You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'ही चिमुरडी नाही, तर विशीतली धोकादायक बाई आहे' असं तिचे दत्तक पालक का म्हणतात?
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
काही वर्षांपूर्वी एक पिक्चर आला होता. तुम्ही हॉररचे फॅन नसाल तर पाहू नकाच असं मी म्हणेन. त्या पिक्चरचं नाव होतं 'ऑर्फन' आणि स्टोरी काहीशी अशी होती की अमेरिकेतलं एक दांपत्य एका रशियन लहान मुलीला दत्तक घेतं. पण ती मुलगी जशी दिसते तशी नसतेच आणि आपल्याच दत्तक आई-वडिलांना छळते, त्यांचा अंत होईपर्यंत. खरंतर ती मुलगीच नसते, लहान मुलीच्या वेशात एक तिशीची बाई असते.
आता तुम्ही म्हणाल की त्यात काय, पिक्चर म्हटला की अशा कल्पोलकल्पित गोष्टी येतात. त्यांचा खऱ्या जगाशी काय संबंध? पण या गोष्टीत एक रहस्य आहे खरं.
हा पिक्चर आल्यानंतर एका वर्षानी अमेरिकेतल्या एका जोडप्याने युक्रेनमधून एक सहा वर्षांची मुलगी दत्तक घेतली, पण नंतर त्यांनी दावा केला की त्यांची दत्तक कन्या लहान मुलगी नसून, विशीतली बाई आहे आणि त्यांच्या जीवाला तिच्यापासून धोका आहे. इतकंच नाही, ते तिला सोडून पळून गेले.
नक्की प्रकरण काय?
सत्य कल्पनेपेक्षाही विचित्र असतं असं म्हणतात. अशाच एका विचित्र घटनेची ही कहाणी. याचे सगळे तुकडे अजून कोणाच्याच हाती लागले नाहीयेत. कोर्टात केसही सुरू आहे, काही गोष्टी कोर्टाने सील केल्यात. पण जेवढे तुकडे समोर आलेत त्यातून उभी राहते ही कधी न ऐकलेली गोष्ट.
2010 साली अमेरिकेतल्या क्रिस्टीन आणि मायकल बार्नेट या जोडप्याने नटालिया नावाची मुलगी दत्तक घेतली. त्यावेळी तिच्या बर्थ सर्टीफिकेटप्रमाणे तिचं वय होतं सहा वर्षं. ही मुलगी मुळची युक्रेनची होती आणि एका बुटकेपणाच्या आजाराने पीडित होती.
या जोडप्याला आधीही तीन मुलगे होते. नटालियाला दत्तक घेतल्यानंतर काही काळातच त्यांना तिच्या वागण्याचा संशय यायला लागला असा या जोडप्याचा दावा आहे.
ती तिच्या वयापेक्षा मोठी वागते, तिची समजही सहा वर्षांच्या मुलीपेक्षा जास्त होती असं या नवरा-बायकोचं म्हणणं होतं.
2019 साली एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत क्रिस्टीन म्हणाल्या होत्या की ज्यावेळी नटालिया घरी आली तेव्हा ती लहान मुलीपेक्षा किशोरवयीन मुलीसारखी वागायची. तिला खेळणी नको असायची, तिला इतर मोठ्या मुलींसोबत वेळ घालवायचा असायचा.
तिच्या शरीरावरही वयापेक्षा मोठ्या असण्याच्या खुणा होत्या असं कुटुंबाचं म्हणणं होतं.
क्रिस्टीन या मुलाखतीत म्हणाल्या होत्या की, "मी तिला आंघोळ घालत होते आणि मला दिसलं की तिच्या जननेंद्रियावर मोठ्या महिलेसारखे केस आलेत. मला धक्काच बसला. मला सांगितलं गेलं की ती सहा वर्षांची आहे, पण प्रत्यक्षात तसं नव्हतं."
"तिला पाळी यायची आणि तिचे दातही प्रौढांसारखे होते. ती लहान मुलगी नव्हती तर पूर्ण वाढ झालेली बाई होती. तिची एका इंचानेही कधी उंची वाढली नाही. अगदी बुटकेपणाचा आजार असलेल्या मुलांचीही थोडी का होईना उंची वाढते."
काही महिन्यांनी क्रिस्टीन आणि मायकल यांनी दावा केला की नटालियापासून त्यांच्या कुटुंबाला धोका आहे.
2012 साली, म्हणजे नटालियाला दत्तक घेतल्यानंतर 2 वर्षांनी हे कुटुंब कोर्टात गेलं आणि त्यांनी नटालियाच्या जन्मतारखेच्या दाखल्यावरची तारीख बदलावी अशी मागणी केली. कोर्टाने त्यांची मागणी मंजूर करत तिच्या जन्माचं वर्ष 2003 वरून 1989 केलं.
या सुनावणीदरम्यान क्रिस्टीन यांनी दावा केला की हाडांच्या चाचणीवरून लक्षात आलं की नटालियाला दत्तक घेतलं तेव्हा तिचं वय 6 नसून 16 होतं.
तिला काही मानसोपचार इस्पितळातही ठेवलं होतं आणि तिथे नटालियाने काही डॉक्टरांना आपण सांगतो त्यापेक्षा वयाने मोठ्या आहोत हे सांगितल्याचा दावा क्रिस्टीन यांनी केला होता.
पण 2013 मध्ये नटालियाला त्या मानसोपचार इस्पितळातून घरी सोडण्यात आलं. त्यावेळे बार्नेट दांपत्याने ठरवलं की ते आता नटालियाची देखभाल करणार नाहीत कारण त्यांना संपूर्ण विश्वास होता की ही सांगते त्या वयापेक्षा फार मोठी आहे.
त्यांनी इंडियाना राज्यातल्या लायफेटमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला. संपूर्ण वर्षाचं भाडं भरलं, त्यात इतर सामानसुमान आणून ठेवलं आणि नटालियाला त्या फ्लॅटमध्ये सोडून ते कॅनडाला निघून गेले.
नटालिया वर्षभर एकटीच राहिली. 2014 मध्ये ती पोलिसांना एकटी राहाताना आढळली.
नटालियाचं म्हणणं काय?
2019 साली नटालियने या संबंधी पहिल्यांदा जाहीर मुलाखत दिली. त्यावेळी तिने सांगितलं की माझं वय 16 आहे, आणि माझा जन्म 2003 साली झालेला आहे. मी काही तिशीतली बाई नाही आणि मी बार्नेट कुटुंबाचा खून करण्याचा, किंवा छळ करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही.
नटालिया आपल्या मुलाखतीत म्हणाली होती, "मी अमेरिकेत आले तेव्हा सहा वर्षांची होते. मला फक्त इतकंच माहितेय की एक कुटुंब मला भेटायला आलं आणि मग त्यांनी मला दत्तक घेतलं."
नटालियाला एक प्रकारचा बुटकेपणाचा आजार आहे. ती अमेरिकेत आल्यापासून अनेक कुटुंबांमध्ये राहिली, पण तिला कायमचं कोणी दत्तक घेत नव्हतं.
पण 2010 साली फ्लोरिडात राहाणाऱ्या क्रिस्टीन आणि मायकल बार्नेट यांनी तिला दत्तक घेतलं.
पण लवकरच या कुटुंबाला शंका यायला लागली की नटालियाचं वय सांगितलं जातंय त्यापेक्षा जास्त आहे. त्यांना वाटायला लागलं की तिचं वय दत्तक घेतलं त्यावेळीच 18-19 असावं, म्हणजे ती त्याच वेळेस सज्ञान होती.
बार्नेट कुटुंबाने नंतर म्हटलं की त्यांना तिची भीती वाटायला लागली आणि ती कुटुंबाला इजा पोहचवेल असं वाटायला लागलं, त्यामुळे ते तिला एकटं सोडून कॅनडाला निघून गेले.
आता क्रिस्टीन आणि मायकलचा घटस्फोट झाला आहे आणि त्यांच्यावर लहान मुलीची हेळसांड आणि तिच्याकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपावरून खटला सुरू आहे.
नटालिया तिच्या मुलाखतीत बोलताना म्हणाली होती की, "बार्नेट कुटुंबात आल्यानंतर मला वाटलं की मला सुयोग्य असा, मला आपलसं करेल असा परिवार मिळाला आहे."
नटालिया बार्नेट कुटुंबाच्या आधी ज्या कुटुंबात राहात होती, तिथे तिने दुसऱ्या एका लहान मुलाला इजा पोहचवल्यामुळे तिला या कुटुंबाने आपल्या घरातून काढून पुन्हा सामाजिक संस्थेत पाठवलं होतं.
क्रिस्टीन बार्नेट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की नटालियाने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला झोपेत असताना भोसकण्याची धमकी दिली होती. त्यांच्या कॉफीत ब्लीच ओतून त्यांना विष देण्याचा प्रयत्न केला होता आणि एकदा क्रिस्टीनला वीजेच्या तारांवर ढकलण्याचाही प्रयत्न केला होता.
पण नटालियाने या आरोपांचा इन्कार केला आहे.
तिने आपल्या मुलाखतीत म्हटलं की, "एकदा स्वयंपाकघरात स्वच्छता करताना क्रिस्टीनला असं वाटलं की मी कॉफीत ब्लीच ओतलं आहे. तो गैरसमज होता. मी त्या दोघांच्या बेडरूममध्ये तेव्हाच जायचे जेव्हा मला रात्री भीतीदायक स्वप्नं पडायची."
नटालियचं असंही म्हणणं आहे की बार्नेट कुटुंब तिला सोडून गेलं तेव्हा ती आठ वर्षांची होती आणि वर्षभर एकटीच राहिली. बार्नेट कुटुंबाने तिच्यासाठी जे हवाबंद अन्नाचे डबे आणून ठेवले होते, ते खाऊन ती जगली.
नटालियाचं असंही म्हणणं आहे की तिला क्रिस्टीन बार्नेट यांनी सांगितलं की तिने लोकांना तिचं वय 22 आहे असं सांगायचं.
तिने अमेरिकेतल्या डॉ फिल या टॉक-शोमध्ये पहिल्यांदा मुलाखत दिली. त्यावेळी तिच्याबरोबर अँटोन आणि सिंथिया मान्स हे दांपत्य होतं. गेल्या सहा वर्षांपासून नटालिया आता अमेरिकेतल्या इंडियाना प्रांतात राहाणाऱ्या या कुटुंबासोबत राहाते.
या कुटुंबाचं म्हणणं आहे की तिच्याकडून त्यांना कोणताही धोका नाही.
मग नटालियाचं नक्की वय किती?
हा प्रश्न उरतोच. पण याचं उत्तर कोणाला ठामपणे देता येत नाहीये कारण दत्तकविधानाची कागदपत्र कोर्टाने सील केलेली असतात आणि त्यामुळे तिचं नक्की वय काय यासंबंधी माहिती जाहीररित्या उपलब्ध नाही.
पण ती ज्या मान्स कुटुंबासोबत आता राहाते, त्यांचं म्हणणं आहे की तिचं वय आता (2019 साली दिलेल्या मुलाखतीत) 16 आहे.
या प्रकरणी बार्नेट कुटुंबाच्या फॅमिली डॉक्टरचं (त्यांचं नाव कधी उघड झालं नाही) एक पत्र माध्यमांच्या हाती लागलं होतं. त्यात या डॉक्टरांनी लिहिलं होतं की, "नटालियाचं युक्रेनचं बर्थ सर्टीफिकेट नक्कीच चुकीचं होतं. नटालियाचं वय नक्कीच त्यापेक्षा खूप जास्त आहे."
तर दुसरीकडे मायकल बार्नेट यांचे वकील जेम्स मेट्झगर यांनी बझफीड न्यूजशी बोलताना म्हटलं होतं की, "जे पुरावे समोर आलेत त्यावरून मला तरी नक्कीच वाटतं की ती लहान मुलगी नाहीये. तिचं वय नक्कीच 18 पेक्षा जास्त आहे."
पण कोर्टात केस चालू असल्याने त्यांनी अधिक माहिती द्यायला नकार दिला.
या केसचा अजून निकाल आलेला नाही, पण कोर्टाने बार्नेट दांपत्यांला याबद्दल आता मीडियाशी बोलण्यास मनाई केली आहे.
नटालिया बार्नेट कुटुंबाच्या घरात आली तेव्हा खरंच छोटीशी चिमुरडी होती की विशीतली पाताळयंत्री महिला हे कळायला काही वेळ जावा लागेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)