कुराण जाळल्याच्या घटनांनंतर धुमसतंय स्वीडन, तीन दिवसांपासून संघर्ष

फोटो स्रोत, Reuters
स्वीडनमध्ये जाणीवपूर्वक कुराण जाळण्याच्या घटनांवर सौदी अरेबियाने नाराजी व्यक्त केली आहे.
सोमवारी (18 एप्रिल) सकाळी सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत निवेदन जारी केलं आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, "पवित्र कुराण आणि मुस्लीम समुदायासोबत जाणीवपूर्वक केलेली गैरवर्तणूक आणि प्रवृत्त केल्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालय निषेध नोंदवत आहे. सौदी अरेबिया संवाद, सहिष्णूता आणि सह-अस्तित्त्वाच्या प्रयत्नांना महत्त्व देण्यावर विश्वास ठेवते. तसंच तिरस्कार, कट्टरतावाद, सर्व धर्म आणि पवित्र स्थळी गैरव्यवहार न करण्याचे समर्थन करते."
प्रकरण काय आहे?
स्वीडनमध्ये उजव्या विचारसरणीच्या गटांनी मुस्लिमांचा धर्मग्रंथ कुराण जाळल्यानंतर अनेक शहरांमध्ये चौथ्या दिवसानंतरही संघर्ष सुरू आहे.
स्थानिक माध्यमांनी सांगितलं की, नोरेशेपिंग शहरात रविवारी (17 एप्रिल) सतत दंगली सुरू होत्या. पोलिसांनी दंगलीत सहभागी असणाऱ्यांना चेतावणी दिली आणि त्यांच्यावर गोळया झाडल्या. यात तीन जण जखमी झाले.
अनेक वाहनं जाळण्यात आली. याप्रकरणी आतापर्यंत कमीतकमी 17 जणांना अटक केली आहे.

फोटो स्रोत, EPA
शनिवारी (16 एप्रिल) दक्षिणेकडील शहर मालमा येथे उजव्या विचारसरणीच्या गटांनी रॅलीदरम्यान झालेल्या हिंसक घटनांमध्ये अनेक वाहनं आणि बसला आग लावण्यात आली.
कुराण जाळल्यानंतर जी निदर्शनं झाली त्यानंतर इराण आणि इराक सरकारने तिथे उपस्थित असलेल्या आपल्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं.
कुराण जाळल्याने आंदोलन
हार्ड लाईन चळवळीचे प्रमुख आणि डेनिश-स्विडिश कट्टरवादी रसमुस पालूदान म्हणाले की, त्यांनी इस्लामचा सर्वात पवित्र ग्रंथ जाळला आहे आणि ते हे पुन्हा करतील.
उजव्या गटांनी जिथे जिथे कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे तिथे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी संघर्ष झाला. यात 16 पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. अनेक वाहनं उद्ध्वस्त झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. स्टॉकहोम येथील उपनगरं लिनशेपिंग आणि नोरेशेपिंगसारख्या शहरांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.

फोटो स्रोत, EPA
डॉएचे वैले यांनी रिपोर्ट केला आहे की, रविवारी (17 एप्रिल) पालूदान यांनी नोरेशेपिंग येथे आणखी एका रॅलीचा इशारा दिला होता. याचा विरोध करण्यासाठी लोक जमले होते.
रॅलीला हिंसक वळण लागल्याने चेतावणी देण्यासाठी पोलिसांनी गोळ्या झाडल्या आणि यात तीन जण जखमी झाले असं स्थानिक पोलिसांनी सांगितलं आहे.
'आधीही दंगली पाहिल्या पण हे काहीतरी वेगळं आहे'
स्वीडनचे राष्ट्रीय पोलीस प्रमुख एंडश टूनबेरी यांनी शनिवारी (16 एप्रिल) सांगितलं की, आंदोलनकर्त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवाचीही पर्वा केली नाही. "आम्ही यापूर्वीही हिंसक दंगली पाहिल्या पण हे काही वेगळंच आहे."

फोटो स्रोत, EPA/SWEDEN OUT
स्वीडनमध्ये हार्ड लाईन आंदोलनात कुराण जाळण्याच्या योजनांविरोधात अनेकवेळा आंदोलनकर्ते हिंसक बनले. 2020 मध्ये मालमा येथे आंदोलनकर्त्यांनी गाड्यांना आग लावली होती आणि अनेक दुकानांचं नुकसान केलं होतं.
डेन्मार्कमध्ये वंशवाद आणि इतर अनेक गुन्ह्यांसाठी पालूदान यांना 2020 मध्ये एक महिन्याचा तुरुंगवास झाला होता. त्यांनी फ्रांस आणि बेल्जियमसारथ्या युरोपिय देशांमध्ये अशाचप्रकारे कुराण जाळण्याचा प्रयत्न केला होता.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








