Climate Change : मोखाड्यात सौर ऊर्जा लोकांचं आयुष्य कसं बदलते आहे?

मोखाडा येथील नागरीक

फोटो स्रोत, Sharad badhe

फोटो कॅप्शन, मोखाडा येथील नागरीक
    • Author, जान्हवी मुळे,
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.

वळणावळणांचा नागमोडी रस्ता, दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा, दरीतून वाहणाऱ्या नदीचा खळखळ आवाज, डोंगर उतारावर वसलेले आदिवासींचे पाडे आणि दूरवर पसरलेली शांतता... मोखाडा परिसरातल्या गावांचं हे रूप थक्क करून जातं.

पालघर-नाशिक सीमेवरचा हा प्रदेश तसा मुंबईपासून दीडशे तर नाशिकपासून साठ किलोमीटवर आहे. पण या शहरांच्या जवळ असूनही हा दुर्गम भाग शहरीकरणापासून तसा दूर राहिला आहे.

पण या गावांमध्ये आता सौर उर्जेच्या आधारानं शाश्वत विकासाचं नवं मॉडेल उभं राहिलंय. सौर उर्जेवर चालणाऱ्या पंपांनी गावात पाणी खेळू लागलंय.

भरमसाठ पाऊस, पण उन्हाळ्यात दुष्काळ

निसर्गानं तसं मोखाडा परिसराला बरंच काही दिलं आहे आणि ऑक्टोबरमध्ये तर हे सौंदर्य आणखी खुलून दिसतं. जिथे तिथे सोनसळी छटांचं भात, वाऱ्यावर डुलणारी नागली (नाचणी) आणि खुरासणीच्या पिवळ्या फुलांनी भरलेली शेतं लक्ष वेधून घेतात.

पण निसर्गाचं हे रूप पावसाळ्यानंतर एखाद दोन महिनेच टिकणारं. त्यामुळे पावसाळा संपला, की इथल्या बहुसंख्य रहिवाश्यांना कामासाठी बाहेर दूर स्थलांतर करावं लागायचं.

शांताराम दळवी

फोटो स्रोत, Sharad badhe

फोटो कॅप्शन, शांताराम दळवी

जवळ पाणी असूनही उन्हाळी शेतीसाठी ते वापरता येत नव्हतं, असं टोक पाड्यावर राहणारे शांताराम दळवी सांगतात. कापणीला आलेलं भात दाखवताना ते माहिती देतात.

"सहा सात वर्षांपूर्वी इथे वीज आली. पण वीजेचा आम्हाला काही फायदा नाही. पाणी आमचं खाली. आमची माणसं तेवढा खर्च करू शकत नाहीत. मोटर टाकणं, लाईट घेणं. पण वीज साथ देत नाही. एक दिवशी राहते तर हप्ताभर राहात नाही. मग तिच्यावर विश्वास ठेवून आपण शेती केली तर ती वाळून जाईल."

तसं या डोंगराळ प्रदेशात दरवर्षी जवळपास अडीचशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. इतका की, इथल्या नद्यांचं पाणी पुढे धरणात साठवून शहरांना पुरवलं जातं.

डोंगरापलीकडेच मुंबईला पाणी पुरवणारं अप्पर वैतरणा धरण आहे. अलीकडे वाघ नदीवरच्या बंधाऱ्यासारखे अनेक लघुपाट बंधारे आणि तलाव आहेत. पण त्याचं पाणी शेतीपर्यंत किंवा गावारपर्यंत सहज पोहोचत नसे.

सौरऊर्जा

फोटो स्रोत, Sharad badhe

फेब्रुवारीनंतर तर इथे जणू दुष्काळच पडतो, टँकरनं पाणीपुरवठ्याची वेळ येते आणि बायकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते.

टोक पाड्यावर राहणाऱ्या जिजा नारायण जाधव सांगतात. "इथून खूप दूर जावं लागायचं. घरीच पाणी तिकडं जायचं मग झऱ्याचं पाणी आणायचं ते गढूळ पाणी, घाणीचं पाणी प्यायचं ना. मग त्यातच वेळ जायचा आमचा घरी येता येता आवरता."

पण पाच वर्षांत इथली परिस्थिती अगदी बदलून गेली आहे.

मोखाड्यात 'सौर'क्रांती

शांताराम आणि जिजा यांच्या टोक पाड्यानं आता सौर उर्जेचा वापर करायला सुरूवात केली आहे. सोलर पंपांनी शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सोडवला आहे. गावापर्यंत पाणी आलं आहे आणि छोट्या फिल्टरमुळे ते पिण्यायोग्यही झालं आहे.

जिजा

फोटो स्रोत, Sharad badhe

फोटो कॅप्शन, जिजा

शांताराम यांचं जगणंच त्यामुळे बदलून गेलंय. त्यांना आता मजुरीसाठी बाहेर जावं लागत नाही. आपल्या शेतात धरलेली वांगी दाखवत ते मोठ्या उत्साहानं सांगातात, "एवढं भारी काम झालंय की आता थोडी थोडी वांगी लागवड झाली, मेथी टाकली दोन चार किलोची. आता बाहेर नाही जायाचं."

जिजा यांचे कष्टही कमी झाले आहेत. "आता दूर जावा लागत नही. बाया उठतात, गावातनंच हवं तेव्हा पाणी आणत्यात. सकाळी कामं लवकर आवरतात. मी लवकर शेतावर जाऊ शकते. फिल्टरचा पाणी पिता, तर काही आजार नाही. चांगले वाटते."

पावसाळ्यात गढूळ पाण्यानं रोगांच्या साथी यायच्या, ज्या कमी झाल्या आहेत.

मोखाडा

फोटो स्रोत, Sharad badhe

इथे गावकऱ्यांनी आता फक्त शेतीसाठीच नाही, तर घरातही सौर उर्जेचा उपयोग सुरू केला आहे. शांताराम यांच्या घरावर जेमतेम फुटभर मापाचं सोलर पॅनेल बसवलं आहे. पण त्यावर तीन दिवे लागतात आणि मोबाईल चार्ज करण्याचीही सोय झाली आहे.

फक्त टोक पाडाच नाही, तर पालघरमधला मोखाडा आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर या तालुक्यांतल्या अठराहून अधिक गावांमध्ये असे सौर प्रकल्प उभे राहिले आहेत.

राहुल तिवरेकर

फोटो स्रोत, Sharad badhe

फोटो कॅप्शन, राहुल तिवरेकर

त्यामागे दिगंत स्वराज फाऊंडेशनची भूमिका महत्त्वाची ठरली. या संस्था स्थापन करणारे राहुल तिवरेकर सांगतात, "इथे आम्हाला मोठा विरोधाभास दिसून आला. म्हणजे जमीन खूप चांगली आहे, पाऊस चांगला पडतोय पण इथे आदिवासींना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं."

"इथे वीज तर पोहोचली आहे. पण ती फक्त गावात आणि प्रामुख्यानं सिंगल फेज आहे. शेताला पाणी द्यायचं तर अडीचशे तीनशे लीटर प्रतिमिनिट पाणी द्यावं लागतं. त्यासाठी चांगल्या ताकदीचा पंप पाहिजे. पण थ्री-फेज इलेक्ट्रिसिटी नाही. मग दोनच पर्याय उरतात. डिझेल आणि सोलर. डिझेल शेतकऱ्यांना परवडू शकत नाही. त्यामुळे सोलार हा पर्याय आम्ही निवडला."

एकजुटीनं बदललं गावाचं नशीब

सौर उर्जेच्या या प्रकल्पासाठी प्रोजेक्ट चिराग, टाटा कॅपिटल्स आणि मुंबईतील रोटरी क्लबसारख्या संस्थांनीही मदत केली. पण प्रकल्प उभारणीपासून ते देखभालीपर्यंत खरं योगदान लोकांनी दिलं आहे.

सोलार पॅनल

फोटो स्रोत, Sharad badhe

लोक या सोलर पॅनेल्सची काळजी कशी घेतात, हे बलद्याच्या पाड्यावर राहणारे हिरामण पखाणे यांनी आम्हाला दाखवलं. "आम्ही दोन दोन तीन तीन दिवसांनी साफ सफाई करतो. बकेट जे आंघोळीचं मग असतो त्यानं पाणी वर फेकतो. आणि मग काडीला कापड बांधतो आणि ते पुसून काढतो वरती शिडी लावून. "

साधारण पाच वर्षांपूर्वी इथे वसवलेले पॅनल्स आजही व्यवस्थित चालतायत. बलद्याच्या पाड्यापाठोपाठ गावांनी सौर उर्जेवर चालणारे पथदिवेही बसवले आहेत. आंगणवाडीत सौर दिवे बसवले आहेत. पोशिरेसारख्या गावात तर अख्खी शाळा सौर उर्जेवर चालते.

जिल्हा परिषदेच्या या शाळेत आम्ही पोहोचलो तेव्हा संध्याकाळ होत आली होती. पण चारही वर्गखोल्या, व्हरांडा, ऑफिस सौर दिव्यांनी उजळून निघालं होतं. शाळेतला टीव्ही, कॉम्प्युटरही या उर्जेवर चालतो आहे.

गावातलं स्थलांतर थांबल्यापासून आरोग्य, शिक्षण यावर लक्ष केंद्रीत करणं गावकऱ्यांना आता सोपं जातंय असं राहुल तिवरेकर सांगतात.

"हा एक एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प आहे, ज्यामध्ये गावातील आरोग्य, शिक्षण, उपजीविका आणि प्रशासन या सगळ्याच बाबतीत मोठा फरक पडल्याचं दिसत आहे. पुढच्या टप्प्यात पत्रावळी बनवण्याचा कारखाना, पिठाची गिरणी अशा गोष्टींना सोलरवर आणण्याचं आमचं लक्ष्य आहे."

सौर उर्जा किती खर्चिक?

सौर उर्जेच्या बाबतीत एक महत्त्वाची अडचण, म्हणजे तिची साठवणूक. सौर उर्जा साठवण्यासाठी बॅटरी लागते, जे काहीसं खार्चिक आहे. बॅटरीच्या आकारानुसार क्षमतेत फरक पडतो.

पण एकदा बॅटरी चार्ज झाली, की चोवीस तास किंवा कधी दोन दिवसही चालू शकते.

सौरऊर्जा

फोटो स्रोत, Sharad badhe

"पावसाचे काही महिने, जेव्हा ढगाळ वातावरण असतं, तेवढे दिवस सोडले तर एरवी रोज हे दिवे अगदी आणि पंप अगदी व्यवस्थित चालतात. एकदा का तुम्ही हे इन्स्टॉल केलं की साधारण वीस पंचवीस वर्ष त्याची लाईफ असते." राहुल तिवरेकर माहिती देतात.

एका गावात सौर उर्जेवर चालणाऱ्या पंपासाठी 15 लाखापर्यंत तर रस्त्यावरच्या एका दिव्यासाठी 15 हजार रुपये खर्च येतो. यात बॅटरीचा समावेश नाही.

वीज साठवणाऱ्या बॅटरींसह एका शाळेला सौर उर्जानिर्मितीसाठी तीन लाख रुपये खर्च येतो. पण त्यानंतर देखभालीशिवाय फारसा खर्च येत नाही. तीन दिवे आणि मोबाईल चार्ज करणारं युनिट अडीच हजार रुपयात मिळतं. बॅटरीच्या आकारानुसार यात फरक पडू शकतो.

पण भरमसाठ वीजबिलं आणि बेभरवशाची वीज यांपेक्षा हा पर्याय खिशाला परवडणारा असल्याचं गावकरी सांगतात.

कोळसा किंवा डिझेलसारख्या क्लायमेट चेंजला कारणीभूत ठरणाऱ्या जीवाश्म इंधनांचा वापर येत्या काळात कमी करायचा असेल, तर पर्याय म्हणून सौर उर्जेकडे पाहिलं जातं. पण ती महाग असते, सोलर पॅनल्सची देखभाल ठेवणं कठीण असतं असाही अनेकांचा समज असतो. पण लोक एकत्र आले, तर ते हे करू शकतात, हेच या गावांनी दाखवून दिलंय.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)