You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एका 3 वर्षांच्या चिमुरडीचं अपहरण आणि तिच्या 52 वर्षं चाललेल्या शोधाची गोष्ट
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
"शेरीलचं वर्णन करायचं असेल तर फक्त दोनच शब्द आहेत. खोडकर आणि क्यूट."
"मी कायमच ही आशा उराशी बाळगली की तिचा हसतानाचा चेहरा मला एकदा तरी दिसेल. मग भले ती कितीही वर्षांची असो."
"तिला मी शेवटचं पाहिलं तेव्हाही ती हसत होती, खेळत होती. माझी पाठ काही सेकंदांसाठी वळली आणि ती दिसेनाशी झाली ती कायमचीच. मला अजूनही त्या क्षणाची दुःस्वप्न येतात. मी स्वतःला कधी माफ करू शकलो नाही."
हे शब्द आहे 59 वर्षांच्या रिकी ग्रिमर यांचे.
1970 साली ऑस्ट्रलियातल्या सिडनीजवळच्या फेअरी मेडो गावातून तीन वर्षांची शेरील ग्रिमर गायब झाली. त्यावेळी संपूर्ण ग्रिमर कुटुंब समुद्र किनारी खेळत होतं. शेरील शेवटची समुद्रकिनाऱ्यावरच्या चेंजिग रूममध्ये दिसली होती.
चेजिंग रूमच्या बाहेर तिचे भाऊ रिक होते. त्यांची पाठ फक्त काही सेकंदांसाठी वळली आणि शेरीलचं अपहरण झालं. पोलिसांना खात्री होती की तिचं अपहरण झालंय. पण त्यासाठी कधीच कोणाला शिक्षा झाली नाही, ना खरं काय घडलं ते समोर आलं.
या प्रकरणाला आता पाच दशक उलटून गेल्यावर नवी कलाटणी मिळाली आहे. एक नवीन साक्षीदार पुढे आलाय, जो त्यावेळी सात वर्षांचा होता. या साक्षीदाराचं म्हणणं आहे की त्याने त्यावेळी त्या बीचवर पाहिलं की एक किशोरवयीन मुलगा एका लहान मुलाला उचलून नेत आहे.
"मला लहान मुलाच्या किंचाळण्याचा आवाज येतोय असं वाटलं. पण त्यावेळी बीचवर जोराचे वारे वाहायला लागले होते. मला कोणा लहान मुलीचं अपहरण होतंय असं वाटलं नाही," या साक्षीदाराने बीबीसीला सांगितलं.
पुढे तो म्हणाला, "आम्ही त्यावेळी पोलिसांना संपर्क केला नाही कारण आम्हाला त्यावेळी इंग्लिश भाषा येत नव्हती. मी आणि माझं कुटुंब ऑस्ट्रेलियात आलेले स्थलांतरित होतो."
शेरील जणूकाही हवेत विरून गेली...
ही घटना घडली तेव्हा रिकी सात वर्षांचे होते. त्यानंतर गेली 52 वर्षं हे कुटुंब अव्याहतपणे शेरीलचा शोध घेतंय.
तिचे आईवडील आता या जगात नाहीत. शेरीलचं काय झालं हा प्रश्न अनुत्तरितच मनात ठेवून त्यांनी डोळे मिटले.
पण रिकी मात्र अजूनही आपल्या बहिणीचा शोध घेत आहेत.
एका अपहरणाची, एका कुटुंबाची आणि एका भावाने आपल्या बहिणीचा 50 वर्षांहून जास्त काळ शोध घेण्याची ही कथा.
सत्तरच्या दशकात इंग्लंडमधली अनेक कुटुंब ऑस्ट्रलियात स्थायिक होत होती. ग्रिमर कुटुंबही त्यातलंच एक. ते ऑस्ट्रेलियातल्या न्यू साऊथ वेल्सच्या फेअरी मेडो या गावात येऊन स्थायिक झाले.
हे गाव म्हणजे समुद्रकिनारी वसलेली एक टुमदार वस्तीच होती म्हणा ना. दुसऱ्या महायुद्धानंतर जगातल्या अनेक देशांची अवस्था वाईट झाली होती. लोकांचे जेवणाचे वांधे झाले होते. त्या सुमारास ऑस्ट्रेलियन सरकारने स्थलांतरितांसाठी योजना सुरू केल्या. युरोपातली लोक तेव्हा फक्त 10 डॉलर भरून तिथे स्थलांतरित होऊ शकत होते.
ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या तेव्हा फारच कमी होती त्यामुळे लोकसंख्या वाढवण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ही योजना सुरू केली होती.
या योजनेअंतर्गत ग्रिमर कुटुंब इंग्लंड सोडून इथे आलं.
त्या दिवसांची आठवण सांगताना रिकी म्हणतात, "सुट्टीच्या शिबिरासारखं वातावरण असायचं. जगभरातून लोक तिथे आलेले होते. वीकेंडला गाण्याबजावण्याचा कार्यक्रम व्हायचा. आम्हा स्थलांतरितांना राहाण्यासाठी तात्पुरत्या खोल्या दिलेल्या होत्या."
कॅरोल आणि व्हिन्स ग्रिमर यांना चार मुलं होती. सगळ्यांत मोठे रिकी, मग स्टीव्हन आणि पॉल. शेरील सगळ्यात लहान होती आणि या दांपत्यांची एकुलती एक मुलगी होती.
12 जानेवारी 1970 ची दुपार होती. ऑस्ट्रेलियातला उन्हाळा तापला होता. मुलांनी आग्रह केला म्हणून कॅरोल त्यांना घेऊन बीचवर आल्या. मुलं पाण्यात खेळत होती पण अचानक वारा सुटला आणि धुळीचं वादळ उठलं.
कॅरोल रिकीला म्हणाल्या की भावंडांना घेऊन वरती चेंजिंग रूमपाशी थांब मी आलेच. तीन वर्षांची चिमुरडी शेरील पळत पळत लेडीज रूममध्ये घुसली. तिला हाक मारूनही ती बाहेर येईना. तिच्या तिन्ही भावांना लेडीज रूममध्ये जायला लाज वाटली म्हणून ते आईला घ्यायला पुन्हा बीचवर आले.
रिकी म्हणतात, "सगळं इतक्या पटकन घडलं ना. आम्हाला खाली येऊन आईला घेऊन वर येईपर्यंत फक्त 90 सेकंद गेले. पण तोवर ती नाहीशी झाली होती. म्हणजे अगदी एका क्षणी होती आणि दुसऱ्या क्षणी नाहीशी झाली."
"आई शोधायला लागली, आम्ही हाका मारायला लागलो. संपूर्ण गोंधळ उडाला. इतर लोक तिला शोधायला लागले. पण ती सापडली नाही."
रिकी स्वतःला कधीच माफ करू शकले नाहीत. शेरील गायब झाल्याच्या घटनेचा रिकीवर खूप परिणाम झाला.
"मला लाखो वेळा लोकांनी सांगितलं की ती नाहीशी झाली यात तुझी काही चूक नाहीये. मी स्वतःला माफ करण्याचाही प्रयत्न केला पण करू शकलो नाही," ते म्हणतात.
एक 59 वर्षांचा माणूस तो फक्त 7 वर्षांचा असताना घडलेल्या घटनेसाठी स्वतःला माफ करू शकत नाहीये. अजूनही!
रिकी त्यांच्या आयुष्यात कधीच स्थिरावू शकले नाहीत. त्यांनी तीनदा लग्न केलं, तिन्ही वेळेस त्यांचा काडीमोड झाला आणि तोही वाईट पद्धतीने. रिकी आयुष्याच्या एक टप्प्यात व्यसनी झाले होते, दारू खूप प्यायचे.
एकदा त्यांच्या मित्रांना कारमध्ये पडलेले आढळले. कदाचित तेव्हाच मेले असते पण मित्रांनी त्यांना वाचवलं असं त्यांचं म्हणणं आहे.
बीबीसीच्या जॉन के यांनी या संपूर्ण घटनेवर 8 पॉडकास्टची मालिका केली आहे. त्यासाठी ते ऑस्ट्रेलियात जाऊन सगळ्यांना भेटले आणि नक्की काय झालं हे शोधण्याचा प्रयत्न केला.
आज या घटनेला 52 वर्षं उलटून गेली असली तरी शेरीलचा उल्लेख आला की रिकीच्या डोळ्यात पाणी तरळतंच.
आता रिकी बरेचसे सावरले आहेत. त्यांना एक गर्लफ्रेंड आहे, व्यवस्थित नोकरी आहे पण भूतकाळ त्यांची पाठ सोडत नाही.
या घटनेने ग्रिमर कुटुंब बदललं ते कायमचंच. शेरीलचे दुसरे भाऊ पॉल ग्रिमर हे जॉन के यांच्याशी बोलताना म्हणतात, "ती हरवली तेव्हा माझे वडील फार तरूण होते. एक असा माणूस जो त्याच्या चार मुलांना चांगलं आयुष्य देता यावं म्हणून आपला देश सोडून परमुलुखात आला."
"पण शेरील हरवली त्या घटनेनंतर ते मोडून पडले. ते कायमचे बदलले आणि आमचं आयुष्यही बदललं. नातवंड झाल्यानंतरही ते कधीच कोणती गोष्ट एन्जॉय करू शकले नाहीत. फक्त सगळे सुरक्षित आहेत ना याचकडे त्यांचं लक्ष असायचं." त्यांचाही आवाज भरून येतो.
तपास
शेरील ग्रिमर नाहीशी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली गेली. माध्यमांमध्येही ही घटना प्रचंड गाजली. ग्रिमर कुटुंब एकदम प्रकाशझोतात आलं.
शेरील नाहीशी झाली त्या दिवशी नक्की काय झालं याबद्दल पोलिसांचे चार अंदाज होते.
पहिलं म्हणजे ती लपून बसली होती आणि नंतर तिला झोप लागली असावी, दुसरं म्हणजे ती समुद्राजवळ गेली आणि लाटांनी तिला समुद्रात ओढलं, तिसरं ती कुठल्या तरी जवळच्या समुद्रात जाणाऱ्या पाण्याच्या झऱ्यात किंवा कालव्यात पडली आणि चौथं म्हणजे तिचं अपहरण झालं आहे.
पण दुसऱ्या दिवशी तिचं अपहरण झालं असल्याचीच शक्यता बळावली आणि पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला.
पोलिसांना अपहरण स्थळाजवळ एक निळी फॉक्सवॅगन गाडी दिसल्याचं कळलं. त्यांना तिसऱ्याच दिवशी त्यांना खंडणी मागणारी एक चिठ्ठी मिळाली ज्यात 10 हजार डॉलर्सची मागणी केली होती. न्यू साऊथ वेल्समधल्या बुलाय लायब्ररीसमोर पैसै घेऊन भेटा म्हणजे मुलगी जिवंत परत मिळेल असं त्यात लिहिलं होतं.
पण चिठ्ठी लिहिणारी व्यक्ती आलीच नाही. ना कधी त्या व्यक्तीने पुन्हा कोणाशीही संपर्क केला.
ग्रिमर कुटुंबावरचा ताण वाढत होता, शेरीलची माहिती देणारे खोटे फोन, चिठ्ठ्या येत होत्या. कोणीही उठून शेरील दिसल्याचा दावा करत होतं. त्यामुळे ते कुटुंब ऑस्ट्रेलिया सोडून इंग्लंडला 10 वर्षांसाठी परत आलं.
पोलिसांकडे प्रत्यक्षदर्शींनी पाहिलेल्या एका माणसाचं वर्णन होतं. त्यांनी तीन संशयितही चौकशीसाठी ताब्यात घेतले पण या संशयितांचं वर्णन प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या माणसाशी जुळत नव्हतं.
घटना घडून 18 महिने झाल्यानंतर अचानक एक त्याला नवं वळण लागलं. एका स्थानिक किशोरवयीन मुलाने शेरीलचं अपहरण आणि खून केल्याचं कबूल केलं. त्यावेळी या मुलाचं वय कदाचित 15-16 असेल.
त्या मुलाने त्या दिवशी काय घडलं हे पोलिसांना सांगितलं. त्याच्या बोलण्यात एक पोलादी गेट, गुरांचा गोठा, आणि जिथे खून झाला ती जवळच्या एका लहान ओढ्याशेजारची जागा असे उल्लेख होते.
हा मुलगा पोलिसांना त्याने जिथे शेरीलचा मृतदेह दफन केलं असं त्याचं म्हणणं होतं तिथे घेऊन गेला. पण तिथे रिडेव्हलपमेंट झाली असल्यामुळे 'मी नक्की सांगू शकत नाही' असं तो शेवटी पोलिसांना म्हणाला.
पोलिसांनी या जागेच्या मालकाकडे चौकशी केली आणि त्याने या मुलाच्या कथनाच्या विपरित अशा गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की इथे ना कधी पोलादी गेट होतं ना गुरांचा गोठा.
या मुलाचं कथन आणि मिळणारे पुरावे जुळत नव्हते. पोलिसांची खात्री पटली होती की हा मुलगा खोटं सांगतोय, गुन्हा केल्याची खोटी कबुली देतोय.
शेरीलची माहिती देण्यासाठी 5000 डॉलर्सचं बक्षीस जाहीर करण्यात आलं पण तरीही तिचं पुढे काय झालं हे कोणालाच कळू शकलं नाही. लवकरच ही घटना - cold cases मध्ये म्हणजे कोणताच उलगडा न होणाऱ्या केसेसच्या थंड बस्त्यात गेली.
पुढे काय ?
त्यानंतर 30 वर्षं या प्रकरणी काहीच झालं नाही. 2000 साली न्यू साऊथ वेल्सच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं की, शेरील आणि तिचं अपहरण केलेला व्यक्ती दोघांचाही मृत्यू झालेला असू शकतो किंवा शेरील जिवंतही असू शकते. आता काहीच सांगता येणार नाही. कोणाकडे काही माहिती असेल तर पुढे या, असं पोलिसांनी आवाहन केलं.
2008 साली एका महिलेने दावा केला की तीच शेरील आहे. पण डीएनए तपासणीत कळलं की ती शेरील नाहीये.
रिकी म्हणतात, "त्या महिलेला खात्री होती की तीच शेरील आहे. तिला वाटत होतं की ती ज्या कुटुंबात राहातेय ते तिचं कुटुंबच नाहीये. माझ्याशी मनात आशा निर्माण झाली जेव्हा मी तिच्याशी फोनवर बोललो. पण भेटल्यावर कळलं की ही शेरील नाहीये. कसं विचाराल तर माहिती नाही. तुम्हाला कळतं आतल्या आत बरोबर."
2011 साली एका शवविच्छेदकाने म्हटलं की शेरील गायब झाल्यानंतर लगेचच तिचा मृत्यू झाला. त्यांनी शिफारस केली की ही केस पुन्हा रिओपन करावी.
कॅरोल ग्रिमर यांनी म्हटलं की त्यांना खात्री आहे त्यांची मुलगी अजूनही जिवंत आहे. मग पोलिसांनी पुन्हा शेरीलची खात्रीलायक माहिती देणाऱ्याला 1 लाख डॉलर्सचं इनाम घोषित केलं.
या प्रकरणाच्या तपासासाठी पुन्हा नवा टास्क फोर्स स्थापन करण्यात आला. पण यानंतर शेरीलचे आईवडील कॅरोल आणि व्हिन्स ग्रिमर मरण पावले.
आपल्या मुलीचं काय झालं हे त्यांना शेवटपर्यंत कळलं नाही.
पुराव्यांची फेरतपासणी
1971 साली एका 16 वर्षांच्या मुलाने आपणच शेरीलचं अपहरण आणि खून केल्याचा कबुलीजबाब दिला होता आठवतंय?
हा मुलगा या कथेतलं तिसरं महत्त्वाचं पात्र.
2016 साली या प्रकरणांच्या पुराव्यांचं पुनरावलोकन करायचं ठरलं. साक्षीदारांचे जबाब पहिल्यांदाच डिजिटाईज्ड केले गेले होते. या पुनर्तपासणीत आधीच्या तपासात झालेल्या अनेक चुका लक्षात आल्या.
काही बाबींचा तपास नीट केला गेला नव्हता. 1971 साली त्या मुलाने गुन्ह्याची कबुली देताना ज्या जागेचं वर्णन केलं होतं पोलीस तिथे पुन्हा चौकशीला पोहचले.
आधी ज्या मालकाकडे चौकशी केली होती त्याच्या मुलाशी पुन्हा बोलले. आता या मुलाने वडिलांच्या उलट माहिती दिली.
त्याने सांगितलं की इथे गोठाही होता आणि पोलादी गेटही. तसंच एक पायवाट जवळच असणाऱ्या ओढ्याकडे जात होती.
मग याच वर्षी पोलिसांनी जाहीर केलं की त्यांना तीन असे साक्षीदार सापडले आहेत ज्यांनी एका किशोरवयीन मुलाला चेंजिंग रूमपाशी घुटमळताना पाहिलं होतं. पोलिसांनी असंही म्हटलं की एक मुलगा एका सोनेरी केसांच्या लहान मुलीला घेऊन जाताना पाहिला गेला होता.
हा मुलगा आता साठीत असेल आणि त्याने स्वतःहून पुढे यावं असं आवाहन पोलिसांनी केलं.
अटक झाली खरी पण...
2017 साली या प्रकरणी पोलिसांनी एका माणसाला अटक केली. या माणसाची साठी उलटली होती. हा तोच माणूस होता ज्याने 50 वर्षांपूर्वी गुन्ह्याची कबुली दिली होती. पण या माणसाचं नाव आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही कारण कोर्टाचे तसे आदेशच आहेत. या माणसाचं नाव जाहीर होऊ शकत नाही.
पोलिसांचं म्हणणं होतं की याच माणसाने शेरीलचं अपहरण आणि खून केला. तिचा मृतदेह आता 47 वर्षांनी सापडू शकत नाही कारण तिथे आता खूपच बांधकाम झालंय.
या माणसाने त्याच्या 1971 साली दिलेल्या कबुलीजबाबात म्हटलं होतं की त्याला 'दुसऱ्याचा खून करण्याच्या किंवा स्वतः जीव देण्याच्या उत्कट भावना जाणवतात.'
त्याने म्हटलं होतं की शेरीलचं अपहरण केल्यानंतर त्याने तिला जवळच्याच एका खड्ड्यात 35 मिनिटं तोंडात बोळा कोंबून बांधून ठेवलं होतं. त्याने मग तशाच अवस्थेत तिला 3 किलोमीटर चालत लांब नेलं.
त्याने आपल्या मूळ कबुलीजबाबात हेही म्हटलंय ती तिच्या तोंडातला बोळा काढल्यानंतर ती ओरडायला लागली आणि म्हणून त्याने तिच्या तोंडावर हात दाबला आणि नंतर तिचा गळा दाबून खून केला. तिचा मृत्यू झाल्यावर त्याने तिचे कपडे काढले आणि तिला त्याच भागात पुरलं.
सरकारी वकिलांचं म्हणणं होतं की, या माणसाला अशा काही गोष्टी माहिती होत्या ज्या फक्त ज्याने शेरीलला त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिलं किंवा जो बीचवर त्या दिवशी होता त्यालाच माहिती असतील.
त्याने सांगितलं की, शेरीलने गडद निळ्या रंगाचा स्वीमसूट घातला होता. तिच्या अंगावर पांढरा छोटा टॉवेल होता आणि तिला पाणी पिण्यासाठी कोणीतरी वॉटर फाऊंटनजवळ उचलून घेतलं होतं.
शेरीलला पाणी पिताना मीच उचललं होतं, असं रिकी म्हणतात.
पण ही केस कोर्टात टिकली नाही. इतका जुना कबुलीजबाब ग्राह्य धरता येणार नाही असं कोर्टाने म्हटलं.
या माणसानेही गुन्हा नाकारला. सरकारी वकिलांनी केस मागे घेतली आणि 2019 साली हा माणूस निर्दोष सुटला.
रिकी आणि त्यांच्या कुटुंबावर हा दुसरा आघात होता.
"आमचा विश्वास बसत नव्हता. जवळपास 50 वर्षं आम्हाला माहितीच नव्हतं की कुणीतरी समोर आलं होतं, कुणीतरी गुन्हा कबूल केला होता. आम्हाला कधी सांगितलं गेलं नाही. तेव्हाच आम्हाला कळलं असतं तर आमचं आयुष्य आज वेगळं असतं. ज्या यातना आम्ही भोगल्या त्यांचं काय?," रिकी उद्वेगाने जॉन के यांना म्हणतात.
"दुसऱ्या कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ न येवो. माझा संताप संताप होतोय. मला स्वतःची चीड येतेय, जगाची चीड येतेय. फक्त संताप येतोय," ते म्हणतात.
रिकी आता ऑस्ट्रेलियात राहातात. तिकडे उन्हाळा सुरू झाला की ते युरोपात ट्रेकिंगला येतात. तेव्हा उत्तर गोलार्धात थंड असते. त्यांना विचारलं की छान उन्हाळ्यात बीचवर जायचं सोडून इतक्या मरणाच्या थंडीत तुम्ही का येता? तर ते म्हणतात, 'मी आजही बीचवर जात नाही.'
शेरीलचं काय झालं हे शोधण्याचा ध्यास इतक्या वर्षांनीही त्यांनी सोडलेला नाही.
"माझ्या आईवडिलांच्या मृत्यूच्या आधी मी त्यांना वचन दिलं होतं. मी शेरीलला शोधून काढीन किंवा कमीत कमी तिच्याबाबतीत काय झालं हे तरी शोधेन. मी त्याशिवाय थांबणार नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)