अफगाणिस्तान : खोट्या पायात बॉम्ब लपवून रहिमुल्लाह हक्कानी यांची हत्या

अफगाणिस्तानात महिलांच्या शिक्षणाचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध मौलवी शेख रहिमुल्लाह हक्कानी यांचा काबूलमध्ये एका आत्मघाती हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
तालिबानच्या सूत्रांनी वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीनुसार, एक पाय नसलेल्या व्यक्तीने हक्कानी यांची हत्या केली. या व्यक्तीने आपल्या प्लास्टिकने बनवलेल्या खोट्या पायात स्फोटकं लपवली होती.
तालिबानच्या गृह मंत्रालयाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी रॉयटर्सशी बोलताना म्हटलं, "हा व्यक्ती कोण आहे, याची आम्ही माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहोत. या व्यक्तीला शेख रहिमुल्लाह हक्कानी यांच्या खासगी कार्यालयात घेऊन येणारा व्यक्ती नेमका कोण होता, याचाही तपास आम्ही करत आहोत. हक्कानी यांचा मृत्यू ही अफगाणिस्तानसाठी खूप मोठी हानी आहे."
या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या कट्टरवादी संघटनेने घेतली आहे. इस्लामिक स्टेटने यापूर्वीही अनेकवेळा रहिमुल्लाह यांच्यावर हल्ल्यांचे प्रयत्न केले होते.
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे एका मदरशात हक्कानी यांच्यावरील हल्ला करण्यात आला.
शेख हक्कानी हे अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे समर्थक होते. तसंच इस्लामिक स्टेट खुरासान (IS-K) संघटनेचे ते कडवे विरोधकही मानले जात.

IS-K ही इस्लामिक स्टेटचीच अफगाणिस्तानात सक्रिय असलेली एक शाखा आहे. या संघटनेकडून तालिबान प्रशासनाचा विरोध करण्यात येतो.
गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी तालिबानचे सशस्त्र हल्लेखोर देशाची राजधानी काबूलमध्ये दाखल झाले होते. यानंतर अफगाणिस्तानात घडलेली ही सर्वात हाय-प्रोफाईल हत्या मानली जात आहे.
तालिबानच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं, "अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातसाठी हा प्रचंड मोठा धक्का आहे. या हल्ल्यात कुणाचा सहभाग आहे, याचा आम्ही तपास करत आहोत."
नावात साम्य असलं तरी शेख हक्कानी यांचा अफगाणिस्तानच्या राजकारणातील बडं नाव असलेल्या हक्कानी बंडखोर संघटनेसोबत कोणताही संबंध नव्हता.
शेख हक्कानी यांनी अफगाणिस्तानात महिलांच्या शिक्षणाच्या बाजूने फतवाही काढलेला होता.

याच वर्षी बीबीसी प्रतिनिधी सिकंदर किरमाणी यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी महिलांना आणि मुलींना शिक्षण घेण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं होतं.
ते म्हणाले होते, "शरियतमध्ये महिला आणि मुलांनी शिक्षण घेऊ न देण्याचा उल्लेख कुठेही केलेला नाही. हे अजिबात न्यायसुसंगत नाही. महिलांना शिक्षणाची परवानगी आहे आणि ते अनिवार्य आहे, असंच सगळ्या धार्मिक पुस्तकांमध्ये म्हटलेलं आहे. कारण अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसारख्या देशांमध्ये एखादी महिला आजारी पडली तर तिच्यावरील उपचार महिला डॉक्टरने करावेत, हेच योग्य ठरतं."
अफगाणिस्तानच्या काही ठराविक प्रांतांमध्येच मुलींना शिक्षणाची परवानगी आहे. देशात इतरत्र मुलींच्या शाळा सध्या बंद पडलेल्या अवस्थेत आहेत.
अफगाणिस्तानात तालिबानने मुलींसाठी माध्यमिक शाळा उघडण्याचं आश्वासन अनेकवेळा दिलं होतं. पण अजूनही या आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही.
तालिबान प्रशासनाच्या मते, अद्याप मुलींचा शाळेतील गणवेश काय असावा, हे ठरलं नसल्याने शाळा उघडण्यात आलेल्या नाहीत.
ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानवर तालिबान संघटनेचं नियंत्रण येताच संपूर्ण देशातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या.
या शाळा आता उघडण्यात येणार होत्या, पण अद्यात तसं होऊ शकलेलं नाही.
काही भागात मुलींच्या शाळा सुरू असल्या तरी हे प्रमाण अतिशय कमी आहे.
तालिबान सत्तेतआल्यानंतर शिक्षण मंत्रालयाने तत्काळ मुलींच्या माध्यमिक शाळा बंद करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासूनच या निर्णयावर चहूबाजूंनी टीका करण्यात येत होती.
अशा स्थितीतही तालिबानच्या भूमिकेविरुद्ध भूमिका मांडणारे शेख हक्कानी सत्ताधाऱ्यांचे जवळचेही मानले जात होते.
शेख हक्कानी यांच्यावर यापूर्वी दोनवेळा हल्ला करण्यात आला होता. शेवटचा हल्ला 2020 मध्ये झाला होता. त्यावेळीही इस्लामिक स्टेटनेच या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.
पाकिस्तानच्या पेशावर शहरात झालेल्या या हल्ल्यात शेख हक्कानी वाचले होते, पण इतर 7 जणांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








