'तीन वर्षांपासून आम्हाला घरी स्वयंपाकसाठी सिलेंडर वापरावा लागला नाही’

प्रियदर्शन सहस्रबुद्धे, बायोगॅस, स्वयंपाक, कचरा, अपारंपरिक ऊर्जा
फोटो कॅप्शन, प्रियदर्शन सहस्रबुद्धे
    • Author, मानसी देशपांडे
    • Role, बीबीसी मराठीसाठी, पुण्याहून

स्वयंपाकघरातल्या ओट्यावर दररोज तयार होणाऱ्या या कचऱ्याचं करायचं काय, हा प्रश्न सगळ्यांसमोरच असतो. पण हाच कचरा जर घरातल्या घरातच जिरवून बायोगॅसच्या रुपानं परत आपल्याला स्वयंपाकासाठी वापरता आला तर?

पुण्यातला तरुण उद्योजक प्रियदर्शन सहस्त्रबुद्धेने ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

आयआयटी बॉम्बेमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या प्रियदर्शनने घरातून तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याचं बायोगॅसमध्ये रुपांतर करण्यासाठी जीसिस्टीम तयार केली, त्याला त्याने 'वायू' असं नाव दिलयं.

2019 पासून त्याचं स्वारगेट जवळच हे घर आता सिलेंडर मुक्त झालंय. अनेक प्रयोगांनंतर घरातल्या घरातच कचरा जिरवून त्यावरुन इंधन निर्मितीच्या प्रयत्नांना यश आलं.

"बायोगॅस हा विषय आपल्या देशात 50-60 वर्षांपासून आहे. शहरी भागात तो आपल्याला वापरता यावा यासाठी ज्या काही सुधारणा कराव्या लागल्या त्या मी माझ्या कामात केल्या आहेत. मी स्वतः आधीपासून ते यंत्र वापरत होतो. त्यामुळे त्यातील अडचणी सोडवण्यासाठी त्यात सुधारणा करायला सुरुवात केली.

एका टप्प्यावर ते सोपं झालंय हे लक्षात आल्यावर ते इतरांनाही वापरायला मी सांगायला लागलो. आताच्या टप्प्यावर आम्ही जे सुधार केले आहेत, त्यामध्ये घरातला ओला कचराजसाच्या तसा त्यात टाकता येतो," असं प्रियदर्शनने सांगितलं.

कचऱ्यापासून बायोगॅस कसा तयार होतो?

एका मोठ्या डब्यामध्ये ज्याला 'डायजेस्टर' म्हटलं जातं, घरातला ओला कचरा टाकला जातो. यामध्ये भाज्या, उरलेलं अन्न, फळांची सालं हे सगळे घटक टाकता येतात. हिरवी झाडांची पानंही यात टाकली जातात.

डायजेस्टरमधले सुक्ष्म जीव त्याचे विघटनही करतात आणि त्यातून 3 आऊटपूट मिळतात. पहिलं स्वयंपाकाचा गॅस तयार होतो. दुसरं द्रव्य रुपातलं जैविक खत मिळतं.

ते बागेत किंवा शेतात वापरु शकतो. तिसरं आऊटपूट म्हणजे अन्नातला चोथा हा 6 महिन्यांमधून एकदा बाहेर काढला जातो आणि तो सुद्धा खत म्हणून वापरला जातो. यातून जो गॅस निर्माण होतो तो एका फुग्यात गोळा केला जातो. यातून आपल्याला कळतं की किती गॅस तयार झाला आहे.

प्रियदर्शन सहस्रबुद्धे, बायोगॅस, स्वयंपाक, कचरा, अपारंपरिक ऊर्जा
फोटो कॅप्शन, बायोगॅस

गॅस भरायला लागला की तो फुगा फुगतो. गॅस वापरायला सुरुवात केली की तो खाली येतो.

एका कुटूंबाची गॅसची पूर्ण गरज भागवण्यासाठी दररोज 8-10 किलो ओला कचरा लागतो. ज्या घरांमध्ये कमी कचरा तयार होतो किंवा ज्यांची गरज जास्त आहे तिथे या बायोगॅसच्या वापरासोबत सिलेंडरचाही वापर करावाच लागतो. तज्ज्ञांच्या मते बायोगॅस पूर्णपणे नैसर्गिक वायूवरचं अवलंबित्व कमी जरी करु शकलं नाही तरीही या दोन पद्धती परस्परपूरक म्हणून बघायला हव्यात.

हा पर्याय सर्वांना शक्य आहे?

प्रियदर्शनने तयार केलेले हे युनिट्स बसवण्याचा खर्च हा त्याच्या आकारानुसार बदलतो. 75 हजार ते एक लाखापर्यंत हा खर्च येऊ शकतो. सर्वसाधारणपणे दरदरोज 8-10 किलो कचरा जिरवल्यास एका कुटूंबाची पुर्ण गरज भागेल इतका गॅस तयार होऊ शकतो. एका घरात एवढा कचरा दररोज तयार होणं शक्य नाही. त्यासाठी स्थानिक सफाई कर्मचाऱ्यांची मदत घेता येऊ शकते असं प्रियदर्शनचं म्हणणं आहे. सफाई कर्मचाऱ्यांशी संलग्न होऊन जास्तीचा कचरा मिळवता येईल अशी व्यवस्था प्रियदर्शन आणि त्याचे सहकारी तयार करत आहेत. त्याचं घरी सिलेंडर मुक्त करण्यासाठी लागणारा जास्तीचा कचरा तो सफाई कर्मचाऱ्यांकडून घेतो आहे.

इंधनाचा पर्यायी मार्ग शोधणं गरजेचं बनलं आहे. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्माण करताना काही मर्यादा येतात. याने रोज लागणाऱ्या सिलेंडरची गरज पूर्णपणे जरी भागवली जाऊ शकत नसली तरीही हे दोन इंधनाचे प्रकार हे परस्परपूरक आहेत असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

प्रियदर्शन सहस्रबुद्धे, बायोगॅस, स्वयंपाक, कचरा, अपारंपरिक ऊर्जा
फोटो कॅप्शन, यंत्रणा

" गॅस सिलेंडरच्या वापराचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या बायोगॅसने सिलेंडरपासून पुर्णपणे मुक्ती मिळणार नाही. पण या दोन्ही गोष्टी एकमेकांना पुरक ठरु शकतात. यामुळे व्यवस्थित नियोजन पण होऊ शकतं आणि इंधन पण मिळू शकतो. कचऱ्यामध्ये ऊर्जा किती आहे हे महत्त्वाचं ठरतं. त्याला 'कॅलोरिफीक व्हॅल्यू' असं म्हणतात.

कचऱ्याचे खूप वेगवेगळे प्रकार असतात. तुम्ही घरचा वापरताय, की कुठल्या डेअरीचा कचरा वापरताय की उद्योगामधून तयार होणार कचरा वापरताय हे पाहणं गरजेचं ठरतं. कचऱ्यात पाण्याचा अंश किती आणि ऊर्जेचा अंश किती हे पाहणं गरजेचं ठरतं," असं प्रयास एनर्जीमध्ये रिसर्च फेलो असलेले अश्विन गंभीर यांनी सांगितलं.

शहरांसाठी ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मीतीचा पर्याय हा अनेक प्रश्न सोडवणारा असला तरिही तो वैयक्तिक पातळीवर प्रत्येक घरामध्ये करणं शक्य होईलच असं नाही.

"प्रत्येक घरामध्ये एवढी जागा नसते आणि तेवढा कचरा पण नसतो. कचरा विघटनासाठी जिवाणूंची गरज असते. या सिस्टिमकडे लक्ष द्यावं लागतं आणि तेवढीच काळजीही घ्यावी लागते. कचऱ्याचं व्यवस्थितपणे वर्गीकरणही करावं लागतं. धरसोडपणा उपयोगाचा नसतो. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर खूप कमी लोकं हे करु शकतात. याचं नियोजन आणि त्यासाठी द्यायचा वेळ हे प्रत्येकाला जमेलच असं नाही. त्यामुळे हे जर सार्वजनिक रित्या झालं तर ते जास्त सुसह्य होतं आणि चालवायला सोयीस्कर ठरतं. पण ज्यांना वैयक्तिक पातळीवर हे बसवणं शक्य आहे त्यांनी जरुर बसवावा," असंही अश्विन गंभीर म्हणाले.

प्रियदर्शन सहस्रबुद्धे, बायोगॅस, स्वयंपाक, कचरा, अपारंपरिक ऊर्जा
फोटो कॅप्शन, टाकाऊतून टिकाऊ

प्रियदर्शनच्या ही सिस्टिम जवळपास 300 ठिकाणी बसवली गेली आहे. पुण्याच्या सहकारनगरमध्ये राहणाऱ्या आणि घरात पोळी भाजी केंद्र चालवणाऱ्या मेधा भावे यांनीही त्यांच्या गच्चीवर हा छोटा बायोगॅस बसवून घेतला आहे.

"माझ्यासमोर कचऱ्याची विल्हवाट हा मोठा प्रश्न होता. तो आत सुटला आहे. बायोगॅसवर आम्ही सकाळचा चहा,नाश्ता, एका भाजी एवढं सगळं करतो. दुसऱ्या एका शेगडीवर सिलेंडर कनेक्शन आहे. कचऱ्यापासून गॅस तयार होत असल्याने त्या सिलेंडरचा वापर कमी झालाय," असं मेधा भावे यांनी सांगिलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)