कठोर परिश्रम आणि समाजसेवा हाच उपासनेचा मार्ग मानणारा मुस्लीम समुदाय

मुस्लीम

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रुकिया ब्युल
    • Role, बीबीसी न्यूज कोमला डमोर पुरस्कार विजेती

सेनेगलमधील एम्बाके कॅडिओर गावात सायंकाळी पारंपारिक वेशात काही मुस्लीम बांधवांची लयबद्ध सुरात अल्लाहची उपासना सुरू आहे.

मशिदीच्या बाहेर वर्तुळ करुन एकत्र आलेले बाय फाल (Baye Fall) अनुयायी एक सुरात गात आहेत. त्यांच्या आवाजातील चढ-उतारही एकाच लयीत सुरू आहे.

अंगात रंगीबेरंगी कपडे आणि त्यांच्या मागच्या शेकोटीच्या ज्वाळांमुळे पडणाऱ्या त्यांच्या नाचणाऱ्या सावल्या.

'साम फॉल' ही पारंपारिक कृती करताना ते अक्षरशः घामाघूम झाले आहेत. घामामुळं त्यांचे चेहरे चमकत आहेत. त्यांची ड्रेडलॉक्स ही विशिष्ट केशरचनाही त्यांच्या हालचालीनुसार हलताना दिसते.

बाय फाल हा सेनेगलमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या मुरिद समुदायाचा - ब्रदरहूडचा उपगट आहे. हा समुदाय इतर मुस्लीम गटांपेक्षा जरासा वेगळा आहे.

'स्वर्गप्राप्ती नव्हे तर कठोर परिश्रम हे ध्येय'

सेनेगल हा पश्चिम आफ्रिकेतील मुस्लीम बहुल असलेला देश. तब्बल 17 मिलियन म्हणजेच 90 टक्के लोकसंख्या मुस्लीम समाजाची आहे. त्यात बाय फाल हा एका छोट्या गटाचे प्रतिनिधित्व करणारा समाज आहे.

त्यांचं राहणीमानच त्यांना ते इतरांपेक्षा वेगळे असल्याचं दाखवतं. त्यांच्या पद्धतीही मुस्लीम समाजाच्या इतर रुढी, परंपरांपेक्षा वेगळ्या आहेत.

सेनेगलमधला मुस्लीम समुदाय

फोटो स्रोत, Getty Images

बाय फाल अनुयायींसाठी इतर मुस्लिमांसारखं पाच वेळा नमाज पठण किंवा रमजानच्या महिन्यात रोजे करणं म्हणजेच अल्लाहची उपासना करणं नव्हे. त्याऐवजी कठोर परिश्रम आणि समाजसेवा हा त्यांच्या उपासनेचा मार्ग आहे.

स्वर्गप्राप्ती हे त्यांचे ध्येय नाही तर हार्डवर्क म्हणजेच कठोर परिश्रम हा त्यांच्यासाठी एक मोठा पुरस्कार आहे.

'बाय फाल' मुसलमानांबद्दल गैरसमज

इतर मुसलमानांना बाय फाल यांच्याबद्दल गैरसमज आहेत. पाश्चात्य देशांमध्ये असाही एक गैरसमज आहे की, बाय फाल समुदायातील लोक हे मद्यपान करतात आणि गांजा ओढतात. मुस्लीम धर्मात अशा गोष्टींना थारा नाही.

बाय फाल

फोटो स्रोत, Getty Images

एम्बाके कॅडिओरमधील बाय फाल समुदायाचे नेते माम सांबा बीबीसीशी बोलताना म्हणाले की, "बाय फाल समुदायाचे तत्त्वज्ञान हे आपल्या कामावर फोकस करणारं आहे. हे एक गूढ प्रकारचं काम आहे, जिथं स्वतः कष्ट करणं म्हणजे अल्लाहची उपासना करण्यासारखं आहे."

प्रत्येक कार्य, जसं तळपत्या उन्हात शेताची नांगरणी असो, शाळा बांधणे असो, किंवा विविध वस्तू तयार करणे असो, अशा गोष्टींना आध्यात्मिक महत्त्व असतं.

काम करणं हे केवळ एक कर्तव्य नाही; ते एक ध्यानात्मक कृत्य आहे, ती एक प्रकारची प्रार्थना आहे.

या समुदायाला विश्वास आहे की, एम्बाके कॅडिओर गावातच त्यांचे संस्थापक, इब्राहिमा फॉल हे पहिल्यांदा शेख अहमदू बांबा यांना भेटले होते.

शेख अहमदू बांबा यांनी 19व्या शतकात सूफी इस्लामची शाखा असलेल्या मुरिद ब्रदरहूडची स्थापना केली होती. सेनेगलमध्ये मुरिद ब्रदरहूडची भूमिका प्रभावशाली असते.

पॅचवर्क...बाय फालची वेगळी ओळख

असं म्हटलं जातं की, फॉल यांनी बांबांच्या सेवेत स्वतःला समर्पित केलं. त्यामुळं त्यांचं स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष झालं. जसं की, खाण्याकडे दुर्लक्ष, उपवास करणं, प्रार्थना करणं आणि स्वतःची काळजी घेण्यासारख्या गोष्टींचा यात समावेश होता.

त्याचे अनुयायी सांगतात की, कालांतराने त्याचे कपडे झिजले गेले, तिथं पॅच म्हणजे ठिगळ लावण्यात आले. हे ठिगळ त्यांच्या निरंतर, निःस्वार्थ समर्पणाचे प्रतीक ठरले. अशाप्रकारे बाय फालच्या तत्त्वज्ञानाची आणि पॅचवर्क कपड्यांची परंपरा सुरू झाली.

धार्मिक नेत्या प्रति असलेली अशी निष्ठाच आता त्यांचे अनुयायी पाळताना दिसतात - या संकल्पनेलाच "नडिगुएल" असं म्हणतात - अनेक बाय फाल आपल्या मुलांच्या नावांमध्येही या शब्दाचा समावेश करतात.

फॉलची मेहनत करण्याची मानसिकता एम्बाके कॅडिओरच्या कार्यशाळेत देखील दिसून येते. या कार्यशाळेत सुंदर पॅचवर्क असलेले कपडे तयार केले जातात.

बाय फाल समुदायातील लोक हे कपडे परिधान करत असतात. या कार्यशाळेत उपासकांची सर्जनशीलता दिसून येते.

कपड्यांच्या वर्कशॉपमधलं दृश्यं
फोटो कॅप्शन, एम्बाके कॉडिओर यांच्या कारखान्यांमध्ये लोक कपड्यांना पॅचवर्क करणं, मोरिंगा पावडरसारख्या कृषी उत्पादनांच्या पॅकिंगचं काम करतात.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कार्यशाळेत सहभागी झालेल्या महिलाही शांतपणे काम करतात, साध्या कापडांना गडद रंगात बुडवतात. विविध रंगात बुडालेले त्यांच्या कपड्याचे रुपांतर नंतर आकर्षक वस्त्रांमध्ये होते.

एम्बाके कॅडिओर येथे कार्यशाळा आयोजित केले जाते. तिथं लोकं पॅचवर्क कपडे तयार करतात, इतर कृषी उत्पादनांची पॅकिंग करणं, जसं की मोरिंगा पावडर आदी.

पुरुष देखील तितकंच बारकाईनं कामं करतात. ते रंगवलेली कापडं घेतात आणि तितक्याच कुशलतेने ते शिवतात. यातूनच बाय फालची वेगळी ओळख दिसून येते.

कठोर श्रम आणि कलात्मकतेचं प्रतिबिंब या कपड्यांमध्ये दिसतं. हे तयार कपडे नंतर सेनेगलमधील बाजारपेठांमध्ये जातात. या सर्व प्रक्रियेत बाय फाल समुदायाचे तत्त्वज्ञान दिसते.

"बाय फाल शैली अनोखी आहे," असं सांबा यांनी स्पष्ट केलं. सांबा यांचे वडील एक प्रतिष्ठित बाय फाल शेख होते. सेनेगलमध्ये धार्मिक नेत्यांना मराबाउट म्हणून ओळखलं जातं.

"पॅचवर्क कपडे सर्वव्यापकतेचं प्रतीक आहेत - तुम्ही मुस्लीम असूनही तुमची संस्कृती जपू शकता. पण सर्वांना हे समजत नाही. आम्ही नेहमी म्हणतो, तुम्हाला टीका सहन करता आली नाही, तर तुम्ही कधीच प्रगती करू शकणार नाही."

रोजे, नमाज ऐवजी कठोर श्रम हीच उपासना

रमजानच्या महिन्यात जेव्हा इतर मुसलमान दिवसभर कडक उपवास करत असतात. त्यावेळी बाय फाल त्यांच्या इफ्तारीसाठी स्वयंपाक तयार करण्यात व्यग्र असतात. रमजानमध्ये मशिदीत रोजा सोडतात.

हे समर्पण किंवा एकनिष्ठता फक्त शारीरिक कामांपुरतीच मर्यादित नसते.

बाय फाल हे सामाजिक कार्यातही पुढे असतात. त्यांनी ग्रामीण सेनेगलच्या शाश्वत विकासासाठी मोठं काम केलं आहे.

सहकारी संस्था, सामाजिक व्यवसाय आणि स्वयंसेवी संघटनांची स्थापना केली आहे. त्यांच्यासाठी, काम हे फक्त जीवन जगण्याचं एक साधन नाही, तर ते अध्यात्मातून व्यक्त होतात.

"आमच्याकडे शाळा आहेत, आरोग्य केंद्रं आहेत त्याचबरोबर सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही कामाची गरज निर्माण करतो," असंही सांबा यांनी स्पष्ट केलं.

सांबा म्हणाले, "आमचे जीवन तत्त्वज्ञान आदर, प्रेम आणि निसर्गावर अवलंबून आहे. इकॉलॉजी हे आमच्या शाश्वत विकास मॉडेलचे केंद्र आहे."

परंतु, रस्त्यावर पैसे मागण्याच्या या समुदायाच्या कृतीवर मोठ्या प्रमाणावर टीका केली जाते.

बाय फाल हे तुबा शहरातील ग्रँड मशीदची देखरेख करतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बाय फाल हे तुबा शहरातील ग्रँड मशीदची देखरेख करतात.

पैसे मागणं हे बाय फालच्या श्रद्धेविरोधात नाही. परंपरेनुसार हे पैसे समुदायातील प्रमुखाकडे दिले जातात. नंतर त्या पैशांचे आपल्या समाजाच्या भल्यासाठी पुनर्वाटप केले जाते.

"खरे बाय फाल आणि ज्याला आपण 'बे फॉक्स' म्हणतो ते खोटे बाय फाल," असे बांबे शहरातील अल्युन डायप विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि मुरिद ब्रदरहुडचे तज्ज्ञ चेख सेने यांनी बीबीसीला सांगतिलं.

राजधानी डाकारसारख्या शहरी केंद्रांमध्ये "बे फॉक्स"ची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे.

"हे असे लोक आहेत, जे आमच्यासारखे कपडे घालतात आणि रस्त्यांवर पैसे मागतात. पण समाजासाठी ते काहीच योगदान देत नाहीत. हा एक गंभीर प्रश्न आहे ज्यामुळे आमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतो," असे सेन यांनी म्हटले.

बाय फालच्या अनुयायांमध्ये होतेय वाढ

बाय फालचा कठोर परिश्रम आणि आपल्या समाजाच्या विकासावर भर या तत्वज्ञानाने सेनेगलच्या सीमा देखील पार केल्या आहेत.

बाय फालच्या अनुयायांमध्ये केटन सॉयर स्कॅनलॉन नावाची एक अमेरिकन महिला आहे. ती 2019 मध्ये या समुदायाच्या लोकांना भेटल्यानंतर त्याच्यात सामील झाली. तिला त्यानंतर 'फातिमा बटुली बह' हे सेनेगाली नाव दिलं गेलं. मराबाउटशी झालेली पहिली भेट आपलं आयुष्य बदलवणारी ठरल्याचे ती मानते.

सेनेगल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बाय फाल पंथीयांची मशीद (तुबा)

"जेव्हा मी त्यांना भेटले त्यावेळी त्यांच्या शरीरातून तेजप्रकाश निघतोय असं मला वाटलं," असं ती बीबीसीला सांगत होती.

ती म्हणाली, "माझ्या मनानं एक सत्य ओळखलं. हा माझ्यासाठी आध्यात्मिक जागरूकतेचा एक महत्त्वाचा क्षण होता."

फातिमा बह आता बाय फाल समुदायासोबत राहते. त्यांच्या विविध प्रकल्पांमध्ये भाग घेते आणि लोकांची सेवा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आदरही करते.

या समुदायाचे अनुकरण करणाऱ्यांची संख्या जगभरात हळूहळू वाढत आहे. या अशा अनोख्या आणि छोट्या समुदायाची ती एक भाग झाली आहे.

सेनेगली समाजात बाय फाल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या विविध कृषी उपक्रमात सहभागी होत अर्थव्यवस्थेसाठी आज ते महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.

दरवर्षी ते मुरिद समुदायाच्या नेत्याला, ज्याला 'कलीफ' किंवा 'ग्रँड मराबू' म्हणून ओळखलं जातं, त्याला आपली निष्ठा दाखविण्यासाठी पैसे, जनावरं आणि पिकांचे दान करून आपली वचनबद्धता दाखवून देतात.

सुमारे 700000 लोक बाय फाल चळवळीशी संबंधित आहेत, ज्यात तरुण सदस्यांची वाढती संख्या आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुमारे 7,00,000 लोक बाय फाल चळवळीशी संबंधित आहेत, ज्यात तरुण सदस्यांची वाढती संख्या आहे.

ते सेनेगलमधील पवित्र शहर तुबामधील ग्रँड मशीदची देखभाल करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ही मशीद मौरीदीझमचे केंद्र आहे. या मशिदीच्या देखभालीचे काम त्यांच्याकडे आहे.

तुबामधील ग्रँड मशीदमध्ये होणाऱ्या मोठ्या कार्यक्रमांदरम्यान अनौपचारिक सुरक्षा रक्षक म्हणूनही ते सेवा बजावतात.

उदाहरणार्थ, धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांनी योग्य कपडे घातले आहेत की नाही ते पाहणं, मशीद परिसरात अंमली पदार्थाची विक्री केली जात नाही आणि कालिफचा अपमान होणार नाही याची काळजी घेणं.

"बाय फालने नेहमीच कालिफ आणि शहराच्या सुरक्षेची हमी दिली आहे," असे सेन म्हणतात. "जेव्हा बाय फाल आजूबाजूला असतात, तेव्हा कोणीही गैरवर्तणूक करण्याचे धाडस करत नाही."

काही लोकांची नाराजी असूनही, बाय फालचा सेनेगलच्या सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रावरील प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. तरीही त्यांना पारंपारिकता आणि आधुनिकतेचा समतोल राखण्यात आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

मर्यादित साधने बाय फालच्या महत्त्वकांक्षी योजनांना अडचणी निर्माण करतात.

तरीही त्यांची दृष्टी स्पष्ट आहे: शाश्वत विकास आणि सेनेगलमधील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी मदत करणं.

युरोपला जाण्यासाठी धोकादायक समुद्री मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो स्थलांतरितांपैकी अनेक जण सेनेगलमधील असतात.

"यावर आम्हाला आणखी काम करायचं आहे," असे सांबा म्हणतात.

"सेनेगलमधील तरुणांना रोजगाराची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी आम्हाला अधिक रोजगार निर्माण करायचा आहे."

"आम्हाला सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याची गरज आहे. भविष्यासाठी ही आमची आशा आहे."

त्यांच्यासाठी, कठोर परिश्रम हे देशाच्या आर्थिक आणि आध्यात्मिक गरजांचं उत्तर आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)