You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युक्रेनमध्ये विकलांग आणि अनाथ मुलांना पलंगाला बांधून ठेवतात कारण...
- Author, रुथ क्लेग
- Role, बीबीसी प्रतिनिधी
वेसिल वेलिच्यको या मुलाला रणरणत्या उन्हात तासन्तास एका बेंचाला बांधून ठेवलं आहे. त्याचा आक्रोश कोणालाही ऐकू येत नाहीये.
18 वर्षीय वेसिल युक्रेनमधील हजारो अनाथ मुलांपैकी एक आहे. बीबीसीला अशा पाच अनाथाश्रमात प्रवेश मिळाला. तिथे त्यांना मिळत असलेली हीन वागणूक आम्हाला दिसली. त्यात अनेक पौगडांवस्थतेली मुलं आणि मोठी माणसं होती. त्यांना कितीतरी दिवस पलंगाला बांधून ठेवलं होतं.
जोपर्यंत या संस्था बंद करत नाहीत तोपर्यंत युक्रेनने युरोपियन युनियनमध्ये जाऊ नये असं तिथल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
रशियाविरुद्ध युद्ध सुरू होण्यापूर्वीच ही व्यवस्था सुधारण्याचं आश्वासन युक्रेनने दिलं होतं.
वेसिलला फिट्स येण्याचा त्रास आहे. तो गतिमंद आहे. युक्रेनच्या दक्षिण पश्चिम भागातील चेर्निव्तसी भागात तो राहतो.
वेसिल ने नॅपी घातलं आहे. तो सारखा मागे पुढे हलतो. अध्येमध्ये जोरजोरात ओरडतो. मात्र तिथले कर्मचारी काहीही प्रतिक्रिया देत नाहीत.
हे कर्मचारी थकले आहेत, त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण आहे त्यामुळे त्यांना बांधून ठेवलं की त्यांच्यावर लक्ष ठेवणं सोपं जातं हे त्यांन कळलं आहे.
पूर्व भागातून अनेक लोकांना वाचवण्यात आलं आहे आणि त्यांना इथे आणण्यात आलंय त्यामुळे या कर्मचाऱ्यांवरचा ताण वाढला आहे. मात्र वेसिल सारख्या लोकांना ज्या पद्धतीने वागवण्यात येतं ते रशियाने हल्ला करण्याच्या पूर्वीपासून आहे.
वेसिलच्या बाजूला आणखी एक तरुण मुलगा आहे. त्याचे हातही बांधून ठेवण्यात आले आहेत. त्याचे डोळे शून्यात लागले आहेत. ते फक्त भिंतीकडे आणि खाली साचलेल्या त्यांच्याच मुत्राकडे पाहत असतात.
हे दिव्यांग मुलं युक्रेनमधल्या लाखो अनाथ मुलांपैकी एक आहेत. ते अनाथाश्रमात राहतात आणि त्यांच्यापैकी अनेक मुलं अनाथही नाहीत.
त्यांच्यापैकी अनेकांची कुटुंबं आहे पण जगण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा नसल्याने त्यांना येथे यावं लागतं.
वेसिलच्या कुटुंबीयांचं असं म्हणणं आहे की त्याला तसं सोडून देण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता.
जेव्हा ते अगदी लहान होता तेव्हा त्यांनी युकेमधील अनेक मेंदूविकारतज्ज्ञांशी संपर्क केला.
मात्र युक्रेनमधली आरोग्यव्यवस्था अतिशय वाईट आणि सामाजिक सुविधा वाईट असल्यामुळे त्यांना घरी त्याची काळजी घेणं अशक्य झालं. कारण त्याला सारख्या फिट्स येत आणि तो वारंवार आक्रमक व्हायचा.
जेव्हा तो पाच वर्षांचा झाला तेव्हा स्थानिक प्रशासनाने सांगितलं की अनाथाश्रम त्याच्यासाठी सर्वोत्तम आहे.
"दिव्यांग मुलांचे पालक होणं फार कठीण आहे." असं वेसिलची आई त्याचा हात किंचित दाबत सांगते. मात्र त्याला बांधून ठेवलेलं पाहून तिला फारसा फरक पडलेला दिसत नाही.
"मला युक्रेनमध्ये असल्याचा अभिमान आहे. मात्र आम्हाला सरकारकडून अधिक मदत हवी आहे. आम्ही युकेमध्ये असतो तर आमचा मुलगा आमच्याकडे असता." त्या पुढे सांगतात.
त्या सांगतात की वेसिलला तिथे ठेवल्यावर पहिली काही वर्षं अत्यंत कठीण होती. आम्ही रडत घरी येत असल्याचं त्या सांगतात. आता आम्हाला या परिस्थितीची सवय झाली आहे असं त्या म्हणतात.
युरोपात युक्रेनमध्ये सर्वांत जास्त मुलं अनाथश्रमात राहतात. सोव्हिएतचा पाडाव झाल्यानंतर मुलं अशा प्रकारे देऊन टाकणं फार सोपं झालं त्यामुळे अधिकाधिक मुलांची दैना झाली.
अशा संस्थांमध्ये मुलांची योग्य काळजी घेतली जाते असा समज आजही युक्रेनच्या समाजात आहे.
शेजारच्या रोमानियाने त्यांच्या देशातली अनाथाश्रमं 1989 च्या उठावानंतर बंद केली. तिथे मुलं अत्यंत वाईट परिस्थितीत राहत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
युक्रेनमध्ये रशियाने हल्ला करण्याच्या आधी दरदिवशी 250 मुलं अशा अनाथश्रमात आयुष्यभरासाठी येत असतात.
अशी 700 केंद्रं या देशात आहेत. त्यांना शासनाकडून दरवर्षी 100 मिलियन पौंड इतका निधी मिळतो. एकूण 68000 कर्मचारी तिथे काम करतात.
ही व्यवस्था बदलण्याची गरज असल्याचं युक्रेन सरकारनं मान्य केलं आहे आणि ते बदलण्यासाठी पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं आहे.
युद्धाने या योजनेत मिठाचा खडा घातला आहे. अनेकांना कुटुंब व्यवस्था असलेल्या अनाथश्रमात पाठवलं. मात्र दिव्यांगांना या योजनेतून वगळलं.
यावर युक्रेन सरकारशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
एरिक रोसेन्थाल हे Disability Rights International (DRI) या संस्थेचे सीईओ आहेत. त्यांच्या मते ही मुलं म्हणजे अपंगांच्या कारखान्याचे प्रॉडक्ट आहेत.
त्यांनी अशा शेकडो अनाथाश्रमांना भेटी दिल्या आहेत आणि तिथली परिस्थिती पाहून त्यांना प्रचंड धक्का बसतो.
आम्ही अशाच एका अनाथश्रमाला भेट दिली. तिथे विशी आणि तिशीतले युवकांना पलंगाला बांधून ठेवलं आहे.
ते हा पलंग कधीही सोडत नाही. त्यांना तिथेच खाऊ पिऊ घातलं जातं
एरिक म्हणतात की तिथले लोक अत्यंत हडकुळे आहेत., त्यांचे हातपाय मोडले आहेत. त्यामुळे त्यांचं कायम कुपोषण झालं आहे हे स्पष्ट झालं आहे.
त्यांच्या मते युद्ध हे अशा परिस्थितीसाठी कारण असू शकत नाही. या मुलांकडे गेली अनेक दशकं या मुलांकडे दुर्लक्ष झालं आहे.
एका माणसाच्या बाजूला उभं राहून ते सांगतात, "तो हळूहळू मरण पावतोय."
या अनाथश्रमात लाकडी पलंग आजूबाजूला लावले आहेत. भिंती मात्र रंगवल्या आहेत. इथे राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यातला अंध:कार दूर करण्याचा तो एक असफल प्रयत्न आहे. त्यांना तिथून सुटायचं नाहीये, त्यांच्याकडे कोणीतरी फक्त लक्ष द्यायला हवं आहे.
बाजूच्या खोलीत ओलेह नावाचा एक व्यक्ती अनेक दशकं पडून आहेत. तो अगदी लहान असताना तिथे आला.
त्याला सेरेब्रल पाल्सी हा आजार आहे. या आजारामुळे हालचाली आणि शरीरातील समन्वयावर मर्यादा येतात. योग्य काळजी घेतली तर ही लोक चांगलं व्यवस्थित आयुष्य जगू शकतात.
ओलेहला त्याच्या आसपासच्या जगाचा पूर्ण अंदाज आहे. DRI संस्थेतून हिलना कुर्लो आली की त्याचा चेहरा उजळतो. ती त्याला सात वर्षांपूर्वी भेटायला आली होती.
तिने ओळख करून दिल्यावर ओलेह छान हसला. आम्ही पत्रकार आहोत म्हटल्यावर त्याला आश्चर्य वाटलं. त्याने आमचं नाव विचारलं.
हिलना यांना त्यांचा हात धरला आणि सांगितलं की त्याच्या स्थितीवरून असं लक्षात येतंय की तो बहुतांश वेळ पलंगावरच असावा.
"तो इथे आयुष्यभर आहे त्यामुळे त्याच्या अंगीभूत क्षमतांचा ऱ्हास झाला आहे." त्या सांगतात.
युद्धाच्या आधीसुद्धा युक्रेन हा युरोपमधला सगळ्यात गरीब देश होता.
कुटुंबाच्या असकार्यामुळे या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत असं तिथे बिंबवलं गेलं आहे असं ओलेहच्या संस्थेच्या संचालिका मयकोला सुखोलतिकी यांना वाटतं.
"दिव्यांग मुलं त्यांच्या कुटुंबापेक्षा इथेच बरी असतात." त्या सांगतात. "कुटुंबात अन्नपाणी आणि कोणतीही काळजी न मिळण्यापेक्षा इथे असलेलं बरं."
एरिक यांच्यामते युक्रेनला आंतरराष्ट्रीय पातळीवर बरीच मदत मिळते आहे. त्या पैशाचा विनियोग ही अनाथश्रमं बंद करण्यासाठी केला जावा. त्यांच्या कुटुंबियांना मुलांची काळजी घेता यावी यासाठी सहाय्य करावं आणि अपंगत्व स्वीकारलं जावं अशी व्यवस्था करावी.
"अनाथश्रम असण्याची अजिबात गरज नाही" असं ते म्हणतात.
त्यांना अशी भीती वाटते की काही पैसा या संस्था चालवण्यासाठी वापरल्या जातात आणि युद्ध संपल्यावर युक्रेनकडे जगाचं लक्ष जाणार नाही आणि ही अनाथश्रमं अशीच चालू राहतील.
उन्हात पूर्ण दिवस व्यतित केल्यावर आता तो त्याच्या आईवडिलांचा निरोप घेतोय. त्याला अजूनही बांधून ठेवलंय आणि तो अजुनही ओरडतोय.
मार्याना म्हणतात की त्या संस्थेच्या आभारी आहेत. आमच्या मुलांना समाजापासून दूर ठेवू नये असंही त्यांना वाटतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)