सतत रडतो, खायला घातलं की थुंकतो म्हणून आईने केला दत्तक बाळाचा खून

    • Author, डंकन लेदरडेल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

लेलँड-जेम्स कॉर्कील एक गोंडस चिमुरडा होता, वय होतं फक्त 13 महिने. त्याचा खून केला त्यालाच दत्तक घेऊ पाहणाऱ्या आईने.

लॉरा कॅसल या महिलेने आपल्याच दत्तक बाळाचा खून केला. तिला आता जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, आणि तिला आता कमीत कमी 18 वर्षं तुरुंगात काढावी लागतील.

पण आईने आपल्या बाळाचा खून करावा अशी वेळ तिच्यावर का आली? ही त्याचीच गोष्ट.

इंग्लंडमधल्या कंब्रिया शहरात राहाणाऱ्या लेलँड-जेम्सचं इवलंस आयुष्य अवघड आणि अडचणीचंच होतं. त्याचा जन्म झाल्यानंतर दोनच दिवसांनी त्याला एका कुटुंबाकडे सांभाळायला दिलं. त्याला दत्तक पालक शोधणं सुरूच होतं.

लेलँड-जेम्सचा पहिले आठ महिने सांभाळ करणाऱ्या शार्लट डे म्हणतात, "तो खूपच गोंडस, आनंदी मुलगा होता."

त्याला खेळताना टुणकन उड्या मारायला आवडायचं, गोष्टी ऐकायला आवडायच्या, त्याला कुशीत उचलून फिरावं लागायचं.

पण त्याला कारमध्ये त्याच्या कार सीटमध्ये बसवलं की तो रडायचा आणि जेवायचं म्हटलं की तोंड वेडवाकडं करायचा, शार्लट सांगतात.

पण काही दिवसांनी लेलँड-जेम्स त्याचं रडणं वाढलं आणि वजनही कमी व्हायला लागलं. दवाखान्यात नेल्यावर कळलं की त्याला पॉलिरिक स्टेनोसिस असा आजार झाला होता. त्यामुळे त्याच्या पचनसंस्थेवर परिणाम व्हायचा म्हणून त्याला जेवण जायचं नाही.

त्याचं ऑपरेशन झालं आणि उपचारानंतर तो खडखडीत बरा झाला. त्याचं वजनही मस्त वाढलं होतं.

मे 2020 मध्ये अजून एक चांगली बातमी आली. त्याला दत्तक आई-बाबा मिळणार होते.

स्कॉट आणि लॉरा कॅसल या दांपत्याला अनेक वर्षं बाळ हवं होतं. वंध्यत्वाची समस्या असल्यामुळे त्यांना बाळ होऊ शकलं नाही. लॉरा डिप्रेशनमध्ये गेली आणि तिने स्वतःची नोकरीही सोडली.

त्यांनी अनेक वर्षं मुल दत्तक घेण्याचा विचार केला होता. अखेरीस 2019 साली त्यांनी मुल दत्तक घेण्यासाठी अर्ज केला. एकेदिवशी त्यांना फोन आला की त्यांना दत्तक मुलगा मिळू शकतो.

पुढची प्रक्रियाही सोपी नव्हती. या दांपत्याला अनेक मुलाखती द्याव्या लागल्या, दत्तकविधान पूर्ण व्हायच्या आधी सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी भेटी दिल्या, त्यांची चौकशी झाली, पण अखेरीस लेलँड-जेम्स त्यांच्या घरी आला.

आठ महिन्यांच्या या बाळाला आता कायमचं घर, कुटंब मिळालं असं सगळ्यांनाच वाटलं, पण ही आशा फोल ठरली.

'सैतानाचा मुलगा'

लेलँड-जेम्स नव्या घरात आल्यानंतर खूप रडायचा, विशेषतः रात्री असं कॅसल दांपत्यांनी सांगितलं.

"मला वाटतं त्याला आम्ही आवडलो नव्हतो," स्कॉट कॅसलनी कोर्टात सांगितलं.

बाळाला सांभाळायची सगळी जबाबदारी लॉरावरच येऊन पडली होती कारण स्कॉटची नोकरी रात्रपाळीची होती.

लेलँड-जेम्स त्यांच्या घरी आल्यानंतर पहिल्या काही आठवड्यांत लॉरा तिच्या नवऱ्याला सारखे मेसेज करायची ज्यात बाळाबद्दल तक्रारी असायच्या आणि एका मेसेजमध्ये लिहिलं होतं की तिने आता बाळाला मारणं बंद केलं पाहिजे नाहीतर ती थांबू शकणार नाही.

पण कोर्टात साक्ष देताना कॅसल पतीपत्नीने म्हटलं की, "मारणं याचा अर्थ हातावर किंवा बाळाच्या पार्श्वभागावर हलकीशी चापट. याचा हेतू बाळाला इजा करणं नव्हता तर त्याला धाक दाखवणं होता."

लॉराने बाळाचा उल्लेख एकदा 'सैतानाचा मुलगा' असाही केला होता पण ती फक्त गंमत होती असंही पतीपत्नीने म्हटलं.

नवं बाळ आणि कॅसल दांपत्य यांच्यात अपेक्षेएवढी जवळीक निर्माण होत नाहीये असं दत्तक प्रक्रिया हाताळणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्याही लक्षात आलं होतं.

लॉरा या बाळावर प्रेम करू शकत नाहीये असंही निरीक्षणही एका कार्यकर्त्याने नोंदवलं, तर लेलँड-जेम्सने काहीही केलं तर कॅसल दांपत्याला आनंद वाटत नाही, असंही मत एकाने व्यक्त केलं.

पण बाळाच्या अंगावर कोणत्याही जखमा, किंवा मारहाणीच्या खुणा नव्हत्या, त्यामुळे बाळाच्या सुरक्षेविषयी चिंता करावी, असं कोणाला वाटलं नाही.

अर्थात सगळंच वाईट होत होतं असं नाहीये. या कुटुंबाने सांगितलं की बाळासोबत काही चांगले दिवसही त्यांनी घालवले. पण बाळाला वाढवताना एक पाऊल पुढे टाकलं की दोन पावलं मागे यावं लागत होतं, असं नवराबायकोचं म्हणणं होतं.

त्यांना आता हे बाळ नकोसं झालं होतं. पण स्कॉटचं म्हणणं पडलं की दत्तक घेतलेलं बाळ असं परत करत येत नाही. तर लॉराने कोर्टात सांगितलं की त्यांच्या कुटुंबातले इतर सदस्य या बाळाच्या प्रेमात पडले होते.

लेलँड-जेम्सचा पहिला वाढदिवस आनंदात साजरा झाला, ख्रिसमसलाही सगळ्यांनी छान छान फोटो काढले. पण तरीही लॉरा अधूनमधून स्कॉटला बाळाची तक्रार करायला मेसेज करतच होत्या.

स्कॉटही तिला रिप्लाय करताना म्हणायचा की, 'ही तुझी चूक नाहीये, बाळाचा दोष आहे.'

6 जानेवारी 2021 ला स्कॉट रात्रपाळी संपवून घरी भल्या पहाटे घरी आला. बाळ आणि लॉरा झोपले होते. स्कॉटने आयमास्क लावला, कानात बोळे घातले आणि गाढ झोपून गेला.

दोनच तासांनी त्याला लॉराने उठवलं. तिच्या हातात बेशुद्धवस्थेतलं बाळ होतं.

लॉराचं म्हणणं होतं की लेलँड-जेम्स सोफ्यावरून खाली पडला आणि त्याच्या श्वास मंदावला आहे.

हेच स्पष्टीकरण लॉराने नंतर डॉक्टरांनाही दिलं, तिचं म्हणणं होतं की बाळ सोफ्यावरून जोरात खाली आदळलं.

पण डॉक्टरांचा तिच्यावर विश्वास बसला नाही.

लेलँड-जेम्सच्या मेंदूचे स्कॅन केल्यानंतर लक्षात आलं की त्यांच्या मेंदूला गंभीर इजा झाली आहे. मेंदूला सुज आहे, रक्तस्राव होतोय आणि 7 तारखेला या बाळाचा मृत्यू झाला, असं घोषित करण्यात आलं.

लॉराने पोलिसांनाही तीच कहाणी सांगितली की बाळ सोफ्यावरून खाली पडलं, पण तिच्या बोलण्यातला खोटेपणा वैद्यकीय चाचण्यांनंतर लक्षात आला.

लेलँड-जेम्सच्या शरीरात 'शेकन बेबी सिंड्रोम' म्हणजे रागाने बाळाला गदागदा हलवणे, याची लक्षणं दिसली.

त्याच्या डोक्यात रक्तस्राव झाला होता, मेंदूत रक्तस्राव झाला होता, डोळ्यात रक्त उतरलं होतं, त्याच्या मणक्याला इजा झाली होती आणि मानेला गंभीर दुखापत झाली होती.

पण त्याचं वय आणि वजन लक्षात घेता फक्त गदागदा हलवल्याने त्याला इतकी गंभीर दुखापत होणं शक्य नव्हतं. त्याला नक्कीच कुठेतरी जोरात आदळलं गेलं होतं.

या प्रकरणी खटला सुरू होण्याआधी लॉराने मान्य केलं की तिच्याकडून चुकून लेलँड-जेम्सला इजा झाली. तिने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मान्य केला होता, पण आपण मुद्दामहून बाळाचा खून केला नसल्याचं तिचं म्हणणं होतं.

तिचं म्हणणं होतं की बाळ रडायचं थांबतच नव्हतं, म्हणून नैराश्याच्या झटक्यात तिने बाळाला उचलून गदागदा हलवलं आणि त्याचं डोकं सोफ्याच्या आर्मरेस्टवर आदळलं.

पण सरकारी वकिलांचं म्हणणं होतं की तिने घृणास्पद गुन्हा केला आहे कारण शेजाऱ्यांनी काहीतरी आदळल्याचा आवाज ऐकला पण बाळ रडत असल्याचा आवाज त्यांना आला नव्हता.

सरकारी वकिलांनी म्हटलं की लेलँड-जेम्सला खायला घालत असताना त्याने तोंडातला घास थुंकला याचा राग लॉराला आला. तिने त्याला उचललं आणि त्याचं डोकं जोरात आदळलं.

लॉराने आपल्या हातून लेलँड-जेम्सच्या मृत्यू झाल्याचं मान्य केलं, पण तसा आपला हेतू नसल्याचं म्हटलं.

पण ज्युरींना तिचा बचाव अमान्य होता आणि त्यांना तिला खुनाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवलं.

तिच्या नवऱ्याची या प्रकरणी निर्दोष मुक्तता झाली.

कोर्टाने निकाल दिला तेव्हा स्कॉट हमसून हमसून रडायला लागला. लॉराने लेलँड-जेम्सचा आपल्या हातून मृत्यू झाला याची कबुली देईपर्यंत त्याला सत्य काय आहे हे माहिती नव्हतं.

"ती माझं सर्वस्व होती आणि ती खोटं बोलेलं असं मला कधी वाटलं नाही," तो म्हणाला.

सामाजिक कार्यकर्त्यांनी कोर्टात सांगितलं की या दांपत्याबद्दल काही शंका होत्या, आणि यांच्याकडे बाळ राहू द्यायचं की नाही याचा आढावा जानेवारी महिन्यात घेतला जाणार होता, पण त्याआधीच लेलँड-जेम्सचा मृत्यू झाला.

या सगळ्यानंतर एकच प्रश्न समोर येतो की हे सगळं थांबवता येऊ शकत होतं का? लेलँड-जेम्सचा मृत्यू टाळता आला असता का?

उत्तर काहीही असो, पण त्या निरागस बाळाला जगायचा अधिकार होता आणि त्याच्या दत्तक आईनेच तो अधिकार हिरावून घेतला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)