वखान कॉरिडोर : अफगाणिस्तानातल्या 'सिल्क रूट'वर चीन का रस्ता बांधतोय?

फोटो स्रोत, Simon urwin
- Author, सायमन आर्विन
- Role, बीबीसी ट्रॅव्हल
चीन, इराण, पाकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उज्बेकिस्तान यांच्या सीमा इथे येऊन मिळतात. अफगाणिस्तानचं आशियात तेच महत्त्व आहे, जे मानवी शरीरात हृदयचं असतं.
तीन कोटी 20 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या देशातले एक चतुर्थांश लोक मजार-ए-शरीफ सारख्या मोठ्या शहरांमध्ये राहातात. मजार-ए-शरीफ अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलपासून 320 किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला स्थित आहे.
देशातलं चौथं सगळ्यांत मोठं असलेल्या शहरात हजरत अलींची कबर आहे. इथल्या स्थानिक लोकांची श्रद्धा आहे की मोहम्मंद पैगंबरांचे जावई आणि इस्लाम धर्मातले चौथे खलिफा यांना इथे दफन केलेलं आहे. स्थानिक लोकांमध्ये अशी मान्यता आहे की जर कोणत्या पक्षाचे पंख वेगळ्या रंगाचे असतील आणि तो पक्षी इथे आला तर त्याचे पंख पारदर्शक आणि पांढऱ्या रंगाचे होतात.
या भागातली पांढऱ्या पंखांची कबुतरं प्रसिद्ध आहेत.
वखान कॉरिडोर मजार शरीफपासून साधारण 600 किलोमीटर लांब पूर्वेला आहे. हा भाग सांस्कृतिक आणि भौगोलिकरित्या अफगाणिस्तानच्या इतर भागांपासून फारच वेगळा आहे.
बदख्शां प्रदेशास्थित असणारा 350 किलोमीटर लांबीचा हा भाग जगातल्या तीन मोठ्या पर्वतरांगा हिंदूकुश, काराकोरम आणि पामीरच्या संगमावर वसलाय.
या क्षेत्रात प्रवासी सहली आयोजित करणाऱ्या काही कंपन्यांपैकी एक आहे इंटेमड बार्डज् डॉट कॉम. या कंपनीचे जेम्स विलकॉक्स म्हणतात की, "अफगाणिस्तानचा ट्रॅफिक, गोंधळ आणि सुरक्षिततेचे मुद्दे यापासून हा भाग मैलोगणिती लांब आहे."

फोटो स्रोत, SIMON URWIN
"इथे लोकसंख्या जास्त नाहीये पण इथे पोहचणं फार अवघड आहे. फार कमी लोकांना या जागेविषयी माहितेय. जगातल्या सगळ्यात दुर्गम आणि सुंदर ठिकाणांपैकी एक ही जागा आहे."
ग्रामीण भाग
वखान कॉरिडोरमध्ये लहान लहान ग्रामीण वस्त्या आहेत. इथे पांढरा दगड, माती आणि लाकडाची घरं बनलेली आहेत. यात काही मोठी गावं एकमेकांना कच्च्या रस्त्यांनी जोडली गेली आहेत. पंज नदीचं पाणी इथून सतत वाहतं त्यामुळे हे कच्चे रस्ते अनेकदा वापरण्यालायक नसतात.
या कॉरिडॉरच्या पश्चिम कोपऱ्यापासून 80 किलोमीटर दूर इश्काशिम शहरात राहाणारे आजम जियाई म्हणतात, "वखानच्या या पूर्ण भागात खूप कमी लोकांकडे स्वतःच्या गाड्या आहेत. पण आमच्याकडे सार्वजनिक वाहतूक आहे, गाढवं आहेत आणि आपले पाय तर आहेतच."

फोटो स्रोत, Simon urwin
तरीही वखान इतर भागांपासून तुटलेलं आहे. काही गावांतून इश्काशिम शहरात जायला चार दिवसांचा प्रवास करावा लागतो.
इथून सगळ्यात मोठं शहर दुशांबे आहे, जी ताजिकिस्तानची राजधानी आहे. तिथे पोहोचायला तीन दिवसांचा वेळ लागतो.
इतक्या दुर्गम भागात असल्याने हा प्रदेश एखाद्या टाईम कॅप्सुलसारखा झाला आहे. काळाच्या कप्प्यात अडकलेला. इथले लोक जेव्हा सीमेपलिकडच्या ताजिकिस्तानमध्ये रस्ते, फोन आणि वीजेसारख्या गोष्टी पाहातात तेव्हा म्हणतात की भविष्यकाळात आल्यासारखं आहे.
वखाई समुदायाच्या लोकांची घरं
वखान कॉरिडोर जवळपास 2500 वर्षांपासून वखाई समुदायाच्या लोकांचं घर आहे. सध्या इथली लोकसंख्या जवळपास 12 हजार आहे. सहसा अफगाणी लोक रूढीवादी सुन्नी मुस्लीम असतात पण वखाई लोक इस्मायली आहेत. हा शिया समुदायाचा एक संप्रदाय आहे.
इथे महिला बुरखा घालत नाहीत आणि इथे मशीदही नाही. इथे वखाई लोकांची सामाजिक केंद्रं आहेत जिथे प्रार्थनाही करता येते आणि सार्वजनिक कार्यक्रमही. विलकॉक्स म्हणतात की, "इस्मायली लोकांना सुन्नींच्या तुलनेत जास्त उदारमतवादी समजलं जातं."

फोटो स्रोत, Simon urwin
"उदाहरणार्थ वखानमध्ये एक पाश्चात्य पुरुष पर्यटक विनापरवानी वखाई महिलेचा फोटो काढू शकतो. यावरून कोणी चिडत नाही. अफगाणिस्तानच्या इतर भागात तुम्ही याचा विचारही करू शकत नाही."
"सुन्नी कट्टरतावाद्यांचं इथे नसणं आणि या क्षेत्रापासून दूर असणं यामुळे इथे इस्लामिक स्टेट आणि तालिबानसारख्या संघटना पोहचू शकल्या नाहीत. त्यामुळे जेव्हा अफगाणिस्तानच्या इतर भागात यादवी माजलेली असायची तेव्हा वखानवर याचा काही परिणाम व्हायचा नाही."
इथली जीवनशैली
वखाई शेतकरी इथे कोरडवाहू शेती करतात. इथे ते गहू, जवस, मटार, बटाटे, सफरचंद आणि खुबानीची शेती करतात. हिमनद्यांचं पाणी वितळलं की इथल्या शेतीला पाणी उपलब्ध होतं. इथल्या श्रीमंत कुटुंबाच्या घरी बकऱ्या, उंट, घोडे किंवा गाढव असतात.
आजम जियाई म्हणतात की, "दरवर्षी जून महिन्यात वखाई लोक आपल्या जनावरांना घेऊन उन्हाळ्यात कुरणांच्या भागात जातात. हे भाग समुद्रसपाटीपासून 4500 मीटर उंचावर असू शकतात.

फोटो स्रोत, Simon urwin
"या प्रवासाला 'कछ' असं म्हणतात. जवसाची कापणी होते तेव्हा म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला इथे 'चनेर' चा मेळाही भरतो. अफगाणिस्तानाच्या इतर भागात दिवसाचे पाच नमाज तुमचा दिवस कसा जाईल ठरवतात पण इथे आमच्या जमिनीशी, इथल्या मातीशी घनिष्ट संबंध आहे. त्यामुळे आमची जीवनशैली शेती, हवापाणी आणि निसर्गावर अवलंबून आहे."
शतकानुशतकांच्या जुन्या परंपरा
वखानच्या खास परंपरांपैकी एक म्हणजे बुझकशी खेळ. यात घोड्यांवर बसून रग्बीसारखा खेळ खेळतात. या खेळात बकरीच्या शरीराचा बॉल बनवून खेळलं जातं.
असं म्हणतात की पोलोच्या खेळाची सुरुवात बुझकशी खेळापासून झाली. बुझकशी खेळात कोणते नियम आणि संघ नसतात. यात नियमाने खेळण्याचीही पर्वाही कोणी करत नाही. खेळाडू एक-दुसऱ्याला लाथाही मारतात. बकरीचं शरीर आपल्याकडे खेचायचं इतकाच खेळ.

फोटो स्रोत, Simon urwin
या खेळात खेळाडूंची हाडं तुटणं सामान्य गोष्ट आहे असं जियाई म्हणतता. वखाई लोक विशेषतः नवरोजच्या प्रसंगी हा खेळ खेळतात.
"अफगाणिस्तानच्या दुसऱ्या भागांत बुझकशी खेळ राजकीय स्वरूपाचं आहे. याचा उपयोग उच्च वर्गाचे लोक आपल्या ताकदीचं प्रदर्शन करण्यासाठी करतात. पण वखानमध्ये ही फक्त स्पर्धा आहे. हीच गोष्ट आम्हाला खास बनवते."
अफगाणिस्तान विदेशी पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित जागा नाही. पण वखान कॉरिडोरमधील काही वर्षांतली शांतता, सुंदर पर्वत आणि वखाई संस्कृतीमुळे लोकांना पर्यटनासाठी ही जागा आवडतेय.
एड समर्स एक टूर गाईड आहेत आणि नऊ वेळा वखानला जाऊन आले आहेत.
ते म्हणतात, "पूर्वी इथे मुठभर लोक यायचे, पण गेल्या 10 वर्षांपासून इथे दरवर्षी 600 पर्यटक येतात. गर्दी आणि गोंधळापासून दूर असणारी ही जागा लोकांना समाधान देते. इथे तुम्ही अशा लोकांना भेटता ज्यांना पारंपरिक आयुष्य जगायला आवडतं. ही जागा फक्त सुंदरच नाही तर इथे पावलापावलावर इतिहासाच्या खुणा सापडतात."
सिल्क रोडचा भाग
चीनला भूमध्य समुद्राशी जोडण्यासाठी इनवी सनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या शतकात बनवलेल्या गेलेल्या सिल्क रोडचा वखान कॉरिडोर फार महत्त्वाचा हिस्सा होता.
एड समर्स म्हणतात की, "इथून व्यापारी चिनी रेशीम, रोमन सोनं आणि या भागातून काढलेली अफगाणी रत्न घेऊन जायचे."

फोटो स्रोत, Simon urwin
"असं म्हणतात की 13 व्या शतकात मार्को पोलो याच भागातून चीनला गेले होते. आणि अलेक्झांडरही याच भागतून गेले. याभागात तुम्हाला प्राचीन रस्त्यांच्या खुणा, मुक्काम करण्याच्या जागा आणि बुद्धमुर्त्यांचे अवशेष सापडतील."
राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं स्थान
19 व्या शतकात ब्रिटन आणि रशियाच्या दरम्यान घडलेल्या ग्रेट गेममध्ये वखानची महत्त्वाची भूमिका होती. विलकॉक्स म्हणतात, "जेव्हा रशिया आणि ब्रिटन मध्य आशियात लढाई लढत होते तेव्हा अफगाणिस्तान फार मोक्याचं होतं.
वखानच्या आताच्या सीमारेषांना तेव्हा एक बफर झोन बनवलं होतं म्हणते दोन्ही प्रतिस्पर्ध्यांच्या सीमा एकमेकांना सरळ भिडणार नाहीत. शीतयुद्धाच्या काळातही वखान महत्त्वाचं ठरलं. आता कदाचित चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमुळे हा मार्ग पुन्हा लोकप्रिय होईल."
नवीन बांधकाम
अगदी काही काळाआधी इश्काशिमपासून निघालेला कच्चा रस्ता ब्रिगेल सीमेपर्यंत पोहचायचा. ब्रिगेल सीमा या कॉरिडोरच्या मध्यात आहे.

फोटो स्रोत, SIMON URWIN
यानंतर पुढे पूर्वेला जायचं असेल तर तुम्हाला एकतर पायी जावं लागायचं किंवा जनावरांचा आधार घ्यावा लागायचा. आता चीनच्या बेल्ट अँड रोडच्या बांधकामाअंतर्गत या रस्त्याची लांबी 75 किलोमीटरने वाढवली आहे. आता हा रस्ता बोजाई गम्बाज गावापर्यंत पोहचतो जो वखाईच्या एकूण लांबीच्या तीन चतुर्थांश आहे.
समर्स म्हणतात की, "हा रस्ता एका जुन्या रस्त्यावर बांधलाय ज्याचा उपयोग आधी किरगिझ मेंढपाळ करायचे. आता इथे बुलडोझर आलेत आणि त्यांनी एक छोटासाच रस्ता बनवला आहे पण इथे नंतर मोठा रस्ता बनवला जाण्याची शक्यता आहे."
असं म्हटलं जातंय की इथे चीन एक रस्ता बांधेल जो चीनी सीमेला बोजाई गम्बाजशी जोडेल. सरतेशेवटी हा रस्ता चीनला मध्य आशियायी बाजारांपर्यंत पोहचण्यासाठी मदत करेल.
चीनकडून आशा
आजम जियाई म्हणतात की चीन त्यांच्या भागात जे बांधकाम करतोय त्यावरून वखाई लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्यात.
ते म्हणतात की काही गोष्टी आमच्यासाठी चांगल्या असतील. "आम्ही चीनमधून बकऱ्या खरेदी करू शकू ज्या इश्काशिम बाजाराच्या तुलनेत स्वस्त असतील. आम्हाला चांगल्या आरोग्य सुविधा मिळू शकतील अशीही आशा आहे."

फोटो स्रोत, Simon urwin
"सध्या आम्हाला मिळणाऱ्या सोयीसुविधा मर्यादित आहेत पण आम्हाला वखाई संस्कृतीच्या जतनाची जास्त चिंता आहे. कारण ही संस्कृती कायमस्वरूपी बदलून जाईल. आमचं इथली शांतता आणि इथल्या निसर्गसौदर्यावर प्रेम आहे.
आम्हाला ट्रॅफिक आणि प्रदूषणाची भीती वाटते. पर्वतीय भागात रस्ता बांधायला बराच वेळ लागतो पण हा रस्ता पुढच्या वर्षांपर्यंत बांधून तयार होईल. चीनी आणि अफगाण दोन्ही सरकारांची हीच इच्छा आहे. आमचं भविष्य काय असेल हे येणारा काळच सांगेल."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








