हिंदू राष्ट्र : हिंदुत्त्ववादी संघटनांची कार्यपद्धती काय आहे? त्यांची संख्या का वाढली?

- Author, विनीत खरे
- Role, बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली
काही वर्षांपूर्वीपर्यंत धर्मनिरपेक्ष भारताला हिंदू राष्ट्राच्या दिशेने नेण्याचा विषय कुणी काढला तर राज्यघटनेच्या आधारावर या गप्पा केवळ काल्पनिक वाटायच्या.
पण आज भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेवर लपून-छपून नव्हे तर प्रसारमाध्यमांमध्ये उघडपणे चर्चा झडताहेत, भाषणं होत आहेत आणि व्हिडिओ बनवले जात आहेत.
नुकतंच भाजपच्या हरियाणातील एक आमदाराने भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा संकल्प सोडला.
बिहार भाजपमधूनही हिंदू राष्ट्र निर्मितीची मागणी करण्यात आली.
भारत हिंदू राष्ट्र आहे आणि यात वादच नसल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
2025 पर्यंत हिंदू राष्ट्राची स्थापना होईल, असं गोव्यात झालेल्या अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाचे आयोजक असणाऱ्या हिंदू जनजागृती समिती या हिंदुत्ववादी संघटनेने म्हटलं होतं.
हिंदू राष्ट्र निर्मितीमध्ये एकीकडे कायदेशीर आणि सामाजिक अडचणी असल्या तरी ही मागणी पुढे रेटण्यात हिंदुत्ववादी संघटना आणि नेत्यांची महत्त्वाची भूमिका आहे. अशा संघटनांची संख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. किती, याची आकडेवारी मात्र उपलब्ध नाही.
नियमित कार्यक्रम, वादग्रस्त आणि धार्मिक भाषणांच्या माध्यमातून सामान्य हिंदूंमध्ये स्वतःचं स्थान टिकवून ठेवण्याचा या गटांचा प्रयत्न असतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा कसा वापर करायचा, प्रसार माध्यमांमध्ये प्राईम टाईमवर कशी पकड मजबूत ठेवायची, याची त्यांना माहिती आहे.
अनेकदा त्यांना फ्रिंज गट किंवा शॅडो आर्मी म्हणतात, ज्यांचा प्रभाव मर्यादित आहे. पण काहींच्या मते हे गट आता काठावर नसून मुख्य प्रवाहात आहेत, समाजात धर्माच्या नावाखाली कट्टरता वाढीस लावत आहेत आणि हिंदू समाजाच्या विचार करण्याच्या दृष्टीकोनावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकत आहेत. प्रत्येकच धर्मातील अशा कट्टर गटांची भूमिका आणि कामाची पद्धत अशीच असते.

फोटो स्रोत, Getty Images
या गटांच्या भरभराटीचा राजकीय लाभ कुणाला होतोय? सामान्य जनतेच्या आयुष्यात या 'फ्रिंज' संघटनांचा स्वीकार कसा वाढला?
पत्रकार आणि लेखक धीरेंद्र झा बऱ्याच वर्षांपासून हिंदुत्त्ववादी विचारसरणीची वाढती पकड या विषयाचा अभ्यास करत आहेत. त्यांनी 'Shadow Armies Fringe Organizations and Foot Soldiers of Hindutva' हे पुस्तक लिहिलं आहे.
यात ते लिहितात, "देशात गेल्या तीन दशकात हिंदुत्त्वाचं राजकारण आश्चर्यकारकरित्या प्रबळ झालं. हिंदुत्त्व ब्रँड पॉलिटीक्सचे अनेक पैलू आहेत. केवळ भाजपच नाही तर त्यांच्या छायेत काम करणारेही मुख्य भूमिकेत आले आहेत."
ते पुढे लिहितात, "या सर्वांचा उद्देश एकच आहे आणि तो म्हणजे एका विशिष्ट समाजाकडे अर्थात हिंदूंकडे विशेष अधिकार असावे आणि राष्ट्रीय अस्मितेची व्याख्यादेखील त्यांनीच करावी."
झा यांच्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना अशा प्रकारच्या राजकारणाचं नेतृत्त्व करते.
हिंदूंच्या हितासंबंधी बोलणाऱ्या हिंदुत्त्वावादी गटांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी थेट संबंध नसला तरी त्यांची विचारसरणी, त्यांचा अजेंडा यावर संघाचा प्रभाव आहे असे आरोप होत असतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत आणि खासदार राकेश सिन्हा हे आरोप फेटाळतात.
बीबीसीशी बोलताना राकेश सिन्हा म्हणाले, "130 कोटी लोकसंख्येच्या या देशात विविधतेमुळे परस्पर विरोधाभास आढळतो. त्यामुळेच लहानसहान अडचणी येत आहेत. लहानसहान वक्तव्यं सगळीकडूनच येत आहेत. ज्या संस्थांचं नाव घेतलं जात आहे त्या संस्थांचे फलक आणि त्यांचे काही सदस्य वगळता त्यांना कोण ओळखतं? त्यांच्या बाजूने कोण उभं राहतं? इलेक्ट्रॉनिक मीडिया नसता तर कदाचित त्या संस्था जगासमोर आल्याही नसत्या. हा तर माध्यमांमध्ये होणाऱ्या चर्चेचा दोष आहे. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काय दोष?"
हिंदुत्त्वाची पताका मिरवणारे
एक नजर टाकूया 'फ्रिंज' मानल्या जाणाऱ्या हिंदू संघटना आणि त्यांच्याशी संबंधित काही व्यक्तींवर. त्यांची विचारधारा काय, त्यावर अंमल करण्यासाठी ते तयाार आहेत का आणि त्यासाठी कुठवर जाऊ शकतात, हे जाणून घेणं रंजक आहे. राजकारणाच्या कॅनव्हासवर त्यांची उपस्थिती मर्यादित दिसते, यात काही शंका नाही.
मात्र, त्यांच्या विचारधारेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी ते काहीही करू शकतात आणि त्यासाठी कुठलीही किंमत मोजायची त्यांची तयारी असते.

फोटो स्रोत, Getty Images
अशा लोकांच्या लांबलचक यादीत एक नाव बजरंग मुनी हेदेखील आहे. उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये असलेल्या बजरंग मुनी यांच्याशी आम्ही झूमवरून बातचीत केली.
बजरंग मुनी खैराबाद येथील महर्षी श्री लक्ष्मण दास उदासी आश्रमाचे महंत आहेत.
काही महिन्यांपूर्वी बजरंग मुनी यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. यात मुस्लीम महिलांवर बलात्काराची धमकी ते देत होते. व्हीडिओवरून बराच गदारोळ झाल्यावर बजरंग मुनी यांनी माफी मागितली. या प्रकरणी त्यांना एप्रिल महिन्यात जामीन मिळाला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
बीबीसीशी बोलताना बजरंग मुनी यांनी त्यांच्या मुस्लीम पोरी-सुनांवर बलात्काराच्या वक्तव्याविषयी सांगितलं होतं, "मी असं म्हणालो होतो की, तुम्ही आमच्या हिंदू मुलींबाबत असं केलं तर आम्ही तसं करू. मी आजही हे मान्य करतो की माझ्या तोंडून निघालेले ते चार शब्द चुकीचे होते. मात्र, तेसुद्धा मी कंडीशनल बोललो होतो."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
बजरंग मुनी यांनी मुस्लीम आणि ख्रिश्चनांची नागरिकता संपवणे आणि लोकसंख्या नियंत्रणासारखे कायदे करण्याच्या मागण्याही केल्या आहेत.
ते पुढे म्हणताात, "आपली फाळणी धर्माच्या आधारावर झाली. (आम्ही) आधीपासूनच हिंदू राष्ट्र आहोत. यांना इथून हाकलून लावण्याची गरज आहे." 2021 च्या फेब्रुवारी महिन्यात कुणीतरी त्यांच्या मणक्यात चाकू खुपसला. त्यामुळे त्यांना चालताही येत नाही, असं बजरंग मुनी यांनी सांगितलं. ते म्हणतात, त्यांना "दिवस-रात्र दुखण्याचा त्रास होतो."
ते म्हणाले, "माझ्यावर नऊ हल्ले झाले. चाकू भोसकला. कुठल्याच मीडियाने हे दाखवलं नाही."
प्रतापगढ जिल्ह्यातील अव्वार गावचे बजरंग मुनी यांचे वडील मध्य प्रदेश पोलिसात होते. इंदूरमधून बीबीए केल्यानंतर 2007 साली त्यांचं कोईम्बतूरला जेट एअरवेजमध्ये सिलेक्शन झालं होतं.
तिथेच त्यांची साधु-संतांशी भेट झाली आणि तिथूनच ते हळूहळू हिंदुत्वाकडे आकर्षित झाले.
सुरुवातीला त्यांनी गोरक्षणाशी संबंधित कामं केली. ते सांगतात, "गो तस्करी करणाऱ्या गाड्या पकडण्याचा प्रयत्न करायचो."
ऑस्ट्रेलियन नागरिक ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांच्या दोन मुलांच्या हत्येच्या प्रकरणात दोषी ठरलेले दारा सिंह 'देवदूत' होते, असं बजरंग मुनी यांचं म्हणणं आहे.
त्यांच्या मते, "त्यांनी (दारा सिंह) निःस्वार्थ भावनेने काम केलं."

फोटो स्रोत, Getty Images
1999 साली ओडिसातील एका गावात ऑस्ट्रेलियन ख्रिश्चन मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांच्या दोन मुलांना जाळून ठार करण्यात आलं होतं. ते तिथे महारोग्यांसाठी काम करायचे.
पण ग्रॅहम स्टेन्स गरीब हिंदूंचं बळजबरीने धर्मंतर करायचे असा कट्टर हिंदुत्त्ववादी गटांचा आरोप होता.
बजरंग मुनी यांच्या मते, "सेक्युलर लोक तर म्हणतीलच की त्याने चूक केली. जी व्यक्ती गेल्या 19 वर्षांपासून तुरुंगात आहे आणि कुठलाच हिंदू त्याला साधी भाकरीही देत नाही, तो इतका छळ सहन करतो आहे. इतर कुणी असतं तर आणखी काही बोलला असता. पण, ती व्यक्ती म्हणते, मी तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर धर्म रक्षणाचंच काम करेन."
सीतापूरपासून काही अंतरावर असलेल्या उत्तर प्रदेशातीलच आग्रा शहरात राहणारे गोविंद पराशर राष्ट्रीय हिंदू परिषद भारत या संघटनेचे अध्यक्ष आहेत.
जगविख्यात ताज महल पूर्वी तेजो महाल मंदिर होतं आणि पुढे ते तोडण्यात आलं, असा गोविंद पराशर यांचा दावा आहे. त्यांच्या या दाव्याला समर्थन देणारे कोणतेही पुरातत्वं पुरावे नाहीत.
काही वर्षांपूर्वी त्यांनी आणि काही हिंदुत्त्ववादी संघटनांनी ताज महालमध्ये आरती करण्याची परवानगी मागितली, त्यावेळी ते चर्चेत आले.
ताज महालाच्या आत असलेल्या कबरींविषयी ते म्हणतात, "ती कबर नाही तेजो महालातली पिंड आहे आणि त्या पिंडीवर थेंब थेंब पाणी पडतं."
गोविंद पराशर पूर्वी बजरंग दलाचे कार्यकर्ते होते. तिथे त्यांच्यावर गोरक्षण, हिंदू आणि मुस्लिमांमधील आंतरधर्मिय विवाह ज्याला काही राजकीय नेत्यांनी आणि मीडियामध्ये 'लव्ह जिहाद' म्हटलं गेलं त्याविरोधात लढा देणे, अशा जबाबदाऱ्या होत्या.
पुढे ताज महालात आरती करण्याची घोषणा केल्याने त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं.
तुरुंगात असताना बजरंग दलाकडून कुठलीही मदत मिळाली नाही आणि त्यामुळे आपण ती संघटना सोडून स्वतःची नवीन संघटना स्थापन केल्याचं गोविंद पराशर यांचं म्हणणं आहे.
देशभरात राष्ट्रीय हिंदू परिषद भारत या संघटनेचे जवळपास दोन लाख सदस्य असल्याचा पराशर यांचा दावा आहे. "हिंदूंची प्रगती, आपल्या बंधू-भगिनींना मदत कशी करायची, गोमातेला कशी मदत करायची, हे आपल्या हिंदू बांधवांना समजावून सांगणं", हे या संघटनेचं काम असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
आता जाणून घेऊया उत्तर प्रदेशापासून दूर मध्य प्रदेशातील भोपाळमधील 'संस्कृती बचाव मंच' या हिंदुत्ववादी गटाविषयी. या संघटनेचं ब्रीदवाक्य आहे - हमारी संस्कृती, हमारी धरोहर (आमची संस्कृती, आमचा वारसा)
व्हॅलेंटाईन्स डे, रेन डान्स पार्टी, हे सगळं भारतीय संस्कृती बिघडवण्याचं षडयंत्र असल्याचं या मंचाचे चंद्रशेखर तिवारी यांचं मत आहे.
हिंदू-मुस्लीम विवाह रोखण्याचा प्रयत्न करणे, "हिंदू मुला-मुलींना समजावणे, संस्कार शिबीरं आयोजित करणे, लोकांना मंदिरात जाण्यासाठी प्रेरित करणे, घरी रामायण, हनुमान चालिसा पठण करण्यासाठी प्रेरित करणे" ही या मंचाची कामं आहेत.
ही ती काही नावं आणि संघटना आहेत, ज्यांचा उदय गेल्या काही वर्षात झाला.

फोटो स्रोत, Getty Images
सनातन संस्था, हिंदू युवा वाहिनी, बजरंग दल, श्री राम सेना, हिंदू एक्या वेदी सारख्या संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून सक्रीय आहेत.
आता राम सेना, हिंदू सेना, सनातन धर्म प्रचार सेवा समिती, करनी सेना, विश्व हिंदू महाकाल सेना यासारखे अनेक हिंदुत्त्ववादी गट मैदानात आहेत.
या संघटनांची कार्यपद्धती काय आहे?
पत्रकार आणि लेखक धीरेंद्र झा यांच्या मते गेल्या काही वर्षात स्थापन झालेल्या हिंदुत्त्वावादी संघटना आणि गटांचा नेमका आकडा शोधून काढणं शक्य नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अनेक संघटना किंवा गटांचं अस्तित्व अगदी काही काळापुरतंच असतं. विशिष्ट हेतू किंवा वादापुरते ते अस्तित्त्वात येतात आणि हेतू पूर्ण झाल्यानंतर गायब होतात.
ते म्हणतात, "गेल्या काही वर्षात जी नावं पुढे आली आहेत त्यांचा विशिष्ट हेतू होता. (या गटांचे) फूट सोल्जर्स छोट्या-छोट्या प्रलोभनांना बळी पडतात. मात्र, त्यांच्या नेत्यांचा ट्रॅक रेकॉर्ड तपासला तर त्यांचा कुठल्या ना कुठल्या प्रस्थापित हिंदुत्त्ववादी संघटनांशी दिर्घकाळापासून संबंध असल्याचं दिसतं."
आग्र्यातील एक ज्येष्ठ पत्रकार नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगतात की, गेल्या तीन-चार वर्षात पश्चिम उत्तर प्रदेशात जवळपास 60 लहान-लहान गटांचा उदय झाला. यापैकी अनेकांना कुणी ओळखतही नाही, त्यांचं रजिस्ट्रेशनही झालेलं नाही आणि हे गट कुठल्याही नियंत्रणाशिवाय मनमानी पद्धतीने काम करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
या पत्रकाराच्या मते मोजकी सदस्यसंख्या असणारे हे गट मोठ्या संघटनांच्या छत्रछायेत काम करतात आणि जेव्हा आग पसरते तेव्हा मोठ्या संघटना स्वतःला त्यांच्यापासून दूर सारतात. अनेक गट लहान मंदिरातून त्यांचे उपक्रम राबवतात आणि सामान्य लोक किंवा व्यापाऱ्यांकडून देणगी घेऊन निधी उभारतात, असंही ते सांगतात.
अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ते संजय जाट म्हणतात, "जेव्हापासून योगी सरकार आलं आहे, भाजपचं सरकार आलं आहे तेव्हापासून कुठे ना कुठे हा ग्राफ (हिंदुत्त्ववादी संघटनांच्या संख्येचा) वाढला आहे. हे आम्ही ठामपणे सांगतो." ते पुढे म्हणतात, "हिंदुत्व जागृत झालं आहे. प्रभू श्री राम आणि भगव्या झेड्यांवरचं प्रेम वाढलं आहे. ज्यांना मुघलांनी दडपलं ते गेल्या अनेक दशकांपासून दडपून बसले होते. जेव्हा भाजप सरकार आलं तेव्हा नवीननवीन संघटना निर्माण झाल्या."
गेल्या काही वर्षात हिंदुत्ववादी संघटनांची संख्या का वाढली?
गोविंद पराशर म्हणतात की, भाजप सरकारच्या काळात, "काहीजण आपला जीव वाचवण्यासाठी भगव्यात आले. काही गुन्हेगारही संघटनांमध्ये आले. 100 रुपयांचा दुपट्टा गळ्यात घातला आणि झाले भगवाधारी. कुणी संघटनांमध्ये घुसलं, कुणी संघ परिवारात घुसलं."
ते पुढे सांगतात, "अशाही घटना घडल्या आहेत ज्यात या संघटनांचे लोक पोलिसांच्या हाती लागले की ते स्वतःला हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असल्याचं सांगून पोलीस आपल्याशी नरमाईने वागतील, अशी आशा करतात आणि पोलीसही ते (एक हिंदुत्त्ववादी पक्ष) सत्तेत आहेत आणि (हे लोक) गदारोळ निर्माण करतील असा विचार करून नरमाईने घेतात."
पत्रकार आणि लेखक धीरेंद्र झा म्हणतात, "गेल्या सात-आठ वर्षात असे गट बरीच सक्रीय झाले, असं म्हणायला हवं. याचं कारण म्हणजे यांना प्रशासनाचा आश्रय आहे. भाजपचं सरकार असणाऱ्या राज्यांमध्ये अशा संघटना अधिक सक्रीय आहेत. ध्रुवीकरण हा भाजपच्या राजकारणाचा आधार आहे. भाजप एक राजकीय पक्ष आहे जो घटनेला बांधील आहे. त्यामुळे त्यांना गरजेची असलेली बरीच कामं हा पक्ष करू शकत नाही - उदा. ध्रुवीकरण करणे. अशी कामं या संघटना करतात."

फोटो स्रोत, Getty Images
भाजपचे नेते मात्र ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा आक्षेप फेटाळून लावत 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास,' हे आमचं ब्रीदवाक्य असल्याचं सांगतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचे भाजप खासदार राकेश सिन्हा म्हणतात, "अशा प्रकारची वादग्रस्त संभाषणं म्हणजे एखाद्या समाजाविषयी चर्चा नसते. त्यातून समाजाची विचारधारा बनत नाही. अशा गोष्टींना महत्त्व देऊन आपण आपलेच पूर्वाग्रह दाखवत असतो. एखादी संस्था, एखादं आंदोलन ज्यांची ऐतिहासिक भूमिका आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची किंवा हिंदुत्त्ववादी चळवळीची त्यावर आक्रमण करण्यासाठी, त्याला दोषी ठरवण्यासाठी फ्रिंज घटकांद्वारे केलेली वक्तव्यं, त्यांच्या कृतींचा दाखला देत शंभर वर्ष जुनी चळवळ आणि संस्था, त्याचं नेतृत्त्व, त्यांच्या विचारधारा यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं, हा अपप्रचाराचा एक मार्ग आहे. आपण यातून बाहेर पडायला हवं."
स्वित्झर्लंडच्या झुरिक विद्यापीठातील ज्येष्ठ संशोधक आणि सामाजिक मानसशास्त्रज्ञ म्हणजेच अँथ्रोपॉलॉजिस्ट सत्येंदर कुमार अशा संघटनांच्या वाढत्या संख्येमागचं कारण सांगतात.
सत्येंदर कुमार यांच्या मते देशात रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. राजकीय शत्रू तयार झालेत. समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या लोकांमध्ये आपण हिंदू आहोत आणि त्याचं प्रदर्शन करण्याची ओढ वाढली आहे. इंग्रजीला श्रेष्ठत्वाशी जोडणाऱ्या देशातील उच्चभ्रू वर्गावर भाषिक लोकांचा रोष आहे. पदवी असूनही तरुणांच्या हाताला रोजगार नाही. सरकारी व्यवस्था मानसिकरित्या सुरक्षा देत नाही, अशी सर्वसामान्यांची भावना आहे.
सत्येंदर कुमार म्हणतात, "रोजगार नसेल तर तसंही कुणी तुमचा आदर करत नाही. अशावेळी तुम्ही एखाद्या संघटनेचे कार्डधारक बनता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता तुमचं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही."
पत्रकार आणि लेखक धीरेंद्र झा म्हणतात, "जेव्हा समाजात बेरोजगारी एवढी वाढली आहे, बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याऐवजी सरकार काहीही करत नाही, उलट रोजगार संपवण्याचं काम सुरू आहे. याचा परिणाम असा होतो आहे की तरुण सहज त्या जाळ्यात खेचले जातात. त्यांना आपण ताकदवान आहोत, असं वाटू लागतं."
सत्येंदर कुमार उत्तर प्रदेशातील एका विद्यापीठात शिकवत असताना त्यांना आलेला अनुभव सांगताना म्हणतात की तिथले बहुतांश विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या हिंदू संघटनांशी संबंधित आहेत.
ते म्हणतात, "तरुणांचा एक मोठा वर्ग असा आहे ज्यांच्यासाठी कुठल्याच संधी नाहीत. संधीच्या नावाखाली 8-10 हजार रुपयांची नोकरी आहे. हे तरुण 20 वर्षांनंतरही अशीच 8-10 हजार रुपयांची नोकरी करतील. त्यांच्याकडे सेव्हिंग्ज नसेल, ना घर, ना मेडिकल सुविधा. ते त्यांच्या आई-वडिलांच्याच घरात राहतील."
ते पुढे सांगतात, "यासोबतच एक सांस्कृतिक जाळं विणलेलं आहे की कुणीतरी तुमचा शत्रू कसा आहे - ते जे तुमचा रोजगार हिरावून घेतात. यात परप्रांतीय आहेत, इतर धर्मीय आहेत. धार्मिकता आयडेंटीटीची आहे. ती आचार-विचार किंवा नैतिकतेची नाही. ती आपली ओळख ठसवण्याची आहे की आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही कुणापेक्षाही कमी नाही."
"जे इंग्रजी किंवा पंजाबी माध्यमातून शिकून आलेले होते त्यांना अपमानित केलं जायचं. असं करून त्यांना वाटतं की ते पाश्चिमात्य सांस्कृतिक हल्ल्याविरोधात लढा देत आहेत. त्यांना अभिमानाने हिंदू ही ओळख दाखवायची होती कारण हिंदूंना कुणी विचारत नव्हतं. हे सर्व घटक एकत्र आले."

सत्येंदर कुमार यांच्या मते या कथित 'फ्रिंज' संस्थांना लोकांमध्ये त्यांच्या भाषिक आणि सांस्कृतिक अपमानाविषयी अस्वस्थता असल्याची जाणीव होती.
ते म्हणतात, "2014 साली हे सर्व घटक एकत्र आले. हे प्रकरण खूप दिवसांपासून सुरू होतं. यात गेल्या सरकारचंही अपयश आहे. लोक बाहेरून आले आणि आमच्यावर राज्य करून गेले - ही भावना लोकांमध्ये होती. या भावनेचा वापर करण्यात आला."
हिंदुत्त्ववादी संघटनांमध्ये 'उच्चवर्णियां'चं वर्चस्व?
'Shadow Armyies Fringe Organizations and Foot Soldiers of Hindutva' या पुस्तकात लेखक धीरेंद्र झा लिहितात की हिंदुत्त्ववादी संघटनांमध्ये प्रत्यक्ष ग्राउंडवर्क करणारे बहुतांश त्या जातीतले असतात ज्यांना समाजात 'खालच्या जातीचे' म्हटलं जातं आणि ज्या हिंदुत्त्वासाठी त्यांनी आपली सगळी शक्ती पणाला लावली आहे ते दुसरं तिसरं काहीही नसून ब्राह्मणवाद आहे.
ते लिहितात, "हिंदू धर्मातली वाढती 'धार्मिकता' आणि 'इतरांचा' द्वेष करण्यात ते इतके आंधळे झाले आहेत की ज्या हिंदुत्त्वासाठी ते काम करत आहेत ते हिंदुत्त्व ब्राह्मण आणि उच्चवर्णियांच्या ऐतिहासिक वर्चस्वाला कशाप्रकारे पुनरुज्ज्वीत करू इच्छितो, हेदेखील त्यांना दिसत नाहीय."
श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिकच्या मागासवर्गीय सहकाऱ्याशी संघात जातीवरून कसा भेदभाव केला जायचा, याचा उल्लेख पुस्तकात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
प्रमोद मुतालिकचा एक सहकारी म्हणतो, "संघात तुम्हाला कुणी काही म्हणणार नाही. पण, तिथे सगळं ब्राह्मणांच्या फायद्यासाठी होतं. खालच्या जातीतील लोकांना कमी दर्जाची कामं करावी लागतात. तुम्ही त्याला वाईट काम म्हणू शकता - उदा. रस्त्यावर मारामारी करणं."
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ब्राह्मण किंवा उच्चवर्णियांचा प्रभाव आहे, अशी टीका कायम झाली आहे. पण संघाला ही टीका मान्य नाही. सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की हिंदू समाजात अस्पृश्यता, असमानता या मोठ्या समस्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी वेळ लागेल.
एकेठिकाणी मोहन भागवत म्हणाले होते की, एक दलित व्यक्तीही सरसंघचालक बनू शकते.
जातीच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाविषयी मोहन भागवत कठोर शब्दात म्हणाले होते की, आम्ही जातीभेद मानत नाही. आम्ही संघात लोकांची जात विचारत नाही. हा आमच्या संस्कृतीचा भाग नाही.
भोपाळचे चंद्रशेखर तिवारी पूर्वी बजरंग दलात होते. वयाच्या बाराव्या वर्षीपासून त्यांनी मंदिरात सेवा द्यायला सुरुवात केली. 'हिंदुत्त्वासाठी' काम करताना त्यांना तीन दशकांहून अधिक काळ झाला आहे.
18 वर्षांपूर्वी काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांच्या कार्यकाळात त्यांनी 'संस्कृती बचाओ मंचा'ची स्थापना केली. या संघटनेचं ब्रीदवाक्य आहे - हमारी संस्कृती, हमारी धरोहर (आमची संस्कृती, आमचा वारसा).
चंद्रशेखर तिवारी यांच्या मते हिंदुत्त्ववादी संघटनांमध्ये 'उच्चवर्णियां'चं वर्चस्व केवळ एक भ्रम आहे आणि हिंदू समाज संघटित होऊ नये, यासाठी हा भ्रम निर्माण करण्यात आला आहे.
ते म्हणतात, "माझा जिल्हा अध्यक्ष धानुक जातीचा आहे. आम्ही गेल्या 8 वर्षांपासून 'चुनरी यात्रा' काढतो आणि विधीवत त्या मंदिरात आम्ही दोघं मिळून पूजा, आरती करतो आणि तिथून आमची यात्रा सुरू होते."
संघाचे माजी स्वयंसेवक आणि राम मंदिरासाठी 1990 साली पहिल्या कारसेवेत सहभागी झालेले दलित समाजाचे भंवर मेघवंशी या मताशी सहमत नाहीत.
भंवर यांच्या मते 1991 साली त्यांना सांगण्यात आलं होतं की हिंदू संघटनांशी संबंधित साधू-महंत त्यांच्या घरी जेवणार नाही. त्यामुळे त्यांनी जेवण पॅक करून द्यावं जेणेकरून पुढच्या गावात साधू-महंतांना ते देता येईल. मात्र, त्यांना हे सांगितलं जाणार नाही की हे जेवण एका दलिताच्या घरचं आहे. मात्र, नंतर त्यांना कळलं की जेवणाची पाकिटं फेकून देण्यात आली होती.
भिलवाडाातील सिलदियास गावात राहणारे आणि आता जयपूरमध्ये स्थानिक झालेले भंवर सांगतात, "मला वाटलं की मी तुमच्यासाठी राम मंदिरासाठी मरायला तयार आहे आणि तुम्ही माझ्या घरचं जेवायला तयार नाही."
भंवर सांगतात की त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांपुढे आपली तक्रार मांडली. मात्र, त्यावर सुनावणी झालीच नाही. त्यामुळे ते संघातून बाहेर पडले.
इतक्या वर्षात हिंदू संघटनांमध्ये ओबीसी आणि दलितांची संख्या वाढली असली तरी सत्ता अजूनही 'उच्चवर्णियां'च्या हाती असल्याचं भंवर मेघवंशी यांचं म्हणणं आहे.
भविष्यतील भारत कसा असेल?
हिंदुत्ववादी संघटना वारंवार हिंदू राष्ट्र निर्मितीची मागणी करतात.
उत्तर प्रदेशात हिंदू युवा वाहिनीचे संस्थापक मंत्री राम लक्ष्मण यांच्या मते, "भारत एक हिंदू राष्ट्र बनावं आणि हिंदुत्त्वाकडे आकृष्ट व्हावं, ही आमची इच्छा आहे. नेपाळ असा देश होता जो पूर्णपणे 'हिंदू राष्ट्र' होता. मात्र, ते ही संपलं. आपल्यासमोरच संपलं."
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 2002 साली स्थापन झालेल्या या हिंदू युवा वाहिनीचे प्रमुख संरक्षक आहेत.
राम लक्ष्मण यांच्या मते, त्यांची 'बिगर राजकीय, सांस्कृतिक संघटना' तिथे काम करते 'जिथे हिंदूंचा छळ होतो, जिथे हिंदूंवर आघात होतो, जिथे हिंदू धर्म आणि संस्कृतीवर संकट येतं.'
त्यांच्या संघटनेबाबत पोलीस प्रशासनाच्या भूमिकेविषयी बोलताना ते सांगतात, "आम्ही चुकीचे असू तर आम्हाला तुरुंगात टाका. हिंदुत्वाचं काम करणं चुकीचं असेल तर आम्ही शंभरवेळा चुका करू. आम्ही राज्यघटनेच्या अधीन राहूनच काम करतो."
मात्र, यती नरसिंहानंद असो किंवा हिंदुत्ववादी संघटनांचे नेते, प्रशासनावर या सर्वांप्रती नरमाईची भूमिका घेत असल्याचे आरोप होतात. पोलिसांनी कायम या आरोपांचं खंडन केलं आहे. मात्र, असे आरोप सुरूच आहेत.
यती नरसिंहानंद आणि नुपूर शर्मा यांच्याबाबत पोलिसांच्या वागणुकीची तुलना मोहम्मद झुबेरसारख्या प्रकरणांशी केली जाते आणि हिंदुत्ववादी गटांना राजकीय आश्रय मिळत असल्याचेही आरोप होतात.
पत्रकार आणि लेखक धीरेंद्र झा भाजप नेते जयंत सिन्हा यांच्या लिंचिंग प्रकरणातील आरोपींना पुष्पहार घालण्याच्या घटनेची आठवण करून देतात.
अशा सर्व परिस्थितीत प्रश्न पडतो की या हिंदुत्त्ववादी संघटनांचा भविष्यातील राष्ट्रीय धोरणांवर किती परिणाम होईल, भारतातील राजकारण आणि निवडणुकांवर त्यांचा किती प्रभाव असेल?
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








