स्नेक आयलंडवर काय आहे? रशिया-युक्रेन युद्धात या बेटाला का महत्त्व आलंय?

    • Author, सोफी विल्यम्स आणि पॉल किर्बी
    • Role, बीबीसी न्यूज

रशियाने युक्रेनवर हल्ला चढवण्याच्या अगदी सुरुवातीपासूनच्या काळात स्नेक बेटाला एक महत्वपूर्ण आणि अगदी पौराणिक दर्जा देण्यात आला होता. काळ्या समुद्रातील हा खडकाळ भूभाग रशियाने ताब्यात घेतला तसं हे बेट सामरिक मूल्य असलेली युद्धभूमी बनली.

रशियाने दावा केलाय की, विशेष सैन्य, युद्ध विमाने, हेलिकॉप्टर आणि ड्रोन यांचा वापर करून बेट पुन्हा ताब्यात घेण्याच्या अयशस्वी प्रयत्नात युक्रेनने विनाशकारी नुकसान केलंय. तर दुसरीकडे युक्रेनचं म्हणणं आहे की त्यांनी आपली मोहीम बेटावर आणि बोटींवर हल्ला करण्यापुरती मर्यादित ठेवली आहे.

युद्ध अजून काही संपलेलं नाही. मात्र रशिया वारंवार आपल्या उध्वस्त झालेल्या छावणीला बळकट करण्याचा प्रयत्नात आहे, असं ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाच्या गुप्तचर यंत्रणेने म्हटलं आहे.

स्नेक किंवा Zmiinyi ही बेटं अगदी काही चौरस किलोमीटरचा भाग असतील. आणि त्याबद्दल विशेष असं काही बोललं ही जात नाही. मात्र पश्चिम काळ्या समुद्राच्या नियंत्रणासाठी या बेटांचं तितकचं महत्त्व यात शंका नाही.

युक्रेनचे सैन्यतज्ज्ञ ओलेह झ्दानोव यांनी बीबीसीला सांगतात की, "जर रशियन सैन्याने स्नेक बेटावर ताबा मिळवला आणि तिथे त्यांची लांब पल्ल्याची हवाई-संरक्षण यंत्रणा उभारली, तर ते काळ्या समुद्राच्या उत्तर-पश्चिम भागातून समुद्र, जमीन आणि आकाश आणि युक्रेनच्या दक्षिणेवर नियंत्रण ठेऊ शकतात."

म्हणूनच रशियन युद्धनौका मॉस्क्वा युद्ध सुरू झाल्याच्या काही तासांतच तिथं हजर झाली. त्यांनी बेटावरील युक्रेनियन सैनिकांना स्वतःला हार मानण्यास सांगितलं. "तुम्ही तुमची शस्त्र खाली ठेवा. रक्तपात आणि अनावश्यक जीवितहानी टाळण्यासाठी शरण या असं मी तुम्हाला सुचवेन. अन्यथा, बॉम्ब टाकून हल्ला करण्यात येईल." असं एक रशियन अधिकारी म्हणाला.

"रशियन लोकांना इथून चालते व्हा" अशा भाषेत युक्रेन सैन्याने उत्तर दिलं. पुढे बेट ताब्यात घेण्यात आलं मात्र काही आठवड्यांनंतर मॉस्क्वा बुडाली.

मॉस्क्वा गमावणं म्हणजे बेटावर असलेल्या रशियाच्या पुरवठा जहाजांना आता किमान संरक्षण उपलब्ध असल्याचं यूकेचं म्हणणं आहे. पण जर रशिया आपली स्थिती मजबूत करू शकला तर मात्र ते काळ्या समुद्राच्या मोठ्या भागावर वर्चस्व गाजवू शकतील.

युक्रेन तसेच शेजारील देश आणि नेटोसाठी धोका

रशियाची या भागातील उपस्थिती ही युक्रेनसाठी धोरणात्मक तसेच आर्थिकदृष्ट्या विनाशकारी असू शकते.

युक्रेनला आधीच आपलं ओडेसाचं बंदर बंद करावं लागलं आहे. धान्य निर्यात ही बंद करण्यात आली आहे. मात्र झ्डानोव्ह यांना भीती आहे की बेटाचा वापर युद्धाची दुसरी फ्रंटलाइन म्हणून होऊ शकतो.

"जर लांब पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली स्थापित करण्यात रशियन यशस्वी झाले तर ते त्यांच्या स्क्वाड्रनचं रक्षण करण्यास सक्षम असतील. हे स्क्वाड्रन युक्रेनच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचू शकतात."

यामुळे रशियन सैन्याला ट्रान्सनिस्ट्रियामध्ये प्रवेश करण्याची संधी मिळेल. रशियन नियंत्रणाखाली असलेला मोल्दोव्हाचा प्रदेश युक्रेनच्या शेजारी असून ओडेसापासून जवळ आहे.

स्नेक बेट हे रोमानियाच्या किनार्‍यापासून केवळ 45 किलोमीटर (28 मैल) अंतरावर आहे, जे पश्चिमेच्या नाटो गटांचा भाग आहे.

यूकेचे नौदल विश्लेषक जोनाथन बेंथम यांच्या मते, बेटावरील रशियन S-400 हवाई क्षेपणास्त्र प्रणाली युद्धात "मोठा गेम-चेंजर" असेल. जर रशिया ही क्षेपणास्त्र प्रणाली तैनात करण्यास सक्षम असेल तर केवळ ओडेसाच धोक्यात येईल असं नाही. तर नाटोची दक्षिणेकडील बाजू ही देखील धोक्यात येईल, असा इशारा रोमानियन इतिहासकार डोरिन डोब्रिंकू यांनी दिला आहे.

"ही गोष्ट रोमानियन सरकार आणि रोमानियन जनतेसाठी महत्त्वाची आहेच. पण नेटोच्या संपूर्ण गटासाठी ही खूप महत्वाची आहे. रशियाकडे आमच्या प्रदेशाच्या पूर्वेकडील शहरे आणि लष्करी क्षमता नष्ट करण्याची क्षमता असेल."

नेटोने युद्धाच्या सुरुवातीपासूनच बेल्जियन आणि फ्रेंच सैन्य पाठवून रोमानियाच्या सीमा बळकट केल्या आहेत.

पण रोमानियासाठी आर्थिक धोके ही आहेत. स्नेक बेट डॅन्यूब नदीच्या मुखाजवळ आहे. ही नदी युक्रेन आणि रोमानियाची सीमा अधोरेखित करते. रोमानियाचे काळ्या समुद्रातील कॉन्स्टंटाचे बंदर दक्षिणेपासून फार दूर नाही. तिथं उतरणारी कंटेनर जहाज यापुढे ओडेसाला जाऊ शकत नाहीत.

रशियन लष्करी-राजकीय विश्लेषक अलेक्झांडर मिखाइलोव्ह म्हणाले की, स्नेक बेटावरील सैन्य, काळ्या समुद्राचा उत्तर-पश्चिम भाग आणि दक्षिण-पूर्व युरोपचे प्रवेशद्वार असलेला डॅन्यूब डेल्टा येथील रहदारी नियंत्रित करण्याच्या स्थितीत असू शकते. "जर या ठिकाणी लष्करी तळ किंवा लष्करी पायाभूत सुविधा असतील तर नदीत प्रवेश करणारी जहाजे रोखणं तसेच सोडणं शक्य होईल." असं त्यांनी रशियन माध्यमांशी बोलताना सांगितलं.

रोमानियाच्या युरो-अटलांटिक रेजेलियन्स सेंटरच्या मते, रशिया हे बेट जोडण्याचा निर्णय घेईल आणि तुर्कीमधील बोस्फोरसकडे जाण्यासाठी शक्य असणाऱ्या काळ्या समुद्रातील सर्व शिपिंग मार्गांवर नियंत्रण ठेवेल.

ऐतिहासिकदृष्ट्या बघायला गेलं तर स्नेक आयलंड हे 1948 मध्ये सोव्हिएत युनियनला मिळेपर्यंत रोमानियन प्रदेश होता. त्यांनी या बेटाचा वापर रडार बेस म्हणून केला. 1989 पर्यंत रोमानिया सोव्हिएत प्रभावाखाली आल्याने बुखारेस्टने ही व्यवस्था स्वीकारली.

साम्यवादाच्या पतनानंतर युक्रेनने या बेटावर ताबा मिळवला. शेवटी 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बेटाच्या प्रादेशिक मर्यादा काढल्या. रोमानियाला या बेटाजवळील काळ्या समुद्रातील महाद्वीपाचा 80% भाग देण्यात आला. आणि उर्वरित भाग युक्रेनला देण्यात आला.

केवळ मुत्सद्देगिरीचा भाग म्हणूनच स्नेक आयलंडची ओळख आहे असं नाही. तर काळ्या समुद्राचा हा भाग हायड्रोकार्बन संसाधनांनी समृद्ध आहे. याचा अर्थ दोन्ही देशांना पेट्रोलियम आणि वायूचे साठे हवे आहेत.

हे बेट म्हणजे छोटीशी किंमत असलेला खडकाळ भाग आहे असं वाटू शकतं. पण रशियन युद्धातील एक प्रमुख घटक म्हणून याची किंमत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)