युरोपपासून चीनपर्यंत अनेक देशांमध्ये वीज संकट, या 7 उपायांची होतेय अंमलबजावणी

उर्जा संकट

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, स्टेफनी हेगार्टी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

जर्मनीला गेल्या काही महिन्यात उष्णतेची लाट, दुष्काळ, कोरोना व्हायरसची साथ अशा गोष्टींचा सामना करावा लागला. त्यात रशिया-युक्रेन युद्धामुळे युरोपला होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा आटला.

त्यामुळे त्यांनी ऊर्जावापर नियंत्रित करण्यासाठी काही ठोस पावलं उचलायचं ठरवलं आहे.

पण उर्जेचं संकट, वीज, नैसर्गिक वायू, खनिज तेल यांच्या वाढत्या किंमती हा काही फक्त जर्मनीपुढे असलेला प्रश्न नाहीये तर संपूर्ण जगच त्याचा सामना करतंय.

पण या संकटावर मात करण्यासाठी जगातल्या काही देशांनी हे सात सोपे उपाय शोधून काढले आहेत.

1. एअर कंडशिनिंग आणि हिंटिंगचा वापर कमी करायचा

रशिया-युक्रेन युद्धापासून रशियाने युरोपला आपल्याकडून होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा कमी केला आहे. त्यामुळे युरोपातल्या अनेक देशांना उर्जासंकटाचा सामना करावा लागतोय.

युरोपात थंडीच्या दिवसात इमारती आणि घरं उबदार ठेवणारे रेडिएटर्स असतात तर उन्हाळ्यात एअर कंडिशनरचा वापर होतो. त्यामुळे या दोन्ही ऋतूंमध्ये बाहेर काहीही तापमान असलं तरी आत आल्हाददायक वातावरण असतं.

पण रेडिएटरने आतलं तापमान वाढवणं असो किंवा एअर कंडिशनरने कमी करणं असो दोन्ही गोष्टीसाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च होते.

ऊर्जेचा हा वापर नियंत्रित करण्यासाठी जर्मनी, फ्रान्स आणि स्पेनने सार्वजनिक इमारतींमध्ये हिवाळ्यात जास्तीत जास्त 19 अंश सेल्सिअस इतकंच तापमान असावं, त्यापेक्षा जास्त असू नये असा नियम केला आहे.

तर फ्रान्स आणि स्पेनने उन्हाळ्यातही इमारतींच्या आतलं तापमान 26 आणि 27 अंशापेक्षा थंड करू नये असा नियम केला आहे.

फ्रान्समध्ये एसी असणाऱ्या दुकानांनी आपली दारं सतत बंद ठेवावीत, असा नियम काढला आहे. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना 750 डॉलर्सचा दंड होणार आहे.

फ्रान्सच्या एका दुकानाच्या दारावरची पाटी ज्यात लिहिलं आहे की जोरात ढकला, आत एसी चालू आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फ्रान्सच्या एका दुकानाच्या दारावरची पाटी ज्यात लिहिलं आहे की जोरात ढकला, आत एसी चालू आहे.

आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचं म्हणणं आहे की, "साध्या गोष्टी, उदाहरणार्थ हिवाळ्यात कृत्रिमरित्या घरातलं तापमान खूप वाढवण्याऐवजी, काही डिग्रीने कमी केलं तर संपूर्ण हिवाळ्यात नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईनव्दारे संपूर्ण युरोपला जितका नैसर्गिक वायू लागतो, तो सगळा वाचेल."

2. लाईट बंद करणं

जर्मनीने म्हटलं सार्वजनिक इमारती आणि प्रेक्षणीय स्थळं रात्री दिव्याने झगमगणार नाहीत. स्पेनने म्हटलंय की दुकानांना रात्री 10 नंतर त्यांच्या डिस्प्लेवरचे मोठे लाईट बंद करावे लागतील.

फ्रान्सला वाटतं की अशा उपाययोजना करून ते एकूण ऊर्जा वापराच्या 10 टक्के बचत करू शकतात. आपल्या उर्जेच्या गरजेसाठी फ्रान्स रशियावर जर्मनीइतका अवलंबून नाही. त्यांच्या देशाच्या एकूण गरजेच्या 42 टक्के ऊर्जा आण्विक प्रकल्पातून तयार होते.

पण तिथे असलेला दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेमुळे आण्विक प्रकल्पातली संयंत्र थंड होण्यासाठी अडचण येतेय त्यामुळे ऊर्जानिर्मितीत अडथळा येतोय.

3. ये रे ये रे पावसा

चीनमध्ये भलतंच ऊर्जासंकट आलेलं आहे. रशियाने चीनला होणारा नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाचा साठा जरी थांबवला नसला तरी चीन सध्या तीव्र उष्णतेची लाट आणि दुष्काळाला सामोरं जातोय. यामुळे तिथल्या नद्या आटल्यात आणि याचा तिथल्या जलविद्यूत प्रकल्पांवर परिणाम झालाय.

सिंचूआन प्रांतात 80 टक्के वीज जलविद्यूत प्रकल्पांमधून येते. तिथे सरकारला ऊर्जा संकटाला तोंड देण्यासाठी सलग 6 दिवस कारखाने बंद ठेवावे लागले तर दुकानं आणि कार्यालयांना त्यांचे दिवे आणि एसी बंद ठेवावे लागले.

सिंचूआनच्या शेजारच्या राज्यांमध्येही अशाच प्रकारची पावलं उचलावी लागत आहेत.

चीनमध्ये यंदा भयानक दुष्काळ पडल्याने नद्या आटल्या आहेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चीनमध्ये यंदा भयानक दुष्काळ पडल्याने नद्या आटल्या आहेत.

चीनच्या कृषी मंत्र्यांनी म्हटलंय की या संकटाला तोंड देण्यासाठी आता कृत्रिमरित्या पाऊस पाडण्याचे प्रयोग केले जातील. फक्त हे प्रयोग कुठे होतील हे त्यांनी अजून सांगितलेलं नाही.

4. कमी काम करा

ही शक्कल लढवली आहे पाकिस्तानने. जून महिन्यात या देशाने जाहीर केलं की ते सरकारी कार्यालयांचे कामाचे दिवस आठवड्याला सहावरून पाचवर आणतील. याच्या काही महिन्यांपूर्वी सरकारी कामाचा आठवडा कार्यक्षमता वाढवण्यासाठी सहा दिवसांचा केला होता.

काही आठवड्यांनी पाकिस्तानात काही ठिकाणी पारा 50 अंशांवर जाऊन पोहोचला होता. जगभरात ऊर्जेच्या वाढत्या किंमतीमुळे आता इथे चिंतेचं वातावरण तयार झालं आहे. सरकारी कर्मचारी शुक्रवारी घरून काम करू शकतात का याची चाचपणी आता सध्या पाकिस्तान सरकार करतंय.

5. शाळेला सुट्टी

बांगलादेशमध्ये उर्जाबचतीसाठी शाळांना आता आठवड्यातून दोन दिवस सुट्टी असेल. शुक्रवारी शाळांना सुट्टी असायची, आता त्याबरोबरीने शनिवारीही सुट्टी असेल.

सरकारी कार्यालयांच्या कामाची वेळ एका तासाने कमी केली आहे.

बांगलादेश द्रवरूपातला नैसर्गिक वायू आयात करतो. अशा प्रकारचा वायू सर्वांत महाग ऊर्जास्रोतांमध्ये मोडतो. यासाठी बांगलादेशला श्रीमंत असणाऱ्या युरोपियन देशांशी स्पर्धा करावी लागते.

6. आण्विक ऊर्जा

ऊर्जास्रोतांच्या सतत वाढणाऱ्या किंमतींमुळे काही ठिकाणी आता लोक पारंपरिक ऊर्जास्रोतांकडे वळत आहेत. यावर्षी जून महिन्यात भारताने सर्वाधिक कोळसा आयात केला. तरीही सरकारने आधी म्हटलं होतं की आपण कोळशाची आयात कमी करणार आहोत आणि कोळशावर असणारं अवलंबित्व कमी करणार आहे.

आता काही देश इतर ऊर्जास्रोतांच्या शोधात आहेत. फुकुशिमाला झालेल्या आण्विक अपघातानंतर 11 वर्षांनी आता जपान नवीन आण्विक ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतोय.

7. लख्ख सूर्यप्रकाश

सध्या असणारं ऊर्जासंकट हे निरंतर ऊर्जास्रोतांसाठी एक इष्टापत्ती ठरेल. फ्रान्स त्यांच्या पवनचक्की ऊर्जा प्रकल्पाची क्षमता वाढवण्याचा विचार करतंय.

चीनमध्ये आता सौरऊर्जेला प्रोत्साहन दिलं जातंय

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चीनमध्ये आता सौरऊर्जेला प्रोत्साहन दिलं जातंय.

तर दक्षिण आफ्रिका आणि चीनसारखे देश कंपन्या आणि सर्वसामान्य नागरिकांना सौर ऊर्जेत गुंतवणूक करण्यासाठी, आपल्या घरांच्या छतांवर सोलर पॅनल बसवण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)