You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युक्रेन-रशिया वाद: पुतीन यांच्या वर्तुळातील आणि युद्ध चालवणारे नेमके कोण आहेत?
- Author, पॉल कर्बी
- Role, बीबीसी न्यूज
व्लादिमीर पुतीन यांच्या निर्णयानं रशियाच्या लष्कराला एका प्रचंड जोखीम असलेल्या युद्धाच्या परिस्थितीत नेऊन उभं केलं आहे. त्यामुळं त्यांच्या देशाच्या आर्थिक स्थितीवर प्रचंड ताण येणार आहे.
त्यांच्या निकटवर्तीयांबरोबरच्या काही कार्यक्रमांमध्ये प्रथमच पुतीन हे काहीसे एकटे आणि वेगळे पडल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या निकटवर्तीय सल्लागारांपासून ते काही अंतरावर याठिकाणी बसलेले आढळून आले.
कमांडर इन चीफ असल्यानं या हल्ल्याची मूळ जबाबदारी ही पुतिन यांच्यावरच येते, पण त्यांनी कायम त्यांच्या वर्तुळातील अत्यंत विश्वासू अशा प्रामाणिक सदस्यांवर विश्वास दाखवला आहे. त्यांच्यापैकी अनेकांनी रशियाच्या संरक्षण सेवांमध्येच त्यांची कारकीर्द सुरू केलेली आहे. अशात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या धोकादायक परिस्थतीत त्यांचे कान नेमके कोण आहेत? म्हणजे पुतीन कोणाचं ऐकतात?
1) सर्गेई शोइगु, संरक्षण मंत्री
जर असं कोणी असेल तर ते त्यांचे दीर्घकालीन विश्वासू सर्गेई शोइगु आहेत. त्यांनी पुतीन यांच्या रशियाला तथाकथिक लष्करी धोक्यापासून वाचवण्यासाठी युक्रेनचं निशस्त्रीकरण करण्याच्या निर्णयावर काही विचार न करता अंमल केला.
सर्गेई हे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याबरोबर सायबेरियामध्ये शिकार किंवा मासेमारीसाठी जातात. तसंच पुतीन यांचे उत्तराधिकारी म्हणूनही त्यांच्याकडं पाहिलं जातं.
पण हा एक अगदी खास असा फोटो पाहा. टेबलच्या शेवटच्या टोकाला सैन्यदलाच्या प्रमुखांबरोबर ते काहीशा अवघडलेल्या अवस्थेत बसलेले पाहायला मिळत आहे.
अशी स्थिती असेल तर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या कानापर्यंत ते कसे पोहोचणार, असं आश्चर्य हा फोटो पाहिल्यानंतर वाटल्याशिवाय राहत नाही.
युक्रेनकडून झालेल्या अनपेक्षित कडव्या विरोधाचा सामना करणाऱ्या आणि मनोबल खचलेल्या लष्करी मोहिमेच्या तीन दिवसांत हा फोटो घेण्यात आला होता.
"शोइगु यांना कीव्हवर चालून जायचं होतं. ते संरक्षम मंत्री असून त्यांना या लढ्यात विजय मिळवायचा होता," असं सशस्त्र संघर्षांच्या तज्ज्ञ वेरा मिरोनोव्हा यांनी सांगितलं.
2014 मधील क्रायमियातील लष्करावर ताबा मिळवण्याचं श्रेय त्यांना देण्यात आलं होतं. त्याचबरोबर दोन नर्व्हं एजंटना विष देऊन ठार करण्याचा आरोप असलेल्या GRU या लष्करी गुप्तचर संघटनेचेही ते प्रमुख आहेत. तसंच 2018 मधील युकेमध्ये सालीसबरी येथील घातक हल्ला आणि विरोधी पक्षनेते अॅलेक्सी नवल्नी यांच्यावर 2020 मध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्याशीही त्यांचा संबंध आहे.
हा फोटो क्लोअजप पाहिल्यानंतर तर आणखीच गंभीर वाटतो. "जणू काही कुणाचं तरी निधन झालं आहे, अथवा अंत्ययात्रेत आले आहेत, असे त्यांचे हावभाव आहेत," असं मिनोरोव्हा म्हणाल्या.
ते अवघडल्यासारखे वाटत असले तरी, रशियातील संरक्षण तज्ज्ञ आणि लेखक अँड्रेई सोल्दातोव्ह यांच्या मते अजूनही संरक्षण मंत्री हे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या जवळचे असून ते त्यांचं ऐकतातही.
"शोइगु हे केवळ लष्कराचेच प्रमुख नाहीत तर आंशिकरित्या ते रशियाच्या विचारसरणीचेही प्रमुख आहेत. रशियामध्ये विचारसरणी ही इतिहासावर आधारित आहे."
2) व्हॅलेरी गेरासिमोव्ह, रशियाच्या सैन्यदलांचे प्रमुख
सैन्यदलांचे प्रमुख या नात्यानं युक्रेनमध्ये हल्ला करणं आणि तो लवकरात लवकर मार्गी लावणं हे त्याचं कर्तव्य आहे. त्या मानकांचा विचार करता ते काहीसे कमी पडल्याचं पाहायला मिळतं.
त्यांनी 1999 मध्ये चेचेनच्या युद्धामध्ये सैन्याचं नेतृत्व केलं, तेव्हापासून व्लादिमीर पुतीन यांच्या लष्करी कारवायांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. गेल्या महिनाभरात बेलारुसमध्ये झालेला लष्कराचा सराव आणि युक्रेनमधील हल्ल्याच्या नियोजनामध्येदेखील ते आघाडीवर होते.
रशियाविषयक अभ्यासक मार्क गालेओट्टी यांनी त्यांचं वर्णन, न हसणारे आणि सरळसाधे नसणारे असं केलं आहे. त्यांच्या मते जनरल गेरासिमोव्ह यांनी क्रायमियाच्या सैन्य कारवाईतही महत्त्वाची भूमिका बजावली होती.
मात्र, सध्या युक्रेनमधील हल्ल्यापासून त्यांना बाजुला करण्यात आलं असल्याचं काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. युक्रेनमधील हल्ल्यात सैन्याचं मनोबल खचल्याच्या चर्चा समोर आल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
पण अँड्रेई सोल्दातोव्ह यांच्या मते, गेल्या काही महिन्यांपासून अशाप्रकारे विचारात बदल झालेला पाहायला मिळत आहे. "पुतीन प्रत्येक मार्गावर असलेल्या सैन्याच्या प्रत्येक तुकडीचं प्रतिनिधित्व करू शकत नाही, आणि हे त्यांचं काम आहे." संरक्षण मंत्र्यांना त्यांच्या गणवेशावर अभिमान असला तरी ते प्रशिक्षित नाहीत, त्यामुळं त्यांना प्रशिक्षित अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवावा लागेल, असंही ते म्हणाले.
3) निकोलाई पात्रुशेव्ह, सुरक्षा परिषदेचे सचिव
"पात्रुशेव्ह हे सर्वांमध्ये अत्यंत कट्टर असे आहेत. अनेक वर्षांपासून पाश्चिमात्य देश रशियावर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचं त्यांचं मत आहे, असं लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये रशियन पॉलिटिक्स या विषयाचे सहयोगी प्राध्यापक बेन नोबल म्हणाले.
पुतीन यांच्या सर्वात विश्वासू अशा तीन सहकाऱ्यांपैकी ते एक आहे. 1970 च्या दशकातल पीटर्सबर्गमध्ये ते सोबत होते. तेव्हापासून ते एकत्र आहेत. तेव्हा रशियाचं दुसरं शहर लेनिनग्राद म्हणून ओळखलं जात होतं.
इतर दोन दिग्गज म्हणजे संरक्षण सेवा प्रमुख अलेक्झांडर बोर्तनिकोव्ह आणि परराष्ट्र गुप्तचर प्रमुख सर्गेई नारिश्कीन हे आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या जवळच्या वर्तुळातील सर्वांना सिलोव्हिकी किंवा अंमलबजावणी करणारे म्हणून ओळखलं जातं. पण हे तिघं अजूनही नीकटवर्तीय आहेत.
काहींचा राष्ट्राध्यक्षांवर असलेला प्रभाव हा निकोलाई पात्रुशेव्ह यांच्यासारखाच आहे. त्यांनी साम्यवादाच्या काळात केवळ जुन्या KGB मध्ये त्यांच्याबरोबर कामच केलं नाही तर 1999 पासून 2008 पर्यंत त्यांनी FSB संघटनेमध्ये त्यांची जागा घेत कामही केलं.
युक्रेनवर हल्ल्याच्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या रशियाच्या सुरक्षा परिषदेच्या एका विचित्र बैठकीदरम्यान, पात्रुशेव्ह यांनी त्यांचं मत मांडत, अमेरिकेचं मुख्य लक्ष्य रशियाचं विभाजन हे होतं असं म्हटलं.
हे संपूर्ण सत्र अत्यंत नाट्यमय पद्धतीनं झालं होतं. त्यात राष्ट्राध्यक्ष एक न्यायालय घेत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्याठिकाणी त्यांच्या संरक्षण पथकातील एक एक सदस्य समोर येऊन रशियाचा पाठिंबा असलेल्या युक्रेनमधील बंडखोरांच्या स्वातंत्र्यता मिळवून देण्याबाबत मत मांडत होते.
निकोलाई पात्रुशेव्ह हे या परीक्षेत उत्तीर्ण झाले. "मुख्य लढाईबाबत ओरड असलेल्यांपैकी ते एक आहेत. तसंच पुतीन त्यांच्या सर्वात टोकाच्या स्थितीकडे वळल्याचा अंदाज आहे." असं बेन नोबल म्हणाले.
4) अलेक्झांडर बोर्तनिकोव्ह, फेडरल सेक्युरिटी सर्व्हीस (FSB)चे संचालक
क्रायमियामधील निरीक्षकांच्या मते राष्ट्राध्यक्षांना सुरक्षा सेवांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवर इतर कोणत्याही स्त्रोतांद्वारे मिळालेल्या माहितीच्या तुलनेत अधिक विश्वास आहे. अलेक्झांडर बोर्तनिकोव्ह हे पुतीन यांच्या अंतर्गत वतुळातील एक आहेत.
लेनिनग्राड केजीबीमधील त्यांचा आणखी एक जुना सहकारी. निकोलाई पात्रुशेव्ह पुढं सरकल्यानंतर त्यांनी FSBची जबाबदारी सांभाळत नेतृत्व केलं.
दोघेही राष्ट्राध्यक्षांचे अत्यंत नीकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मात्र, "पण नेमके निर्णय कोण कशाप्रकारे घेत आहे, हे आपण ठामपणे सांगू शकत नाही," याकडे बेन नोबल यांनी लक्ष वेधलं.
FSB चा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या इतर सेवांवरही बऱ्यापैकी प्रभाव आहे. तसंच त्यांचं स्वतंत्र सैन्यही आहे.
ते महत्त्वाचे आहेत पण ते रशियाच्या नेत्यांना आव्हान देण्यासाठी किंवा इतरांप्रमाणे सल्ला देण्यासाठी नाहीत, असं मत अँड्रेई सोल्दातोव्ह यांनी मांडलं.
5) सर्गेई नारिश्कीन, परराष्ट्र गुप्तचर सेवेचे (SVR)संचालक
जुन्या लेनिनग्राडमधील त्रिकुट पूर्ण करणारे सर्गेई नारिश्कीन हे त्यांच्या कारकिर्दीतील बहुतांश काळ राष्ट्राध्यक्षांच्याबरोबरच राहिले आहेत.
तर मग सुरक्षा परिषदेच्या बैठकीदरम्यान निरोप देताना त्यांनी केलेल्या पेहरावाचं काय?
त्यांना जेव्हा परिस्थितीसंदर्भात त्यांचं मत विचारण्यात आलं तेव्हा गुप्तचर प्रमुख गोंधळल्याचं पाहायला मिळालं. त्यांना काय बोलायचं ते ते विसरले होते. त्यानंतर राष्ट्राध्यक्षांनी त्यांना, "आपण यावर चर्चा करत नाही आहोत," असं स्पष्ट केलं.
हे प्रदीर्घ संत्र संपादीत करण्यात आलं होतं. म्हणजे क्रायमियानं त्यांच्या मोठ्या टीव्ही प्रेक्षकांसमोर त्यांची अस्वस्थता दाखवण्याचा निर्णय घेतला होता.
"ते धक्कादायक होतं. ते अत्यंत शांत आणि एकत्रित होते, म्हणजे नेमकं काय सुरू आहे? असं लोक विचारतील," असं बेन नोबल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. या संपूर्ण विखारी वातावरणाचा फटका मार्क गालेओट्टी यांना बसला.
मात्र, अँड्रेई सोल्दातोव्ह ते केवळ या क्षणाचा आनंद घेत होते. "पुतीन यांना त्यांच्या नीकटवर्तीयांची गंमत घ्यायला आवडतं, त्यामुळं ते (नारिश्कीन) मूर्ख दिसतात," असं ते म्हणाले.
सर्गेई नारिश्कीन हे दीर्घकाळापासून पुतीन यांच्याबरोबर आहेत.
सेंट पीटर्सबर्गमध्ये 1990 मध्ये, त्यानंतर 2004 मध्ये पुतीन यांच्या कार्यालयात आणि संसदेचे अध्यक्ष बनल्यानंतर ते सोबत आहेत. पण त्याचबरोबर ते रशियाच्या हिस्टॉरीकल सोसायटीचे प्रमुखही आहेत. सोल्दातोव्ह यांच्या मते, पुतीन यांना कृतीसाठी वैचारिक भूमिका पुरवण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे.
गेल्यावर्षी त्यांनी बीबीसीच्या मॉस्को येथील प्रतिनिधी स्टीव्ह रोझमबर्ग यांना एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी रशियानं विषबाधा करणं, सायबर हल्ले किंवा इतर देशांच्या निवडणुकीत हस्तक्षेपाचे आरोप फेटाळले होते.
6) सर्गेई लाव्हरोव्ह, परराष्ट्र मंत्री
गेल्या 18 वर्षांपासून लाव्हरोव्ह हे रशियातील सर्वात वरिष्ठ राजदूत किंवा राजकारणी राहिलेले आहेत. निर्णयप्रक्रियेत त्यांचा फारसा वाटा नसला तरी जगासमोर रशियाची भूमिका मांडण्यात त्यांचा वाटा राहिली आहे.
पुतीन त्यांच्या भूतकाळातील सहकाऱ्यांवर विश्वास टाकतात याचं आणखी एक उदाहरण म्हणजे, 71 वर्षीय सर्गेई लाव्हरोव्ह.
ते अत्यंत हुशार राजकारणी आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी ब्रिटिश परराष्ट्र सचिव लिथ ट्रस यांची थट्टा करण्याचा प्रयत्न केला होता. रशियाचा भूगोलाबाबत असलेल्या ज्ञानाबाबत त्यांनी त्यांची टिंगल केली होती. तर वर्षभरापूर्वी युरोपीय महासंघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांचाही अपमान करण्याचा प्रयत्न केला होता.
पण युक्रेन संदर्भातील कोणत्याही निर्णयांपासून ते सुरुवातीपासून वेगळे राहिले. त्यांची प्रतिष्ठा आणि भविष्यातील नाराजीचा विचार न करता यांनी युक्रेनबरोबर राजकीय चर्चेची पाठराखण केली होती. पण पुतीन यांनी त्याकडे दुर्लक्ष करणंच पसंत केलं.
रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचं व्हीडिओ लिंकद्वारे समर्थन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेतील बहुतांश सदस्य बाहेर पडले याची त्यांनी पर्वा केली नाही.
7) व्हॅलेंटिना मॅटवियेन्को, फेडरेशन काऊन्सिलच्या अध्यक्षा
पुतीन यांच्या गटातील दुर्मिळ चेहरा. रशियाच्या लष्कराला हल्ल्याचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी परदेशात लष्कराच्या प्रवेशाला मान्यता मिळण्यासाठी वरिष्ठ सभागृहात झालेल्या मतदानावर शिक्कामोर्तब करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
व्हॅलेंटिना मॅटवियेन्को यादेखील पीटर्सबर्गपासूनच्या पुतीन यांच्या विश्वासू असून त्यांनी 2014 मध्ये क्रायमिया विलिनीकरणातही मदत केली होती.
पण निर्णय घेणाऱ्या प्रमुख चेहऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होत नाही. त्यामुळं मोठे निर्णय नेमकं कोण घेत आहे, हे सांगणं काही लोकांसाठी अत्यंत सोपं होतं.
रशियातील नेत्यांनी त्यांचं मत ठरवलेलं असल्यामुळं रशियाच्या सुरक्षा परिषदेतील इतर सदस्यांप्रमाणेच त्यांची भूमिकाही सर्वांच्या निर्णयाच्या बाजूनं मान हलवणं हीच होती.
8) व्हीक्टर झोलोतोव्ह, नॅशनल गार्डचे संचालक
राष्ट्राध्यक्षांचे माजी बॉडीगार्ड. सहा वर्षांपूर्वी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी नॅशनल गार्ड, रॉसग्वार्दियाची स्थापना केली होती. त्याचे व्हीक्टोर प्रमुख आहेत. रोमन साम्राज्यातील प्रॅटोरियन गार्डसारखं हे खासगी सैन्य आहे.
स्वतःच्या सुरक्षारक्षकाची या सैन्याच्या नेतृत्वासाठी निवड करून त्यांनी निष्ठेला महत्त्वं असल्याचं दाखवून दिलं. व्हीक्टोर झोलोतोव्ह यांनीही या सैन्याचा आकडा 4 लाखांपर्यंत वाढवल्याचं सांगितलं जातं.
व्हेरा मिरोनोव्हा यांच्या मते रशियाची मूळ योजना काही दिवसांत हा हल्ला पूर्ण करण्याची होती. त्यानंतर लष्कराला जेव्हा यात अपयश येऊ लागलं तेव्हा रशियाच्या नॅशनल गार्डनं याचं नेतृत्व केलं.
अडचणीचा बाब म्हणजे नॅशनल गार्डच्या प्रमुखांनी लष्करी प्रशिक्षण घेतलेलं नाही. त्यात त्यांच्या तुकड्यांकडे रणगाडे नसल्यामुळं त्यांच्या हल्ला करण्यामध्येदेखील असुरक्षितता आहे.
पुतीन आणखी कोणाचं ऐकतात?
पंतप्रधान मिखाईल मिशुस्तीन यांच्याकडे वाईट अवस्थेतील अर्थव्यस्था सावरण्याचं काम आहे. पण युद्धाबाबत त्यांच्या शब्दाला फार अर्थ नाही.
मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन आणि रोझनेफ्ट येथील तेल कंपनीचे प्रमुख इगोर सेशिन हेदेखील राष्ट्राध्यक्षांचे नीटवर्तीय असल्याचं मत, राजकीय विश्लेषक येवगिनी मिनचेन्को यांनी व्यक्त केलं.
बोरीस आणि आर्केडी रोटेनबर्ग हे अब्जाधीश भाऊदेखील पुतीन यांचे बालपणीचे मित्र आहेत. तसेच दीर्घकाळापासून त्यांचे विश्वासूही आहेत. 2020 मध्ये फोर्ब्स मासिकानं त्यांचं कुटुंब रशियातील सर्वात श्रीमंत असल्याचं जाहीर केलं होतं.
(अतिरिक्त वार्तांकन-ओल्गा इव्हाशिना आणि केतरियाना खिनकुलोव्हा, बीबीसी रशिया )
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)