हेलफायर R9X : अयमान अल जवाहिरीच्या मृत्यूमुळे अमेरिकेचं ‘निंजा मिसाईल’ चर्चेत

    • Author, बर्नार्ड डेब्युसमान ज्युनियर, बीबीसी न्यूज
    • Role, ख्रिस पार्टरिज, बीबीसी शस्त्रास्त्र तज्ज्ञ

31 जुलैची सकाळ. सूर्योदयानंतर साधारण तासाभरानं अल कायदाचा हा म्होरक्या अयमान अल जवाहिरी काबुलमधल्या त्याच्या घराच्या बाल्कनीत आला. नमाजनंतरचा जवाहिरीचा हा आवडता दिनक्रम असल्याचं सांगितलं जातंय.

पण त्या दिवशी जवाहिरीनं केलेलं ते शेवटचं कृत्य ठरलं.

स्थानिक वेळेनुसार सकाळी 06:18 वाजता (भारतीय वेळेनुसार 07:18 वाजता), दोन क्षेपणास्त्रं जवाहिरीच्या बाल्कनीतून आत घुसली.

71 वर्षांच्या जवाहिरीचा जागीच मृत्यू झाला पण त्याची पत्नी आणि मुलीला त्याच घरात असूनही साधं खरचटलंही नाही. या हल्ल्यात झालेलं नुकसान केवळ बाल्कनीपुरतं मर्यादित होतं.

असा अचूक आणि नेमका हल्ला कसा काय शक्य झाला?

खरं तर याआधी अनेकदा ड्रोननं केलेल्या हल्ल्यांमुळे सामान्य नागरिकांचीही हत्या झाल्यामुळे अमेरिकेवर खूप टीका झाली होती. पण या हल्ल्यात तसं काही झालं नाही.

जवाहिरीच्या नेहमीच्या सवयींचा अभ्यास आणि एका विशिष्ट प्रकारच्या नव्या क्षेपणास्त्रामुळे हे साध्य झालं.

हेलफायर मिसाईल काय आहे?

अमेरिकेनं या हल्ल्यासाठी ड्रोननं डागल्या जाणाऱ्या हेलफायर क्षेपणास्त्राचा वापर केल्याचं काही अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. हेलफायर हे एक हवेतून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र असून 9/11च्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या परदेशातील दहशतवादविरोधी मोहिमांचा ते महत्त्वाचा भाग बनलं आहे.

हे क्षेपणास्त्र हेलिकॉप्टर, जमिनीवरची वाहनं, जहाजं, काही लढाऊ विमानं आणि ड्रोन मानवविरहीत वाहनातूनही डागता येतं. 2020 साली अमेरिकेनं इराणचे लष्करप्रमुख कासेम सुलेमानी यांना बगदादमध्ये मारण्यासाठी हेलफायर क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचं मानलं जातं. 2015 साली सीरियामध्ये 'जिहादी जॉन' नावानं ओळखला जाणारा इस्लामिक स्टेट संघटनेचा ब्रिटिश जिहादी अतिरेकी याच हेलफायरची शिकार ठरल्याचंही सांगितलं जातं.

अशा मोहिमांसाठी हेलफायरचा वापर करण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे या क्षेपणास्त्राची अचूकता.

ड्रोनमधून जेव्हा एखादं मिसाईल डागतात (लाँच करतात) तेव्हा एक वेपन ऑपरेटर (अस्त्र चालवणारी व्यक्ती) ते नियंत्रित करत असतो.

हा ऑपरेटर कधीकधी हजारो मैल दूर अमेरिकेत एखाद्या एसी रूममध्ये बसून हे काम करत असू शकतो. त्या व्यक्तीला ड्रोनचे कॅमेरा सेन्सर्स आणि सॅटेलाईटद्वारा नियोजित लक्ष्याचा व्हीडियो फीड सतत पाहता येतो.

ऑपरेटरला स्क्रीनवर एक चौकट म्हणजे 'टारगेटिंग ब्रॅकेट' दिसत असते, ज्याचा वापर करून ऑपरेटर लक्ष्य निश्चित करू शकतो आणि त्यावर एक लेसर सोडतो. एकदा क्षेपणास्त्र डागलं, की ते त्या लेसरचा मागोवा घेत लक्ष्यावर जाऊन धडकतं.

यात कुठली अतिरीक्त जीवितहानी टाळण्यासाठी असा हल्ला करण्याआधी काही अत्यावश्यक आणि ओळीनं आखलेल्या नियमांचं पालनं होणं गरजेचं आहे. याआधी अमेरिकन सैन्य किंवा सीआयएनं केलेल्या अशा हल्ल्यांसाठी कधीकधी सैन्याचे वकील आणि तज्ज्ञांकडून सल्लाही घेतला जायचा आणि मगच अशा हल्ल्याचा आदेश देता यायचा.

हेलफायर R9Xनं कसा साधला अचूक लक्ष्यवेध?

ड्रोननं टारगेटेड हल्ल्यांविषयीचे अभ्यासक आणि सिराकस विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर पॉलिसी अँड लॉ या संस्थेचे संस्थापक प्राध्यापक विल्यम बँक्स त्याविषयी माहिती देतात. ते सांगतात की लक्ष्य किती महत्त्वाचं आहे आणि त्यात किती सामान्य नागरिकांच्या मृत्यूचा धोका आहे याची तुलना अधिकाऱ्यांना करावी लागते.

जवाहिरीवरचा हल्ला हा अशाच नेमक्या अभ्यासाचं फलित आहे असं मत ते मांडतात. "असं दिसून येतंय की त्यांनी अगदी काळजीपूर्वक आणि निर्धारानं त्याला एकट्यालाच गाठण्यावर भर दिला. त्यामुळेच केवळ जवाहिरीला मारणं आणि इतर कुणालाही इजा न पोहोचवणं त्यांना शक्य झालं"

जवाहिरीला मारण्यासाठी हेलफायर R9X या क्षेपणास्त्राचा वापर केला असल्याची चर्चा आहे, पण अमेरिकेनं त्याला पुष्टी दिलेली नाही.

हेलफायर क्षेपणास्त्राच्या या प्रकाराविषयी तुलनेनं फारशी माहिती उपलब्ध नाही. पण हे क्षेपणास्त्र स्फोट घडवून आणण्यापेक्षा एका वेगळ्या पद्धतीनं लक्ष्य नष्ट करतं.

या क्षेपणास्त्रावरची सहा धातूची पाती अखेरच्या क्षणी बाहेर येतात आणि ज्याच्यावर हल्ला झाला आहे त्या व्यक्तीला कापून काढतात. क्षेपणासात्राच्या वेगानं मिळालेली उर्जा या प्रक्रियेत मदत करते.

2017 साली जवाहिरीच्या हाताखाली काम करणारा अल कायदाचा अन्य एक जिहादी अबु खायर अल-मासरी याला अशाच हेलफायर R9X क्षेपणास्त्रानं सीरीयामध्ये मारल्याचं सांगितलं जातं. हल्ल्यानंतर अल-मासरीच्या वाहनाचे फोटो समोर आले होते. त्यात गाडीचं छत फोडून क्षेपणास्त्र अस्त्र आत घुसलं होतं आणि त्यानं आतल्या प्रवाशांचे तुकडे केले होते. पण कुठला स्फोट किंवा गाडीला आणखी काही नुकसान मात्र झालं नव्हतं.

जवाहिरीचा शोध कसा लागला?

अमेरिकेला जवाहिरीचा ठावठिकाणा कसा लागला आणि त्यांनी कशी पाहणी केली याविषयीची माहिती अजून समोर येते आहे.

पण त्यांनी एवढी माहिती जमा केली होती की जवाहिरीच्या रोजच्या सवयींविषयीही त्यांना सगळं ठाऊक झालं होतं. त्यामुळेच तो रोज नामाजनंतर बाल्कनीत येतो, हे लक्षात आलं.

याचा अर्थ अमेरिकन हेर या घरावर महिनोन महिने नाही तरी निदान काही आठवडे तरी लक्ष ठेवून होते. काही तज्ज्ञांचा अंदाज आहे की यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबिल्या गेल्या असू शकतात. त्यासाठी जमिनीवरून दिसणारही नाही अशा ड्रोन किंवा विमानांचाही वापर केलेला असू शकतो.

सीआयएमधले एक माजी उच्चाधिकारी मार्क पॉलीमरोपोलोस यांनी बीबीसीला सांगितलं की, "तुमच्याकडे इतकी अचूक माहिती असायला हवी, की ही तीच व्यक्ती आहे जिला मारायचं आहे. ही मोहीम कोणत्याही कोलॅटरल डॅमेजशिवाय म्हणजे कोणत्याही सामान्य लोकांच्या मृत्यूशिवाय पार पाडता येईल याचीही तुम्हाला खात्री पडायला हवी. "

मार्क सांगतात की अमेरिकन गुप्तहेर खात्याला अल कायदा आणि अन्य अतिरेकी संघटनांशी निगडीत लोकांवर पाळत ठेवण्याचा दशकांचा अनुभव आहे, त्याचा जवाहिरीवरील हल्ल्याच्या वेळेस फायदा झाला.

"यात आमचा हात कुणी धरू सकत नाही, वीस वर्षांत अमेरिकन सरकार अशा हल्ल्यांमध्ये तरबेज झालं आहे आणि सुरक्षितपणे ते असे हल्ले करू शकतात."

पण अशा मोहिमा नेहमीच ठरल्याप्रमाणे पार पडतात असं नाही. 29 ऑगस्ट 2021 रोजी काबूल विमानतळाजवळ इस्लामिक स्टेट गटाच्या काही स्थानिक सदस्यांना मारण्यासाठी एका कारवर ड्रोन हल्ला केला गेला, पण त्यात दहा निरपराधांचा मृत्यू झाला. अमेरिकेचं संरक्षण मुख्यालय अर्थात पेंटागॉननं आपली 'दुर्दैवी चूक' झाल्याचं मान्य केलं.

फाऊंडेशन फॉर डिफेन्स फॉर डेमॉक्रसीज या संस्थेतले सीनियर फेलो बिल रॉजियो गेली अनेक वर्ष अमेरिकेच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा अभ्यास करत आले आहेत.

ते सांगतात की जवाहिरीवरचा हल्ला हा कदाचित आधीच्या हल्ल्यांपेक्षा जास्त कठीण असावा कारण तिथे जमिनीवर अमेरिकन सरकारचं किंवा कुठल्या पाठिराख्यांचं अस्तित्व नाही.

याआधी अमेरिकेनं पाकिस्तानात अनेकदा ड्रोन डागले आहेत, ते शेजारच्या अफगाणिस्तानातून जिथे अमेरिकन सैन्याचा तळ होता. तर सीरीयामधले ड्रोन हल्ले इराकमधून केले गेले, जिथे अमेरिकेचं अस्तित्व आहे.

"पाकिस्तान किंवा सीरीयात पोहोचणं अमेरिकन ड्रोन्ससाटी सोयीचं होतं, कारण निगराणीसाठी जमिनीवर आपली माणसं ठेवणं त्यांना शक्य होतं. पण जवाहिरीवरचा हल्ला इतका सोपा नव्हता. अमेरिकेनं अफगाणिस्तान सोडल्यानंतर अल कायदा किंवा इस्लामिक स्टेटविरुद्ध तिथे केलेला हा पहिलाच हल्ला होता. असं सहसा होत नाही."

असा हल्ला पुन्हा होऊ शकतो?

बिल रॉजियो सांगतात की अल कायदा समर्थकांविरुद्ध अफगाणिस्तानात असे हल्ले पुन्हा झाले, तर आश्चर्य वाटायला नको.

"अनेकजण अमेरिकेच्या लक्ष्यावर आहेत. अल कायदाचा पुढचा म्होरक्या अफगाणिस्तानातला नसेल तर तो तिथे जाऊन राहण्याची शक्यता आहे."

"प्रश्न असा आहे की असे हल्ले सहजपणे करण्याची अमेरिकेची क्षमता कायम राहील का, की येत्या काळात परिस्थिती कठीण होत जाईल?"

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)