरोध प्रदर्शनात कुराण जाळलं, त्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली होती. कुराण जाळण्याची घटना स्वीडनमधल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कायद्यात बसणारी आहे.

त्यांच्या या कृत्याचे परिणाम स्वीडनच्या सीमेबाहेर इतर देशातच जास्त पाहायला मिळाले. जगभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. विशेषतः सौदी अरेबिया आणि इतर इस्लामिक देशांनीही नाराजी जाहीर केली.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

कुराण हे अल्लाहचेच शब्द असल्याची भावना मुस्लीम लोकांच्या मनात आहे. कुराणचा अपमान करणं किंवा त्यासोबत मुद्दाम छेडाछेड करणं हा गंभीर गुन्हा मानला जातो.

अशा घटना थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे लागू करण्याची आणि एकत्र येऊन पावलं उचलण्याची गरज असल्याचं 'ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशन' या मुस्लीम देशांच्या संघटनेनं, तेव्हा म्हटलं होतं.

स्वीडननेही या घटनेवर टीका करत याला, इस्लामोफोबिया म्हणजे मुस्लीम धर्माविरोधातला तीव्र द्वेष म्हटलं होतं.

सलवान मोमिक यांनी कुराण का जाळलं?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सलवान मोमिका

कुराण जाळल्याचं समोर आल्यानंतर अनेक ठिकाणी हिंसक दंगली उसळल्या. इराकची राजधानी बगदाद मध्येही स्वीडनच्या दुतावासावर हल्ला करण्यात आला.

पाकिस्तानात इस्लामाबाद, कराची आणि लाहोरमध्येही अनेक मोर्चे निघाले.

संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेसमोर या घटनेविरोधात मुस्लीम देशांनी तक्रार नोंदवली होती.

ही घटना द्वेषपूर्ण आणि धर्मांध असल्याचं सांगत संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेनंही त्याचा विरोध केला. भारतानंही विरोध केला होता.

सलवान मोमिका कोण होते?

38 वर्षांचे मोमिका इराकमधून येऊन स्वीडनमध्ये आश्रित म्हणून राहत होते. 2018 च्या एप्रिल महिन्यात ते स्वीडनला आले. त्यानंतर 2021 मध्ये त्यांना आश्रित असल्याचा दर्जा मिळाला.

मोमिका यांनी अनेकदा मुस्लीम विरोधी आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता. कुराण जाळल्यानंतर सुरू झालेला वाद इतका उफाळला की, बगदादमधल्या स्वीडन दुतावासाला बंद करावं लागलं.

एसवीटीच्या बातमीनुसार, गेल्यावर्षी जुलैमध्ये सलवान मोमिका यांनी घराचा परवाना एका वर्षासाठी वाढवला.

मोमिका यांना इराकला, त्यांच्या देशात, परत पाठवलं तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं स्थलांतर मंडळानं म्हटलं होतं.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात सलवान मोमिका नॉर्वेमध्ये गेले होते. एसवीटीने दिलेल्या माहितीनुसार, नॉर्वेमध्ये शरणार्थी म्हणून रहायचा त्यांचा विचार होता.

मात्र, नॉर्वे सरकारकडून त्यांची रवानगी पुन्हा स्वीडनला केली गेली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)