अफगाणिस्तान : तालिबानी शार्प शूटर आता अधिकारी झालेत, पण नागरिक मात्र पैशांसाठी मदतीवरच अवलंबून

ऐनुदीन त्याच्या ऑफिसमध्ये बसला आहे, मागे तालिबानचा पांढऱ्या रंगावर काळ्या अक्षरांत शाहदा लिहिलेला झेंडा आहे.
फोटो कॅप्शन, तालिबानचा स्नायपर ऐनुदीन आता बाल्ख प्रांतात नागरी विकास विभागाचा संचालक आहे.

तालिबाननं गेल्या वर्षी अफगाणिस्तानातली सत्ता काबीज केली, तेव्हा तिथल्या जनतेचं जीवन रातोरात बदलून गेलंय.

गेल्या वर्षभरात हजारो अफगाण नागरिकांना निर्वासित म्हणून देशाबाहेर सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागला, अफगाणिस्तानात मुलींच्या बहुतांश माध्यमिक शाळा बंद करण्यात आल्या आहेत आणि देशात गरिबी वाढते आहे.

पण गेल्या अनेक दशकांत पहिल्यांदाच हा देश हिंसाचाराच्या वेढ्यात अडकलेला नाही आणि भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी झाल्याचं दिसत आहे.

अफगाणिस्तानात सत्तांतर झालं तेव्हा बीबीसीचे प्रतिनिधी सिकंदर किरमानी तिथेच होते आणि वर्षभरात काय बदललं हे पाहण्यासाठी ते परत तिथे गेले होते.

तालिबानच्या स्नायपरचं नवं आयुष्य

गेल्या वर्षी परदेशी सैन्य देशातून बाहेर पडण्याच्या तयारीत असताना तालिबानी फौजा अफगाणिस्तानात आगेकूच करत होत्या आणि सरकारच्या ताब्यातून एक-एक प्रदेश काबीज करत होत्या, त्यावेळी आम्ही ऐनुदीनला भेटलो. त्यावेळीस ऐनुदीन अफगाणिस्तानच्या उत्तर भागातील बाल्ख प्रांतातला एक कट्टर तालिबानी लढवय्या होता.

आमच्याशी बोलताना तो आपली भेदक, कोरडी नजर आमच्यावर रोखून होता. मी त्याला विचारलं की, या हिंसाचाराचं समर्थन तो कसं करू शकतो.

तो म्हणाला, "आम्ही सामान्य नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेतो आहोत. पण ही लढाई आहे आणि लोक मरतील. अफगाणिस्तानात इस्लामिक व्यवस्थेशिवाय दुसरं काहीही आम्हाला मान्य नाही."

आम्ही फार वेळ बोलू शकलो नाही. तेव्हा युद्ध सुरू होतं आणि अफगाण सरकारकडून हवाई हल्ल्यांची टांगती तलवार डोक्यावर होती.

तालिबानचं सरकार स्थापन झाल्यावर काही महिन्यांनी मी ऐनुदीनला भेटलो. अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानच्या सीमेवरून वाहणाऱ्या अमू दर्या नदीच्या काठी बसून तळलेले मासे खात खात ऐनुदीननं मला सांगितलं की तो तालिबानचा स्नायपर होता.

स्नायपर म्हणजे असा बंदुकधारी हल्लेखोर जो दूरवर लपून शत्रूवर अचूक नेम साधू शकतो. सोप्या भाषेत आपण त्याला एक प्रकारचा शार्प शूटर म्हणू शकतो. ऐनुदीन स्नायपर होता आणि त्याच्या अंदाजानुसार त्यानं अफगाण सरकारच्या किमान डझनभर सैनिकांना मारलं होतं. यादरम्यान दहावेळा त्यालाही दुखापती झाल्या होत्या.

पण तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यावर त्याची बाल्ख प्रांतात नागरी विकास विभागाचा संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

नव्या राजवटीच्या सुरुवातीच्या काळात मी त्याला भेटलो तेव्हा त्याला विचारलं होतं, एवढे दिवस लढून झाल्यावर तो 'जिहाद' मिस करतोय का? "होय," त्यानं कसलीही पर्वा न करता उत्तर दिलं.

या फोटोत ऐनुदीन त्याच्या ऑफिसमध्ये बसला आहे.
फोटो कॅप्शन, तालिबानचा हल्लेखोर ऐनुदीन सांगतो की तो लढताना खूश असायचा, पण डेस्कमागे बसून काम करण्यातही त्याला आनंद वाटतो.

आता एक वर्षानंतर, तो आपल्या लाकडी डेस्कमागे बसला आहे. मागे इस्लामिक अमिरातीचा मोठा काळा-पांढरा झेंडा आहे. आपल्या नव्या आयुष्याशी तो अजूनही जुळवून घेत असल्याचं जाणवतं. पण आपण निभावत असलेल्या जबाबदारीचं महत्त्व त्याला समजलं आहे.

"आम्ही आमच्या बंदुकांनी शत्रूशी लढत होतो. ईश्वराच्या कृपेनं आम्ही त्यांना हरवलं. आता आमच्या लेखणीच्या सहाय्यानं आम्ही आमच्या लोकांची सेवा करतो आहोत." ऐनुदीन सांगतो की लढताना तो खूश होता, पण आताही आनंदात आहे.

लढाईत आघाडीवर असलेले अनेक तालिबानी खासगीत बोलताना मान्य करतात की ऑफिसातल्या आपल्या नव्या कामाचा त्यांना कंटाळा येऊ लागला आहे.

ऐनुदीनच्या हाताखालचे बहुतेकजण आधीच्या सरकारनं नोकरीत भरती केले होते. पण शहरातल्या इतर काही रहिवाशांनी त्यांच्या नोकऱ्यांवरही तालिबानींनी कब्जा केल्याची तक्रार केली.

मी ऐनुदीनला विचारलं की तो या कामासाठी पात्र आहे का? "आम्हाला सैनिकी प्रशिक्षणासोबत आधुनिक शिक्षणही मिळालंय," असं तो सांगतो आणि पुढे म्हणतो, "आम्ही सैनिकी पेशातून आलो असलो आणि आता या क्षेत्रात काम करत असलो, तरी मागच्या सरकारशी तुलना करून तुम्ही पाहू शकता की कोणाची कामगिरी जास्त चांगली होते आहे."

पण तो पुढे सांगतो की "लढण्यापेक्षा प्रशासन चालवणं जास्त कठीण आहे... युद्ध सोपं होतं कारण तेव्हा आमच्यावर फारशी जबाबदारी नव्हती."

बंडखोरांच्या भूमिकेतून सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत शिरणं तालिबानमध्ये सगळ्यांसाठीच आव्हान ठरत आहे.

ग्रामीण भागातील लोकांचा सुटकेचा निश्वास

अफगाणिस्तानातल्या मोठ्या शहरांवरच्या बॉम्बहल्ल्यांनी कायमच मीडियाचं लक्ष वेधून घेतलं. पण गावा-गावातलं युद्ध खरं दमछाक करणारं होतं.

तिथे तालिबान आणि अफगाण सैन्यातल्या लढाईमध्ये सामान्य लोक अडकले होते. काहींसाठी दोन्ही सैन्यांमध्ये फारसा फरक नव्हता, आणि त्यांना केवळ शांततेत राहण्याची तीव्र इच्छा होती.

तालिबाननं सत्ता काबीज केल्यावर काही दिवसांतच आम्ही लोगार प्रांतातल्या पडख्वाब गावात गेलो. काबुलच्या आग्नेयेला असलेल्या त्या गावातले लोक आम्हाला तिथल्या युद्धाच्या मागे राहिलेल्या खुणा दाखवण्यासाठी उत्सुक होते. जेमतेम काही आठवड्यांपूर्वीच त्यांच्या जगण्यावर युद्धाची छाया होती.

गावामधल्या दुकानाचा एक फोटो
फोटो कॅप्शन, अफगाणिस्तानात लोगारसारख्या ग्रामीण भागांत जास्त अटीतटीची लढाई लढली गेली.

"परिस्थिती फारच वाईट असायची," असं या गावात टाईल्स तयार करणारा समिउल्ला सांगतो. "आम्ही काहीच करू शकत नव्हतो. बाजारात आमच्या दुकानांमध्येही जाऊ शकत नव्हतो. आता आम्ही कुठेही जाऊ शकतो आहोत."

शहरांपेक्षा अशा गावांमध्ये तालिबानची मूल्यं स्थानिक लोकांच्या मतांशी जास्त मिळतीजुळती आहेत. आधीच्या सरकारच्या काळातही, गावांमध्ये महिला सामान्यतः त्यांचा चेहरा झाकून ठेवायच्या आणि क्वचितच स्थानिक बाजारात जाताना दिसायच्या.

गेल्या आठवड्यात आम्ही गावात परतलो, तेव्हा तिथल्या बाजारातल्या इमारतींवर बंदुकीच्या गोळ्यांमुळे पडलेली बरीच छिद्रं बुजवलेली दिसली, बाजार भरला होता आणि सुरक्षित वातावरणाविषयी रहिवाशांनी समाधान व्यक्त केलं.

"आधी अनेक लोक, विशेषतः शेतकरी जखमी व्हायचे, मारले जायचे. दुकानदारही मारले जायचे," असं इथे कपडे शिवणारा गुल मोहम्मद सांगतो.

पण अमेरिकेनं माघार घेतल्यापासून अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था ढासळते आहे. परदेशातून आलेल्या निधीवर इतला 75 टक्के सार्वजनिक खर्च चालायचा. पैशाचा तो ओघ घटला आहे. आंतरराष्ट्रीय बँकांनी बहुतांश व्यवहार बंद केले आहेत, कारण त्यांना निर्बंध तोडण्याची भीती वाटते.

अफगाणिस्तानच्या सेंट्रल बँकेचा राखीव पैसा अमेरिकेनं गोठवून ठेवला आहे. पाश्चिमात्य देशातील राजनैतिक अधिकाऱ्यांनी वारंवार सुचवलं आहे की अफगाणिस्तानची महिलांविषयीची अन्यायकारक धोरणं पाहता इथे येणारा निधी सरकारी व्यवस्थेला वळसा घालून आणला जायला हवा.

या संकटाचा परिणाम म्हणजे शहरात मध्यमवर्गीय कुटुंबांच्या उत्पन्नात भरपूर घट झाली आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांना अनेक महिने पगार मिळालेला नाही आणि त्यांच्या पगारात कपात झाली आहे.

ज्यांचा आधीच हातातोंडाशी घास होता, त्यांच्यासाठी आपल्या कुटुंबाचं पोट भरणं आणखी मोठं आव्हान बनलं आहे.

समिउल्लाचा फोटो
फोटो कॅप्शन, तालिबानी राजवटीत शांतता आल्यानं समिउल्ला समाधानी आहे, पण अर्थव्यवस्था 'मोडकळीस आली आहे' असं त्याला वाटतं.
1px transparent line

पडख्वाब गावात जीवनावश्यक गोष्टींच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत आणि रोजगार उपलब्ध नाही, ही अनेकांची तक्रार आहे. "अर्थव्यवस्था कोलमडली आहे, काही काम किंवा नोकऱ्या उरलेल्या नाहीत," समिउल्ला सांगतो, "सगळेजण परदेशातल्या नातेवाईकांवर अवलंबून आहेत."

"लोकांना मांस आणि फळं सोडा, पीठही घेणं परवडत नाहीये," गुल मोहम्मद सांगतो.

पण समिउल्ला सांगतो, "तेव्हा पैसा होता हे खरं आहे, पण आम्हाला भरपूर अत्याचार सहन करावा लागला." अफगाण सरकारच्या सैन्यानं गावातल्या लोकांचा छळ केल्याचा आरोप तो करतो.

तालिबानवर उघडपणे टीका करणाऱ्यांची संख्या कमी होते आहे, पण अनेकांना त्यांच्या विजयानं आयुष्य सुधारण्याची संधी दिली आहे.

मात्र अनेकांना असंही वाटतं, की त्यांनी ज्या देशाच्या उभारणीसाठी मदत केली होती, त्या राष्ट्राचं स्वप्न त्यांच्या डोळ्यांदेखत नाहीसं होतंय. त्याची जागा घेणाऱ्या व्यवस्थेविषयी त्यांच्या मनात साशंकता आहे.

तालिबानला न जुमानता व्हीडिओ बनवणारी यूट्यूबर

तालिबानी फौजा गेल्या वर्षी काबुलमध्ये शिरू लागल्या तेव्हा अनेक रहिवासी घाबरले होते. या संघटनेनं अनेक वर्षं या शहरात आत्मघातकी हल्ले आणि हत्या घडवून आणल्या होत्या.

पण हलके-फुलके व्हीडिओ तयार करणारी यूट्यूबर रोईनानं बाहेर पडून तालिबानशी बोलायचं ठरवलं.

"पुरुष आणि महिलांकडे समान हक्क आहेत," गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तिनं निर्भीडपणे बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं. पण फार काळ आपण काम करू शकू की नाही याविषयी ती साशंक होती.

एका वर्षानंतर तिच्या मनातली अस्वस्थता कायम आहे आणि देशभरातही तशीच भावना दिसते आहे.

काबुलच्या रस्त्यावर चालणारी रोईना
फोटो कॅप्शन, यूट्यूबर रोईना सांगते की महिलांना त्यांचे हक्क मिळायला हवेत.

अफगाणिस्तानात मुलींच्या माध्यमिक शाळा बंद करण्याच्या तालिबानी नेत्यांच्या निर्णयावर आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये तसंच बहुतांश अफगाण लोकांच्यात आणि अगदी तालिबानमध्येही अनेकांनी निराशा व्यक्त केली आहे.

1990च्या दशकातल्या तालिबानी सरकारसारखी परिस्थिती आता नाही. लहान मुलींना शाळेत जाण्याची परवानगी आहे आणि सध्या विद्यापीठात असलेल्या मुलींना महिलांसाठी स्वतंत्र वर्गांमध्ये शिकण्याची परवानगी आहे.

पण तालिबानमधले अनेक प्रभावी आणि कट्टरवादी नेते मुलींना शाळेत जाऊ देण्यास फारसे तयार नसल्याचं दिसून येतंय. त्यामुळे महिलाहक्कांच्या बाबतीत गेल्या 20 वर्षांत इथे झालेली प्रगती उलथून लावली जात असल्याचं चित्र आहे.

तसंच बहुतांश सार्वजनिक नोकरीत असलेल्या महिलांना ऑफिसमध्ये परतू नका, असं सांगण्यात आलं आहे. अपवाद केवळ शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील महिलांचा. खासगी क्षेत्रात तुलनेनं कमी महिलांना आपली नोकरी सुरू ठेवता आली आहे.

रोईना अजूनही व्हीडिओ तयार करते आहे, त्यासाठी ती नियमांना आव्हान देते आहे. आपला चेहरा ती झाकत नाही, पण चेहऱ्याभोवती आपला हेडस्कार्फ घट्ट लपेटून घेतेय.

ती काबूलमध्ये प्रवास करत असते, तेव्हा काळा अबाया आणि सर्जिकल मास्क असा काहीसा पारंपरिक वेश धारण करते. तालिबाननं महिलांनी सार्वजनिक जागी त्यांचे चेहरे झाकायला हवेत असा आदेश काढला आहे, पण त्याची अंमलबजावणी आता थोडी शिथील झाली आहे. मोठ्या शहरांत महिलांनी पूर्ण चेहऱ्याऐवजी केवळ केस झाकणं ही सामान्य गोष्ट आहे.

आताच्या आयुष्याविषयी आणि तालिबानला उद्देशून बोलताना रोईना काळजीपूर्वक शब्द निवडते. "मुली आणि महिलांना हिजाबचे नियम पाळावे लागतात. त्यांना इस्लामनं देऊ केलेली सगळी स्वातंत्र्यं मिळायला हवीत. त्यांचे हक्क हिरावून घेतले जाऊ नयेत. त्यांना काम करण्याची आणि अभ्यास करण्याची परवानगी मिळायला हवी."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)