वीज संकट: भारत कोळशाविना का राहू शकत नाही?

Climate Change : भारत कोळशाविना का राहू शकत नाही?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोळसा कामगार
    • Author, रजनी वैद्यनाथन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, दक्षिण आशिया

सर्वाधिक कोळसा उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कोळशासाठीचं खोदकाम कमी करण्याचं आवाहन जगातील अनेक मोठे देश करत आहेत. मात्र, वेगानं विकसित होणाऱ्या भारतासाठी आपलं महत्त्वाचा ऊर्जा स्रोतच गमावणं किती कठीण गोष्ट आहे?

2006 साली शौनक नामक एका तरुण उद्योजकाशी माझी चर्चा झाली होती. ते म्हणाले होते की, "कार्बन उत्सर्जन कमी करण्यास केवळ भारताला का सांगितलं जातंय? पाश्चिमात्य देश अनेक दशकांपासून प्रदूषण करत आहेत आणि त्यातून नफाही कमावला आहे."

शौनक मुंबईतल्या एका चपलांच्या फॅक्टरीचे मालक होते. हवेत प्रदूषणाचं प्रमाण वाढत असल्याचं सुद्धा शौनक यांनी स्वीकारलं होतं.

ते पुढे म्हणाले होते की, "मी या चपला ब्रिटन आणि अमेरिकेत निर्यात करतो. मग हे असं आहे की, पाश्चिमात्य देश तिथलं उत्सर्जन विकसनशील देशात पाठवत आहेत. मग आपण का थांबलं पाहिजे?"

कोळसा, हवामान बदल, वातावरण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोळसा खाण

तेव्हापासून आतापर्यंत बराच बदल झालाय. जगभरात कार्बन उत्सर्जन वेगानं वाढतंय आणि भारताची लोकसंख्या, अर्थव्यवस्थाही वेगानं वाढतेय.

पाश्चिमात्य देश सातत्यानं भारताला आपलं कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा आग्रह करत आहेत आणि त्यातही त्यांचा रोख कोळशावर आहे. भारतातील एकूण ऊर्जा उत्पादनांमध्ये 70 टक्के कोळसाआधारीत उत्पादन आहे.

स्थानिकांसाठी कोळसा 'लाईफलाईन'

ओडिशाच्या तालचेर जिल्ह्यातील खाणीबाहेर आता सूर्योदय होणार आहे आणि ट्रकमध्ये कोळसा भरलेला आहे. तोच आसमंतात आवाज घुमवत ट्रेन तिथं दाखल होते, जी देशभर कोळसा पोहोचवते.

चमकत्या गुलाबी साड्या परिधान केलेल्या महिलांचा एक गट हातानं कोळसा गोळा करतो आणि डोक्यावरील टोपलीत तो कोळसा टाकतो. तर पुरुष सायकलींवर कोळशाचं ओझं सांभाळून नेताना दिसतात.

कोळसा, हवामान बदल, वातावरण

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, कोळसा वाहतूक

ब्रुकिंग्ज इन्स्टिट्यूटच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, भारतात कोळसा उद्योगात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या 40 लाख लोक जोडले गेलेत. झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांमध्ये कोळसा उत्पादन जास्त होतं.

या भागातील कोळासा अर्थव्यवस्थेचा आधार आहे. स्थानिक लोकांची लाईफलाईन आहे.

ओडिशातील कोळसा मजुरांसाठी काम करणाऱ्या यूनियनचे नेते सुदर्शन मोहंती सांगतात की, भारत कोळशाविना जिवंत राहू शकत नाही.

मोहंती यांच्याप्रमाणे देशातील अनेकांना असं वाटतं की, कोळशापासून स्वच्छ ऊर्जा संसाधनांकडे जाण्याआधी एक स्पष्ट रणनिती असायला हवी, जेणेकरून कोळशावर अवलंबून असणाऱ्या लोकांची अडचण होणार नाही.

एका उघड्या कोळसा खाणीच्या तोंडावर उभं राहून माझ्याशी बोलताना ते सांगत होते की, या खाणीत काम करण्यासाठी दशकांपूर्वी कितीतरी लोकांना आपली कुटुंबं सोडून इथं यावं लागलं.

या खाणी हटवल्या गेल्यास यावर अवलंबून असलेल्या लोकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होईल, असं ते म्हणतात.

"जर जागतिक गटांच्या दबावात येऊन आपण कोळशाचं उत्पादन बंद केल्यास आम्ही आमचं आयुष्य कसं जगावं?" असा प्रश्न ते उपस्थित करतात.

आपण पर्यावरणाच्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू शकतो, मात्र जेव्हा कोळशाच्या उत्पादनाशी तडजोड करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा ते अशक्य आहे, असंही ते म्हणतात.

स्वच्छ उर्जेचा बाजार

गेल्या एका दशकात भारतातील कोळशाचाचा खप दुप्पट झालाय. देश चांगल्या गुणवत्तेचा कोळसा आयात करतोय. तसंच, आगामी काळात नवीन खाणी खोदण्याच्या योजनाही भारताच्या आहेत.

मात्र, तरीही भारत ब्रिटन आणि अमेरिकेच्या तुलनेत कमी वीज तयार करतोय.

कोळसा, हवामान बदल, वातावरण
फोटो कॅप्शन, कोळसा खाण

याचसोबत, भारत स्वच्छ उर्जेच्या दिशेनंही जातोय. 2030 पर्यंत बिगर-जीवाश्म इंधनांपासून 40 टक्क्यांपर्यंत वीज तयार करण्याच ध्येय भारताचं आहे.

दिल्लीस्थित पर्यावरणशी संबंधित थिंक टँक काऊन्सिल फॉर एनर्जी, इन्व्हायर्नमेंट अँड वॉटरचे अरुणाभ घोष दिल्लीतल्या मेट्रो सिस्टमचं उदाहरण देत सांगतात की, दिल्ली मेट्रोची 60 टक्के ऊर्जा सौरऊर्जेवर आधारित आहे.

मात्र, हे वाढवण्यासाठी बाहेरून गुंतवणूक आणणं आवश्यक असल्याचंही ते सांगतात.

"ही मुक्त भांडवलाची गोष्ट नाही. हे अगदी सामान्य आहे की, स्वच्छ ऊर्जेतल्या गुंतवणुकीसाठी भारत सर्वांत मोठा बाजार आहे आणि आम्हाला वाटतं की, आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार यावेत आणि त्या बदल्यात चांगला परतावा मिळवावा," असं ते म्हणतात.

'कुठलाही पर्याय नाही'

आंतरराष्ट्रीय ऊर्जा समितीनुसार, 1.3 अब्ज लोकसंख्या असलेल्या भारतात आगामी 20 वर्षांमध्ये ऊर्जेची आवश्यकता इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक असेल.

मात्र, ओडिशातील समुदाय आपल्याला लक्षात आणून देतं की, कोळशावरील अवलंबित्व कमी करण्याचा विचार आपल्यासमोर किती आव्हानं उभी करतो आणि हे अवलंबित्व दूर करण्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील.

कोळसा खाणीच्या बाहेरील एका झोपडीत जमुना मुंडा बसल्या होत्या.

जगण्यासाठी कोळसा खाणीत काम करणाऱ्या जमुना या त्या 10 लाख लोकांपैकी एक आहेत, ज्यांच्याकडे वीज नाही, मात्र घरातली चूल पेटवण्यासाठी कोळसा निश्चित आहे.

जेवण बनवताना त्या सांगतात की, "आमच्याकडे कोळसा नसेल तर आम्ही जेवण कसं बनवू शकतो. रात्री आम्ही हे जाळतो आणि घरात ठेवतो, जेणेकरून प्रकाश मिळेल. जर हे नुकसान कारणारं असेल तर यावर आम्ही काय करू शकतो? कोळसा वापरण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही."

भारतातल्या अनेकांना हे पटणार नाही. त्यांना वाटेल की, भारतात कोळशाव्यतिरिक्त इतर उर्जेत भारतानं बरीच झेप घेतलीय. पण वास्तव वेगळं आहे. आजही भारत कोळशावर अवलंबून आहे. कोळसामुक्त भारत हे स्वप्न बरंच दूर आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )